माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

मुंबई महानगर पालिके ने हेल्पलाइनद्वारे मदतीचा हात पुढे केला आहे. त्यातील एक हेल्पलाइन आहे, ‘१८००२२१२९२’  ही हेल्पलाइन  हातावर पोट असणाऱ्या कामगार,  मजूर व परगावातून रोजंदारीवर मुंबईत राहणाऱ्या गोरगरिबांसाठी, भिक्षेकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.  करोनाच्या पाश्र्वभूमीवर ‘१९१६’/ ‘४७०८५०८५’/ ‘१८००२२१२९२’ या हेल्पलाइन्स मुंबईकरांसाठी उपयोगी ठरत आहेत. महाराष्ट्र राज्यासाठी २२०२४५३५ ही एक हेल्पलाइन सुरु केली गेली आहे.

मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची ‘१९१६’ ही हेल्पलाइन १५ ऑपरेटर्सकडून १२ महिने २४ तास चालविली जाते. वर्षभर नागरिक या हेल्पलाईनवर शहरात घडणाऱ्या विविध घटनांची माहिती देऊन मदत मागू शकतात,  नागरी सेवांविषयीही तक्रारी नोंदवू शकतात.

उदा. कचरा उचलला न जाणे, अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, रस्त्यावरील खड्डे आदी. मात्र या ६ मार्च २०२० पासून ही हेल्पलाइन करोना विषाणूविषयी लक्षणे, उपचार इत्यादीची माहिती देण्यासाठी जाहीर करण्यात आला. या नियंत्रण कक्षाचे संचालक महेश नार्वेकर याविषयी विस्ताराने माहिती देतात.

‘‘सुरुवातीला या हेल्पलाइनवर अवघ्या २४ तासांत एक हजारांवर कॉल्स आले. त्यावरून लोकांना या आजाराविषयी किती भय आहे ते लक्षात येते. जरासा खोकला वा ताप आला तरी लोक घाबरून फोन  करत आहेत, हे लक्षात आले आणि हेल्पलाइनवर उत्तरं द्यायला डॉक्टरांना नेमण्यात आलं. त्यानंतर साथीचा प्रादुर्भाव वाढला तसं तक्रारींचं स्वरूप बदललं. उदा. शेजारच्या घरातल्या लोकांवर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का असूनही ते बाहेर फिरताहेत, लॉकडाऊन पाळत नाहीत वगैरे. मग आम्ही पोलीस नियंत्रण कक्षही आमच्या हेल्पलाइनला जोडून घेतला. त्यानंतर साथीचा प्रादुर्भाव अधिक वाढला तशी ‘०२२-४७०८५०८५’ ही खास ‘करोना मदत सेवा हेल्पलाईन’ नव्याने सुरू केली.

नवीन हेल्पलाइन ऑपरेट करण्यासाठी व नागरिकांना फोनवरून आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी ४० डॉक्टरांची टीम नियंत्रण कक्षात नेमली गेली. इतकंच नव्हे, तर अत्याधुनिक यंत्रणेचाही सुयोग्य वापर सुरू केला गेला. त्यामुळे हेल्पलाइन नंबर दाबताच वैद्यकीय (क्लिनिकल) माहिती हवी असल्यास ‘एक’ क्रमांकाचं बटन दाबा, असं सांगितलं जातं व कॉल थेट डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांना प्रवास करावा लागू नये यासाठी ही हेल्पलाइन रुग्णालयात तैनात असलेल्या डॉक्टरशी थेट संपर्क साधून सल्ला मिळवून देते.’’

या नियंत्रण कक्षाचे संचालक महेश नार्वेकर अधिक माहिती देतात, ‘‘आधुनिक तंत्रप्रणालीचा आधार घेत आम्ही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा ‘चार्ट ब्लॉग’ तयार केला आहे. टीममधील सर्व डॉक्टरांनी आपल्या मोबाइलवर तो ‘अपलोड’ केला आहे. आता डॉक्टरांना फोन जाताच डॉक्टर या ‘चार्ट  ब्लॉग’मध्ये दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचं नाव, पत्ता, लक्षणे, तक्रारी ही माहिती भरतात. लक्षणांवरून डॉक्टरांना संबंधित रुग्णाला करोनाची लागण झाल्याचा संशय आल्यास ते त्या व्यक्तीच्या निवासाजवळच्या खासगी लॅबला संदेश पाठवतात. खासगी प्रयोगशाळांची सूत्रबद्ध जोडणी केलेली असल्याने त्यांचे लॅब असिस्टंट स्वत: रुग्णाच्या घरी जाऊन ‘स्व्ॉब’ घेतात. ते सॅम्पल कस्तुरबा रुग्णालयालाही पाठविले जाते. तोवर आमची रुग्णवाहिका रुग्णाच्या घरी पोहोचते व त्याच्या निवडीनुसार खासगी वा महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्या व्यक्तीला भरती केले जाते.’’

‘‘ही सगळी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून अत्यंत तातडीने कार्यान्वित होते. त्यानंतर ‘जीआयएस मॅपिंग’ केलं जातं. त्यामुळे कंट्रोल रूममधील संगणकावरील नोंदींनुसार कुठल्या विभागात करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, कुठे अधिक लक्ष द्यायला हवं, कुठे रोगजंतुनाशक फवारणी करायला हवी, हेही तत्काळ कळतं. नियंत्रण कक्षात ५५०० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण उपलब्ध आहे व त्यांच्या लाईव्ह ‘फीडबॅक’मधून संपूर्ण मुंबई शहर व उपनगरावर आपत्कालीन नियंत्रण कक्ष बारीक लक्ष ठेवत आहे. शहरात कुठेही लॉकडाऊन उल्लंघन वा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास हॉटलाइनवरून पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पोलिसांची  मदत घेतली जाते. तसेच नागरिकांच्या उपयुक्त सूचना व माहिती यांची नोंद घेण्यासाठी ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ अशा समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करून घेतला जातो आहे,’’ असंही ते सांगतात.

नुकतीच एक नवी हेल्पलाइन महानगरपालिकेने सुरू केली आहे, ‘१८००२२१२९२’. ही हेल्पलाइन विशेषत: हातावर पोट असणाऱ्या कामगार,  मजूर व परगावातून रोजंदारीवर मुंबईत राहणाऱ्या गोरगरिबांसाठी सुरू करण्यात आली आहे. मुंबई शहरात या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांना अनेकदा व्यसन वा दुर्धर रोग झालेले असतात. त्यांच्यापासून इतरांना धोका पोहोचू नये व करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी त्यांच्या स्वच्छ व सुरक्षित निवाऱ्याची सोय करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या चहा,  नाश्ता,  जेवणाचीही व्यवस्था आपत्कालीन कक्षातर्फे करण्यात येत आहे. अशा बेघर स्त्रियांच्या सुरक्षेचा विचार अग्रक्रमाने केला जात आहे. कोणीही निवाराहीन व्यक्ती या हेल्पलाइनवर मदत मागू शकते. त्याचा एक तपशील तयार करून अशा गोरगरीब जनतेसाठी काय करता येईल याचे विश्लेषण केले जात आहे. इतर नागरिकांनीही अशा व्यक्तींची माहिती पुरवली तरी मदत दिली जाते.

अशा प्रकारे ‘१९१६’/ ‘०२२-४७०८५०८५’/ ‘१८००२२१२९२’ अशा नियंत्रण कक्षातील तीनही हेल्पलाइनद्वारे नागरिक बृह्न्मुंबई महापालिकेशी प्रभावीपणे संपर्क साधत असून यातून मुंबई महानगरीला करोना विषाणूपासून वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना लवकर यश येवो.