माझं मला स्वत:ला तपासायचंय. नसेल जमणार एखादी गोष्ट करणं, तर ते करून पाहिल्यावर माझं मला कळू दे, हा त्यांचा आग्रह असायचा. म्हणूनच पावलोपावली समाजाची नकारात्मक मानसिकता सहन करूनही आज त्या सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक झाल्या आहेत. बहुविकलांग मुलंमुली, सेरिब्रल पाल्सी, स्पाटिक, पाठीच्या कण्यांची दुखापत असणाऱ्यांच्या मनांसाठी काम करण्याबरोबरच मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोगग्रस्त लोकांवरही त्या काम करीत आहेत.  डॉ. अरुंधती खाडिलकर या दुर्गेविषयी..
‘‘ग्रॅ ज्युएशन झाल्यावर मी निर्णय घेतला की, मला सांगली सोडायचंय, मुख्य म्हणजे सुरक्षित कुटुंब सोडायचंय! काळजीनं वडील म्हणाले, ‘अगं, तुझ्या शारीरिक अडचणी, बाकी प्रश्न?’  पण मी ठामपणानं सांगितलं, मला एकटं राहायचंय. मला स्वत:ला तपासायचंय. नसेल जमणार तर ते करून पाहिल्यावर माझं मला कळू दे. मग मी माझा हट्ट सोडेन! खूप भावनिक रणकंदन झालं. घरातील बाकी सगळे जण गोकाकला गेले असताना मी माझ्यासाठी बनवून घेतलेली सुधारित स्कूटर बाहेर काढली आणि स्कूटरवरून थेट पुणं गाठलं. रात्री सगळे कुटुंबीय सांगलीत घरी परतले, तर माझा पत्ता नव्हता. सगळेच काळजीत पडलेले. शोधाशोध- फोनाफोनी सुरू झाली आणि मी पुण्यात आजीकडं पोहोचल्याचं समजलं. त्यानंतर बाबा भेटले तेव्हा त्यांचे उद्गार होते, ‘अशक्य आहेस तू; पण आता मला तुझी काळजी नाही!’.. मी पुण्यात गेले होते मानसशास्त्रात एम.ए. करण्यासाठी. बाकी राहण्याचे, आपल्याकडच्या पायाभूत सुविधा अपंगांसाठी मत्रिपूर्ण नसण्याचे प्रश्न होतेच! हे प्रश्न वरवर दिसणारे, मात्र त्याहीपलीकडे खूप संघर्षनाटय़ होतं.’’
आता मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक म्हणून यशस्वी असलेल्या डॉ. अरुंधती मधुसूदन खाडिलकर सांगत होत्या. वयाच्या चौथ्या महिन्यात त्यांच्या दोन्ही पायांवर व उजव्या हातावरही पोलिओनं आघात केला. अर्थात चालता न येणं याव्यतिरिक्त अरुंधतीच्या जगण्यात फार फरक पडला नव्हता. अरुंधती गुडघेच पावलं असल्यासारखी वापरत चालायची म्हणून  तिला ‘स्पेशल चाइल्ड’सारखं कधीही वागवायचं नाही, हे तिच्या वडिलांनी घरादाराला लावून दिलेलं वळण. साधं प्यायला पाणी हवं असेल आणि तिनं कुणाला तरी हाक मारून मागितलं की, वडील म्हणायचे, ‘‘अरुंधती, तुझं तू घे. तुझ्या हातात आणून द्यायला तू काही पाहुणी नाहीयेस आणि आपल्या घरात नोकरचाकरही नाहीयेत. यू हॅव टू बी नॉर्मल.’’ अशामुळं अरुंधतीला लहानपणापासून सवयच लागून गेली संघर्षांची. छोटय़ा छोटय़ा गोष्टी प्रयत्नपूर्वक करायच्या, लहानमोठी कौशल्यं कष्टानं विकसित करायची.. यातूनच तिचं धाडस वाढलं.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अरुंधतीनं सांगलीतच घेतलं. वडील तिला रोज स्कूटरवरून सोडायचे. आठवीनंतर मात्र तिला तिची ट्रायसिकल मिळाली आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षी हॅन्ड ब्रेक असलेली, त्या वेळी सहजासहजी न मिळणारी स्कूटर. अरुंधती सतत मित्रमत्रिणींनी वेढलेली, सगळ्यांची लाडकी. अरुंधतीचं अक्षर सुरेख, वक्तृत्वगुण उठून दिसणारे, गायचीही छान, मात्र ‘हिच्यासारखी मुलगी काय करणार?’ असा तुच्छभावच तिला शिक्षकांच्या नजरेत जाणवत राहायचा. परिणामी आपले गुण दाखवायची संधी हुकतच राहिली. आपण कुणी तरी आहोत, काही तरी नक्की करू शकतो याची जाणीव तिला मिळाली कॉलेजच्या वर्षांमध्ये. तिथल्या शिक्षकांनी तिच्यातले गुण जाणले, त्यांना रंगमंच दिला. अरुंधतीचा आत्मविश्वास झळाळून उठला. व्यक्तिमत्त्व झरझर बदललं. शारीर अडचणींना समजून घेणं, ही एक पायरी, मात्र कॉलेजच्या शिक्षकांनी दाखवलेली मन:पूर्वक आत्मीयता, आपुलकी याची आठवण अरुंधतीच्या मनात आजही ताजी आहे, विशेषत: प्रा. आडसुळे आणि बोडस मॅडमची. अरुंधती म्हणते, ‘‘आज मी कुणी तरी प्रतिष्ठित आहे म्हणून मला माझ्या शाळेत बोलावलं गेलं, पण मी कुणीही नसताना, माझी शून्यातून सुरुवात असताना कॉलेजच्या शिक्षकांनी माझ्यावर विश्वास दाखवला, संवेदनशीलता दाखवली, ती माझ्यासाठी सर्वोच्च महत्त्वाची आहे.’’
एम.ए. करायचं तर पुण्यात एस.एन.डी.टी.लाच हे अरुंधतीनं मनात पक्कं केलं होतं. प्रवेश सहज मिळावा अशी गुणवत्ता तर होतीच. तरीही अरुंधती मानसशास्त्र विभागाच्या एच.ओ.डींना भेटली. ते म्हणाले, ‘‘प्रवेश मिळण्यात काहीच अडचण नाहीये.’’ अरुंधती निर्धास्त होऊन पुण्यात राहण्याच्या दृष्टीने सोयी पाहायला लागली. प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली. अरुंधतीचं नाव नव्हतं. दुसऱ्या व तिसऱ्या यादीतही नाव आढळलं नाही तेव्हा ती पुन्हा एच.ओ.डींना भेटायला गेली. त्यांना थेट विचारलं तर ते म्हणाले, ‘‘आमचा विभाग आहे पाचव्या मजल्यावर. तिथं शंभर पायऱ्या चढून जावं लागतं. तुमच्यासारखी व्यक्ती तिथं कशी पोचणार? तुमची अनुपस्थिती लागून आमच्या विभागाच्या निकालावर त्याचा परिणाम होणार.    
त्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या चांगल्या मुलीचं भलं होऊ द्या. कशाला जागा अडवून ठेवता?’’ – ही मुक्ताफळं ऐकून अरुंधतीच्या डोक्याची शीर तडतडली. शारीरिकदृष्टय़ा अपंगत्व असलं तरी ते वगळता बाकी ती नॉर्मल होती. बुद्धिमत्ता चांगली, शैक्षणिक गुणवत्ता चांगली, असं असताना भणंग कारणं देऊन योग्य व्यक्तीस प्रवेश नाकारला जातो म्हणजे काय? तिनं दुर्गावतार धारण केला, ‘‘सर, तुम्ही आत्ता जे काही म्हणालात ते लेखी द्या. मला प्रवेश का नाही याचं काही तरी ठाम कारण त्यात लिहा. आता मी कोर्टात दाद मागेन याविषयी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला काय जमू शकतं आणि काय नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? ते माझं मलाच ठरवू द्या नि दाखवू द्या.’’ – अरुंधतीला एम.ए.ला एस.एन.डी.टी.लाच प्रवेश मिळाला हे वेगळं सांगण्याची गरज नाही. फर्स्ट क्लास फर्स्ट येऊन तिनं नंतर आपलं नाणं खणखणीत आहे हे सिद्धही केलं.
संकटातून वाट काढत पुन्हा वेगळ्या संकटाच्या बोगद्यात प्रवेश हे तिच्या पाचवीला पुजलेलं. पुण्यासारख्या शहरात नातेवाईक पुष्कळ होते; पण अरुंधतीला तिथं राहायचं नव्हतं. नातेवाईकांबरोबर राहताना येणारा अवघडलेपणा नको होता म्हणून तिनं पेइंग गेस्ट म्हणून खोली शोधायला सुरुवात केली. आधी फोनवर बोलून सगळं पक्कं केलं व प्रत्यक्षात तिथं पोहोचलं की, घरमालक म्हणायचे, ‘आम्हाला पेइंग गेस्ट म्हणून तुमच्यासारख्यांना ठेवून घेता येणार नाही. अपंगांची जबाबदारी वेगळी. ती कोण घेणार?’ – खरं तर अशी कुठली वेगळी जबाबदारी उचलायची होती? अरुंधती स्वावलंबी होती, रीतसर नियम पाळून पसे भरणार होती.. पण समाजाच्या मानसिकतेचं करायचं काय? मानसशास्त्रज्ञ होऊ पाहणाऱ्या अरुंधतीला या सगळ्यातून जावं लागलं. अरुंधतीनं आपला हा झगडा कधीही घरी सांगलीला कळवला नाही, कारण ते लगेच परतून ये म्हणाले असते. संघर्षांचा सामना थेटपणानं करण्याची अरुंधतीची वृत्ती तिला परतण्याची परवानगी देत नव्हती. वडिलांना न बोलता सगळं कळत होतं. त्यांनी हळुवारपणे तिला सांगून पाहिलं. तिनं तेच उत्तर दिलं, ‘‘मला जमतंय का नाही हे माझं मला ठरवू दे!’’
शिक्षण संपल्यावर येरवडा मेंटल हॉस्पिटलला मानसोपचारतज्ज्ञ म्हणून इन्टर्नशिपची संधी अरुंधतीला मिळाली. डॉ. रमेश किंकर आणि डॉ. उल्हास लुकतुके हे तिचे मानसशास्त्रज्ञ म्हणून करिअर घडवण्यामागचे स्तंभ. तिची हिंमत, धडाडी आणि समोरच्याला समजून त्याचा प्रश्न हाताळण्यातलं कौशल्य पाहून डॉ. लुकतुकेंनी तिनं स्वत:चं क्लिनिक उघडावं, असा आग्रह धरला. ते तिनं केलंच, परंतु आपलं ज्ञान अनेकांच्या उपयोगी पडावं म्हणून पुण्यातील बालकल्याण संस्थेत व अशा अनेक ठिकाणी जात राहिली. मुळात पसा हा कधी तिच्यासाठी प्राधान्यक्रम नव्हताच. आपल्याकडून मिळणाऱ्या मानसिक आधाराने कुणी आपली शक्ती पुन्हा कमवत असेल तर ते मात्र नक्की हवं होतं. अरुंधती फ्रीलान्स करत राहिली. वडिलांनीही तिला तीच दीक्षा दिली होती, ‘‘पसा नगण्य आहे. त्याच्या मागं धावू नको. तुझी ताकद वेगळी आहे, इतरांपेक्षा जास्त कष्ट तुला करावे लागतील; पण तुझ्या संवेदनशीलतेमुळं तुझ्याकडं येणारा माणसांचा ओघ कधीच आटणार नाही!’’ – आणि खरंच अरुंधतीचं तीन वर्षांत बस्तान बसलं. आज वडील तिच्याबरोबर शरीरानं नाहीत; परंतु तत्त्वानं जगण्याचं जे सूत्र तिला त्यांनी दिलं त्या रूपानं ते तिच्यासह रोज जगताहेत, असा अरुंधतीचा विश्वास आहे.
बहुविकलांगता असणारी मुलंमुली, लìनग डिसॅबिलिटीज असणारे पेशंट्स्, सेरिब्रल पाल्सी, स्पाटिक, स्पायनल कॉर्ड एन्जुरी असणाऱ्यांच्या मनांसाठी काम करता करता अरुंधतीनं आपला परीघ विस्तारला. डायबिटीस, लठ्ठपणा, कॅन्सर अशा गोष्टींशी झुंजणारी माणसं एका टप्प्यावर जगण्याबद्दल अत्यंत उदासीन होतात, एकाकीपणानं घेरली जातात, हे पाहून त्यांच्या प्रश्नांवरही अरुंधतीनं काम सुरू केलं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जन
डॉ. शशांक शहा, डॉ. जयश्री तोडकर यांच्यासारख्या तज्ज्ञांबरोबर सहकारी मानसशास्त्रज्ञ म्हणून ती काम करत राहिली. अधिक वेळ देऊन कष्ट करण्याची अरुंधतीची पद्धत, हुशारी, भाषेवरचं प्रभुत्व यामुळं दिवसेंदिवस ती तिच्या वरिष्ठांची आणि रुग्णांचीही लाडकी बनत गेली, मात्र तिच्याबरोबर काम करणाऱ्यांना तिचा हा वेग व प्रसिद्धी खटकू लागली. तिला मानसिक त्रास होऊ लागला. पुण्यामधल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयामधला अनुभव धक्कादायक म्हणावा असाच! मोठय़ा हॉस्पिटलमध्ये नी-पॅडसह गुडघ्यावर चालत जाऊन रुग्णांपर्यंत पोहोचायचे हे वेळखाऊ व थकवून टाकणारे काम. त्यामुळंच रुग्णालयाची व्हीलचेअर वापरून अरुंधती राऊंड्स घ्यायची. अरुंधती सांगते, ‘‘ही २०११ ची गोष्ट. एक दिवस रुग्णालयानं फतवा काढला की, तुम्हाला हॉस्पिटलची व्हीलचेअर वापरता येणार नाही. तुमची तुम्ही सोय करावी. खरं तर काही वेळासाठी रिकामी असलेली व्हीलचेअर वापरण्यानं कोणालाच कसला फरक पडत नव्हता, पण त्रास द्यायचा तर तो कशाही माग्रे दिला जाऊ शकतो. तोडकर मॅडम म्हणाल्या वाद नकोत, आपण आपली व्हीलचेअर आणू. ती आणलीही; पण मग हॉस्पिटलमधून दुसरा फतवा निघाला की, व्हीलचेअर वापरून झाल्यावर तुम्हाला ती परत न्यावी लागेल. हॉस्पिटलमध्ये ठेवता येणार नाही! – खरं तर माणुसकीच्या नात्याने आणि सामाजिक हक्क म्हणूनसुद्धा मला त्यांनी सन्मानानं वागवायला हवं होतं. मी कुठच्याच सवलती तुमच्याकडे मागत नाही, पण वावरण्यासाठीचं पर्यावरण तर द्या. तो माझा हक्क आहे! अशा वेळी खरं तर मला मानणाऱ्यांनी, माझ्या वरिष्ठांनी पािठबा द्यायला हवा होता. तसं घडलं असतं तर येणाऱ्या अनेकांना पुन:पुन्हा हक्कांची लढाई लढण्याचं कारण उरलं नसतं, एक पायवाट तयार झाली असती. मात्र पायवाट तयार होणंही सोप्पं नसतंच. मी राहते त्या हाऊसिंग सोसायटीमध्येही हाच झगडा मला करावा लागला. वेडय़ावाकडय़ा पाìकगमुळे माझी गाडी गरसोयीच्या ठिकाणी पार्क करून फ्लॅटपर्यंत पोहोचण्याचं दिव्य रोज रोज करण्याचा प्रसंग येऊ लागला तेव्हा मी सांगितलं, ‘माझा हक्क मी समंजसपणानं सांगतेय तोवर समजून घ्या, नाही तर पोलिसांकडे जावं लागेल. कायदा माझ्या बाजूनं आहे.’ मी असं ठणकावल्यानंतर परिस्थिती बदलली.’’
‘‘माझ्यासारख्या व्यक्तींना प्रत्येक ठिकाणी संघर्ष हा करावाच लागतो. मान खाली घालून कुढत जगणं स्वीकारलं, तर चार लोकांनाही बदलण्याचं बळ आपल्यात उरणार नाही. अपंगत्वानं हाडं वाकली तरी कणा ताठच ठेवायला हवा. कच खाता कामा नये! यातूनच शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी मत्रिपूर्ण व संवेदनशील समाजाची जडणघडण होऊ शकणार आहे. आता झोक्यावर बसलोच आहोत,
तर तो जास्तीत जास्त उंच घेण्याची रिस्क व मौज दोन्ही घेऊ या!’’        
संपर्क- arundhati.madhusudan@gmail.com

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…