‘‘आमच्याकडे काका-काकू वगैरे बराच गोतावळा जमला होता. बुजुर्ग मंडळींना त्या रात्री ‘पिठलं-भात-पापड’ वगैरे टिपिकल चविष्ट पण करायला सोपा (म्हणे)आणि झटपट बेत करावासा वाटला. साहजिकच नवीन सूनबाई म्हणजे माझ्या बायकोवर जबाबदारी येऊन पडली. तिची चांगलीच पंचाईत झाली. मी लगेच शर्टाच्या बाह्य सरसावून पुढे झालो. ‘‘अगं त्यात काय घाबरायचं? पिठलं करणं एकदम ईझी! पंधरा जणांसाठी पंधरा वाटय़ा बेसन काढून घे. कांदे वगैरे कापायची मदत मी करतोच, तू फक्त मिरच्या, कोथिंबीर वगैरे चिरून घे.’’ असं म्हणून मी लगेच कामाला लागलो. ‘मटण शेरे पंजाब’ करणाऱ्या माझ्यासारख्या बहाद्दराला पिठलं करणे म्हणजे एकदम भातुकलीतलाच खेळ वाटला. हाय काय आन नाय काय! ..’’ पण प्रत्यक्षात काय झालं आपल्या खवय्या वाचकांनी पाठवलेल्या त्यांच्या स्वयंपाकघरातील अनुभवांचं हे सदर दर पंधरवडय़ाने..

मी एक अतिशय उत्साही, सगळ्या गोष्टींत रस घेणारा, जीवनावर मनापासून प्रेम करणारा साधासुधा पुरुष आहे. मी शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनीयर आणि पेशाने नौदल अधिकारी असलो तरी स्वयंपाक करायला आणि वेगवेगळे पदार्थ करून ते जवळच्या लोकांना विशेषत: बायकोला खाऊ  घालायला मला मनापासून आवडते.

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Rasikh Salam Dar was reprimanded for breaching the IPL code of conduct
DC vs GT : रसिख सलाम दारला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने वेगवान गोलंदाजाला फटकारले
IPL 2024 Shivam Dube Wife Anjum Khan Share Emotional Post for MS Dhoni on Instagram
IPL 2024: ‘सॉरी’ म्हणत शिवम दुबेच्या पत्नीची धोनीसाठी लांबलचक पोस्ट; अंजुम खान म्हणाली, “माझ्या तोंडून एकही शब्द..”
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
Surya is Back: अशक्य वाटणारा फटका ‘मसल मेमरी’मुळे खेळतो! सूर्यकुमार यादवनं सांगितलं यशाचं कारण

लहानपणापासूनच माझ्या आईच्या भाषेत मी एक ‘चळवळ्या, स्वस्थ न बसणारा’ असा ‘हायपर’ मुलगा होतो. माझ्या बाबांची स्कूटर जरा कुठे पार्किंग लॉटमध्ये विसावली की मी जसे तिचे एकेक पार्टस् सुटे सुटे करून निरीक्षण करत असे, तितक्याच तत्परतेने जरा संधी मिळाली की आई-आजीचा डोळा चुकवून स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यामधून सर्व प्रकारचे जिन्नस एकत्र करून माझ्या परीने नवनवीन पदार्थ तयार करीत असे आणि गंमत म्हणजे माझ्या ‘रेसिपीज’ खरोखरच चविष्ट होत असत. एखाद्याच्या हातालाच चव असते म्हणतात ते माझ्या बाबतीत खरंच असावं!

माझ्या लहानपणी आमच्याकडे आईआजीचे सोवळं-ओवळं फारच कडक असे. अंडय़ांनासुद्धा एकदम मज्जाव, चातुर्मासात कांदा-लसूण वज्र्य वगैरे बरेच स्वयंपाकघरातील नियम होते. पण मित्रांच्या संगतीने मी व माझा धाकटा भाऊ , दोघांना मटण-चिकन खायची चटक लागली होती. एकदा आई-आजी दोघीजणी कुठल्याशा देवीच्या जत्रेला सकाळपासूनच जाणार होत्या, त्यांना सोबत हवी म्हणून बाबाही जाणार होते. ‘घरी परतायला आम्हाला संध्याकाळचे आठ-नऊ  तरी वाजतील, तुम्ही दोघे दुधी हलवा व तिखट मिठाच्या पुऱ्या खाऊन घ्या’,अशा सूचना देऊन ते तिघे रवाना झाले.

इकडे ही संधी साधून मी माझ्या भावाला एक किलो मटण आणायला पाठवले आणि स्वयंपाकघरात मी ‘मटण शेरे पंजाब’ करण्याच्या तयारीला लागलो. एक मोठी कढई घेतली, त्यात भरपूर तेल ओतले, कांदे कापून घातले, टोमॅटो, लसूण, हाताला लागतील तसे सगळे गरम मसाले अंदाजाने घातले आणि भाऊ  येईपर्यंत एका मोठय़ा कालथ्याने त्याला छान ढवळत बसलो. मटण आणल्याबरोबर ते सगळे मटणाचे तुकडे स्वच्छ धुऊन कढईत घातले व झाकण लावून भावाला त्यावर लक्ष ठेवण्याची सूचना देऊन मी आंघोळीला गेलो. भावाच्या जिभेवरूनदेखील लाळ टपकायला सुरुवात झालीच होती. माझ्या सूचना तो तंतोतंत पाळत तर होताच, पण आपली शक्कल लढवून त्याने न सांगताच पावाच्या लाद्या, हिरव्या मिरच्या, लिंबं वगैरे मटणासोबतच आणले होते. थोडय़ा वेळाने घरभर घमघमाट सुटला. झाकण उघडून पहिले तर रस्सेदार मटण तयार! हाय काय आन नाय काय! आम्ही दोघांनी त्यावर असा ताव मारला आणि मग अशी ताणून दिली की रात्री नऊ  वाजता आई-बाबा-आजी, तिघांना दरवाजा तोडून घरात शिरावे लागले असे दुसऱ्या दिवशी कळले! शिवाय दुसऱ्या दिवशी सगळे स्वयंपाकघर घासून पुसून स्वच्छ करण्याची शिक्षा मिळाली ते वेगळेच! पण मी मात्र एवढा मोठा ‘प्रोजेक्ट’ स्वत:च्या हिमतीवर ‘सक्सेसफुल’ केला म्हणून भलताच खूश होतो.

पुढे यथावकाश मला नोकरी लागल्यानंतर घरात माझ्या लग्नासाठी हालचाली सुरू झाल्या. मीदेखील माझ्या परीने  पोरींवर नजर ठेवून होतोच. तशात एक दिवस सुवर्णसंधीच चालून आली! माझी मावसबहीण आणि मला जन्मोजन्मी साथ देणारी माझी ही बायको मैत्रिणी होत्या (अजूनही आहेत). बहिणीच्या घरी मी केव्हा तरी गेलो असेन, तेव्हा म्हणे माझ्या बायकोने मला पाहिले आणि पाहता क्षणीच मी तिला आवडलो. तिच्या नवऱ्याच्या कल्पनेत मी अगदी फिट्ट बसत होतो. पण ‘स्वयंपाक करण्याची आवड असेल तर मग पुढचा पाठचा विचार न करता होकार देईन’ असा तिने मोठा धाडसी निरोप माझ्या मावसबहिणीबरोबर पाठवला. मीसुद्धा बेधडक होकार देऊन टाकला. लग्न झाल्यानंतर मला कळले की शिक्षण-करियर वगैरे करण्याच्या नादात बायकोने स्वयंपाकाचे धडे अजिबातच घेतले नव्हते आणि भावी नवऱ्याकडून स्वयंपाक शिकेन व त्यालाच खाऊ  घालीन असे एक प्रेमळ स्वप्न तिने उराशी बाळगले होते! त्या स्वप्नाचा थोडा विरस होणारी एक घटना मात्र थोडय़ाच दिवसात घडली, तो किस्सा सांगतो.

त्याचे असे झाले, आमच्या लग्नानंतर लगेचच माझी बदली विशाखापट्टणमला झाली. नव्या ठिकाणी मी व माझी नववधू जरा कुठे स्थिस्थावर होतोय न होतोय तोच महिनाभरातच तेथील सुप्रसिद्ध सिंहाचलम देवस्थानात कसलासा उत्सव होता. आमचे कुलदैवत नरसिंह असल्याने या उत्सवाचे निमित्त साधून आमच्याकडे काका-काकू, चुलत काका-काकू, चुलत-चुलत वगैरे बराच गोतावळा जमला होता. सगळा उत्सवसमारंभ पार पडल्यानंतर बुजुर्ग मंडळींना त्या रात्री ‘पिठलं-भात-पापड’ वगैरे टिपिकल चविष्ट पण करायला सोपा(म्हणे) आणि झटपट बेत रात्रीच्या ‘हलक्या’ जेवणासाठी करावासा वाटला. साहजिकच नवीन सूनबाई म्हणजे माझ्या बायकोवर जबाबदारी येऊन पडली. तिची तर चांगलीच पंचाईत झाली. माझ्या आईचा डोळा चुकवून (आई खरं तर मुद्दामच किचनकडे कानाडोळा करत जावांशी गप्पा मारत बसली होती) तिने मला हळूच किचनमध्ये बोलावले. ‘‘अरे भात करण्याचा मला १०० टक्के कॉन्फिडन्स आहे, पण पिठल्याचे काय? लाडवांसाठी सासूबाईंनी भरपूर बेसन आणून ठेवलं आहे, पण पुढे काय?’’ बायको जाम घाबरली होती. मी लगेच शर्टाच्या बाह्य सरसावून पुढे झालो. ‘‘अगं त्यात काय घाबरायचं? पिठलं करणं एकदम ईझी! हे बघ, आपण किती जण आहोत? पंधरा जण, राइट? आता प्रत्येकाच्या नावाने एक वाटी म्हणजे पंधरा वाटय़ा बेसन काढून घे. कांदे वगैरे कापायची मदत मी करतोच, तू फक्त मिरच्या, कोथिंबीर वगैरे चिरून घे.’’ असं म्हणून मी लगेच कामाला लागलो. ‘मटण शेरे पंजाब’ करणाऱ्या माझ्यासारख्या बहाद्दराला पिठलं करणे म्हणजे एकदम भातुकलीचाच खेळ वाटला. हाय काय आन नाय काय! मग किचनमध्ये त्यातल्या त्यात मोठं असलेलं एक घमेलं गॅसवर चढवलं. सढळ हाताने तेल, कांदे, इतर मसाले वगैरे बेसिक गोष्टी घालण्यात तर मी एकदम तरबेज झालो होतो. मग बेसन व पाणी एकत्र करून घातले आणि एका मोठय़ा उलथण्याने ढवळायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र थोडा वेळ आमची जी भंबेरी उडाली ती केवळ अवर्णनीयच! अहो ते बेसनाचे पाणी उकळ्या फुटत फुटत जे वर चढायला लागले की जसे काही ‘नर्मदेला’ आलेला महापूरच! पिठलं फुगत, फुगत पातेल्यातून चोहोकडून ओसंडायला लागले. माझ्या तर तोंडचे पाणीच पळाले. बायकोचे डोळे पाण्याने भरून आले. बाहेर या बुजुर्ग मंडळींच्या गप्पांचा फड चांगलाच रंगला होता. पटकन किचनचा दरवाजा लावून घेतला आणि पातेल्यातील अर्धे पिठल्याचे पाणी फेकून दिले. काय करणार, दुसरे भांडेच नव्हते ठेवायला! आणि मग तो पिठल्याचा व्हॉल्यूम एकदाचा आटोक्यात आल्यावर माझ्या जीवात जीव आला! वरवर उसने अवसान आणून बायकोला म्हटले, ‘‘मी शिकवलेली ट्रिक तुला आठवतेय ना? स्वयंपाक रुचकर होण्यासाठी तिखट, मीठ, तेल आणि ढेर सारे प्रेम एवढय़ा चारच गोष्टींची जरुरी असते. हे प्रमाण एकदा जमलं की पदार्थ झकास झालाच पाहिजे!’’ तिच्याकडे बघत, डोळे मिचकावत मी पिठल्याला फायनल टच दिला आणि बाहेर दिवाणखान्यात जाऊन समस्त काका-काकू मंडळींना जेवणाची वर्दी दिली. काय सांगू राव! त्या पिठलं-भातावर सगळे जण असे तुटून पडले आणि असा त्याचा फडशा पाडला की बस्स! अगदी तोंड फाटेस्तो नव्या सूनबाईंची स्तुती झाली. बायकोने तर दुसऱ्या दिवशी माझी दृष्टच काढली, ‘‘अस्सा पाकशास्त्रनिपुण नवरा बाई जन्मोजन्मी मिळावा!’’

या गोष्टीला आता बरीच वर्षे झाली. मी व बायको दोघेही आता ज्येष्ठ नागरिक आहोत. बायको माझ्या हाताखाली शिकून चांगली सुगरण झाली आहे! मी मात्र ‘चटणी आणि कोशिंबीर’ करण्यापुरतीच स्वयंपाकघरात लुडबुड करतो. ‘गडय़ा आपला हाच प्रांत आता बरा!’ पण अजूनही बायकोच्या भिशी पार्टीला जमलेल्या तिच्या मैत्रिणी माझ्या हातची चटणी मिटक्या मारत खातात! शेवटी काय तर चटणी करावी तर ‘माझ्या बायकोच्या नवऱ्यानेच’ (अर्थात अस्मादिक!).

राजीव वैद्य