जोरदार पावसाला सोबत घेऊन भल्या सकाळी पोहोचलो ठाण्याहून नाशिकला. कुसुमाग्रज स्मारकाच्या परिसरातील सभागृहामध्ये रसिक जमू लागले होते. आमच्या कार्यशाळेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी, नाशिक परिसरच नव्हे तर थेट धुळे, जळगावपासून आले होते. विषय होता ‘मनोव्यापार आणि चित्रपट!’

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या चित्रपटनिर्मिती करणाऱ्या जोडीचं वैशिष्ट्य असं की, त्यांनी सातत्याने मानसिक क्षोभ, समस्यांवर चित्रपट तयार केले. असा कलासंग्रह जगात कोणीही निर्माण केला नसेल. मानसिक आजाराचं यथातथ्य चित्रण करतानाच त्याभोवती एक गोष्ट रचायची आणि त्यातून मनोस्वास्थ्य प्रबोधनाला एक कलात्मक उंची द्यायची हे शिवधनुष्य त्यांनी वारंवार पेललं. त्यांच्या चित्रपटांमध्ये कलात्मक आणि मानसशास्त्रीय अस्सलपणा एकजीव होतो. ‘देवराई’ या चित्रपटाचा उपयोग, तरुण मनोविकारतज्ज्ञांना ‘स्किझोफ्रेनिया’ या आजाराची लक्षणं शिकवण्यासाठी देशापरदेशात होतो. त्याच वेळी ज्यांना ‘स्किझोफ्रेनिया’बद्दल अजिबात माहिती नाही, अशा प्रेक्षकालाही हा चित्रपट गुंतवून ठेवतो.

कार्यशाळेला आकार देण्यासाठी माझ्याबरोबर होता खुद्द सुनील सुकथनकर. आम्हा दोघांनाही प्रिय असणारी सुमित्रा काळाच्या पडद्याआड कधीच जाणार नाही, हा विश्वास नव्याने जागवणारा दिवस होता तो आमच्यासाठी. कार्यशाळेचं प्रास्ताविक करताना मी काही उपयुक्त संज्ञा शिकवल्या. मोठ्या चार्ट पेपरवर ते सारे शब्द लिहून त्याची पोस्टर्स लगेच भिंतीवर लावली. चर्चेसाठी असे संदर्भ समोरच असले की सारेच प्रेक्षक त्याचा उपयोग करतात. कशी होती ही पोस्टर्स? मानसिक आरोग्य म्हणजे विकार (Disorder), विसंवाद ( Distress) आणि विकास (Development) अशा तिन्ही पायऱ्या आहेत. ‘देवराई’ चित्रपटामध्ये शेष या व्यक्तिरेखेला विकार आहे, पण कमालीच्या तणावाखाली (Distress)आहे त्याची बहीण सीना. चित्रपटाचे दिग्दर्शक या दोघांमधला विकास कथेमध्ये अधोरेखित करतात.

चित्रपटामध्ये आपल्याला दिसणाऱ्या भावनांचं वर्गीकरण करणारा एक तक्ता होता. ‘मी’ भावना, ‘आम्ही’ भावना आणि ‘आपण’ भावना असा पट असतो, स्वकेंद्रित ते सर्वकेंद्रित भावनांचा. चित्रपटाचा ‘अर्थ’ लावताना शब्दार्थ, भावार्थ, मथितार्थ आणि गर्भितार्थ असे चार स्तर असतात. यातून दिग्दर्शक आपल्याला कोणत्या जीवनमूल्यांचं दर्शन कसं घडवतो ते आपण अनुभवायचं आहे. एक तक्ता होता वर्तनाचा. तटस्थ (Passive), भिडस्त (Submissive), ठाम ( Assertive) आणि आक्रमक (Aggressive) अशा काही शैली आम्ही चर्चा करून लिहिल्या. चित्रपटाच्या ‘फ्रेम’चा दृकश्राव्य भाषेतील सर्व घटक सांगणारा एक आलेखही तयार झाला. चित्रपट पाहताना त्याला पारखण्याची प्रक्रिया दाखवणारे एक छोटेखानी गाइडच तयार झाले म्हणा ना.

सुमित्रा-सुनीलचे आम्ही निवडलेले चित्रपट होते ‘देवराई’ (स्किझोफ्रेनिया), ‘बाधा’ (कन्व्हर्शन डिसऑर्डर), ‘अस्तु’ (डिमेन्शिया) आणि ‘कासव’ (डिप्रेशन). या चित्रपटांतील सरासरी पाच ते आठ मिनिटांचे प्रसंग दाखवून त्यावर रसास्वादाची चर्चा व्हायची. पुढच्या वेळी यामध्ये आम्ही ‘नितळ’ हा ‘कोड’ या त्वचाविविधतेवरच्या चित्रपटाचाही समावेश करू.

सुनील या प्रसंगांच्या चित्रीकरणाबद्दल बोलायचा आणि मी त्यातील मनआरोग्याच्या मुद्द्यांवर. मी काही प्रमाणामध्ये चित्रपटाच्या भाषेतही लुडबुड केली. त्याचं कारण असं की, या साऱ्या संहिता लिहून झाल्यावर त्यांचे पहिले वाचक होण्याच्या यादीत माझा समावेश असायचा. ‘देवराई’ आणि ‘कासव’ या चित्रपटांचा अधिकृत मनआरोग्य सल्लागार म्हणून माझा वाटा उचलण्याचा मान मिळाला होता. या चित्रपटांमधल्या अभिनेत्यांच्या प्रशिक्षणातही माझा सहभाग होता. त्यामुळे पडद्यावर दिसणाऱ्या प्रसंगातील छोट्या पण वेधक गोष्टी टिपायला सोपे पडत होते.

‘अस्तु’ चित्रपटाच्या शेवटचा प्रसंग पाहताना ज्याचे डोळे पाणावत नाहीत असा माणूस विरळाच. डिमेन्शिया झालेले आप्पा(डॉ. मोहन आगाशे) आणि त्यांना मातृत्वाची माया देणारी चेनम्मा (अमृता सुभाष) यांच्या नात्याची वीण पडद्यावर उमटत होती. ‘बाधा’ चित्रपटातील धनगर तरुणीच्या (अमृता सुभाष) दडपलेल्या भावना आणि त्यांचे उसळून येणारे अस्तित्व प्रेक्षकांना सुन्न करत होते. स्वत:चं खासगी वास्तव आणि जगातल्या सर्वांचे सामायिक वास्तव यामध्ये लोंबकळणारा ‘देवराई’मधला शेष (अतुल कुलकर्णी) आणि त्याची बहीण सीना (सोनाली कुलकर्णी) यांची व्यथा थेट आमच्या मनात उतरत होती. ‘कासव’मधला भावनेनं उद्ध्वस्त झालेला मानव (आलोक राजवाडे) जानकीबरोबर (इरावती हर्षे) त्याच्या जगण्याचा सूर पुन्हा कसा मिळवतो हे अनुभवताना प्रेक्षक नैराश्याच्या सुन्न प्रदेशात सफर करून आले.

हे सारे प्रसंग प्रेक्षकांना दाखवण्याआधी आम्ही दोघे त्यावर बोलायचो. चित्रपटातील काही प्रसंग पाहिल्यावर ते प्रतिक्रिया द्यायचे. त्यावर चर्चा व्हायची. ‘अस्तु’ मध्ये आप्पांची मुलगी इरा ही मुख्य काळजीवाहक असते. अर्थात् ‘केअरगिव्हर’. पण चनम्मा होते रक्ताने न जोडलेली काळजीवाहक. ‘देवराई’ चित्रपटाच्या निमित्ताने काळजीवाहक गटासाठी नवे नाव जन्माला आले, ‘शुभंकर’. आणि मनोरुग्णांसाठी नवी संज्ञा ‘शुभार्थी.’ ‘देवराई’मध्ये सीना असते रक्ताची बहीण आणि कल्याणी असते, शेषची बालमैत्रीण. काळजी घेणं हे तत्त्व रक्ताच्या नात्यापुरतं मर्यादित नाही, हा दिग्दर्शकद्वयीचा विश्वास त्यात दिसतो. ‘कासव’ हा असा चित्रपट आहे, ज्यामध्ये नैराश्याच्या समस्येच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेले जानकी आणि मानव एकमेकांचे शुभंकर बनतात. मानव ज्यावेळी त्याच्या औदासिन्याशी झगडत असतो, तेव्हा तुलनेने पुढच्या विकास टप्प्यावर असलेली जानकी त्याला स्वीकारते. आपला म्हणते.

‘‘या दोघांचं नातं आहे वेदनेमधल्या सहवेदनेचं.’’ आमच्या चर्चा रंगत होत्या. नाइलाज असल्यासारखे आम्ही चहा-जेवणाची मध्यंतरे घेत होतो. असे सहा तास पटकन उडून गेले. मनाचा थकवा तरीही दूरच होता. कारण आमच्या सहभागी प्रेक्षकांतील काही जणांनी त्यांच्या स्वत:च्या कहाण्या धीटपणे मांडायला सुरुवात केली होती. नैराश्याचा प्रश्न आता फक्त ‘कासव’ चित्रपटातला नव्हता, तर त्या चक्रातून गेलेल्या व्यक्ती आता स्वत:च्या भावना थेट चित्रपटाशी जोडत होत्या. इतर सर्वांचं तिथे असणं हा त्यांच्यासाठी अडसर नव्हता तर अवसर होता.

सुमित्राचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. किती छान वाटलं असतं तिला. ती जशी कलाकार होती तशी हाडाची कार्यकर्तीसुद्धा होती. समाजशास्त्राचं शिक्षण असल्याने तिच्या सामाजिक समरसतेला अभ्यासक जाण होती. मनआरोग्य समस्यांची फक्त चर्चा होत नाही आहे, तर तिच्या चित्रपटाच्या निमित्ताने संवादाचे अडथळे विरून जाताहेत आणि सामाजिक परिघामध्ये वैयक्तिक वेदना मांडल्या जात आहेत, स्वीकारल्या जात आहेत. हे सारे चित्रपट आता ‘ओटीटी’वर विविध चॅनेलमध्ये उपलब्ध आहेत हे किती चांगलं आहे. आपण सारेच आता या ठेव्यापासून शिकू शकतो.

दुपारी चार वाजता आम्ही कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो. आम्ही पाहणार होतो, सुमित्राने एकटीनं, (सोलो) दिग्दर्शित केलेला आणि तिची अंतिम कलाकृती असलेला ‘दिठी’ हा चित्रपट. दि.बा. मोकाशी यांच्या ‘आमोद सुनासी आले’ या कथेने सुमित्राला अनेक वर्षं झपाटलं होतं. तिची खुद्द दिबांशीही चर्चा झाल्याचं स्मरतं. आधुनिक मराठी लघुकथेच्या इतिहासाने मी सुरुवात केली. मौज-सत्यकथा-लिटल मॅगेझिन्सच्या काळाबद्दल बोललो. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, विद्याधर पुंडलिक अशा मोकाशींच्या समकालीन लेखकांबद्दल बोललो. या कथेचं शीर्षक म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवातील नवव्या अध्यायातील ओळी. ‘ज्ञानेश्वरी’ हा महाग्रंथ संपूर्ण झाल्यानंतर सद्गुरु निवृत्तीनाथ आपल्या शिष्यबंधूला म्हणाले की, ‘‘आता तुझी स्वत:ची निर्मिती होऊ दे.’’ ‘ज्ञानेश्वरी’ हा टीकाग्रंथ असल्याने ज्ञानदेवांनी त्यानंतर ही निर्मिती केली. संप्रदायामध्ये हरिपाठ रोज वदावा, ज्ञानेश्वरी पारायणाला घ्यावी आणि त्या पूर्वतयारीनिशी ‘अमृतानुभवा’च्या किमयेमध्ये उतरावं, असे म्हणतात.

तर एका खेडेगावातला रामजी लोहार आणि त्याचे साथी ‘अमृतानुभवा’चे पोथीवाचन करत असतात. पावसाळी दिवस असतात. पावसाला उसंत म्हणून नसते. नदीओढे फुरफुरत असतात. त्या पुरामध्ये रामजीचा उमदा आणि कर्तृत्ववान मुलगा वाहून जातो. आयुष्यभर साधे, समाधानी वारकरी जीवन जगलेल्या रामजीला असह्य यातना होतात. त्याच्या सर्व श्रद्धा ढवळून निघतात. त्याला भक्तीचा अर्थ आणि उद्दिष्ट कळेनासे होते. वियोगाचा सुन्नपणा हर श्वासाला असा रुतत, बोचत असताना त्याला टाहो ऐकू येतो, एका अडलेल्या गाईच्या मालकिणीचा. रामजीकडे सुईणीचं कौशल्य असतं. गाईच्या बाळंतपणामध्ये ते तो वापरत असतो सेवाभावाने. तो उठतो आणि त्याची हत्याराची पेटी घेऊन त्या गाईला सोडवायला जातो. पुढे काय होतं आणि गाईबरोबरच रामजीच्या मनाची भावनिक अडवणूक कशी संपते याचं अतिशय भिडणारं चित्रण तो चित्रपट पाहताना अनुभवलं

‘दिठी’ शब्दाचा शब्दार्थ आहे दृष्टी किंवा नजर. पण त्यामध्ये भावना घातल्या की तो होतो ‘पाहण्याचा प्रवाह’ माणसाकडे व्यवहाराची दृष्टी असते. त्यामध्ये जे पाहायचे ते आणि जो पाहणारा असा भेद असतो. हे जग मी-तू पणाच्या सहकार्य आणि कलहावर चालतं. यापलीकडे असते ती ज्ञानदृष्टी. ती चित्तामधले भेद घालवते. भेद निमाले की वैयक्तिक ‘मी’पणासुद्धा विरघळतो. अहंकारविरहित अनुभवाचा प्रवाह म्हणजेच अमृतानुभव.

गाईचं बाळंतपण करताना रामजी स्वत:ची वेदना गायीच्या वेदनेशी समरस करतो. तिच्या वेदनेत निर्मितीची शक्यता आहे. त्याच्या वेदनेमध्ये वियोगाची पोकळी आहे. निर्मिती आणि लय यांचं हे सृष्टीचक्र किती अव्याहत आहे. गाईला मदत करताना रामजी उरतो फक्त माणुसकीपुरता. इतका एकतान होतो की, स्वत:च्या वेदनेपार जातो. गाय सुटते. वासरू स्वत:च्या पायावर उभं राहतं.

नव्या जीवनाच्या प्रकाशात ताटातुटीचा अंधार लटका पडतो. रामजीने स्वत:च्या सुनेला घर सोडून जाण्याची धमकी दिलेली असते, कारण तिला मुलगी होते. त्याला हवा असतो मुलगा. त्यानिमित्ताने आपला गेलेला मुलगा परत येईल हा रामजीचा विश्वास. पण आता नवीन ‘दिठी’ ल्यालेला रामजी सुनेला म्हणतो, ‘‘तुझ्या म्हाताऱ्या लेकराला माफ कर.’’ प्रेमाचा पान्हा फुटल्यासारखा त्या नातीला तो जवळ घेतो. मन मोठे करणाऱ्या अनुभवानंतरही तो पोथी पूर्ण करायला जातोच. ज्ञानदृष्टी आल्यावरही भक्ती संपत नाही हे तर माऊलीचं प्रतिपादन. रामजीचा एकटेपणाचा अनुभव त्याच्या साऱ्या सवंगड्यांचा होतो. सारे जण पाणावल्या डोळ्यांनी ज्ञानेशांच्या ओळी सजीव करतात… ‘‘नाकच झाला सुवास आणि ध्वनिलहरी बनले कान । दृश्यामध्येच विरघळून गेली, जणू डोळ्यांची तहान ।।’’

चित्रपट संपल्यावर त्याचं निरूपण करता करता माझेही डोळे भरून येत होते. भोवताली ज्ञानदेव होते, दि.बा. मोकाशी होते, सुमित्रा होती, चित्रपटातले अवघे नट आणि तंत्रज्ञ होते. मूर्तीतून मुक्त झालेला चैतन्यमय विठुरायाही होता. सहस्रा पाकळ्यांच्या द्वैताने फुललेले ‘दिठी’चे एकरूप कमळ आम्हा सर्वांच्या चित्तामध्ये फुलत होते… अद्वैत यापेक्षा वेगळे काय असते!