संजय मोने sanjaydmone21@gmail.com
‘‘महाविद्यालयात असताना कुणी मला कधी नाटकात घेतच नसे. पण एकांकिकांचा महत्त्वाचा प्रेक्षक मीच होतो! पुढे नाटक सुरू होताना काळोख झाल्यावर रंगमंचावरील नटाला जो मोकळेपणा वाटतो, तो मी प्रथम अनुभवला पंचविशीच्या उंबरठय़ावरच. त्याचवेळी आयुष्यात काही महत्त्वाच्या व्यक्तींनी माझं नाठाळपण समजून घेत मार्गदर्शन केलं. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच प्रयत्नांमुळे अधिक. त्यामुळे  पंचविशीतल्या त्या ‘गद्धेपणा’नं मला शहाणंच केलं..’’

‘माझी गद्धेपंचविशी’ हा मथळाच थोडा सैल आहे. संदिग्ध म्हटलं तर जास्त योग्य. आपल्या या काळाबद्दल किंवा याविषयी लिहायचं कसं? आणि काय? त्याचा जमाखर्च कसा मांडायचा? इंग्रजी भाषेत एक शब्द आहे- ‘टीनएजर’. म्हणजे १३ ते १९. सात वर्षांचा कालखंड. त्याबद्दल लिहिणं सोपं आहे. पण गद्धेपंचविशी? म्हणजे पंचविशी. ‘सव्विशी’ किंवा ‘चोविशी’ असं नाही. एका ‘पंचविशी’बद्दल काय लिहिणार? म्हणून मग मी याआधी या सदरात आलेले अनेक मान्यवरांचे लेख पाहिले आणि लक्षात आलं की त्यांनी आपला जीवनपट की हो लिहून काढला. आधी- मागे घडलेल्या अनेक गोष्टी किंवा पंचविशीनंतर घडलेल्या बऱ्याच गोष्टींचा समावेश करून आता सध्याच्या वयात काय करते झालो किंवा करत आहोत याचा आलेखच जणू. एक आत्मचरित्रच की काय?..

Atal Bihari Vajpayee 1996 No Confidence Motion speech
“सरकारे येत-जात राहतील, पण देश वाचला पाहिजे”, अजरामर ठरलेलं हे भाषण वाजपेयींनी केव्हा केलं होतं? काय होती राजकीय परिस्थिती?
Bansuri Swaraj underlines this message My mother’s daughter
सुषमा स्वराज यांचेच माझ्यावर संस्कार, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार; बन्सुरी स्वराज यांची भावनिक साद
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?

मला वाटतं, की खुद्द पंचविसाव्या वर्षी मी काय केलं हे लिहायचं म्हणजे जरा अवघड बाब आहे. व्यक्ती म्हणजे काही देश नाही, की एका वर्षांत प्रचंड घडामोड व्हायला. शिवाय त्या वयात सगळा जोशच जोश असतो. काहीही ऐकू येत नाही. ‘इतका वाढलास घोडय़ासारखा..’, ‘डुकरासारखा लोळतोस काय?’, ‘अक्कल नाही? बैल आहेस की काय?’, ‘काही इकडेतिकडे जायची गरज नाही या उन्हात. नागासारखा बसून राहा एका ठिकाणी!’, ‘आडवा पडून काय खातोस? कुत्रा आहेस की काय?’ या आणि अशा वाक्यांनी आपण जन्माला कोण म्हणून आलो आणि काळानुसार आपली गणना प्राणीसृष्टीत कशी कशी होत गेली हे दिसून येतं. कधीकधी एरंडाच्या झाडाशीही आपली तुलना होते. पालकांच्या भाषाभांडारावर आपलं नेमकं अस्तित्व काय ते कळून येतं. पालक किंवा शिक्षक आणि आजूबाजूचे लोकही आपल्या बाबतीत त्यांच्या भाषेचा उत्स्फुर्त  अभिषेक आपल्यावर करत असतात. आमच्या वयाचे सगळे त्याला फार अपवाद नव्हतो.  ४००-५०० शब्द कमी जास्त, इतकंच काय ते.

सगळ्यांचं गेलं तसंच माझंही बालपण मजेत, सुखात गेलं. नको त्या वेळी प्रश्न विचारणारी माणसं नव्हती. पालकही अगदी पालकाच्या भाजीइतके सौम्य होते. भावी आयुष्य नावाचं एक फसवं मृगजळ शब्दांत मांडून त्यात यशस्वी होण्यासाठी काय काय करायला लागतं याचा धोशा त्यांनी कधीच लावला नाही आणि तो लावावा लागेल असं आम्ही कधी फार वागलोही नाही. देश स्वतंत्र होऊन जेमतेम २२ वर्ष झाली आणि माझा जन्म झाला होता. (अर्थात दोन्ही गोष्टींचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. पण असं देशबिश पेरलं की जरा लेखाला वजन येतं. लेखाचं खरं वजन रद्दीच्या दुकानात होतं ते अलाहिदा.) तर शाळा झाली. पेढे वाटण्याइतके गुण मिळाले होते. गूण की गुण? या गोंधळात थोडे जास्त मिळवायचे राहून गेले. मग महाविद्यालय. आमची १०+२+३ ची पहिली तुकडी. आधीचे ११+४ वाले आणि आम्ही एकदम महाविद्यालयात जाणार होतो. त्यामुळे जो काही गोंधळ उडणार होता तो झालाच आणि त्यामुळे आम्हाला शालांत परीक्षेनंतर शाळेतच ठेवणार हे नक्की झालं. शाळेला त्याची तरतूद करायची होती. त्यामुळे आम्हाला तब्बल तीन साडेतीन महिने सुट्टी मिळाली. त्या काळात जी काही मित्रांची शिकवणी मिळाली ती सगळी अजूनही खर्च झाली नाही. आमचा गणवेश बदलला, पण संबोधनं तीच होती. टीका तितकीच व्हायची. काही काही विद्यार्थी पूर्ण विजारीत थोराड दिसायला लागले होते. त्यामुळे शिक्षकही हात उचलताना विचार करायला लागले आणि आमच्यासारख्या बऱ्याच शांत आणि मवाळ मुलांचीही शिक्षेतून सुटका झाली. शेवटी एकदाचे आम्ही महाविद्यालयात दाखल झालो. अगदी जवळ पाच-सात चित्रपटगृहं होती. तिथे दोन रुपयांत सकाळचा चित्रपट बघायला मिळायचा. खालच्या वर्गात बसलं तर दीड रुपया. गंमत अशी होती, की शिक्षणपद्धती बदलली अशी बोंबाबोंब करून दिल्या गेलेल्या शिक्षणात बदल काहीच नव्हता. शाळेत शिकवलं होतं त्याच्याच पुढचं शिक्षण. ‘सूर्य पूर्वेला उगवतो’च्या ऐवजी ‘सूर्य पश्चिम दिशेच्या विरुद्ध दिशेला उगवतो’ असं म्हणायचं. ज्यांना शिकायचं होतं ते शिकत होते, पुढे परदेशातही जाऊन त्यांनी नावलौकिक मिळवला. आज सर्व तथाकथित सुखं त्यांना मिळत आहेत असा त्यांचा ठाम समज होता आणि राहीलही. त्याबद्दल मला ना राग, ना लोभ, ना खंत. आमचा मार्ग जरा वेगळा होता. मतही असं होतं, की ज्या वयात ज्या मौजमजा करायच्या त्या न करता त्या वेळात अभ्यास, भावी कारकीर्द याचा विचार करायचा नाही. त्यामुळे आम्ही चित्रपट, नाटकं, व्याख्यानमाला याकडे ओढले गेलो. शिवाय चित्रपटात वैविध्य असायचं. मनोरंजन भरपूर. सगळ्यांची गोष्ट निराळी. नायक, नायिका आणि खलनायक निराळे. त्यांचे आईबापच काय ते ठरलेले पाच-सहा. (त्यांना कथेनुसार होणारे आजार मात्र निरनिराळे. कधी कर्करोग किंवा क्षयरोग. मग उपचारासाठी एखाद्या उत्तर भारतातल्या थंड हवेच्या ठिकाणी त्यांची रवानगी. तिथे एकदा पालकाला (बहुदा माताच) इस्पितळात भरती केलं की नायक गाणी-बजावणी, प्रेमात पडणं, प्रेमभंग होणं, खलनायकाबरोबर मारामारी वगैरे करायला मोकळा. शिवाय शिकून त्याबद्दलची स्वप्नं खरी होण्याचा काळ तीन ते सात वर्ष असतो. सिनेमात सगळा फैसला दोन-अडीच तासांत व्हायचा. आपली नसतील, पण कुणाची तरी स्वप्नं खरी व्हायची. त्या सिनेमा बघण्यात मौजमजा वाटायची. कधी कधी पैसे नसायचे. मग सात-आठ तिकिटांचे पैसे मोजून आम्ही दहा-बारा जण घुसायचो.

पावसाळ्यात आमच्या महाविद्यालयाच्या मैदानात बरेच बेडूक जन्माला यायचे. संध्याकाळी तिथे सकाळपेक्षा जास्त गर्दी व्हायची. त्या बेडकांचा मस्त डरांव डरांव असा सूर लागायचा. त्यावर मानसशास्त्राचा अभ्यास चांगला होतो असं कोणीतरी सांगितलं होतं. आम्ही मात्र सकाळीच वहीच्या कागदांचा चण्याच्या पुडीसारखा कोन करून आत बालबेडूक पकडून घ्यायचो आणि चित्रपटाला जाताना बरोबर न्यायचो. सगळीकडे वातावरण स्थिर झालं- म्हणजे खलनायक नायिकेच्या स्थावर आणि नायक जंगम मालमत्तेबरोबर खेळू लागला की अलगद पुडीतून एकेक बेडूक चित्रपटगृहात सोडायचो. काही वेळानं प्रेक्षागृहातून अवेळी आणि अस्थानी किंचाळ्या फुटायच्या. बेडकांना चित्रपट दाखवून सांस्कृतिकदृष्टय़ा सक्षम करायचा हा सरळ, सोपा आणि बिनखर्चाचा उपक्रम आम्ही महाविद्यालयातून बाहेर पडलो (बरेचदा बाहेरच असायचो) तरी चालूच होता. शेवटी ती चित्रपटगृहं पाडून तिथे गृहप्रकल्प उभे राहिले आणि मंडूक विद्याभास बंद पडला.

मी कसा कविता करणारा वगैरे म्हणून लोकप्रिय होतो किंवा अभिनय करून प्रसिद्ध होतो किंवा अभ्यासात कसा नावलौकिक बाळगून होतो याचं कुठलंही वर्णन मी करणार नाही, हे लेख लिहायच्या सुरुवातीलाच ठरवलं. कारण ते इतर बहुतेक जणांच्या लेखात तुम्हाला वाचायला मिळेल. तिथे कुठेही माझं नाव आहे अशी कल्पना करून तुम्ही वाचा. त्याच आनंदाची हमी. मी २५ वर्षांचा, इतर कुठलाही तरुण किंवा तरुणी- मुख्यत: शहरी तरुण वर्ग काही अपवाद वगळता ज्या थोडय़ाबहुत कैफानं जगत असायचा, तसाच जगायचो. ‘कैफ’ शब्द अवाजवी वाटला तर नादिष्टपणा म्हणा. एकतर काळ सुखाचा होता. केलेल्या सगळ्या मागण्या १०० टक्के पालकांकडून पुऱ्या केल्या जायच्या असं नाही, पण मुळात मागण्याच कमी असायच्या. विशीपर्यंत शिक्षण पुरं व्हायच्या अंतिम टप्प्यात आलेलं असायचं. दूरदूपर्यंत नवीन क्षितिजं अंधूक दिसायला लागली होती. शिवाय तारुण्य उपभोगायच्या संध्या (हे नाव नाही कुणाचंही! ‘शक्यता’ म्हणू या हवं तर) मोहरवून टाकणाऱ्या होत्या. ‘लहानपण देगा देवा’मधला फोलपणा कळू लागला होता. आमच्या त्या महाविद्यालयीन काळात एकदा आणीबाणी आणवली गेली. आमच्या दृष्टीनं तीच काय ती ठळक घटना. पण बहुसंख्य मध्यमवर्गाला त्या सुमारास ‘उच्च मध्यमवर्गीय’ म्हणवून घ्यायची घाई अनावर झाली होती. सबब आणीबाणी, त्याचे परिणाम, वगैरे जाणून घ्यायच्या फंदात तो सबंध वर्ग पडलाच नाही. उलट ‘होती ते चांगलं होतं’ असं मानण्यात आलं. मुळात मुंबई आणि तशा मोठय़ा शहरात अस्तित्व टिकवणं हीच लढाई होती. नाटक, चित्रपट, यातून त्यावर प्रकाश पडेल असं फारसं काही घडलं नाही. काही नाटकांमधून तसे प्रयत्न झालेही. पण पुढे ते सगळे उन्मळून सांगण्यासाठी नसून पुढील आयुष्यात श्रेयाच्या, जमेच्या बाजूला मांडायच्या कारणानं झाले, असं आढळून आलं. कुठलाही धक्का न लागता शहरातले मध्यमवर्गीय जगत होते. शिवाय आजही जेव्हा कसल्या तरी समस्या मांडायला एखादा नाटक किंवा चित्रपट निर्माण केला जातो, तेव्हा ते सादर करणारे ‘आम्ही मांडतोय, पण तुम्हाला ते कितपत कळेल देव जाणे’ या भूमिकेत आणि तोऱ्यात वावरतात, तसंच तेव्हाही होतं. (या सगळ्याबद्दल माझं एकच म्हणणं आहे. समस्याप्रधान निर्मिती करा, पण ती शेवटच्या क्षणापर्यंत वाचक किंवा प्रेक्षकाला खिळवून ठेवणारी असावी. कंटाळा हा जर तुमच्या निर्मितीचा प्रमुख अवयव असेल, तर ती खुरडतच चालणार. एका हुकूमशहाच्या क्रौर्यावर चार्ली चॅप्लिन जर अत्यंत सुंदर, शेवटपर्यंत श्वास रोखून बघायला लावणारा नितांतसुंदर चित्रपट निर्माण करू शकतो, तर अजून काय पाहिजे?)

आंतर महाविद्यालयीन स्पर्धामध्ये तेव्हा फार मजेदार एकांकिका व्हायच्या. जर्मन छळछावणीत घडणारी एक एकांकिका होती ती आठवते. बक्षिसाचा हमखास लाभ असायचा. काय त्यांचा आणि आपला संबंध? तर त्या एकांकिकेत एक जर्मन अधिकारी आणि एक दोस्त राष्ट्रांपैकी कुणाचा तरी सैनिक अशी पात्रयोजना होती. दोघांच्याही केसांवर सोनेरी रंग लावलेला. मध्येमध्ये तो उडून रंगीत धुरळा दिसायचा. काय त्यांची समस्या असायची देव जाणे? त्या महायुद्धाची आपल्याला भारतात झुळूकही लागली नव्हती, तर ज्वाळांचे चटकेबिटके तर दूरची गोष्ट. कलाकार, दिग्दर्शक हे कुठलेही असले, तरी तालुक्याच्या बाहेरचासुद्धा अनुभव त्यांना असायचा नाही. थोडीफार वाचनाची उसनी कावड घेऊन ते अभिनयाचा मळा शिंपत असत. सगळं वरवरचं वाटायचं. मला कधी कुणी कुठल्याही नाटकात किंवा एकांकिकेत काम देत नसत. अगदी दिलंच, तर शिंकून झाल्यानंतर प्रेक्षकानं मान वर करेपर्यंत माझं काम संपून गेलेलं असायचं. पण एकांकिकांचा महत्त्वाचा प्रेक्षक मात्र मी नेहमीच असायचो. सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या एकांकिका असायच्या. एक संपूच नयेत असं वाटणाऱ्या आणि दुसऱ्या कधी संपतील असं वाटणाऱ्या. आम्ही दुसऱ्या प्रकारच्या एकांकिका लवकर संपाव्या यासाठी प्रेक्षकांच्या वतीनं हिरिरीनं प्रयत्न करायचो. अशी एखादी प्रतिक्रिया द्यायची, की एकांकिकेनं गाशा गुंडाळलाच पाहिजे. एका एकांकिकेत एका पात्रानं अरबाचा पोशाख घालून प्रवेश केला. दोन तीन वाक्यांत त्याचं बिंग फुटून तुकडे प्रेक्षागृहात सर्वदूर उडाले. तितक्यात प्रेक्षकातली एक व्यक्ती मोठय़ानं पुटपुटली ‘अरे! हा अरब आहे की परब?’ दुसऱ्या सेकंदाला एकांकिकेनं मान टाकली. दुसऱ्या एका स्पर्धेच्या वेळी एक पांढरे केस रंगवलेला तरुण मुलगा ओठांत सिगारेट धरून आगपेटी शोधत होता. आता नाही सापडत, तर पुढची वाक्यं बोलावी ना? पण नाही! दिग्दर्शकानं सिगारेट पेटवूनच बहुदा वाक्यफेक करायला सांगितली असणार. तो शोधतोय, लोक चुळबुळत बसलेत. मला त्याची दया आली. मी माझ्या खिशातून आगपेटी काढून मंचावर टाकली आणि झालं. प्रेक्षागृहातल्या इतरांनी १५-२० आगपेटय़ा मंचावर टाकल्या. मृच्छकटिक नाटकात ‘अंगे भिजली जलधारांनी’च्या वेळी पाऊस पडतो तशा आगपेटय़ा बरसल्या आणि एकांकिका वाहून गेली. त्या वेळी आमच्यात प्रेक्षकांत ठळक दोन तट होते- ‘कशीही असली तरी एकांकिका पाहायची’वाला एक आणि ‘चांगली होत नसेल तर त्यांच्या नजरेस आणून द्यायचं’वाला दुसरा. मी अर्थात दुसऱ्या गटातला. एकदा माझ्या वाटय़ाला एक रद्दड एकांकिका आली. लोकांना अजिबात आवडली नाही आणि ते आरडाओरडा करू लागले. त्यांचा आवाज इतका मोठा होता, की आम्हाला मंचावर ‘आं?..आं? काय म्हणालास?’ असं म्हणून पुढचं वाक्य म्हणायला लागत होतं. शेवटी एकांकिका गुंडाळायला प्रेक्षकांची आम्हाला मोलाची मदत झाली. त्यांचे आज मी आभार मानतो.

हे सगळं होत होतं तरी मी नाटक, चित्रपट सपाटय़ानं बघत होतो. माझे वडील काही काळ नाटकात काम करायचे. त्यामुळे बरेचदा ‘फुकट फौजदार’ म्हणून नाटकाला बसायचो. अनेक नट-नटय़ा जवळून बघायला मिळायच्या. कुठेतरी त्यांचं ते स्वत:त हरवून वागणं, आजूबाजूला काय चाललंय याची फिकीर न बाळगणं, हे गुण वाटायला लागले. आपणही नाटकात काम करावं असं वाटायला लागलं. स्वभाव लाजराबुजरा होता माझा. आज कुणालाही पटणार नाही. पण होता. त्यामुळे आपल्यालाही काही सांगायचंय आणि ते सांगताना नाटकात जसा काळोख झाला की समोरचा प्रेक्षक दिसेनासा होतो आणि त्या बिनचेहऱ्याच्या गर्दीसमोर जरा मोकळेपणा येतो, तसा मला हवाहवासा वाटू लागला. आणि वयाच्या तेवीसाव्या वर्षी तशी एक संधी मला राज्य नाटय़ स्पर्धेच्या नाटकामुळे मिळाली. १९८३ मध्ये ‘या मंडळी सादर करू या’ संस्थेतर्फे  ‘कोळीष्टक’ हे नाटक होणार होतं. माझे मित्र त्यात काम करत होते. त्यातल्या एका कलाकाराला (कै. अशोक वंजारी) नोकरीनिमित्त दिल्लीला जावं लागलं. मुंबईतले गडी जसे गावी जाताना बदली गडी देऊन जायचे, तसा मी बदली कामगार म्हणून त्या नाटकाच्या तालमींना जाऊ लागलो. ऐन प्रयोगात अशोक वंजारी हे काम करणार व मी तोपर्यंत इतर कलाकारांना सवय व्हावी म्हणून काम करणार, असं ठरलं. पुढे आठ-दहा दिवस तालमी झाल्यावर संस्थेचे पुरू बेर्डे (पुरुषोत्तम बेर्डे), प्रदीप मुळे (‘मुळ्ये’ही असेल), रघू कुलकर्णी आणि इतर कलाकारांनी मला ‘तूच प्रयोग कर’ असं सांगितलं. नाटकाला बक्षीस मिळालं. प्रयोगाची वाहवा झाली. त्यांच्यामुळे हे शक्य झालं.

ते नाटक झालं आणि पुढच्या वर्षी ‘अनाहत’ हे नाटक करायचं असं आम्ही वेगळी संस्था स्थापून ठरवलं. त्या नाटकाच्या तालमीच्या सुमारास लेखक डॉ. राजीव नाईक, कै. दामू केंकरे परिचयाचे झाले. त्यांच्याबरोबर झालेली ती ओळख आणि मैत्री माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. ‘अनाहत’ नाटक झाल्यावर पुढच्याच वर्षी राज्य नाटय़ स्पर्धेचा रौप्य महोत्सव होता. त्यासाठी आम्ही आंतरनाटय़ संस्थेकडून शेक्सपिअरचं अरुणदादानं (अरुण नाईक) भाषांतरित केलेलं ‘ऑथेल्लो’ सादर केलं. त्या नाटकानं प्राथमिक आणि अंतिम फेरीत पहिल्या क्रमांकाबरोबर अनेक पारितोषिकं पटकावली. तेव्हा मी बरोबर २५ वर्षांचा होतो. अरुणदादा, राजीव, यांनी आम्हाला दिशा दाखवून द्यायचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही ‘आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या’सारखे काही काही वेळा वागलो. रंगभूमीचे बदलते संदर्भ, त्याबद्दलचा विचार याचं त्यांनी नाठाळ विद्यार्थी आहेत वगैरेचं भान बाळगून मार्गदर्शन केलं. आज जो मी लेखबिख, नाटकबिटक आणि चित्रपट वगैरे लिहायला आणि वेगवेगळ्या भूमिका करायला लायक वाटतो, त्यात त्यांचा महत्त्वाचा भाग आहे हे नि:संशय.

पंचवीसाव्या वर्षी एक महत्त्वाचं नाटक मला करायला मिळालं. त्या दरम्यान अनेक मित्र, सहकारी मिळाले. त्यामुळे पंचविशी कधीच ‘गद्धेपणा’ची वाटली नाही. उलट काही प्रमाणात शहाणा झालो मी. माझ्या आजच्या ६० वर्षांपर्यंत मजल मारण्याच्या सगळ्या प्रवासात काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील, तर त्या त्यांच्याचमुळे. वाईट गोष्टीचं निर्विवाद श्रेय अर्थात माझ्याकडे. कसलीच महत्त्वाकांक्षा नाही मला. आवडत्या गोष्टी नुसता छंद म्हणून न राहाता उपजीविकेचं साधन झालं म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो.