डॉ. शंतनू अभ्यंकर shantanusabhyankar@hotmail.com 
‘नॅच्युरल’, ‘हर्बल’ आणि ‘होलिस्टिक’ या शब्दांना सध्या मोठंच महत्त्व आलंय. हे शब्द सर्वाधिक वापरले जातात, ते आरोग्य क्षेत्रातच.  पण जेव्हा एका गर्भवतीनं डॉक्टरांना  ‘नॅच्युरल सीझर’ करण्याची गळ घातली, तेव्हा ते विचारात पडले. मात्र काही वेळानं त्यांना जाणवलं, की हेही शक्य आहे! आणि त्यांनी तात्काळ दवाखान्याची पाटी बदलायला घेतली..

आठवडाभरापूर्वीचीच गोष्ट. मी अगदी मनातून खट्टू झालो. खुदाईखिन्नता पार वेढून राहिली मला. तसा मी बऱ्या मनोवृत्तीचा माणूस आहे. सुखदु:खे (जमेल तितकं) समे कृत्वा वगैरे. पण काही और घडलं आणि मी खचलोच.

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?

त्याचं झालं असं, की एक रुग्ण माझ्याकडे आली. गरोदरपणामुळे तिला बरीच दुखणी जडली होती. रक्तदाब वाढला होता, थायरॉईड बिघडलं होतं, शुगर तर झोके घेत होती. आधीची तीन ‘सीझर’ होती. मी आधीचे पेपर बघितले. रिपोर्टस्चा अभ्यास करता करता डोळ्याच्या कडेनं मी  तिच्या हालचाली निरखत होतो. एकूणच अस्वस्थता जाणवत होती. मला वाटलं, ‘डॉक्टर, तुम्हीच नॉर्मलच डिलिव्हरी करणारच असाल तरच तुमच्याकडेच डिलिव्हरी’ असा काहीतरी ‘च’कारांत प्रस्ताव ही माझ्यापुढे ठेवणार. असा प्रस्ताव आला असता तर माझं काम सोपं होतं. हे शक्य नाही, असं नम्रपणे सांगायचं आणि ही बया आणि बला टाळायची.

पण घडलं भलतंच. त्या बाईनी मला सांगितलं, की एकूणच ‘नेचर’- म्हणजे निसर्ग, या प्रकारावर तिचा भलताच विश्वास आहे. जगात जे काही घडतं ते निसर्गनियमानुसारच घडतं अशी तिची पक्की खात्री होती. तीन वेळा सीझर करावं लागलं, एवढं वगळता  तिच्या आयुष्यात अनैसर्गिक असं काही घडलं नव्हतं. किंबहुना आत्यंतिक काळजी घेऊन तिनं ते घडूच दिलं नव्हतं. तेव्हा तिचं म्हणणं असं, की ‘सीझर’ तर मी करावंच, पण ते शक्यतो ‘नॅच्युरल’ करावं! हे ऐकून मी हतबुद्ध, गतप्रभ, दिङमूढ वगैरे वगैरे झालो. सीझर करण्याच्या विविध पद्धती मला माहीत होत्या, पण ‘नॅच्युरल सीझर’ ही भानगड मला अवगत नव्हती. तसं मी तिला स्पष्टपणे सांगितलं. त्यावर ‘नॅच्युरल’ म्हणजे ‘कृत्रिम उपकरणं किंवा औषधं न वापरता केलेलं सीझर’ अशी व्याख्या तिनं मला ऐकवली.

यावर सर्वच उपकरणं कृत्रिम असतात. अणकुचीदार दगडानं पोट  फाडण्याची मला प्रॅक्टिस नाही, असं मी प्रामाणिकपणे कबूल केलं. तिनं मला तात्काळ माफ करून टाकलं. तेवढं उपकरणांचं  चालेल म्हणाली. पण मी औषधोपचार करणार त्यात कोणतेही ‘केमिकल’ नसावेत, ‘हॉर्मोन’ नसावेत आणि ‘स्टीरॉइड’ तर अजिबात नसावेत; असा एक नवाच पेच तिनं टाकला. आता संभाषण रंगात आलं होतं. मी तिला म्हणालो, ‘‘हे बघा, सर्व हॉर्मोन हे केमिकलच असतात, पण सारेच स्टीरॉईड नसतात. हां, पण काही हॉर्मोन स्टीरॉईड असतात. तसेच सर्व स्टीरॉईड हे हॉर्मोन नसतात, पण केमिकल असतात. त्यातही काही स्टीरॉईड हॉर्मोन असतात. आणि हॉर्मोन, स्टीरॉईड असो वा नसो अथवा स्टीरॉईड, हॉर्मोन असो वा नसो; काहीही असलं तरी  स्टीरॉईड आणि हॉर्मोन, हे दोन्ही केमिकलच असतात!’’

आता ती संपूर्ण गारद झाली होती. मग अचानक माझ्या जिभेवर पु.लं. नाचू लागले. ‘‘आयुष्यात मला भावलेलं एक गूज तुम्हाला सांगतो,’’ अशी अत्यंत गंभीर सुरुवात करत मी म्हटलं, ‘‘अहो,  तुम्ही ‘बाईसारख्या बाई’ आहात आणि मी ‘पुरुषासारखा पुरुष’ आहे, हे त्या स्टीरॉईड हॉर्मोनमुळेच बरं का!’’

माझ्या या सरबत्तीचा चांगलाच परिणाम झाला. आपणच केलेल्या लोकरीच्या गुंत्याकडे मांजरीनं स्तब्ध होऊन पाहावं तसा तिचा चेहरा झाला. आता मिशांवरून पंजा फिरवावा, का पंज्यावरून मिशा? असा प्रश्न पडलेल्या मांजरीसारखी ती दिसू लागली. शेवटी, ‘‘ते जाऊ दे हो डॉक्टर, तुम्ही ते नॅच्युरलचं तेवढं बघा ना.’’ एवढंच ती पुटपुटली.

मी तिला आठवडय़ाभरानं यायला सांगितलं आणि ‘नॅच्युरल सीझर’ कसं करायचं याचा विचार करता करता मी मनात सीझरची उजळणी करायला लागलो. सर्वप्रथम रुग्णाला दिलं जातं ‘अ‍ॅट्रोपिन’. बेलाडोना या झाडापासून मिळणारं हे द्रव्य. त्यामुळे अ‍ॅट्रोपिन या रुग्णाला चालायला हरकत नव्हती. मग त्वचा साफ करण्यासाठी ‘आयोडिन’. हे तर नॅच्युरलच झालं की. नंतर ‘स्पिरिट’- म्हणजे दारू, म्हणजे सोमरस, म्हणजेही नॅच्युरल! आणि हो, नुसतंच नॅच्युरल नाही; चक्क ‘हर्बल’सुद्धा!

मग भूल देण्यासाठी ‘झायलोकेन’ वापरलं  जातं. हे मात्र कारखान्यात बनवलं जातं. याला नॅच्युरल पर्याय म्हणजे डोक्यात हातोडा घालून त्या बाईंना बेशुद्ध करणं आणि तेवढय़ा वेळात सीझर उरकणं! पर्याय ‘नॅच्युरल’ जरी असला तरी त्यांना मान्य होण्यासारखा नसणार, असं आपलं मी समजलो.

बाकी पोट उघडून मूल बाहेर काढताच रुग्णाला ‘पिटोसिन’ आणि ‘मिथार्जिन’ इंजेक्शन दिलं जातं. पिटोसिन हा एक हॉर्मोन आहे. त्या बाईंच्या उपासाला हा चालणार का? पण हा तर शरीरातच निर्माण होतो. डिलिव्हरी होताच त्या बाईंच्या मेंदूतून सर्वदूर पसरणारच आहे तो. तेव्हा त्यात थोडी भर घालायला काहीच हरकत नसावी. मिथार्जिन हेदेखील ‘नॅच्युरल’ आणि हो, हर्बल औषध आहे. म्हणजे त्याची निर्मिती बुरशीपासून केली जाते. शिवाय मी ‘अँटिबायोटिक’ देणार, बुरशीपासून निर्माण झालेलं, ‘पेनिसिलिन’. तेव्हा हेही हर्बलच. याबद्दलही आक्षेप असायचं कारण नाही.

पुढे उघडलेलं पोट शिवण्यासाठी ‘कॅटगट’ हा प्राणीज धागा वापरता येईल आणि त्वचा शिवण्यासाठी सुताचा दोरा वापरला तरी चालतो. एरवी कॅटगट आणि सुतापेक्षा नवे, चांगले पर्याय मी वापरत असतो; पण या केसमध्ये खास जुने वापरायची माझी तयारी होती.

ऑपरेशननंतर वेदनाशामक म्हणून काही औषधं ‘नॅच्युरल’ नसल्यानं मला बाद करावी लागली. पण ‘अ‍ॅस्पिरिन’ हे विलोच्या खोडापासून बनलेलं औषध. ‘फॉर्टविन’ म्हणजे गांजाचा चुलतभाऊ. हे हर्बलच काय पण ‘स्पिरिच्युअल’सुद्धा असल्यानं रुग्णाची यालाही काही हरकत असण्याची शक्यता नव्हती! राहाता राहिलं सलाईन. सलाईन म्हणजे मिठाचं पाणी. अगदीच ‘नॅच्युरल’ की हो हे.

सरतेशेवटी माझ्या असं लक्षात आलं, की भूल देणं, सीझर करणं, भूल उतरणं, पुढे काही तास रुग्णाची प्रकृती स्थिर आहे ना हे पाहाणं, या सगळ्यादरम्यान मी शरीरातील अनेक गोष्टींचं संतुलन साधत असतो. म्हणजे ‘इनपुट’ आणि ‘आउटपुट’, रक्तस्त्राव आणि रक्त भरणं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि क्षार, असं बरंच काही. त्यामुळे माझं हे ‘संतुलन सीझर’ही होतं! शिवाय सीझर करताना बाळ, बाळाभोवतीचं पाणी, वार आणि मेम्ब्रेन असं सगळं मी काढून घेणार. यातला थोडा जरी भाग आत राहिला तर रुग्णाला काही त्रास होऊ शकतो. त्यामुळे ‘प्रॉडक्ट्स ऑफ कन्सेप्शन’चं समूळ निराकरण करणं ही एक महत्त्वाची पायरी आहे. गर्भावस्था संपुष्टात आल्यामुळे गर्भधारणेशी संबंधित सारे आजारही समूळ बरे होणार होते.

थोडक्यात, मी जे करत होतो ते ‘नॅच्युरल’ तर होतंच, पण ‘हर्बल’ही होतं. ‘हर्बल’ तर होतंच पण ‘संतुलित’ आणि ‘समूळ’ही होतं. आणि इतकं सगळं होतं, तर त्याला ‘होलिस्टिक’ म्हणायला हरकत ती कसली?

अचानक कोडं सुटलं.

मी तात्काळ फ्लेक्स बोर्डवाल्याला फोन केला. म्हटलं, ‘‘दवाखान्याबाहेर एक बोर्ड लावायचा आहे. घे मजकूर- आमचे  येथे ‘नॅच्युरल सीझर’ करून मिळेल.. थांब, थांब. आमचे येथे नॅच्युरल, हर्बल, संतुलित, समूळ तसेच होलिस्टिक सीझर करून मिळेल!’’

शेवटी काय, मला विशेष किंवा वेगळं काहीच करायचं नव्हतं. पाटीवर काय लिहायचं एवढाच तर प्रश्न होता!