|| रुचिरा सावंत

२०१०-२०२० : विज्ञान-तंत्रज्ञान

२०२१ हे वर्ष म्हणजे एका नव्या दशकाची पहाट आहे. या नव्या दशकात प्रवेश के लेला असताना थोडं थांबून गेल्या दहा वर्षांकडे मागे वळून पाहणं, विविध क्षेत्रांत घडलेल्या नानाविध, अकल्पित घटनांचा अंदाज घेणं, नव्या दृष्टिकोनासह त्या समजून घेणं, काही गोष्टींबद्दल अभिमान बाळगतानाच काहींना इथेच निरोप देणं, हे सगळं जितकं साहजिक आहे, तितकंच अनिवार्यसुद्धा.

 या दहा वर्षांची गोळाबेरीज करताना २०१० अगदी फार दूर नव्हतं असं जरी वाटत असलं, तरी या दहा वर्षांत आलेलं स्थित्यंतर, झालेला बदल पाहता शेकडो वर्षं उलटल्याचा भास होतो.  दहा वर्षांपूर्वीचं आजपेक्षा फार वेगळं असलेलं जग, आजचं आपण अनुभवत असलेलं जग यात खूप फरक आहे, हे ‘ट्रान्सफॉर्मेशन’ झालंय ते विविध क्षेत्रांतील बदलांमुळे. समाजाच्या प्रगतीचा आलेख ज्या काही महत्त्वाच्या पायांवर अवलंबून असतो, त्यांपैकी एक स्तंभ म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. माणसाच्या सतत शोध घेण्याच्या वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या, त्याला फार काळापासून या विश्वाविषयी, सजीव सृष्टीविषयी, माणसाविषयी सतावणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं या दशकात माणसाला सापडली आहेत आणि या उत्तरांबरोबर अनेक नवे प्रश्न आणि शक्यता त्याच्यासमोर फेर धरताहेत. असं असलं तरी स्त्रियांसाठी हे सारं मुळीच सोपं नव्हतं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आपलं स्थान मिळवण्यासाठी स्त्रियांनी केलेल्या आणि त्या करत असलेल्या संघर्षाविषयी, त्यांच्या प्रवासाविषयीच्या कथा सर्वश्रुत आहेत. आज मागच्या दशकभरात स्त्रियांनी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला समजून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं करायचा आहे.

ही गोष्ट आहे २०२० च्या महिला दिनाची. त्या दिवसाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय वेगवेगळ्या माध्यमांतून करून दिला जात असतो. अशीच २०२० च्या महिलादिनी ‘केमिकल अँड इंजिनीअरिंग न्यूज’ या नियतकालिकातील ‘अ डे विथ जेनिफर डोडुना’ या लेखाच्या माध्यमातून मला त्यांची ओळख झाली. CRISPR  तंत्रज्ञानातील ‘जीन्स’च्या (जनुकांच्या) संशोधनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या वैज्ञानिक आणि एक ‘सीरिअल आँत्रप्रेन्युअर’ या वर्षीच्या रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिक असणार आहेत हे त्या वेळी ध्यानीमनीही नव्हतं! CRISPR  या डोडुना यांच्या संशोधनामुळे ‘डीएनए सिक्वेन्स’ बदलणं, याबाबतच्या त्यांच्या संशोधनाचा उपयोग करून आजाराचा प्रसार रोखणं, जनुकीय दोष सुधारणं असे अनेक फायदे होऊ शकतात. या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार डोडुना आणि इमॅन्युएल कारपेंटियर या दोघींना CRISPR  तंत्रज्ञानातल्या जनुकांच्या संशोधनाबद्दल मिळाला. हा पुरस्कार अनेक कारणांनी महत्त्वाचा होता. २०१९ पर्यंत १८४ वैज्ञानिकांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं आहे. यांपैकी केवळ ५ स्त्रिया होत्या. २०२० मधील या पुरस्कारानं आता तो आकडा ७ झाला. २०१० पासून २०२० पर्यंत ३ स्त्रियांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं. या दोघींव्यतिरिक्त ते मिळवणारी आणखी एक स्त्री म्हणजे २०१८ मध्ये हा पुरस्कार प्राप्त झालेल्या फ्रान्सिस अरनॉल्ड. Directed Evolution (DE)  या पद्धतीचा वापर करून ‘एन्झाइम्स’ तयार करण्याच्या पद्धतीवरील मूलभूत संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. यातून निसर्गाला कमीतकमी हानी पोहोचवून नूतनीकरणक्षम संसाधनांसाठी एन्झाइम्स तयार करता येऊ शकतात. या आणि अशाच विविध प्रकारे या पद्धतीचा वापर मानवाला होऊ शके ल.

जेनिफर डोडुना यांची आणखी एक ओळख म्हणजे माणसाचा सध्याचा सर्वांत मोठा शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करोना विषाणूवरील लस शोधण्यातील त्यांचा सहभाग. करोनासंदर्भातील या संशोधनात अनेक स्त्रियांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यापैकी एक  नाव म्हणजे ओझलेम ट्युरेसी. BioNTech या कंपनीच्या सहसंस्थापक असणाऱ्या ओझलेम स्वत: एक डॉक्टर, वैज्ञानिक आणि उद्योजक आहेत. त्यांची कंपनी २०२० मध्ये ‘आरएनए’ आधारित लस बनवून त्यासाठी मंजुरी मिळवणारी पहिली कंपनी ठरली. अशा कठीण काळात माणसाला आधार देण्याचं मोलाचं कार्य त्यांनी केलं. जगातील ६० हून अधिक देशातील  १३०० हून अधिक माणसं या कंपनीत काम करतात आणि त्यांपैकी निम्म्याहून अधिक स्त्रिया आहेत. जेनिफर, ओझलेम ही काही प्रातिनिधिक नावं आहेत. त्यांच्या जोडीनं अनेक स्त्रिया या विषयातील संशोधनासाठी तहानभूक हरपून काम करत आहेत.

या दशकातील एकूण नोबेल पारितोषिकांचा विचार केला, तर जीवशास्त्र किंवा वैद्यकीय शाखेचं नोबेल दोन स्त्रियांना मिळालं. २०१४ मध्ये May-Britt Moser या नॉर्वेजियन सायकॉलॉजिस्ट आणि न्यूरोसायंटिस्टना (मानसतज्ज्ञ व मेंदूशास्त्रज्ञ) मेंदूतील ‘इनर जीपीएस’ प्रणाली शोधण्यासाठी नोबेल पारितोषिक विभागून प्रदान करण्यात आलं. आपण कुठे आहोत हे स्थान, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचा अचूक रस्ता, आपण लक्षात ठेवतो त्या साऱ्या गोष्टी याच ‘इनर जीपीएस’मुळे ध्यानात राहतात.  त्यानंतर पुढील वर्षीच- म्हणजे २०१५ मध्ये मलेरिया साथीवरील उपचारपद्धतीच्या (थेरपी) संशोधनासाठी

‘तू युयु’ यांना याच शाखेचं नोबेल विभागूनच मिळालं. या दशकात भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषिकासाठी २०१८ आणि २०२० असा दोन वेळा स्त्रियांचा सन्मान झाला. २०२० मध्ये अँड्रिया गेझ यांना आपल्या आकाशगंगेच्या मध्यावर असणाऱ्या एका विशाल कृष्णविवराच्या शोधासाठी इतर दोघांबरोबर विभागून हे पारितोषिक मिळालं. तर २०१८ मध्ये डोना स्ट्रीकलन्ड यांना ‘लेझर फिजिक्स’ या विषयातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी ते विभागून देऊन गौरवण्यात आलं.

भारतातील प्रसिद्ध ‘शांतीस्वरूप भटनागर पारितोषिका’ची नामावली पाहिली तर लक्षात येतं की, आजवर दिल्या गेलेल्या एकूण जवळपास ५६० पारितोषिकांपैकी स्त्रियांची संख्या २० सुद्धा नाही. असं असलं, तरी स्त्रियांचं या क्षेत्रातील कार्य सतत चालूच आहे. दिवसागणिक त्या नवनवी शिखरं सर करताना दिसून येत आहेत. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रातील स्त्रियांचं योगदान जाणून घेत असताना तंत्रज्ञानातील त्यांची भरारी दखलपात्र आहे.  ‘बायोटेक्नोलॉजी’ (जैवतंत्रज्ञान) या विषयामध्ये जगाच्या नकाशावर चीनचं अस्तित्व अधोरेखित करणाऱ्या ‘झाई लॅब’ या कंपनीच्या संस्थापक व प्रमुख कार्यकारी अधिकारी असणाऱ्या सुमंथा डू यांनी आणि त्यांच्या कंपनीनं या काळात उल्लेखनीय कार्य केलं. कर्करोग आणि संसर्गजन्य आजारांवरील ‘ऑटो इम्युनिटी’साठीच्या औषधांच्या निर्मितीसाठी काम करणारी चीनमधील ही संस्था जगातील आघाडीच्या काही संस्थांपैकी एक झाली. ‘लँडमाइन्स’ (खाणींमधील सुरुंग) शोधण्यासाठी ‘पोर्टेबल’ यंत्रणा तयार करण्यात योगदान दिलेल्या Regina E. Dugan यांनी याच काळात ‘यूएस डीफे न्स अ‍ॅडव्हान्स्ड रीसर्च प्रोजेक्टस् एजन्सी’ (डीएआरपीए) या संस्थेच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होण्याचा मान मिळवला. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि काँम्प्युटर व्हिजन या क्षेत्रांतील मूलभूत पाया रचणाऱ्या फी फी ली यांनी याच दशकात वृद्ध माणसांना स्वतंत्र आयुष्य जगता यावं व त्यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी सेन्सर्स व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा ताळमेळ साधत बरंच संशोधन केलं. ‘ब्लॅक रॉक स्टार्टअप’च्या संस्थापक असणाऱ्या मेट  लॉरेन्को यांनी या दशकाच्या उत्तरार्धात- म्हणजे २०१६ मध्ये आपल्या स्टार्टअपच्या स्थापनेसोबत जगभरातील कृष्णवर्णीय व्यक्तींना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवनिर्मितीसाठी सहकार्य करायला चालना देणारं एक व्यासपीठच उभारलं. हे करत असताना अनेक इनोव्हेशन्ससाठी आणि बदलांसाठी त्यांनी दारं खुली केली. या सगळ्याबरोबर आणखी एक फार वेगळं योगदान या काळात आरोग्य क्षेत्रास मिळालं. 23andMe ही कंपनी काही वर्षांपूर्वी एक आगळीवेगळी कल्पना घेऊन अ‍ॅन वोजसिकी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह स्थापन केली. आपल्या पूर्वजांविषयी माहिती मिळवणाऱ्या व आपल्याला भविष्यातील आरोग्यविषयक धोके समजून घेण्यासाठीच्या विविध चाचण्या त्यांनी तयार केल्या. २०१५ मध्ये ‘एफडीए’नं त्यांच्या या चाचण्यांना परवानगी दिली. यामध्ये काही प्रकारचे कर्करोग, सिस्टिक फायब्रोसिस, सिकलसेल, अल्झायमर, पार्किन्सन्स अशा चाचण्यांचा समावेश आहे.

अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रिया या दशकात मोलाच्या जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेसाठी अनेक स्त्रियांनी आघाडीवर काम केलं. ‘चांद्रयान-२’ मोहिमेसाठी ‘इस्रो’च्या (भारतीय अवकाश संशोधन संस्था) इतिहासात पहिल्यांदा एका मोहिमेसाठी मिशन संचालक आणि प्रकल्प संचालक म्हणून स्त्रियांची नेमणूक झाली. याच दशकात पहिला ‘ऑल विमेन स्पेस वॉक’ झाला. २०१२ च्या डिसेंबर महिन्यात जाहीर झालेल्या ‘नासा’च्या ‘परसिव्हरन्स’ मोहिमेत अनेक स्त्रिया त्यांच्या भूमिकेसाठी जगप्रसिद्ध झाल्या. यामध्ये ‘गायडन्स आणि कंट्रोल ऑपरेशन्स’ प्रमुख असणाऱ्या डॉ. स्वाती मोहन, ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरसाठीच्या प्रकल्प प्रमुख असणाऱ्या मिमि आँग ही नावं अग्रक्रमावर आहेत. याच दशकात संयुक्त अरब अमिरातींनी ‘एमिरेट्स’ मोहिमेची घोषणा केली. त्या मोहिमेसाठी काम करणाऱ्या ८० टक्के  स्त्रिया होत्या. अशा दमदार पद्धतीनं स्त्रियांनी २०१० ते २०२० या दशकातून नव्या दशकात पाऊल ठेवलं आहे.

या दशकात स्त्रियांनी कोणत्या संधींचं सोनं 

के लं, कोणत्या संधी गमावल्या, कोणत्या अनुभवांपासून त्या उपेक्षित राहिल्या, यातून शिकत असतानाच त्यांचा पुढचा मार्ग सुखाचा आणि विविध कामगिरी व अनुभवांनी युक्त असावा, यासाठी लक्ष देणं आवश्यक आहे. गेल्या दशकाच्या उत्तरार्धात स्त्रियांनी विज्ञान-तंत्रज्ञानास दिलेलं योगदान पाहता नवं दशक अधिक समृद्धीचं असेल अशीच आशा!

postcrdsfromruchira@gmail.com