घालूनी अकलेचा पवाड,
व्हावे ब्रम्हांडाहुनी जाड,
तेथे कैचे द्वाड करंटेपण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समर्थ रामदास स्वामींची मनाला खूप ऊर्जा देणारी ही ओवी. काही माणसे आपल्या नशिबाला दोष देतात. आपण करंटे आहोत असं त्यांना वाटतं. रामदास स्वामींना माणसानं स्वतला दुबळे अथवा करंटे मानणं अजिबात आवडत नाही. ‘‘आपल्या मनाची तयारी करा. मी वाटेल ते काम करू शकतो, हा विश्वास मनाला दिला तर प्रतिकूल परिस्थिती आपल्या प्रगतीच्या आड येत नाही, असं स्वामी सांगतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आभाळाएवढं काम करणाऱ्या सिंधुताई सकपाळ यांचं जीवन पाहिलं तर स्वामींचं सांगणं अगदी पटतं.

ताईंचा विवाह त्या अकरा वर्षांच्या असताना, त्यांच्या पेक्षा २६ वर्षांनी मोठय़ा असलेल्या श्रीहरी सकपाळ यांच्याशी झाला. ताईंची योग्यता, त्यांचं मोठेपण त्यांच्या पतीला कधी कळलंच नाही. तान्ही लेक घेऊन त्या लोकलमध्ये भीक मागत होत्या, अनेक वाईट प्रसंगातून जाताना कित्येकदा जीवन संपवावं, असंही त्यांना वाटलं, पण एका निर्णायक क्षणी त्यांच्यातील अस्मिता जागी झाली आणि त्यांनी स्वतला समजावलं, आसवे माझ्या डोळा वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका.’

गावोगावी फिरून त्यांनी लोकांकडून अनाथ मुलांसाठी मदत मागितली. ‘ममता बाल सदन’ मोठय़ा जिद्दीने उभे केले. दोन दिवसांच्या मुलापासून ते ७५ वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्वच त्यांची मुले आहेत, विधवा, परित्यक्ता, मनोरुग्ण स्त्रिया या त्यांच्या मुली. ताईंच्या बाळंतपणात गाईनं सांभाळ केला म्हणून वध्र्याला सिंधुताईंनी गोरक्षण केंद्र काढलं, इथे भाकड गायी, अपंग गायींचा सांभाळ होतो.
ताइर्ंना त्यांच्या कार्याबद्दल आत्तापर्यंत १७२ पुरस्कार मिळाले. सुरेश भट आणि बहिणाबाई यांच्या काव्यातून त्यांना जगण्याचे बळ मिळाले, असे त्या सांगतात. त्यांचा समाजाला एक अमूल्य संदेश आहे, तो असा, वेदनांची कीव करा, वेदनांचा पराजय करा. स्वत ला कधीही दुबळे समजू नका.

– माधवी कवीश्वर

मराठीतील सर्व चित्ती असो द्यावे समाधान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas shlok
First published on: 09-04-2016 at 01:03 IST