आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला. या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव  म्हणाले, ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी’ मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत. त्यावर मुक्तानं विचारलं, ‘‘दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही? तुम्ही म्हणता, ‘तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा’ तसं इतर लोकांना का वाटत नाही? त्यावर ज्ञानोबा म्हणाले, ‘‘मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी’. अगं मुक्ता पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते. म्हणजे नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल. तुला सांगतो, सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे. हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे.’’ हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात, ‘अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे’ हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते. तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग..’, नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली..’ संत अमृतराय म्हणतात, ‘अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी..’ संत सेना महाराज म्हणतात, ‘जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची..’ आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो.

असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, ‘संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे’. संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ‘काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

madhavi.kavishwar1@gmail.com