‘फॅन्टसी’ हा प्रकार पुलंनी फार कमी हाताळला. म्हणूनच ही – एक पुलं फॅन्टसी – खास दिवाळीच्या निमित्ताने. पुलंची क्षमा मागून.
‘फॅन्टसी’ हा प्रकार पुलंनी फार कमी हाताळला. ‘गुळाचा गणपती’ चित्रपटातील काही गाण्यांत तो थोडाफार आढळतो. विद्याधर पुंडलिक यांनी एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला होता, ‘शुद्ध फॅन्टसीवर आधारित विनोद मराठीतून का येत नाही?’ पुलं म्हणाले होते, ‘मला वाटतं फॅन्टसीला लागणारं जादूचं वातावरण आपल्याकडे नाही. फॅन्टसीचं जग हे जादूच्या नगरीसारखं असतं. अशी फॅन्टसी आपल्या संस्कृतीत कमी आहे.. आपल्याकडे तशी भुतंखेतं आहेत, पण त्यात भीती आणि चेष्टेचं एलिमेंट जास्त. एक कृष्ण सोडला, तर देवाचीसुद्धा भीती घालण्याकडे आपला कल जास्त असतो. आपल्याकडे मुलांना ‘सांताक्लॉज’ही नाही..’
कोणत्याही व्यक्तीचं व्यंग शोधणं हा मूळ स्वभाव असल्यामुळे, त्यांना एका गोष्टीची चुटपुट होती- व्यंगचित्र न आल्याची. ‘ड्रॉईंग मास्तरांनी माझ्या चित्रकलेशी जुळवून घेतलं असतं तर..’ तोही प्रकार त्यांनी हाताळला असता. मग शब्दांवर अतोनात प्रेम करणाऱ्या पुलंना, व्यंग दाखविण्यासाठी शब्दांची गरज पडली नसती! तसा मूकनाटय़ (माईम) हा प्रकार त्यांनी ‘बटाटय़ाच्या चाळीत’ हाताळला. व्हिक्टोरियात बसलेल्या माणसांचे गचके, ती थांबल्यावर होणाऱ्या अ‍ॅक्शनला भरपूर टाळ्या पडत. चार्ली चॅप्लीनच्या ‘ट्रॅम्प’लादेखील बोलपटांपूर्वी मूकपटांत अभिनयासाठी कधी शब्दांची गरज पडली नाही. चॅप्लीन तर पुलंचं दैवत..त्यांनी म्हटलंय, ‘चॅप्लीन हा मला नेहमीच एकमेवाद्वितीय वाटत आला आहे. त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी चटकन हात जोडून लांबूनच नमस्कार केला.. नंतर हसू आलं, पण त्याला इलाज नाही.’ पुलंच्या घरात देवाची तस्वीर नसेलही, पण संगीत-साहित्य-संस्कृतीत रमलेल्या या बहुरूप्याच्या दिवाणखान्यात तीन गोष्टी होत्या. रवींद्रनाथ टागोरांचं सुंदर रेखाचित्र, चार्ली चॅप्लीनचं नजर वेधणारं छायाचित्र अन् शांती निकेतन येथील शर्वरी रॉयचौधुरींनी घडविलेला, बडे गुलाम अली खाँसाहेबांचा अर्धपुतळा- बस्ट! याच रॉयचौधुरींनी पुलंचा पाल्र्यातील ‘बस्ट’ घडविताना चष्माच उडविला होता.. कारण म्हणे चष्म्यामुळे डोळ्यातले भाव हरवतात! आपल्याला तोपर्यंत पुलंचा चष्मा हा चेहऱ्याचाच एक भाग वाटायचा. डोळ्यांतल्या मिश्कीलपणास चष्म्यामुळे फ्रेम मिळायची. चॅप्लीनची हॅट अथवा केनस्टीक, पुलंचा चष्मा अशा वस्तूंच्या देखील मग आख्यायिका होतात, फॅन्टसीज् निर्माण होतात.. आपणही फिरून येऊ या फॅटन्सीच्या जगात..
‘भाई, बातमी वाचलीस का पेपरांत, ‘कोटय़ाधीश पुलंच्या घरी चोरी!’  ‘पुलं’च्या घरावर दरोडा’, संपादकीयदेखील आलीय्त. ‘पुलंचा कोटींचा घोटाळा’, शब्दांच्या पलीकडच्या जगात, सुरांवरी हा जीव तरंगे’ अशा अवस्थेत असलेल्या पुलंना सुनीताबाई वरती ‘जॉईन’ झाल्यावर, ‘कधी वाऱ्यांतून, कधी ताऱ्यांतून’ असा नव्यानं प्रवास सुरू झाला होता. त्यामुळे पुलंचा मूळ स्वभाव उफाळून वर आला, अन् मिश्कीलपणे म्हणाले, ‘सुनीता, माझ्या पश्चात तू इतकी र्वष होतीस त्या घरात, धाडस नाही झालं कुणाचं!’
 ‘तुझा कोटय़ा करण्याचा स्वभाव नडला.’ ‘कोटय़ाधीश पुलं’ या कोटीमुळे चोराचा गैरसमज झाला.’ ‘गैरसमज नाही, फजिती झाली असेल. मराठी लेखकाच्या घरी चोरी होण्याएवढं ऐश्वर्य, यात मला तर फॅन्टसीच दिसतेय!’
‘डोंबलाची फॅन्टसी. तुला कधी काळजी होती घराची..’
पुलं नुसतंच हसले. फॅन्टसीत शिरले..
अन् घराच्या रंगमंचावर एन्ट्री घेतली!
घरभर फिरून बसेपर्यंत, दाराचा लॅच उघडण्याचा आवाज झाला. सावरून बसत ‘ही कुणी छेडिली तार’च्या चालीवर ‘हे कुणी फोडीले दाऽऽर’ गुणगुणताना, पाहिलं तर, भरघोस टक्कल-करवती मिश्या-कानावर घनदाट केस-पोटाचा विस्तार असलेल्या कॅरॅक्टरची एन्ट्री झाली. कुठं बरं पाहिलंय यांना, असा विचार करत सवयीनं त्यांनी आलेल्या व्यक्तीचं स्वागत केलं.
‘या या मालक, आज असं अपरात्री येणं केलंत अचानक, तेदेखील किल्लीशिवाय दार उघडून.. साहजिकच आहे, मीडियाला सांगून सावरून, बरोबर घेऊन यायला तुम्ही काही खासदार-आमदार-नगरसेवक नव्हेत. ती मंडळी दिवसाढवळ्या दरोडे घालतात! अरे हो, पण उभे का, बसा ना. मला बसावंच लागतं, या गुडघ्यांमुळे.’
‘ब. ब. बसतो की,’ चोराची ब.. बोबडीच वळली.
‘हं बोला आता, कसं काय येणं केलंत? चोरबीर असाल तर तुमची मेहनत वाया जाईल. आठेक दिवसांपूर्वीच एक चोरमहाशय घर मोकळं करून गेलेत. मलादेखील चोरी होण्याचा फारसा पूर्वानुभव नाही.. हा आमच्या बटाटय़ाच्या चाळीत फुटकळ चोऱ्या व्हायच्या. पण त्याहीपेक्षा हृदयचोऱ्याच जास्त. त्यावर लिहिलंय देखील भरपूर. शिवाय आमच्या शब्दांच्या दुनियेत वाङ्मयचौर्य भरपूर. पण रोजचंच झाल्यावर किती लिहिणार? बरं काही चहापाणी? अगं सुनीता..’
पुलंनी ‘उपदेशपांडय़ांना’ सवयीनं हाक मारली, तेव्हा त्यांना त्यांनीच केलेलं विडंबन आठवलं, ‘प्रियेऽऽ चहा, रात्रीचा समयसरूनी येत उष:काल हा.!’
‘भाई, या वेळेस चहाबिहा मिळणार नाही हां. एक तर अजून रात्र सरायची आहे आणि ते अपॉइंटमेंट न घेता आले आहेत..’ बॅकस्टेजवरून नुसताच आवाज.
चोराची तंतरलीच. चेहऱ्यावर काय भुताटकी आहे, असा भाव..
‘राहू द्या हो भाईसाहेब, आमचा बाप म्हणतो चहा वाईट ‘प्रकृती’ला.’
‘बरं राहिलं.. पण मी फार छोटा माणूस आहे हो. आमच्याकडे पूर्वी गडकरी, देवल, खाडिलकर, अत्रे वगैरे बरीच ‘श्रीमंत’ मंडळी होऊन गेली. अत्रे तर ‘बे एके बे’चा पाढा ‘दोन हजार एके दोन हजार’ असं  म्हणतच मोठ्ठे झाले. ते खरे मोठे मासे, आम्ही छोटे मासे. त्यांच्याकडे शब्दभांडार भरपूर. चांगली कमाई झाली असती तिकडे तुमची.
‘म्हणजे तुम्ही कोटय़ाधीश, तसे ते डबल-टिबल कोटय़ाधीश!’
प्रथमच ‘कोटय़ाधीश’ असण्याचा पुलंचा भ्रम दूर झाला. तरी विद्याधर पुंडलिकांना म्हटलं होतं, ‘कोटीचा सोस असू नये..’ विचार करता करता पुन्हा पुंडलिकांवरचीच कोटी आठवली, ‘पुंडलिकाला म्हणावं, त्याने फेकलेल्या विटेवर मी उभा नाही!’ घ्या, जित्याची खोड मेली तरी जात नाही. ‘वर’ गेल्यावर पुंडलिकांना सांगितलं पाहिजे, कोटीमुळे झालेल्या घोटाळ्याबद्दल.. पुलं स्वत:शीच हसले.
‘काय भाईसाहेब, आपल्याला मोजता येत नाही, म्हणून हसताय होय?’
‘छे, छे. एका कोटीनंतर आम्हीदेखील पुन्हा कोटीच करतो आणि मोजतां आलं नाही तरी कमावताय ना भरपूर! आमच्याकडे फुकाच्या शब्दांचंच भांडार, ज्यावर प्रकाशक श्रीमंत झाले. ‘उरलं सुरलं’देखील ‘पुरचुंडी’, ‘गाठोडं’ बांधून नेलं! काहीच शिल्लक नसेल आता, नाहीतर तुम्हालाही दिलं असतं काही..’
‘भाई, उगाच काही कमीट करू नकोस हां, नंतर मलाच सगळं निस्तरावं लागतं..’ पुन्हा आवाज.
चोराची पुन्हा हवा टाइट. सावरल्यासारखं करीत म्हणाला,
‘शब्दांचे कधी पैसे होतात का राव? खिल्ली उडवताय गरिबाची.’
कुठलंही दार फोडून आत शिरायला याला किल्ली लागत नाही, पण ‘खिल्ली’ माहीत आहे. वा! आधी भेटला असता तर ‘वल्ली’त जमा केला असता.. सखाराम गटण्यासारखा. सखाराम गटणे.. त्याच्या तोंडात दातांऐवजी छापखान्यातले खिळे बसविले आहेत असं वाटायचं. विलक्षण छापील बोलायचा. याला काय सांगणार शब्दांचं महत्त्व!
‘होतात होतात शब्दांचे देखील पैसे होतात. कुणी पुस्तक लिहून, कुणी स्टेजवर, पडद्यावर बोलून पैसे कमावतात. कुणी खोटा शब्द देऊन वा शब्द फिरवून पैसे कमवतात. या समोरच्या भिंतीवरच्या माणसाला ओळखत असाल कदाचित..’
‘हा तर वल्डफेमस मॅड कॉमेडीवाला चार्ली चॅप्लीन.’
‘बा ओरिजिनल मॅड. त्यानं शब्दांवाचून जगाला मॅड केलं.’
‘पुण्यात आल्ता कधी?’
‘तेवढं पुण्याचं पुण्य नाही हो! पुण्याचं सोडा, यानं साऱ्या जगाला हसवलं-रडवलं, कमावलं-गमावलं.. आमच्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस!’
‘हात्तीच्या, म्हणजे तो पण तुमच्यासारखाच..’
‘त्याच्या डोक्यावरची ती हॅट, ती केनस्टिक दिसतेय ना.. भरपूर होत्या अशा त्याच्याकडे. परदेशात अशा प्रसिद्ध व्यक्तींनी वापरलेल्या वस्तूंचे पैसे होतात भरपूर..’
‘आपल्याकडे तसं नसतं भाईसाहेब, ’
‘तेही खरंच आहे. गांधीजींचा चष्मा चोरीला जातो त्याचंदेखील कुणाला सोयरसुतक नसतं आपल्याकडे!’
‘भाईसाहेब, खरं सांगू मी इथं का आलो ते? तुमचा तो टेबलावरचा चष्मा मिळविण्यासाठी!’
‘त्यानं काय मिळणार तुम्हाला? चष्मा म्हणजे नुसती स्पष्ट दिसण्यासाठी वस्तू. मुळात दृष्टी पाहिजे.. प्रत्येकाला नाही ‘सूट’ होणार, तशी दृष्टी असल्याशिवाय.’
‘बाबांसाठी नेणार होतो चष्मा..’ ‘त्यांचं काही जुन्या वस्तूंचं संग्रहालय, अँटिक शॉप आहे की काय?’
‘साईनबोर्ड पेंटिंगचं दुकान होतं, अप्पा बळवंत चौकात. आता ‘निऑन’ च्या झगमगत्या दुनियेत धंदा बसला.. जगणं कठीण झालं. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे ‘जीवनाशी एकनिष्ठ राहण्यात’ त्यांचं आयुष्य गेलं. त्यांनी मला एकच सांगितलं.. आपण जग बदलू शकत नाही, पण दिवाळीच्या अंधारात उजेड देणारी एखादी पणती लावू शकतो, निश्चित!’
शेवटचं वाक्य ऐकून पुलं चमकले. कुठली तरी आठवण जागी झाली.
‘कुणाचं वाक्य आहे हे?’
‘तुमचंच.’
‘माझं? कुठल्या पुस्तकातलं?’
‘पुस्तकातलं नाही. तुमच्या एका चाहत्याला तुम्ही पत्रात लिहिलं होतं. ते बाबांनी लिहून ठेवलं होतं.. तेच!’
‘नाव काय म्हणालात आपलं?’
‘पुरुषोत्तम.. पुरुषोत्तम सखाराम गटणे. वडिलांचे तुम्ही आदर्श होतात, म्हणून माझं नाव त्यांनी ठेवलं पुरुषोत्तम. आमच्या घरात तुमचा फोटो आहे भिंतीवर.’
आता हबकण्याची पाळी पुलंची! सखाराम गटणेचा हा चिरंजीव, सखारामचा बाप असाच दिसायचा..
‘सखाराम गटणेची निर्मिती करताना, शेवटी तुम्ही मला जन्माला घातलं, अन् विषय संपवला ‘व्यक्ती आणि वल्ली’त, माझ्या जन्माचे पेढे मिळाल्यावर. पण पुढे काय? आमच्याकडे ना बापासारखं सुंदर हस्ताक्षर, ना शिक्षण. आजोबांसारखे आम्ही अर्धवट शिकलो. रूपदेखील आजोबांचंच.. काही जमेना तेव्हा अ‍ॅिक्टग करू लागलो. जमली ना चोराची अ‍ॅिक्टग? तुमचं सर्टििफकेट महत्त्वाचं.. आम्हाला तुमच्या साहित्यात जन्माला घालणारे तुम्हीच. आम्हाला वेगळं अस्तित्व नाहीच. असेच फिरत राहणार कल्पनेच्या साम्राज्यात.. तुम्हाला येताना पाहिलं, म्हटलं चान्स घ्यावा. तुम्ही घरात असताना आम्हाला मुक्त प्रवेश. तुमचा चष्मा देऊन बापाला खूश करणार होतो. दिवाळीच्या अंधारात उजेड देणारी पणती, म्हणजे दुसरं काय असतं?’
असं म्हणत त्यानं टाळीसाठी हात पुढं केला. तेव्हा दोन्ही पुरुषोत्तमांच्या टाळीचा आवाज घराच्या रंगमंचावर घुमला! रंगमंचावर कुणीच नव्हतं, टेबलावरचा चष्मादेखील नव्हता!
रंगमंचावरून ‘एक्झिट’ घेत सुरांवरून तरंगत पुन्हा शब्दांच्या पलीकडल्या जगात जाताना, पुलंनी सुनीताबाईंना विचारलं,
‘काय गं सुनीता, तूदेखील कशी वेळेवर रंगमंचावर एन्ट्री घेतलीस?’
‘दुसरं मी काय केलं आयुष्यभर?.. अन् काय रे भाई, चहा कुठनं देणार होते, तुझ्या या आगंतुक पाहुण्याला? नेहमीप्रमाणे गोंधळ घालशील तो निस्तरावा लागेल मलाच म्हणून हजर झाले वेळेवर. तुझ्या सगळ्या खोडींची कल्पना आहे मला, गेल्या जन्मापासून. तुझी कोटय़ावरची ‘जित्याची खोड’ अजून गेली नाही, तिथं माझा ‘सुंभ जळला तरी पीळ ‘कसा जाईल!’ असं म्हणून त्या खळाळून हसल्या.’
‘म्हणून तर मूळ शब्द, आहे मनोहर तरी गमते उदास- बदलून मी नेहमीच म्हणतो, आहे मनोहर.. म्हणुनी जमते झकास!’अन् कधी वाऱ्यातून-कधी ताऱ्यांतून अशी भाई-सुनीताबाईंची पुन्हा ‘निघाली ताऱ्यांवरची वरात.. निघाली ताऱ्यांवरची वरात!’   
chaturang@expressindia.com