|| डॉ. सुनीलकु मार लवटे

  ‘‘मी कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो तेव्हा मुलांना उदाहरण द्यायचो, ‘अरे बस, रेल्वे, रिक्षा प्रवासात कुणाच्याही शेजारी जाऊन बसता. इथे तर चार-चार वर्षांची तुमची एकमेकांशी ओळख आहे. कँटीन, कॉफी हाऊसमध्ये एकत्र बसता. वर्गात का नाही?’ तर त्याचं उत्तर होतं, औपचारिक-अनौपचारिक अंतर आपण कापलेलंच नाही. तिथे आपण मुखवटे पांघरूनच जगत असतो. भारतात स्त्रिया जितक्या ‘अ‍ॅडाप्टिव्ह’आहेत, तितके पुरुष नाहीत. स्त्रीनं नऊवारी, पाचवारी, स्कर्ट, जीन्स, चुडीदार, केवढा मोठा पल्ला गाठला. पुरुष फक्त धोतरातून पँटस्, पटलून्समध्येच अडकून राहिला. पुरुष अजूनही रमा, रमी, रमच्या खेळातून मोकळा झालेला नाही. पुरुषवीण जोपर्यंत आतून उसवली जात नाही, तोपर्यंत समाजात मूलभूत परिवर्तन घडणार नाही. पुरुषांनी अंतर्मुख होऊन स्वत:स बदलणं हाच यावर उपाय आहे. त्यासाठी समाजात लिंगनिरपेक्ष भावसाक्षरता रुजवणं गरजेचं आहे. एकमेकांचं ‘उभयान्वयी अव्यय’ होऊन!…’’ 

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा

जीवसृष्टीतील अन्य प्राणी-पक्षी वंशातील जीवांप्रमाणे मानवी वंशाचा जन्मही नर, मादी म्हणूनच होतो. नराचा ‘पुरुष’ होणं नि मादीचं ‘स्त्री’ होणं ही मनुष्य समाजाची सांस्कृतिक निर्मिती आहे. स्त्री-पुरुषाचं ‘माणूस’ होणं हे मानवी सभ्यतेचं सुरम्य ‘पहाटस्वप्न’ आहे. आपली घरं, कुटुंबं या स्त्री-पुरुष घडणीच्या टाकसाळी नि प्रयोगशाळा होत. पुरुष घर, कुटुंबात आकारतो, समाजात त्याचा विकास होतो, धर्म, जात त्यावर शिक्कामोर्तब करते, मोहोर उठवते.

आई, दाई, बाई ही समाजमनातली उतरंड, उतरती भाजणी मुळातच समजून घेतली पाहिजे. बायको असलेल्या घरात पुरुषाला रिमोट दिसत नाही, की माठातलं पाणी पिता येत नाही. इतकं च कशाला, भारतातल्या घरात पुरुषांना हात नसतात. म्हणून त्याला झाडू मारता येत नाही, कपडे धुता येत नाहीत, भांडी घासता येत नाहीत. त्याला पंख्याचं बटणसुद्धा अनेकदा माहीत नसतं घरातलं. नवरा, बायको दोघं मिळूनच कामावरून घरी येतात, पण पाणी मात्र बाईनंच ग्लास भरून समोर ठेवायचं. मग हे बाजीराव पाणी पिणार!  हा माज कधी उतरणार?  माज उतरवायची मात्रा फक्त स्त्रीतच असते. फक्त ती वापरत नाही. मायाजाल, गांधारीची पट्टी, सती, सावित्री, सीता यांच्या निमित्तानं सारी मिथकं पुरुषांनी बेमालूमपणे स्त्रीच्या माथी मारली नि गळी उतरवली. स्त्रीनं ‘मिथक’ तयार केल्याचा इतिहास नाही. म्हणूनच आजच्या काळातल्या स्त्रियांनी काही पुस्तकं वाचून कोळून प्यायला हवीत. बेट्टी फ्रीडनचं ‘द फे मिनाइन मिस्टीक’,  सीमॉन द बोउआरचं ‘द सेकंड सेक्स’, अ‍ॅलन आणि बार्बरा पीजचं ‘व्हाय मेन डोन्ट लिसन अँड विमेन कान्ट रीड मॅप्स’, डॉ. जर्मन ग्रेअरचं ‘द व्होल वुमन’ आणि ‘द फीमेल यूनक’ ही दोन्ही पुस्तकं. शिवाय इस्मत चुगताई यांचं ‘लिहाफ’,  शशी देशपांडे यांचं ‘द लाँग सायलेन्स’, उमा चक्रवर्ती यांचं ‘जेन्डरिंग कास्ट थ्रू अ फे मिनिस्ट लेन्स’, ‘मी संपत पाल- गुलाबी साडीवाली रणरागिणी’(अनु- सुप्रिया वकील),  ऊर्मिला पवार याचं ‘आयदान’. त्याशिवाय जगातला माणसाळलेला पुरुष नाही घडवता येणार. स्त्री आपोआपच मुक्त होईल, जर माणूस नावाचा पुरुष घडवला तर!

भारतात मालक जन्मतात, पालक युरोपमध्ये! मुलगा कळत्या वयाचा झाला की तो मिळवता व्हायला पाहिजे, असं पालक तिथं कटाक्षानं पाहातात. मुलाला कर्ज, जबाबदाऱ्या देणारा बाप शहाणा. मुलगी ‘डेटिंग’ला कशी जात नाही याची पालकांना चिंता असते. आपल्याकडे मुलीनं सातच्या आत घरात नि मुलानं सातनंतर बाहेर हा रिवाज. भारतातल्या नवश्रीमंत आई-वडिलांनी मुलांना मनानं अंध, अपंग, मतिमंद, अनाथ करून टाकलं आहे. तीस वर्षांपर्यंत, म्हणजे आयुष्याचा पहिला वसंत बहार वाया जाईपर्यंत आयतं शिकायचं. आयतं खायचं, मोबाइल, बाईक आई-बाबांनीच घेऊन द्यायची. प्लॉट- फ्लॅटचं ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ पालकच करून ठेवतात. पोरापोरींनी तेवढं फक्त आपला श्वास आपण घ्यायचा एवढंच शिल्लक राहातं. तोही पालकांना घेता आला असता तर भारतातल्या पालकांनी एक नाही सात जन्म घेतला असता. तिकडे युरोपमध्ये पॅरिसच्या मेयरचा मुलगा गाड्या धुतो, डिश वॉशर चालवतो, हॉटेल बॉय होतो. मुलगी बेबी सिटर, ट्यूटर होते नि मुलं-मुली स्वावलंबी होतात. इथे मुलांना आपण असं घडवतो ते केवळ मालकी अहंकारातून. हे शहर, महानगरांचंच सांगतो असं समजू नका. खेड्यापाड्यात चित्रं वेगळं नाही. मुलं मोटारसायकल बांधावरून फिरवत शेती करतात. भारा आणायलाही बाइक लागते. पण एकरांचा धनी गुंठेवारीवर आलाय. शहर ते खेड्याच्या हमरस्त्यावर ‘रोड टच’ शेतीच उरली नाही. सर्वांचे मालक पेट्रोलपंप, बिअरबार, मॉलवाले. हे सर्व कोण, तर गावचे कारभारी- अण्णा, भाऊ, दादा, बापू नाही तर साहेब! ताई, माई, अक्का औषधाला सापडायची नाही. ती फक्त मताला. गावची आई, आजी, मावशी, वहिनी… काय हाल सांगू तिचे? गोठा तिनंच साफ करायचा, धारा तिनंच काढायच्या, भांगलण तिनंच करायची, लावण, लागवड तिनंच करायची. बापयानं दूध डेअरीला घालायचं, ऊस फॅक्टरीला पोचवायचा. पट्टी आणायला बापय कायम मोकळाच. जिल्हा बँकेत खातं असेल बाईच्या नावे, पण अंगठा पुरुषाचा नि दस्तुरपण. खेड्यापाड्यात दुस्तुरखुद्द पुरुषच असतो. बाईनं सोसायचं, पुरुषानं भोगायचं. अर्थात हा पुरुष गिरवला, गोंजारलाही बाईनंच.

स्वातंत्र्योत्तर काळात स्त्री शिकली, सवरली नि सावरली. पण अजून ती मिळवती होऊनही खर्चाचा एकाधिकार मिळवू शकली नाही. खोटं वाटेल, पण आजही हे चित्र आहे,  बाई ‘एम.ए., पीएच.डी.’ झालेली असली तरी रिक्षाचे पैसे नवऱ्याकडूनच घ्यावे लागतात तिला. बाई मिळवणारी, पण माहेरच्या आईचं औषधपाणी करायची संधी पुरुष तिला देत नाही. ती अजून ‘फेसबुक’वर सर्रास दिसत नाही. ती ब्लॉग्ज अपवादानं लिहिते. ‘एटीएम’चा ‘पिन’ अजून धन्याकडेच असतो. ‘एफ.बी. अकाउंट’चा पासवर्ड देत नाही म्हणून ब्रेकअप झालेल्या किती ‘गर्लफ्रेंड’ सांगू? मुलीनं रात्री मोबाइल वापरायचा नाही म्हणून किती घरात रोज खटके उडतात म्हणून सांगू? स्त्रियांचे मोबाइल ‘अनलॉक’च असले पाहिजेत. बाबांच्या नि दादाच्या मोबाइलला तिनं हात लावायचा नाही. तिनं ‘डीपी’, ‘स्टेटस’ ‘सोबर’च ठेवायचा. ‘व्हल्गर क्लिप्स’ पाहाण्याचा मक्ता फक्त पुरुषांचा! हिच्या फोनवर घरी ऑफिसचे फोन आलेले चालत नाहीत. पण याचे ‘चॅट्स चाळे’ खुल्लमखुल्ला चाललेले. ती बिचारी गांधारी पट्टी ओढून जगत, झुरत राहाते. तिला कुणाचा ‘मिसकॉल’ येऊन चालत नाही. याचे मिसकॉल, ‘फोनिक सेक्स’ जगभर पसरलेले!

‘चतुरंग’ वाचणारे काही चतुररंगी पुरुष ‘हे सारं एकांगी लिहितोय’ असा कांगावा करणार हे मला माहीत आहे. पण मी तरी काय करू? हे पाहातच मोठा झालोय. एक तर मी शापित मातेच्या पोटी भारतात जन्मलो, तिनं आश्रमात ठेवलं. मी जन्मलो त्याच आश्रमात राहिलो. तिथे इकडेतिकडे साऱ्या मुली नि स्त्रियांचाच गोंगाट होता. शंभर-दीडशे मुली-स्त्रिया कुमारीमाता, घटस्फोटिता, वेश्या, परित्यक्ताच होत्या. कळायला लागल्यावर त्यांचंच काम करायला लागलो.  लक्षात यायचं त्यांना फसवलेले घरचेच होते. मामा, दीर, चुलतभाऊ नि सासरापण त्यांत असायचा नि कधीतरी जन्मदाते वडीलपण असायचे त्यांत. ‘माझ्या झाडाचं फळ मी खाल्लं, तुझ्या बापाचं काय गेलं?’ विचारणारेही मला भेटलेत. भारतातल्या अनेक नवऱ्यांना आपल्या बायका मुलं झाल्यावर ‘काकू’ वाटू लागतात. त्यांच्या मनातली रंभा, अप्सरा, मधुरा, चतुरा कधीच ओसरत नाही. अन् हिच्या लेखी तो मात्र सत्यवानच राहतो, तेही एक नाही सात जन्म! भारतात वनवास शकुंतलेलाच. विश्वामित्र, दुष्यंताला शिक्षेची नोंद इतिहासात शोधून सापडायची नाही.

वाचायला कटू वाटेल, परंतु कुमारी माता, वेश्या, फसवलेल्या विधवा, परित्यक्ता ही आपल्या समाजाच्या लेखी ‘सोशल ड्रेनेज सिस्टिम’ आहे. युरोपमध्ये यासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या विसर्जनाचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. ऑर्फनेज, पुअर होम्स, रेस्क्यू होम्स समाजात विसर्जित होत निघालीत. आपल्याकडे मात्र ‘माऊली’ला पुरस्कार देऊन गौरवीकरण. मलाही किती पुरस्कार मिळालेत? समाजाचे प्रश्न समाजानं समाजातच का नाही सोडवायचे? अशी शहाणीव रुजवायची वेळ येऊन ठेपली आहे. हे काम घरं नि शाळाच करू शकतील, शासन नाही करू शकणार.

लहानपणापासूनच मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष भेद बंद करायला हवेत. लेडीज-जेन्ट्स कंपार्टमेंट, लेडीज-जेन्ट्स टॉयलेट्स, लेडीज-जेन्ट्स टेलर्स जाऊन ‘युनिकंपार्टमेंट्स’, ‘युनिटॉयलेट’, ‘युनिपार्लर’ येतील तो सुदिन!

पुरुषी मानसिकतेचं गारूड माझ्याही मनावर किती आहे? एकदा युरोपात असताना मी भल्या रात्री युथ हॉस्टेलवर मुक्कामी गेलो. तिथं डॉरमेटरीमध्ये ‘थ्री टायर बंकबेड्स’ होते. मला ‘मिडल बर्थ’ मिळालेला. माझ्यापूर्वी ‘अप्पर’ आणि ‘लोअर’ बर्थ दोन भगिनींनी पटकावलेले. त्या माझ्याआधीच घोरत पडलेल्या. त्या दोन स्त्रियांमध्ये मी स्वतंत्र बर्थवर असूनही ‘सँडविच’ झालेला. रात्रभर उघड्या डोळ्यांनी डॉरमेटरी न्याहाळत काढली. डोळ्याला डोळा लागला नाही तो एकाच कल्पनेनं, की वर नि खाली स्त्री आहे. पूर्ण डॉर्मेटरीत मी एकटा भारतीय पुरुष जागा. सारे युरोपिअन्स कसे गुण्यागोविंदानं सारखझोपेत स्वप्नमश्गूल! ही पण भारतीय पुरुषी घडणच होती.

मी कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो. जगभर अनेकदा, अनेक देशांत जाऊन आलेला मी. माझी भाबडी धडपड भारताला जग करण्याची. पुढे कॉलेजचा प्राचार्यही झालो. वाटलं, जग जाऊ दे, कॉलेज तरी बदलू. उदाहरण द्यायचो, ‘अरे बस, रेल्वे, रिक्षा प्रवासात कुणाच्याही शेजारी जाऊन बसता. इथे तर चार-चार वर्षांची तुमची एकमेकांशी ओळख झालेली. कँटीन, कॉफी हाऊसमध्ये एकत्र बसता. वर्गात का नाही?’ तर त्याचं उत्तर- औपचारिक-अनौपचारिक अंतर आपण कापलेलं नाही. तिथे आपण मुखवटे पांघरूनच जगत असतो.  भारतात स्त्रिया जितक्या ‘अ‍ॅडाप्टिव्ह’, ‘सबमिसिव्ह’ आहेत, तितके पुरुष नाहीत. स्त्रीनं नऊवारी, पाचवारी, स्कर्ट, जीन्स, चुडीदार, लेगिंज, केवढा मोठा पल्ला गाठला. पुरुष फक्त धोतरातून पँट्स, पटलून्समध्येच अडकून राहिला. स्त्रीला कॅटवॉक जमला, पुरुषाला नाही. हे मी फक्त ‘फॅशन परेडस्’च नाही सांगत. घरं कशीही मिळोत, स्त्रियांनी  मांजराचं चार पायी कौशल्य हस्तगत केलं. पुरुष अजून रॅटरेसच्याच मागे आहे. पुरुष खर्चीक, बाई काटकसरी. संसार स्त्रिया करतात, हे पुरुषाला संकटकाळाचा दरवाजा तीच उघडते तेव्हा लक्षात येतं. जीव आणि दागिने दोन्ही गहाण टाकते, पण कुटुंब वाचवते. पुरुष अजून रमा, रमी, रमच्या खेळातून मोकळा नाही झाला. संकटकाळी मागे पळणारे पुरुष कमी आहेत का? जोपर्यंत पुरुषवीण आतून उसवली जात नाही, तोपर्यंत समाजात बुनियादी, मूलभूत परिवर्तन, बदल घडणार नाही. पुरुषांनी अंतर्मुख होऊन स्वेच्छा, स्वत:स बदलणं हाच यावर उपाय आहे. अलीकडे मी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचं समग्र वाङ्मय वाचत आहे. त्यांचा एक लेख आहे, ‘पाश्चात्त्य संस्कृतीच्या संगमाने घडलेले भारतीयांचे धार्मिक आणि सामाजिक परिवर्तन’ असं त्याचं शीर्षक आहे. त्यात त्यांनी नोंदवलेलं भारतीय पुरुषांचं एक निरीक्षण इथं नोंदवावंसं वाटतं, मोह नाही आवरत म्हणून. त्यांनी म्हटलंय, ‘पांढरपेशा लोक वरून सुधारलेले दिसतात, परंतु त्यांच्या गृहसंस्थेत शिरल्याबरोबर त्यांच्यातील पुरातन रूढींच्या काळ्या आणि वृद्ध पुरुषाचे स्वरूप निदर्शनास येऊन एकदम भय निर्माण होते. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी या गृहसंस्थेतील सनातन रूढीचा कलिपुरुष आपल्या अस्तित्वाच्या खुणा पटवितो.’ हे निरीक्षण पुरुषासंबंधी नसून मुख्यत: सनातन कुटुंबव्यवस्थेचं आहे. पुरुष अर्थातच त्याचं एक अंग आहे, हे मात्र विसरता येत नाही.

मध्यंतरी काही निमित्तानं योनिशुचितेचं सर्वेक्षण सुरू होतं. मुली विचारत होत्या, की या प्रश्नावलीत शिश्नशुचिता का विचारत नाही? सर्वेक्षण मुलींचंच का? मुलांचं का नाही? पुरुषदासतेचा ‘वन वे रोड’ संपत चालल्याचं पाहून मी किती सुखावलो म्हणून सांगू? पूर्वी आम्ही वेश्यावस्तीत मोफत कंडोम वाटायचो. पुरुष नाखूश असायचे. आता वेश्याभगिनीच कंडोमशिवाय गिऱ्हाईक करत नाही म्हणतात, तेव्हा ‘एड्स’ दूर होतोय हे लक्षात येतं.

पुरुषी विखार नि विकार मी हल्ली ‘कॉर्पोरेट कल्चर’मध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवतो. तिथं स्त्री समायोजनाची जी तारेवरची कसरत करते ना, तिला दादच द्यायला हवी. स्त्री सक्षम असून, तिनं ‘रिझल्ट’ देऊनही तिला ‘सीईओ’ केलं जात नाही, तेव्हा ती ज्या कौशल्यानं स्वत:ला सांभाळून पुढे जाते, अशा काळात सहकारी भगिनी तिच्या मागे एकीनं उभ्या राहातात, मग पुरुषी व्यवस्थापन नांगी टाकतं. हे अजिबात सोपं नसतं. पण आधुनिक स्त्रीनं ‘हार्ड नि सॉफ्ट स्किल्स’ आणि ‘सिक्स्थ सेन्स’ असा जागा ठेवला आहे की भारतातलं उद्याचं राज्य स्त्रीचं असणार ही आता मला काळ्या दगडावरची रेघ दिसू लागली आहे. कॉलेजमध्ये आताशा आम्ही गुणवत्तेवर वर्ग प्रतिनिधी निवडतो. वर्गात प्रथम येणारा तो वर्ग प्रतिनिधी. मी २०१० मध्ये निवृत्त झालो. त्या वर्षीच्या सर्व वर्ग प्रतिनिधी मुली होत्या नि ‘जीएस’ (जनरल सेक्रेटरी) पण मुलगीच. सर्व क्षेत्रात स्त्रीची भरारी मी पाहातो आहे. बरोबरीची स्पर्धा म्हणून ती ठीक आहे. पण त्याची जागा अहंकार घेणार नाही, हे मात्र पाहायला हवं. अन्यथा ‘बाईचा पुरुष झाला’ असं इतिहास नोंदवेल, तर तो आपला पराभव समजावा. स्त्री आणि पुरुष ‘माणूस’ होणं, असणं, राहाणं महत्त्वाचं.

समाज लिंगसापेक्ष आहे की लिंगनिरपेक्ष आहे, हे मला महत्त्वाचं मुळीच वाटत नाही. समाजात लिंगनिरपेक्ष भावसाक्षरता रुजवणं आपल्यापुढचं आव्हान आहे. माणूस बनण्यापेक्षा माणूस असणं महत्त्वाचं. शरीर, मन, प्रेम ही सत्तासाधनं नाहीत. त्या एकमेकास समजून घेऊन एकमेकांत विसर्जित व्हायच्या भावना आहेत. ‘ते’ लैंगिक उन्मादाचे क्षण वगळता आपण माणूसच असतो. माणसात स्त्रीपण आणि पुरुषपण समसमान असतं. अर्धनारीनटेश्वराची पूजा उभयपक्षी होत राहील तर क्या कहने? तुमच्यात पुरुषी वीर्य वाहातं की स्त्रीधर्मीय मासिक रक्त वाहातं, ते महत्त्वाचं नाही. तुमच्यात माणुसकीचा अखंड झरा वाहतो का, ते अधिक महत्त्वाचं असतं. मी अनाथ मुलांचं शिशुगृह चालवायचो. पाळण्यातील रडती बाळं काळजीवाहिकांना आवरायची नाहीत. मी खांद्यावर घेतली की मात्र गप्प व्हायची. का? थोडक्यात, बाळाला आईची ऊब लागते, हा पुरुषी बनाव आहे. फसवल्या गेलेल्या भगिनींकडून त्यांना कु णी फसवलं हे आम्हाला पुनर्वसनाच्या दृष्टीनं समजून घेणं गरजेचं असायचं. भगिनी समुपदेशक त्यांच्यापुढे हात टेकायच्या. मग मी बोलायचो, मला यश यायचं. रहस्य काय, तर मी पूर्ण संरक्षणाची हमी द्यायचो. पण त्यापेक्षा मी तुझा बाप, भाऊ, मामा आहे असं समज, म्हटल्यावर कळी खुलायची; कारण एव्हाना ते सर्व वैरी झालेले असायचे. नात्याचा हात संकटकाळी गरजेचा असतो. तेव्हा माणसं क्षणात प्रेक्षक होतात. नात्याचं प्रेक्षकीकरण मी करोनात अनुभवतो आहे.

संस्कृती वर्तमानाची असते. सभ्यता ही भविष्यलक्ष्यी असते. आपणास मानवी संस्कृतीचं रूपांतर मानवी सभ्यतेत करायचं आहे. कल्पना, रूढी, रिवाजापेक्षा जीवनमूल्यं, विचार महत्त्वाचे.

विद्याताई  बाळ,लीलाताई पाटील, ताराताई भवाळकर ही सर्व मंडळी माणूसपणाची वाट निर्माण करत होती. मी तेव्हाही वारकरी होतो, आजही तसाच वारकरी आहे. ‘मिळून साऱ्याजणी’, ‘पुरुष स्पंदन’, ‘पुरुष उवाच’, ‘साधना’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’, ‘नवभारत’, ‘समाजप्रबोधन पत्रिका’सारखी नियतकालिकं हा लिंगभाव साक्षरतेचा निरंतर प्रयत्न वर्षानुवर्षं करत आलीत. काहीच बदललं नाही असं म्हणणं करंटेपणा ठरेल. पण बदलाची कासवगती स्वत:चा ससा होऊ न देता  स्त्री-पुरुषांना दोघांनाही एकमेकांचं उभयान्वयी अव्यय बनून कशी वाढवता येईल, यात भविष्याचं हित सामावलेलं आहे.

drsklawate@gmail.com