रेश्मा राईकवार

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सुरू होऊन यंदा नऊ वर्ष पूर्ण झाली आणि आतापर्यंतची परंपरा कायम राखत हा सोहळा या वर्षीही पुरेपूर रंगला. याचबरोबरच यंदाचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्यातली ऊर्जा पाहून वातावरण पुलकित होऊन गेलं. मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथे नुकत्याच झालेल्या या सोहळय़ाचा हा वृत्तांत.

Sunil Kedar, Godse, Wardha, Sunil Kedar latest news,
वर्धा : गांधींच्या जिल्ह्यातून गोडसे विचार हद्दपार करा, माजी पालकमंत्री सुनिल केदार म्हणतात, “महात्म्यांचा तिरस्कार…”
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

 ‘शहर का तब्दील होना शाद रहना और उदास

रौनके जितनी यहाँ हैं औरतों के दम से हैं’

मुनीर नियाजी यांच्या या ओळींची शब्दश: प्रचीती आणून देणारा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’ हा सोहळा यंदा उपस्थितांनी अनुभवला. ‘एखाद्या शहराचं प्रसन्न असणं किंवा उदास असणं हे तिथल्या स्त्रियांवर अवलंबून असतं. त्यांच्या कर्तृत्वानंच त्या शहराची ओळख ठरत असते,’ असा भावार्थ सांगणाऱ्या या ओळी दशकपूर्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’चं महत्त्व विशद करतात. एका अर्थी ध्येयवेडय़ा, समाजासाठी झपाटून काम करणाऱ्या स्त्रीशक्तीनंच ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’चा लौकिक वाढवला आहे.

आत्मशोधातून गवसलेलं प्रेरणेचं, कार्याचं स्फुल्लिंग समाजमनांतही चेतवणाऱ्या स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’चं नववं पर्व यंदा साजरं झालं. सोमवारी, १० ऑक्टोबर रोजी दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहा’त झालेल्या भव्य पुरस्कार सोहळय़ात समाजासाठी भरीव कार्य उभारणाऱ्या नऊ दुर्गाना मान्यवरांच्या हस्ते ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’ देऊन सन्मानित करण्यात आलं.

काळाची गरज ओळखून सामाजिक कार्यापासून मूलभूत विज्ञान-संशोधन क्षेत्रात पाय रोवून उभ्या राहिलेल्या कर्तृत्ववान दुर्गाचा सन्मान आणि गेल्या पाच दशकांहून अधिक काळ कलासाधनेच्या जोरावर हिंदूस्थानी शास्त्रीय संगीताच्या मेरुमणी ठरलेल्या बेगम परवीन सुलताना यांचा या दुर्गाच्या हस्ते जीवनगौरव सन्मानक्षण, असा अनोखा योग या सोहळय़ाच्या निमित्तानं जुळून आला.

एका ठोस उद्देशानं सुरू झालेला सातत्यपूर्ण असा प्रत्येक उपक्रम कुठल्या ना कुठल्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचतो. दशकपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ उपक्रमानंही यंदा असाच अर्थपूर्ण टप्पा अनुभवल्याचा आनंद ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केला. दरवर्षी या पुरस्कारांसाठी येणाऱ्या ४००-४५० अर्जामध्ये विविध क्षेत्रांत धडाडीनं समाजकार्य करणाऱ्या स्त्रियांची संख्या अधिक असते. यंदा मूलभूत विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्त्रियांचे अर्ज या पुरस्कारांसाठी मोठय़ा प्रमाणात आले होते, असंही त्यांनी सांगितलं. ‘स्त्रियांना आपण स्वातंत्र्य देत आहोत असा आव आजही समाजमनात असतो. मात्र या सगळय़ापलीकडे जात समाजस्तुतीपासून दूर असलेल्या अनेक स्त्रिया विविध क्षेत्रांत भरीव स्वरूपाचं कार्य करत आहेत. त्यातही विज्ञान-संशोधनात स्त्रिया फारशा आढळून येत नाहीत हा आपल्याकडचा प्रचलित समज. तो यंदा पुरस्कारासाठी याच क्षेत्रातून आलेल्या अर्जानी मोडून काढला. विज्ञान क्षेत्रात अत्यंत मूलगामी स्वरूपाचं कार्य करणाऱ्या स्त्रियांना समाजासमोर आणणं हा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’चा उद्देशही सफल होत आहे,’ असा आनंद त्यांनी व्यक्त केला.

 यंदा या पुरस्कारांसाठी आलेल्या अर्जाची अंतिम छाननी करून नऊ दुर्गा निवडण्याचं कठीण काम सामाजिक कार्यकर्त्यां छाया दातार, वृषाली मगदूम आणि उद्योजिका मीनल मोहाडीकर यांच्या निवड समितीनं केलं, अशी माहिती ‘लोकसत्ता चतुरंग’च्या संपादिका आरती कदम यांनी दिली. सातत्यानं नऊ वर्ष हा पुरस्काराचा उपक्रम राबवत असताना समाजाचं बदलत गेलेलं चित्र या वर्षीच्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’त अधिक ठळकपणे जाणवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या वेळी प्रथमच सायबर सुरक्षेसाठी झटणाऱ्या, करोना विषाणू कसा आला हे शोधू पाहणाऱ्या, ते कृषीमधील जैवरसायन संशोधनातल्या शास्त्रज्ञ-उद्योजिकांचे अर्ज मोठय़ा प्रमाणावर आले होते, असं आरती कदम यांनी स्पष्ट केलं.

अमृतमहोत्सवी चित्रपट संगीताची मैफल

समाजोपयोगी कार्य उभारणाऱ्या या दुर्गाच्या सन्मान सोहळय़ाला कायमच शब्दसुरांच्या मैफलीची संगत लाभते. यंदा ७५ वर्षांतल्या हिंदी चित्रपट संगीताचा आढावा घेणारा ‘अमृत सिनेमा’ हा संगीतमय कार्यक्रम प्रसाद महाडकर यांच्या ‘जीवनगाणी’तील कलाकारांनी सादर केला. ७५ वर्षांत हिंदी चित्रपट संगीत कसं बदलत गेलं, त्या त्या काळातले संगीत दिग्दर्शक आणि गायक-गायिकांचा प्रभाव कसा पडत गेला, याचं अभ्यासपूर्ण निवेदन कुणाल रेगे यांनी केलं. चार टप्प्यांत हा प्रवास सुरेल गाण्यांच्या साथीनं उलगडत गेला. ‘आईए मेहेरबाँ..’, ‘ख्वाब हो या तुम कोई हकीकत’, ‘माना जनाब ने पुकारा नही’, ‘लग जा गले’, ‘ऐ मेरे वतन के लोगो’ असा सुमधुर गाण्यांचा १९६८ च्या आधीचा काळ. १९६८ ते १९८७ या भारतीय सिनेमाचं सुवर्णयुग मानल्या जाणाऱ्या काळात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन या  सुपरस्टार नायकांवर चित्रित झालेली गाजलेली गाणी, एस. डी. बर्मन-आर. डी. बर्मन, खय्याम, शिव-हरी ते रवींद्र जैन, बप्पी लाहिरी असे भिन्न संगीत शैलीतील संगीतकार हा इतिहास त्या काळातील गाण्यांनी अधिकच रंगतदार केला. ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘तेरी बिंदिया रे’, ‘तेरे बिना जिंदगी से शिकवा’, ‘चिंगारी कोई भडके’ अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर झाली. १९८८ ते २००७ या काळात ए. आर. रेहमान या संगीत दिग्दर्शकांमुळे जागतिक स्तरावर पोहोचलेलं भारतीय चित्रपट संगीत आणि २००७ ते आत्ताच्या काळात तरुणाईला भुरळ घालणारे प्रीतम, अमित त्रिवेदीसारखे संगीतकार, असा खूप मोठा चित्रपट संगीताचा पैस गाण्यातून रसिकमनाचा ठाव घेता झाला. जय आजगांवकर, राजेश अय्यर, अपूर्वा पेंढारकर आणि सोनाली कर्णिक यांच्या गायनानं ही मैफल रंगली.

मान्यवरांच्या हस्ते सन्मान..

या पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेल्या प्रत्येक दुर्गेचं कार्य अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी आपल्या ओघवत्या निवेदनातून उपस्थितांपर्यंत पोहोचवलं. दुर्गाचा कार्यपरिचय करून देणाऱ्या या संहितेचं लेखन ‘लोकसत्ता’चे शफी पठाण यांनी केलं होतं. निवेदनाबरोबरच लघुमाहितीपटातूनही या प्रत्येक दुर्गेचा प्रवास, त्यांनी केलेला संघर्ष समर्पकरीत्या उलगडत गेला. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ‘जमीन प्रायव्हेट लिमिटेड’च्या अस्मा सय्यद, ‘ठाणे जनता सहकारी बँके’चे शरद गांगल यांच्या हस्ते सायबर सुरक्षेबाबत काम करणाऱ्या सोनाली पाटणकर, जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी क्षेत्रात  बदल घडवू पाहणाऱ्या संशोधक-उद्योजक संदीपा कानिटकर आणि कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागलेल्या पीडितांना उमेद देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम करणाऱ्या तसंच उद्योजक असलेल्या भूपाली निसळ यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यात अभिनेत्री वंदना गुप्ते, ‘तन्वी हर्बल्स’च्या ऋचा पै मेहेंदळे आणि उत्पादन शुल्क व नागरी हवाई वाहतूक विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या हस्ते पीडित-वंचितांना ‘निरामय आरोग्य’ मिळण्यासाठी काम करणाऱ्या सीमा किणीकर, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या तपस्वी गोंधळी आणि मिथेन वायू कमी करण्यासाठी, तसंच करोनाच्या उत्पत्तीविषयक संशोधन करणाऱ्या डॉ. मोनाली रहाळकर यांना सन्मानित करण्यात आलं. तर ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक किरण शांताराम, अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाच्या प्रकाशक वैदेही ठकार यांच्या हस्ते देशातील नॅनो तंत्रज्ञानातील एक प्रमुख वैज्ञानिक डॉ. सुलभा कुलकर्णी, मूलभूत संशोधनात व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात रमलेल्या डॉ. सुनीती धारवाडकर आणि अंध-अपंगांना स्वाभिमानानं जगता यावं यासाठी धडपडणाऱ्या जाई खामकर या दुर्गाना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘जो रियाज करेगा, वही राज करेगा’

‘हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतात बेगम दोनच. एक अख्तरीबाई आणि दुसऱ्या बेगम परवीन सुलताना. संगीतातील प्रत्येक प्रकारावर ताकदीची हुकमत मिळवणाऱ्या कलावंत,’ अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२२’च्या मानकरी बेगम परवीन सुलताना यांच्या प्रतिभेचे विविध पैलू उलगडले. बेगम परवीन सुलताना यांनी कलावंत म्हणजे काय याचं मर्म आपल्या छोटेखानी भाषणातून उपस्थितांना सांगितलं. ‘संगीत ही गुरुमुखी विद्या आहे. म्हणजेच गुरूसमोर बसून संगीताचे धडे घ्यायचे आणि त्याला करणी विद्येची जोड द्यायची. म्हणजेच सतत रियाज, सराव करून आपल्या कलेत नैपुण्य मिळवायचं. जो रियाज करेगा, वही राज करेगा,’ असा गुरुमंत्र बेगम परवीन सुलताना यांनी दिला. संगीत असो वा अन्य कोणतंही क्षेत्र, अभ्यास आणि सरावाशिवाय तुम्हाला त्यात उत्कृष्टता साधता येत नाही, हे सांगतानाच कलावंतानं प्रत्येक मैफल ही आव्हान असल्यासारखी मेहनतीनं रंगवायला हवी, असंही त्यांनी सांगितलं. 

पुरस्कार मिळवलेल्या नऊ दुर्गाचं त्यांनी भरभरून कौतुक केलंच, पण त्यांच्या हस्ते हा बहुमान आपल्याला दिला, याबद्दलही आभार व्यक्त केले. समाजोपयोगी कार्य उभारणाऱ्या या नऊ दुर्गाच्या शक्तीचा जागर म्हणून ‘भवानी दयानी’ हे मिश्र भैरवीतील भजन त्यांनी गायलं. राज्यभरातील या नऊ दुर्गाच्या अचंबित करायला लावणाऱ्या यशोगाथा, त्याच्या जोडीला स्वरमाधुर्यानं भरलेली चित्रपट संगीताची मैफल अशा या आगळय़ा पुरस्कार सोहळय़ाची सांगता बेगम परवीन सुलताना यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी झाली आणि हे क्षण उपस्थितांनी आपल्या मनात साठवून घेतले. ‘इन्शाअल्लाह फिर मिलेंगे..’ हे बेगमजींचे शब्द आणि नऊ दुर्गाच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’चं दहावं पर्वही आश्वासक असेल, हा विश्वास मनात जागवणारी ठरली.

reshma.raikwar@expressindia.com