डॉ. वृषाली किन्हाळकर
‘‘आत्मविश्वासपूर्वक आणि गोड बोलणाऱ्या सान्वीच्या स्वरातून तिनं मिळवलेलं स्वातंत्र्य झळकत होतं. तीस वर्ष मन मारून, कुढत, अपराधी वाटून घेत जगण्यानंतर मिळालेलं हे स्वातंत्र्य मोलाचंच. एका क्षणी त्यासाठी लागणारं सारं धाडस तिनं एकवटलं आणि विचारपूर्वक पाऊल उचललं.. ‘भरत’ला तिलांजली देण्याचं! आता भरत नव्हताच.. फक्त सान्वी होती! मनानं तर ती आधीपासूनच होती, आता तनानंही सान्वी झाली होती.’’
एका लग्न समारंभाला गेले होते. सोफ्यावर बसून आजूबाजूची सजावट निरखत असताना अचानक एक उंच, देखणी तरुणी माझ्याजवळ आली आणि माझा हात हातात घेऊन कानात हळूच कुजबुजली, ‘‘डॉक्टर, ओळखलंत का मला?..’’
माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहूनही ती आली तशीच उत्फुल्ल हसत निघूनही गेली. काळाभोर केशसंभार आणि साजेसा सलवार-कमीज. मी तिला पाठमोरी न्याहाळत होते, पण ओळखू शकले नाही. दोन-तीन दिवसांनी मला एक फोन आला, ‘‘डॉक्टर, तुम्हाला भेटायला यायचं आहे. कधी येऊ?’’ मी वेळ दिली आणि तिनं फोन ठेवला, गोड ‘थँक यू’ म्हणत. मी फोनवर नंबर पाहिला, नाव दिसत होतं- सान्वी. नावावरून तरी ती कोण हे माझ्या लक्षात आलं नाही. असावी माझी एखादी रुग्ण, असा विचार करून मी तो प्रसंग विसरूनही गेले.
आणि काल ती भेटायला आली. हसरी, उंच, देखणी तरुणी. ‘‘मला खूप बोलायचंय तुमच्याशी,’’ असं मनापासून म्हणत खरंच बोलत राहिली किती तरी वेळ.. सारं सारं.. आत दाट दाट साचलेलं.. मळभ दूर होऊन प्रसन्न ऊन पडावं तसा तिचा चेहरा भूतकाळातून वर्तमानात आला तेव्हा ताजातवाना झाला होता..
‘‘डॉक्टर, तुम्ही लावणी पाहिलीय मी सादर केलेली. आठवतेय?..’’ अन् मला एकदम आठवला तो भरत. उत्तम लावणी नर्तक, ‘सप्तरंग नृत्य अकादमी’ चालवणारा, कलासक्त, सुजाण माणूस. मला भरत आणि या सान्वीमध्ये काहीसं साम्य वाटलं. मी म्हणाले, ‘‘तुम्ही जराशी भरतची आठवण करून देताय मला. साम्य वाटतं तुम्हां दोघांत.’’
तशी खळखळून हसत ती म्हणाली, ‘‘आता भरत नाहीच, आता केवळ सान्वीच आहे.. डॉक्टर, मीच भरत. पूर्वीचा! तुम्ही ओळखलं नाही?’’
ती सांगत होती, पण माझा विश्वास बसत नव्हता. त्याच कुतूहलातून मी फक्त ऐकत होते तिची सारी कहाणी. माझ्यासमोर जणू एक चित्रपट हळूहळू पुढे सरकत होता..
‘‘मी आता खूप आनंदात आहे. मला जे आतून वाटायचं ना, ते आता मी मुक्तपणे करू शकतेय. मी एका व्यापारी कुटुंबात जन्मले. मोठय़ा बहिणीच्या पाठीवर मी मुलगा. त्यामुळे आई-वडील, नातेवाईक खूप आनंदात होते. मला आठवत नाही, पण आई-आजी सांगायच्या, की अगदी लहानपणी मी मोठय़ा बहिणीचे कपडे घालून नाच करायचे. तसे काही फोटोही होते घरी. माझी ही आवड पुढे वाढतच गेली. मी सातवीत असताना स्त्रीवेशात नृत्य करून बक्षीस घेऊन घरी आले, तेव्हा वडील संतापले होते. त्यांना वाटायचं, मी लवकर त्यांच्या व्यवसायात यावं, दुकानदारी शिकावी; पण माझा कल अभ्यासाकडे होता. वर्गात पहिल्या चार-पाच हुशार मुलांत मी असायचे. अभ्यास, शिक्षण आणि संधी मिळाली की स्त्रीवेशात नृत्य हा माझा आयुष्याचा मार्ग होता आणि आवडही. पण घरात त्याविषयी अनास्थाच जास्त होती. दरम्यान मी वयात येत होते. काही तरी बदलतंय शरीरात हे कळत होतं, पण नेमकं काय ते लक्षात येत नव्हतं. मी इतरांसारखी नाही हेही साधारण त्याच दरम्यान लक्षात येऊ लागलं होतं, पण वयाच्या सतरा वर्षांपर्यंत तरी मला नीट उमगलं नव्हतं की मी कोण आहे, पुरुष की स्त्री?
वर्गातही मुलं माझ्याशी फटकून राहात. मला ‘बायल्या’ म्हणत. त्याचाही स्पष्ट अर्थ मला कळत नसे. शिकावं, आपल्या पायांवर उभं राहावं असं मनापासून वाटायचं; पण वडिलांच्या व्यवसायात मन रमत नव्हतं. त्यामुळेच माझं आणि वडिलांचं नातं हळूहळू रुक्ष होत होत संपून गेलं. मी ‘बी.सी.ए.’ केलं, पण तोपर्यंत मी नृत्याकडेही खूप गांभीर्यानं पाहायला सुरुवात केली होती. खूप वाचन केलं, आकर्षक स्त्रीरूप कसं असतं, रंगरंगोटीनं ते अधिक कसं खुलवावं याचा अभ्यास करत गेले. तसं मी स्वत:ला नटवायचीही आणि एक दिवस मी लावणी नृत्य पाहिलं. असं वाटलं, की जणू भक्ताला देवच दिसला! माझा मार्ग मला सापडला.. ती होती सुरेखा पुणेकरांची लावणी. मी ती पाहिली अन् अचूक बारकाव्यांसह आत्मसात केली. आत्मविश्वासानं सादरही केली आणि लोकांना ती प्रचंड आवडली. मग ‘भरत जेठवाणी, लावणी कलावंत’ म्हणून माझं नाव झालं. माझं हे सगळं लावणीप्रेम तुम्हाला माहीतच आहे की डॉक्टर..’’
मी आठवत होते भरतला. त्याचं किंचित बायकी, पण लाघवी बोलणं आठवलं. काळेभोर, कुरळे, खांद्यावरून खाली रुळणारे केस आठवले आणि आठवली त्याच्या नाकात चमकणारी मोरणी! आता मला धागा सापडला अन् लक्षात आलं, की भरत हा नेमका काय होता ते. मनानं तो मुलगीच होता. स्त्रीवेशात नाचणं हा त्याचा बालपणापासूनचा ध्यास, आवड, छंद. नकळत्या वयातही बहिणीचे कपडे घालणं हे कशाचं निदर्शक होतं?.. दुर्दैवानं आई-वडिलांना त्यातलं गांभीर्य लक्षात आलं नाही किंवा जाणवत असलं तरीही समाज काय म्हणेल या भीतीनं त्यांनी गोष्ट स्वीकारली नसावी. अतिशय नेमक्या शब्दांत, सफाईदार इंग्रजीत, मधूनच थोडं मराठीत सान्वी हे सारं सारं सांगत होती. तिच्या प्रत्येक हालचालीतून आता तिचं स्वातंत्र्य, तिचा मोकळा आनंद जाणवत होता.. हवेलाही शिरायला जागा नसणाऱ्या काळ्याकभिन्न दगडी तुरुंगातून तिची जणू सुटका झाली होती आणि आता ती मुक्त आकाशाचा आनंद लुटत होती..
पण ही आजची सान्वी होती. भरतची सान्वी होण्यापर्यंतचा प्रवास खूपच अवघड होता. मनाने आपण एक स्त्री आहोत हे स्वीकारल्यानंतर पुढचा टप्पा होता तो तनानं स्वीकारण्याचा. एक लोकप्रिय लावणी कलावंत झाल्यावर भरतकडे पैसा, प्रतिष्ठा दोन्ही आलं. नावाला आता वलय मिळालं होतं. स्वत:चं वेगळं अस्तित्व तयार होत होतं. भरतनं स्वत:ला आणखी मोठं करायचं ठरवलं, शिक्षणानं. नृत्याचाच अभ्यास करून त्यानं ‘पीएच.डी.’देखील मिळवली; पण अजूनही तो शरीरानं भरतच होता. त्याचं मन स्त्री होण्यासाठी आसुसलेलं होतं. ही सगळी प्रतिष्ठा, लोकप्रियता, आर्थिक सुबत्ता त्याला स्त्री म्हणून हवी होती. अखेर प्रचंड धाडस गोळा करत, कित्येक रात्री झोपेविना घालवत, त्यानं मनातलं हे द्वंद्व आई-वडिलांना सांगितलं. प्रतिक्रिया अर्थातच विखारी होती. ‘या पोरानं बघा घराण्याचं नाक कापलं’ अशा अर्थाची.
दरम्यान करोनानं जगभर थैमान घातलं. माणसं घरातच बंदीवान झाली. आपल्याच माणसांच्या सहवासात असूनही अधिकाधिक एकटी झाली. भरतच्या मनातलं युद्ध आता अधिकच तीव्र झालं. घरात लग्नाचा विषय निघू लागला तसा तो त्रास जीवघेणा होऊ लागला. कारण त्याला मुलींबद्दल आकर्षणच वाटत नव्हतं. ‘मला अविवाहित राहायचं आहे,’ त्यानं अखेर जाहीर केलं; पण त्यामुळे घरातली अशांतता अधिकच वाढली. लग्नाचं वय झालं तरी फारशी लिंग ताठरता त्याला कधी जाणवायची नाही. आपलं शरीर असं कसं, या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडत नव्हतं. शरीर-मनातल्या या असह्य घुसमटीला वाट फोडण्यासाठी अखेर तो तृतीयपंथीयांच्या वस्तीत जाऊन आला. त्यांचं जगणं समजून घेतल्यावर तर तो अधिकच गोंधळला, ‘कोण आहे मी नेमका? तृतीयपंथी की समिलगी? काय आहे वेगळेपण?’ त्याला समजत नव्हतं; पण तिथल्या तृतीयपंथीयांचं जगणं पाहून तो व्यथित झाला आणि अखेर तो पोहोचला मनोवैज्ञानिक डॉक्टरांकडे.
त्यांनी सांगितलं, ‘‘तुला ‘Gender Dysphoria’ आहे. यात मन स्त्रीचं अन् शरीर पुरुषाचं असतं. त्यामुळे लिंग अस्वस्थतेची भावना निर्माण होते.’’ आपल्या अवस्थेचं नेमकं निदान त्याला कळलं होतं. आता पुढचा टप्पा होता निर्णयाचा. त्यानं विचारपूर्वक निर्णय घेतला, की मी माझ्या मनाचं ऐकणार. मी पूर्ण स्त्री म्हणूनच जगणार. लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेणार. या परिवर्तनासाठी सुरुवातीला त्यानं सतत स्त्रीवेशात राहाणं सुरू केलं. मग हार्मोन्सची उपचार पद्धती सुरू केली. पहिली शस्त्रक्रिया चेहरा, जबडा, ओठ आणि अर्थातच स्तनांची करवून घेतली.
त्यानंतर मग मूळ गोष्ट- लिंग परिवर्तन. दोन वाक्यांतला हा प्रवास अजिबातच सोपा नाही. सतत औषधं, गोळय़ा, वेगवेगळी मलमं. गेल्या पाच महिन्यांत अनेक वेळा रुग्णालयात राहाणं आणि प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या; पण हे सगळं सहन करण्यासाठी जी ताकद लागते, ती त्याला मिळाली होती. कारण अगदी लहानपणापासूनच जीवाला ती ओढ होती. इतका सगळा शारीरिक, मानसिक त्रास सहन करून अखेर ती शस्त्रक्रिया पार पडली आणि अखेर तो शरीरानं सान्वी झाला.. आधी मनानं आणि आता तनानंही. सान्वीला आजही तो दिवस आठवतोय. वेदनामय शस्त्रक्रियेनंतर हळूहळू बरी होत जेव्हा ती घरी आली, पहिल्यांदा आरशात स्वत:ला स्त्री म्हणून पाहिलं, तेव्हा तिला जाण आल्यापासूनचा सारा प्रवास नजरेसमोरून धडधडत गेला. स्वर्गसुखाचा आनंद मिळाला. त्यानंतर किती तरी दिवस ती स्वत:ला नटवत, सजवत राहिली.. आपलं स्त्री होणं आसासून अनुभवत राहिली..
विचारपूर्वक आणि प्रचंड अभ्यास करून सान्वीनं स्वत:मधल्या भरतला तिलांजली दिली होती..
शस्त्रक्रियेनंतर ती ओडिशाला जाऊन लावणी नृत्य करून आली. त्रास झाला, पण लोकांची मिळालेली दाद तिच्या सर्व त्रासावर मात करून गेली. सान्वी ऋण मानते लावणीचे!
तिचं जास्त कौतुक यासाठी वाटतं, की सगळय़ा मर्यादा, पायऱ्या ओलांडून, चढून जाताना तिच्यासोबत कुणीच नसायचं. विचार एकटीचा, निर्णय एकटीचा, प्रवास एकटीचा अन् आता मिळणारा स्वच्छ, संपूर्ण आनंददेखील तिचा एकटीचा!
घर, कुटुंब, समाज आजही तिच्याकडे भेदरलेल्या, कधी कुतूहलाच्या, कधी परक्या नजरेनं बघतात. त्यांची नजर कळते, पण तिनं आता मनाची समजूत घातली आहे. अर्थात तिला पूर्ण समजून घेणारेही कमी नाहीत. तिच्या नृत्यवर्गाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, तिचे लावणी प्रशंसक, काही आप्तेष्ट, मित्रमैत्रिणी यांनी छान स्वागत केलं सान्वीचं. माझ्यातली डॉक्टर, लेखिका, आई आणि एक विवेकी व्यक्ती या सगळय़ा भूमिका सान्वीचं स्वागत करतात. माझ्याकडे आली तेव्हा मी तिला कुंकू लावून साडी दिली. तेव्हाचा तिच्या डोळय़ांतला आनंद शब्दांत न मांडता येणारा. तिचा विवेक, धडपड, धाडस यामुळे तिचं ते यातनामय मानसिक द्वंद्व आता संपुष्टात आलं आहे. हे असं सीमारेषेवरचं जगणं, हा देह-मनाचा गोंधळ तिनं तीस वर्ष सोसला. शस्त्रक्रिया होऊन ती आता एका परिपूर्ण स्त्री जीवनाचा उपभोग घेऊ इच्छिते. तिला आई व्हायचं आहे, पण शरीरात गर्भाशय, अंडाशय नसल्यानं तिला सरोगसीची मदत घ्यावी लागेल. पण ती तेही करायला मनापासून उत्सुक आहे. आता वैद्यकीय जगातल्या नवनव्या प्रगत तंत्रज्ञानामुळे, शल्यचिकित्सेमुळे या अशा दुर्दैवी जीवांची घालमेल थांबवणं शक्य झालं आहे. एक आव्हान मात्र अनेकांसमोर असतं, ते खर्चाचं. आणखी एक महत्त्वाचं- हा विषय चेष्टेचा, खिल्ली उडवण्याचा, हसण्याचा नाहीच, हेही समाजाला लख्ख समजायला हवं. दहा-वीस लाखांतील एखाद्या व्यक्तीला Gender Dysphoria असतो. आपल्या मुलांमध्ये अशी काही मनोकायिक विसंगती आढळली, तर तो विषय दुर्लक्ष करण्याचा, दडपून टाकण्याचा किंवा मुलांवर चिडण्या-संतापण्याचा किंवा त्याची लाज वाटून घेण्याचाही नाही. जन्मलेल्या प्रत्येक जीवाला आनंदी राहाण्याचा हक्क आहे आणि तो हक्क घर, कुटुंब, समाज, प्रदेश, देश आणि जग जेवढय़ा लवकर, सहजपणे मान्य करेल, तेवढंच वैश्विक कल्याण त्यात आहे.
अशा अनेक भरतना फारसं प्रेम मिळत नाही. घरात-बाहेर त्यांचं मन कुणी समजून घेत नाही. इतरांच्या दबावामुळे अशा किती मुलांना हयातभर देह-मनाचं युद्ध सहन करावं लागत असेल? सान्वीच्याही आयुष्यात आलेल्या एका तरुणानं तिला जवळ केलं, पण ते पैशांसाठी होतं हे लवकरच तिच्या लक्षात आलं आणि एक साथ सुटली; पण सान्वीचं धाडस उल्लेखनीय तर आहेच, पण लोकशिक्षणाच्या मार्गावर एक वस्तुपाठ आहे. मैलाचा दगड आहे. गेली तीस वर्ष प्रेमासाठी तहानलेल्या या जीवाला आता आयुष्यात मनापासून प्रेम करणारं कुणी मिळायला हवं..
sahajrang@gmail.com