नऊ वर्ष ती आपल्याच बिछान्यात ७० पेक्षा जास्त पुरुषांचा बलात्कार सहन करत होती आणि तिला त्याची सुतराम कल्पना नव्हती.. पण तिला भान आणणारी ‘ती’ घटना घडली आणि सुरू झाली न्यायालयीन लढाई.. आपल्याच नवऱ्याविरुद्धची आणि बलात्काराच्या कायद्यातील बदलासाठीची.. बाईच्या सन्मानासाठीची! त्या जीझेल पेलिकॉ यांना नुकताच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘लीजिआँ ऑफ ऑनर’ देण्यात आला. त्यानिमित्ताने..

स्त्री चळवळीची लाट आणणारं ‘द सेकंड सेक्स’ पन्नास वर्षांपूर्वी लिहिणाऱ्या स्त्रीवादी लेखिका, तत्त्वज्ञ सीमॉन द बोव्हा यांच्या फ्रान्समध्ये आजही स्त्रीला तिच्या आत्मसन्मासाठी, हक्कासाठी लढावं लागतंच आहे, याचंच जीझेल पेलिकॉ हे जळजळीत उदाहरण.

तिच्यावर झालेल्या ‘mass’ बलात्काराने केवळ फ्रान्सच नाही, तर जग हादरलं, खरं तर जेव्हा हे बलात्कार उघडकीस आले तेव्हा तीच मुळापासून हादरली होती, कारण ते तिच्याच ‘विश्वासू’ नवऱ्याने घडवून आणले होते. पण नंतर मात्र ती उभी राहिली.. ताठ मानेनं. स्वत:साठी आणि तिच्यासारख्या असंख्य अत्याचारपीडित, बलात्कारित स्त्रियांसाठी.

– ही घटना अनेक बदलांना कारणीभूत ठरली. मुख्य म्हणजे फ्रान्समधला बलात्काराचा कायदाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि त्याच्या बदलाचे संकेत राजकीय झाले.

– बलात्काराचा हा खटला गोपनीयतेने चालवण्यासाठी तिने नकार दिला. ‘लाज त्यांना वाटायला पाहिजे, मला नाही,’ असं म्हणत ती उजळ माथ्याने तिच्यावर तीन महिने चालू असलेल्या प्रत्येक सुनावणीला हजर राहिली.  इतकंच नाही तर ‘पुरुषप्रधान समाजाचा बलात्काराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायची वेळ आली आहे,’ असं सांगत तिने बलात्कार करणाऱ्यांसमोर त्यांच्या ‘त्या’ चित्रफिती दाखवण्यास होकार दिला..

– धाडसाचं प्रतीक ठरलेल्या जीझेलला महत्वाचे पुरस्कार मिळाले. ‘बीबीसी’ने २०२४ वर्षांतली तर ‘टाइम मॅगझिन’ ने २०२५ ची प्रभावशाली स्त्री म्हणून तिचा गौरव केला आहे. इतकंच नाही तर खुद्द तिच्या देशाने अलीकडेच (१४ जुलै) तिला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान  ‘लीजिआँ ऑफ ऑनर’दिला आहे,

ते तिच्यातल्या अतुलनीय धैर्यासाठी. ती जीझेल पेलिकॉ (Gisèle Pelicot). आज ७२ वर्षांची आजी. नवरा, तीन मुलं आणि सात नातवंडांसह फ्रान्समधील एका छोटय़ा गावात सुखेनैव आयुष्य जगणारी, सप्टेंबर २०२० पर्यंत. त्यानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या त्या एका दिवसाने तिला आश्चर्य, धक्का, दु:ख, वेदना, क्रोध, विश्वासघात, असहायता या भावनांनी भोवंडून गरागरा फिरवलं.. त्यानंतरचं तिचं आयुष्य तिचं राहिलंच नाही.. तिच्या नवऱ्याला, डॉमनिक पेलिकॉला  पोलिसांनी अटक केली होती, कारण काय तर त्याने सुपरमार्केटमध्ये बायकांचे स्कर्टखालचे म्हणजेच अश्लील फोटो लपून काढले होते. पोलीस त्यांच्या घरी आले. घराची झडती सुरू झाली. त्यांच्या घरात त्यांना असे २० हजारपेक्षा जास्त व्हिडीओ, फोटो सापडले. फोल्डरवर लिहिलं होतं ‘अ‍ॅब्युज’. अधिक शोध घेतला गेला.. तेव्हा लक्षात आलं त्यातले बहुसंख्य फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स हिच्याच आहेत. आणि त्याही त्याच घरातल्या. त्यांच्याच बिछान्यावरच्या. बलात्काराच्या! ग्लानीतली ती आणि तिचा उपभोग घेणारे मात्र वेगवेगळे. एक, दोन नाही ७०च्या वर पुरुष. आणि मग खुलासा झाला तो सतत नऊ वर्षांपेक्षा जास्त काळ  (२०११ ते २०२०) सुरू असलेल्या तिच्यावरच्या बलात्काराचा. तिची संमती तर नाहीच, पण जाणिवेतही नाही अशा बेशुद्धावस्थेत झालेला तिच्यावरच्या अत्याचाराचा. इतका प्रेमळ, विश्वासू नवरा असं काही करत असेल ही कल्पना करणंसुद्धा जिथं कठीण तिथं एकामागोमाग एकेक सापडणारे व्हिडीओ नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा कुटुंबवत्सलतेचा मुखवटा टराटरा फाडत होते आणि ती असहायपणे आपल्या विश्वासाला तडे जाताना फक्त पाहत होती.

  हळूहळू तिला एकेका घटनांचे अर्थ लागू लागले.. अनेक रात्री आपल्याला इतकी गाढ झोप का लागते, सकाळी उठल्यानंतरही किती तरी काळ ग्लानीतच का राहतो आपण, अलीकडे वरचेवर आजारी पडतोय.. वजनही वेगाने कमी होतंय, केस तर रोजच्या रोज खूप गळताहेत, आणि आठवण.. रोज काही ना काही विसरायला होतंय, आपल्याला अल्झायमर तर झाला नाही, ही तर सतत भेडसावणारी शंका.. या साऱ्याचं मूळ वेगळंच होतं तर.. ते होतं, त्या त्या रात्री जेवणातून, सरबत वा दारूतून किमान सात तास गाढ झोपण्यासाठी डॉमनिक तिला देत असलेल्या झोपेच्या आणि नैराश्यावरच्या गोळ्या. त्यांचं प्रमाण इतकं होतं की ती कदाचित मेली असती, असं पुढे सांगितलं गेलं.

आता तिला वास्तवाचं भान आलं. काय घडून गेलं आहे याची कल्पना आली. इतक्या पुरुषांकडून बलात्कार होणं म्हणजे  एखादी बाई शरमेने मरून गेली असती, स्वत:ला घरात कोंडून जगापासून लपून बसली असती. पण जीझेलने मात्र स्वत:साठी उभं राहायचा निर्णय घेतला. तिला न्याय तीच मिळवून देणार होती. त्यासाठी तिला जगासमोर येणं भाग होतं. तिने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तपास सुरू झाला. सगळे पुरावे घरातच होते. आता त्यावरून ‘त्या’ पुरुषांना शोधणं सुरू झालं. सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२४ तपास सुरू होता. ती राहत असलेल्या दक्षिण फ्रान्सच्या मझान गावच्या आजूबाजूच्याच पंचक्रोशीतली ५१ पुरुषांना शोधण्यात यश आलं. वय र्वष २० ते ७०. कुणी पेंटर, कॉन्ट्रॅक्टर, ट्रक ड्रायव्हर, कुणी इलेक्ट्रिशियन, कुणी शेतकरी, कुणी वॉर्डन तर एक शिपाईसुद्धा. 

या सगळ्यात सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती इंटरनेटची. (जर इंटरनेट नसतं तर इतकं मोठं कांड घडलं नसतं, अशी एकाची कबुली.) डॉमनिकला पॉर्न साइट बघायची चटक लागली. एकदा बायकोला गुंगीचं औषध देऊन तिचा बलात्कार करणाऱ्याचा व्हिडीओ त्याला दिसला आणि त्याच्या डोक्यात विकृत राक्षसाने जन्म घेतला. त्या राक्षसाची बळी ठरली त्याची बायको जीझेल. त्याआधी समआवडीचे लोक एकत्र येऊन चॅटरूम तयार झाला होताच. त्याने कल्पना मांडली. एक जण तयार झाला. रात्री तीनच्या सुमारास काम ‘फत्ते’ करून निघूनही गेला. काहीच घडलं नाही. घरातला दुसरा दिवस नेहमीसारखाच निवांत गेला. मग मात्र डॉमनिकचं धाडस वाढलं. मधूनमधून तिला गुंगीचं औषध देत तो आपलं काम पूर्ण करू लागला. प्रत्येक घटनेचा तो व्हिडीओ काढायचा. कॅमेरा तसा सेटच केला होता. आणि येणाऱ्यांना सक्त ताकीद. दारू, सिगारेट प्यायची नाही, सेंट मारायचा नाही. गुपचूप आपलं काम उरकायचं आणि निघून जायचं. त्या पुरुषांना जे हवं ते मिळत होतं.. बस्स!  बाकीचा विचार करण्याइतपत बहुतेकांची मनं किंवा आत्मेच मेलेले होते बहुतेक! डॉमनिक त्याच्या व्हिडीओ क्लिप्स बनवायचा आणि इंटरनेटवर टाकायचा. घृणास्पद काम करणाऱ्या या विकृताला ना खेद वाटत होता, ना पश्चात्ताप. सकाळ झाली की तो प्रेमळ पिता, विश्वासू नवरा या भूमिकेत आपसूक शिरायचा.

बलात्कारकर्त्यां पुरुषांना अटक झाली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि साक्षींचा दौर सुरू झाला.. एकामागोमाग एक. त्याने फ्रान्समधल्या बलात्कारविषयक कायद्याचं पितळ उघडं पाडलं. एकविसाव्या शतकात असूनही तिथं पुरुषप्रधानतेची मुळं इतकी घट्ट रुजली आहेत की शरीरसंबंधांसाठी त्या बाईची परवानगी आवश्यक असते, संमतीशिवायचा संबंध हा बलात्कार मानायला हवा, यासाठी कायद्यात योग्य तो बदल करायला हवा याचा नव्याने साक्षात्कार झाला तिथल्या न्यायव्यवस्थेला.  म्हणूनच आत्तापर्यंत फ्रान्समध्ये बलात्कारित स्त्रियांचे गुन्हा नोंदवण्याचे प्रमाण फक्त २० टक्के इतकं असून त्यातील ९४ टक्के प्रकरणे खटल्याआधीच फेटाळली जातात, असे सांगितले जाते. हिंसा, धमकी, भीती याचा उपयोग करून जर कुणा स्त्रीवर बलात्कार झाला तरच तो बलात्कार मानला जातो. म्हणूनच  या खटल्यात अनेकांनी साक्ष देताना, आम्हाला वाटलं, डॉमनिकने त्याच्या बायकोची परवानगी घेतली आहे, किंवा हा सेक्स गेमचा भाग आहे, किंवा ती झोपेचा बहाणा करते आहे, इतकंच नाही तर आम्ही तिच्या चेहऱ्याकडे पाहिलंच नाही, अशा काहीही साक्षी दिल्या. एकाने तर ती घोरत असण्यावरून विनोदही केला होता. किती बीभत्स आहे हे! सरळ सरळ दिसतंय, एक बाई आपल्या बिछान्यात गाढ झोपेलेली आहे. समोर कॅमेरा चालू आहे.. आणि तरीही..?

तपासाचा भाग म्हणून यातल्या ५० जणांचा भूतकाळ खोदण्यात आला. त्यातले बहुसंख्य हे पीडित भूतकाळाचे बळी आहेत. कुणाचे वडील क्रूर होते, प्रचंड मार त्यांनी सहन केलेला आहे, तर कुणी लहानपणीच लैंगिक अत्याचाराचा बळी होता, कुणी अतिप्रचंड गरिबी भोगली होती तर कुणाचे बायकोबरोबरचे लैंगिक संबंध चांगले नव्हते. प्रत्येक जण अत्याचार भोगलेला आहे तरीही त्यांना आपण करीत असलेल्या कृत्याविषयी तिळमात्रही खेद नव्हता आणि म्हणूनच अनेकांनी निर्लज्जपणे, याला बलात्कार म्हणतात का, असा प्रश्न केला. स्वत: डॉमनिकही संघर्षांचं आयुष्यच जगला होता. त्याचे वडील क्रूरकर्मा होते. ते आईलाही खूप मारायचे. लहान असताना एकाने म्हणे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. गरिबी होतीच. मिळालेल्या पगारातला ८० टक्के भाग बाबाच घ्यायचा. संघर्ष पाचवीला पुजला होता, अर्थात म्हणून जीझेलवरच्या त्याने केलेल्या जीवघेण्या अत्याचाराचं समर्थन होऊच शकत नाही. पण पुढे मात्र तो इलेक्ट्रिशियन झाला, इस्टेट एजंट झाला. जीझेल भेटली. तीही चांगल्या पदावर नोकरी करत होती. प्रेमात पडून लग्न केलं. तीन मुलं झाली. सुखात संसार सुरू होता. दरम्यान, तीन र्वष जीझेल सहकाऱ्याच्या प्रेमात होती. डॉमनिकला हे कळल्यावर तोही दुसरीबरोबर राहायला लागला. पण लवकरच ते पुन्हा एकत्र आले. २००७ पासून ते एकत्रच होते. निवृत्तीचं आयुष्य भोगण्यासाठी मझान गावी आले होते. आयुष्य शांतपणे सुरू होतं, पण मध्येच डॉमनिकला ही अवदसा आठवली आणि.. सुखी आयुष्याच्या चिंधडय़ा उडाल्या.  न्यायालयाने डिसेंबर २०२४ मध्ये डॉमनिकला २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तर इतर पन्नास पुरुषांना बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न या कारणांसाठी आठ ते १० वर्षांची तुरुंगवासाची सजा सुनावली आहे.

 मात्र, त्यानंतर जीझेलचं खरं काम सुरू झालं आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेकडून बाईला दिल्या जाणाऱ्या आत्मसन्मानाचं. त्यासाठी फ्रान्समधील स्त्रियांही रस्त्यावर उतरल्या आहेत. मुळात या घटनेने आणि खटला चालू असतानाच्या काळातही जीझेलला फ्रान्सच्या नागरिकांकडून प्रोत्साहनच मिळालं. तिचं ठामपणे उजळ माथ्याने लोकांना सामोरं जाणं लोकांना बदलाची नवी झुळूक वाटते आहे. ‘आम्ही तुझ्या पाठीशी आहोत’चे नारे तिचं मनोधैर्य वाढवत आहेत. म्हणूनच आता तिने लोकांसाठी पुढचं आयुष्य घालवायचं ठरवलं आहे.

सर्वात महत्त्वाचं काम आहे ते फ्रान्सच्या कायद्यासंदर्भातील. लग्नांतर्गत बलात्कार (मॅरिटल रेप), संमतीशिवाय केलेले शरीरसंबंध म्हणजे बलात्कारच ही व्याख्या,  अमली वा नशेच्या पदार्थाचा उपयोग करून केलेले(केमिकल सबमिशन) गुन्हे, लैंगिक अत्याचार यावर तिचा भर असणार आहे. जीझेलची मुलगी, कॅरोलाइन डोरियन हीसुद्धा आता या लढय़ात उतरली आहे. तिची तीनही मुलं तिच्यासोबत ठामपणे उभी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 बलात्कार संदर्भातला संमतीचा कायदाही अगदी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे फ्रान्समधील अनेक गुन्ह्यांना तर वाचा फुटेलच; परंतु अनेक जणी आपल्यावरील गुन्ह्यांच्या विरोधात दाद मागायला पुढे येतील. आपल्या या साऱ्या आठवणींना एकत्रित बांधणारं पुस्तक ती लिहितेय, A Hymn to Life: Shame Has to Change Sides. त्याचा २२ भाषांत अनुवादही केला जातोय.      

डॉमनिक पेलिकॉ सुपरमार्केटमध्ये अश्लील फोटो घेताना पकडलाच गेला नसता तर? जीझेलवरच्या अत्याचाराला वाचाच फुटली नसती, पण ती फुटली आणि  एक लखलखीत व्यक्तिमत्त्व झळाळून पुढे आलं. त्याच्या प्रकाशात अनेकींचं काळंकुट्ट आयुष्य तेजोमय होईल, हीच आशा.

arati.kadam@expressindia.com