‘‘व्यक्तीला पुढे जाण्याची धडपड करावीशी वाटण्याइतपत स्पर्धा जरूर असावी. सदैव कानशिलावर पिस्तूल रोखून किंवा मानेवर सुरा ठेवून यश नाही मिळवता येत. चुकूनमाकू न तसं मिळालं तरी त्याची गोडीही नाही वाटत. प्रत्येक वेळी, प्रत्येक बाबतीत आपलंच मूल पहिलं यावं असला आततायीपणा टाळता आला तरी खूप होईल कदाचित. त्यांना ‘ऑल द बेस्ट’ म्हणू या आणि ‘ऑलवेज द बेस्ट’चा ससेमिरा त्यांच्यामागे लावणं थांबवू या.’’
गावात मोठी खळबळ उडावी, अशी घटना घडली होती. चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत आपण निवडले गेलो नाही, हे कळल्यावर चौथी इयत्तेतला एक मुलगा मध्यरात्रीपर्यंत घरीच गेला नव्हता. शाळेची आणि आई-बापाची पुरती पाचावर धारण बसवली होती पोरानं. रात्री उशिरा का होईना तो सुखरूप घरी पोहोचला होता म्हणून, नाही तर कोणता अनवस्था प्रसंग ओढवला असता कोण जाणे. पालक सभेपुढे त्या महिन्यात चर्चेला तोच विषय होता. या शाळा उगाचच या स्पर्धात्मक परीक्षांच्या भरीला आपल्याला घालतात, सध्याच्या अतितीव्र स्पर्धेमुळे मुलांचं मूलपण पोखरलं जातं, पहिल्यांदा हे स्पर्धात्मक वातावरण दूर केलं पाहिजे, तेवढं स्पर्धाचं लचांड दूर केलं, की मुलांच्या भावविश्वात आबादीआबाद होईल यावर बऱ्याच पालकांचं एकमत झालं आणि त्यांनी व्यवस्थापनापुढे त्या अर्थाचं निवेदन ठेवलं. पुढे तीन-चार पालकांचं एक शिष्टमंडळ या संदर्भात संस्थेच्या अध्यक्षांना भेटायलाही गेलं.
अगदी प्राथमिक शिक्षणापासून करिअर सुरू करून आज वयाच्या पासष्टीनंतर संस्थेचे अध्यक्ष झालेले ते गृहस्थ शिक्षणक्षेत्राचा दीर्घ अनुभव बाळगून होते. गावात एक स्थान आणि मान कमावून होते. त्यांच्यासमोर बसलेले पालक पुष्कळच तरुण, अननुभवी आणि कदाचित त्यामुळेच आपल्या विचारांवर अंमळ जास्तच ठाम होते. हिरिरीने सांगत होते, ‘‘बाकी काही नको, तुम्ही ही चौथीची स्कॉलरशिप वगैरे बंद करा बुवा. पोरांवर फार ताण येतो त्याचा.’’
‘‘मग शाळेची वार्षिक परीक्षा ठेवायची की नाही?’’
‘‘ती एक वेळ चालेल. तरी नकोच. चौथीपर्यंत परीक्षाच नसाव्यात.’’
‘‘ठीक आहे. अलीकडे हा विचार बळावतो आहेच. मग पाचवीपासून परीक्षा असू देत का?’’
‘‘एक वेळ.. समव्हॉट.. कारण तोवर मुलांची वयं थोडी तरी मोठी होतील.’’
‘‘मग उलट त्यांचे जास्तच मान-अपमान बळावतील. ती जास्तच मनाला लावून घेतील असं नाही वाटत? आता निदान लहान वयामध्ये तेवढं गांभीर्य कळत नसेल असंही एक वेळ म्हणता येईल ना?’’
‘‘हो, पण एकूण सध्याच्या मुलांना फारच फिअर्स कॉम्पिटिशनला, तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. तिनं ती पिचून जातात म्हणून ती कमी करावी असं आमचं म्हणणं आहे.’’
‘‘तुमच्या लहानपणी स्पर्धा नव्हती?’’
‘‘एवढी नव्हती.’’
‘‘एवढी का तेवढी तो पुढचा प्रश्न झाला. स्पर्धाच नसे का? पहिल्या नंबराचं कौतुक नव्हतं का? परीक्षेला जाताना तुमचे आई-वडील, ‘जा हं बाळा परीक्षेला जा आणि छान नापास होऊन ये,’ असं म्हणत होते का?’’
‘‘काय चेष्टा करता सर?’’
‘‘राहिलं. चेष्टा करत नाही. सिरिअसली विचारतो, पहिल्या नंबराचं कौतुक होत नव्हतं का? माझ्या लहानपणीसुद्धा होत होतं. परीक्षेत पहिला नंबर काढलास तर आईस्फ्रूट घेऊन देईन, पहिला आलास तर तीन दिवस रहाटाचं पाणी शेंदून आणायला लावणार नाही, असली आमिषं आमच्या काळातसुद्धा होती. मुद्दा काय, तर सर्व काळात स्पर्धा ही होतीच, असतेच, असणारच.’’
‘‘आता जरा जास्तच आहे.’’
‘‘मग संधीही जास्त आहेत की नाहीत? पूर्वीपेक्षा जास्त स्पर्धक, जास्त स्पर्धा, जास्त संधी असं सगळंच तर वाढत चाललंय.’’
‘‘पण पोरांच्या मनावरचा दबाव वाढायला नको आहे आम्हा लोकांना.’’
‘‘तो कोण वाढवतंय? तुम्हीच ना? आता काय सांगायचं, साध्या चाचणी परीक्षेमध्ये आमच्या मुलाला अर्धा मार्क कमी का दिला म्हणून एकेक पालक भांडायला येतात आमच्याकडे. शिक्षकांचीच परीक्षा त्यावरून घेणारे महाभाग निघतात.’’
‘‘तुम्ही शिक्षकांचीच बाजू घेणार शेवटी. सगळं चुकतं ते आम्हा पालकांचंच चुकतं. आम्ही एका व्यवस्थेचे गुलाम असतो असं नाही वाटणार तुम्हाला.’’
‘‘ते बघण्यात तर आयुष्य गेलं माझं. तो प्रश्न नाही. हल्ली जो उठतो तो व्यवस्था बदलण्याच्या मागे लागतो.’’
‘‘ये सब सिस्टमही सडेला है, वगैरे टाळ्यांची वाक्यंही असतात सिनेमामध्ये. ही सिस्टीम आपण कशी स्वीकारतोय याला काहीच महत्त्वं नाही का?’’
‘‘आमचं साधं म्हणणं आहे, पोरवयावर स्पर्धेचं ओझं लादू नये.’’
‘‘फाईन. पण मग मोठय़ांवर तरी का हवं ते? तिथे पर्याय नाही. पूर्ण स्पर्धारहित जगणं शक्य नाही आणि कदाचित योग्यही नाही. जी मॅच हरली तरी चालेल आणि जिंकली तरी चालेल ती खेळण्यात मजा वाटणार नाही. ती बघावीशीही वाटणार नाही. बाकी नुसतं पुढे जाण्याच्या आनंदासाठी पुढे जाणारी माणसं थोडीच असतात जगात. बहुतेकांना कोणाला तरी मागे सारून पुढे गेल्याचाच आनंद वाटत असतो हे स्वत:शी तरी कबूल करायला हरकत नसावी मला वाटतं.’’
‘‘थोडक्यात, तुमच्या मते शिक्षणातली स्पर्धा अशीच राहणार.’’
‘‘हो. काही प्रमाणात तरी नक्कीच. कारण जगण्यात ती आहे. फार कशाला, माणसाच्या असण्याची, जगण्याची सुरुवातही तिच्यापासूनच आहे.’’
‘‘हे काय नवीन?’’
‘‘नवीन नाही. सनातन आहे. पटकन लक्षात येत नाही इतकंच. शेकडो, हजारो, लाखो पुरुष बीजांपैकी एखादंच फळतं. का? तर ते इतरांना मागे टाकून, पुढे जाऊन स्त्री बीजाला मिळण्याची यशस्वी धडपड करतं म्हणून. बरोबर?’’
‘‘मला वाटतं आम्ही आता इथून निघावं.’’
‘‘वैतागून?’’
‘‘नाही. पुढे बोलण्यासारखं काही दिसत नाही म्हणून.’’
‘‘माझा तसा हेतू नाही. मला एवढंच म्हणायचंय की व्यक्तीला प्रेरणा देण्याइतपत पुढे जाण्याची धडपड करावीशी वाटण्याइतपत स्पर्धा जरूर असावी. हुशारीने वापरावी. मला सांगा, तुम्ही लोक मुलांच्या शिक्षणासाठी इतकं जिवाचं रान करता, ते मुलांना किती मिळतं, त्यात त्यांची प्रगती, अधोगती कुठे होते आहे हे तुमचं तुम्हाला तरी कळायला नको? आपोआप कसं कळणार ते? एक मात्र आहे. सदैव कानशिलावर पिस्तूल रोखून किंवा मानेवर सुरा ठेवून यश नाही मिळवता येत. चुकूनमाकू न तसं मिळालं तरी त्याची गोडीही नाही वाटत. प्रत्येक वेळी, प्रत्येक बाबतीत आपलंच मूल पहिलं यावं असला आततायीपणा टाळता आला तरी खूप होईल कदाचित.’’
अध्यक्ष समजुतीने, पण ठामपणे सांगत राहिले. त्यामागचा अनुभव आणि उत्कटता जागवण्याइतकी होती. तिनं पालकांच्या शिष्टमंडळामध्ये माफक चुळबूळ झाली. काहींना त्यांचं म्हणणं तंतोतंत पटलं, काहींना तितकं नाही पटलं, पण अगदीच खोडून काढावं असं कोणालाच वाटलं नाही. समारोपाकडे जाताना एकूण वर्षभरातल्या परीक्षांची संख्या कमी करावी, मार्काऐवजी किंवा क्रमांकाच्याऐवजी ग्रेड्स द्याव्यात, मेरिट लिस्ट लावू नये वगैरे मुद्दे चर्चेला आले, गेले. अध्यक्षांनी त्याबाबतचेही आपले अनुभव सांगितले. यानिमित्ताने पालकांच्या प्रतिनिधींशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या म्हणून ते खूश होते. सगळे उठल्यावर तेही दरवाजापर्यंत त्यांना सोडायला आले. दरवाजात उभं राहून म्हणाले, ‘‘ओ.के. देन, ऑल द बेस्ट!’’
‘‘आमच्यापेक्षा आमच्या मुलांना याची जास्त गरज आहे.’’
‘‘त्यांच्या पाठी तर आपण सगळेच आहोत ‘ऑल द बेस्ट’ म्हणायला. मात्र, ऑल द बेस्ट हे तोंडभरून म्हणू या आणि ‘ऑलवेज द बेस्ट’चा ससेमिरा त्यांच्यामागे लावणं थांबवू या, की पुढचं बरंच सोपं जाईल. प्रत्येकाला, प्रत्येक प्रयत्नात, प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम ते मिळवणं शक्य नाही, तशी अपेक्षा करणं हा अन्याय आहे, या विचाराच्या सोबत जाऊन बघा. कदाचित सगळाच जाच कमी वाटेल. तुम्हालाही आणि तुमच्या मुलांनाही!’’
mangalagodbole@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 17th Aug 2013 रोजी प्रकाशित
ऑलवेज
सदैव कानशिलावर पिस्तूल रोखून किंवा मानेवर सुरा ठेवून यश नाही मिळवता येत.
First published on: 17-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Childrens and study