माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

टाळेबंदी सुरू झाल्यावर जसे इतर अनेक प्रश्न निर्माण झाले तशाच राज्यभरातल्या विद्यार्थी आणि पालकांनाही विविध शंका भेडसावू लागल्या. परंतु शिक्षणविषयक समुपदेशकांनी त्यांना या काळात आधार दिला, त्यांच्या शंकांचं निरसन केलं आणि भविष्यातील विविध संधींबद्दलही माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरलेल्या समुपदेशकांच्या या हेल्पलाइनविषयी..

मार्च महिना हा एरवी विद्यार्थी आणि पालक दोघांसाठी अत्यंत व्यग्रतेचा आणि तणावपूर्ण असतो. यंदा मात्र मार्च महिन्यातच शिक्षण क्षेत्राचं चक्र ‘करोना’च्या संकटात रुतलं आणि त्या संदर्भातले अनेक प्रश्न निर्माण झाले. ‘एनसीईआरटी’ व ‘एससीईआरटी’ (अनुक्रमे ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’ व ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’) यांच्या हेल्पलाइननं या काळात अनेक विद्यार्थी व पालकांना मदतीचा हात दिला.

या दोन्ही संस्थांनी समुपदेशनाचं प्रशिक्षण घेतलेल्या अनुभवी शिक्षकांची अधिकृत समुपदेशक म्हणून निवड केली आहे. त्यांचे खासगी फोन क्रमांक हेल्पलाइन नंबर म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यावर फोन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं नाव, त्याच्या शाळा वा महाविद्यालयाचं नाव, प्रभाग, त्यांनी मांडलेली समस्या यांची नोंद ठेवणं अनिवार्य करण्यात आलं. या मान्यताप्राप्त समुपदेशकांनी विद्यार्थ्यांची भावनिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक पाश्र्वभूमी विचारात घेऊन आणि मानसशास्त्रीय कौशल्यांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केलं. या हेल्पलाइनचा उपयोग महाराष्ट्रातल्या शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही मोठय़ा प्रमाणावर झाला. व होतो आहे.

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात सर्वात अधिक संख्येनं हेल्पलाइनवर फोन आले, ते परीक्षा होणार की नाही, न झाल्यास आमच्या शैक्षणिक प्रगतीचं मूल्यमापन कसं केलं जाईल, उरलेल्या पेपर्सचं काय, या शंका विचारणारे होते. त्यावर सर्वच समुपदेशकांनी हे आवर्जून सांगितलं की विद्यार्थ्यांच्या गुणांचं मूल्यमापन करणारी समिती अस्तित्वात आहे. ती चर्चेअंती विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य तो निर्णय घेईल. त्यामुळे त्याची काळजी नसावी. मुंबई विभागाच्या समुपदेशक आणि ‘एच. के. गिडवानी हायस्कूल’च्या शिक्षिका स्मिता शिपुरकर टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव सांगतात, ‘‘त्या वेळी परिस्थिती खूप अनिश्चित होती. शाळा आणि सरकारकडून कोणत्याही सूचना येत नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हवालदिल होते. एरवी शाळा आणि शिकवण्यांमध्ये नऊ तास घराबाहेर राहणारी मुलं दिवसभर घरात अडकल्यामुळे त्यांचीही खूप चिडचिड होत होती. घराघरांत किशोरवयीन मुलांचे पालकांशी खटकेही उडत होते. अशा पालकांचे सल्ल्यासाठी हेल्पलाइनवर खूपदा फोन येत. एकदा एका पालकानं सांगितलं, की मुलगा एवढा हिंसक झालाय की तो चिडून घरातल्या साऱ्या वस्तू इतस्तत: फेकतोय. आपला संताप बाहेर काढण्याची  त्याची ती पद्धत होती परंतु पालक

ती समजून घेऊ शकत नव्हते. अशा सर्वच पालकांना आम्ही समजावलं, की जरी तुम्ही घरातून ऑफिसचं काम करत असाल, घरकामात व्यग्र असाल, तरी मुलांशी तासभर गप्पा मारा, जुने खेळ काढा, मजेदार आठवणींना उजाळा द्या. आम्हाला जे फोन येत होते त्यावरून हे जाणवत होतं, की विद्यार्थ्यांना गुण, परीक्षेचा निकाल, तसंच अभ्यासक्रमांची निवड, प्रवेश यांची चिंता भेडसावत आहे. त्यामुळे त्यांचा भावनिक उद्रेक होत आहे. मुलं सांगत, की आमचे आई-बाबा सतत नकारात्मक बोलतात. बाहेर जाऊ नको, हे करू नको, ते खाऊ नको.. सतत नकारघंटा! मग आम्ही पालकांना समजावलं, की मुलांच्या परीक्षा, प्रवेश प्रक्रिया वा पुढील करिअर हे सर्वच धोक्यात आहे मान्य.. पण त्याच त्याच विषयावर चिंता व्यक्त करत न बसता मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टींत रमवा. नृत्य, गायन, चित्रकला यांच्या ‘ऑनलाइन’ शिकवण्या लावा. ‘टाकाऊतून टिकाऊ’सारखे काही उपक्रम घरात करा. विद्यार्थ्यांची आणखी एक तक्रार होती, की आई-बाबा या काळात आम्हाला सतत दामटून अभ्यासाला बसवतात, टीव्ही बघू देत नाहीत, मोबाइलवर खेळूही देत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना हे सांगावं लागलं, की सतत मोबाइल पाहिल्यामुळे डोळ्यांवर,मेंदूवर ताण येतो. तेव्हा पालक जे सांगताहेत ते तुमच्या हिताचंच आहे.’’

या काळात स्मिता यांना हेल्पलाइनवर काही विशिष्ट अडचणी मांडणारे फोनही आले. त्या सांगतात, ‘‘एका पालकानं तक्रार केली, की मी मुलीच्या ‘नीट’ परीक्षेची (राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा) फी भरली आहे, पण ती अभ्यासच करत नाही. त्या तक्रारीवरून मी त्यांच्या मुलीला फोन करून आमची बोलण्याची काही कौशल्यं वापरत त्याबद्दल विचारलं. ती म्हणाली, ‘‘परीक्षा होणारच नाहीत तर मी कशाला अभ्यास करू?  शिवाय मी काहीही केलं तरी वडील सतत रागावतच असतात. म्हणून मी रागानं अभ्यासच करत नाही.’’ मग तिला हे समजवावं लागलं, की सध्या तुझा अभ्यासातला रस गेलाय हे मान्य. पण सरकारी नियम कधी, कसे बदलतील सांगता येत नाही. तेव्हा हीदेखील एक संधी समज आणि परीक्षेची तयारी कर. शिवाय वडीलही वेगवेगळ्या कारणानं अस्वस्थ असतीलच. त्यांना समजून घे. एका मुलाच्या घरी आई-वडिलांची सतत भांडणं होत असत. एरवी तो घरात थांबण्याऐवजी शाळेतल्या मित्रांबरोबर जास्त वेळ घालवायचा. त्यानं हेल्पलाइनवर फोन करून सांगितलं, की घरातलं वातावरण  नकोसं आहे. मित्रही भेटत नाही. जगणं नकोसं झालंय. त्याला विचारलं, की तुला काय करायला आवडतं?  तो म्हणाला, ‘‘चित्रं काढायला आवडतं.’’ मग त्याला ‘करोना’ या विषयावर चित्रं काढायला सांगितली. त्यानं अशी अनेक चित्रं मला पाठवली. चित्रांमधून तो मनातले विचार व्यक्त करत होता. हळूहळू तो त्यात रमत गेला आणि निराशेतून बाहेर आला.’’

जून महिना उजाडला आणि ‘ऑनलाइन’ वर्गाना सुरुवात झाली. पुणे जिल्हा विभागाचे समुपदेशक प्रशांत पाटील सांगतात, ‘‘हेल्पलाइनवर आम्हाला येणाऱ्या फोनच्या वाढत्या संख्येमुळे ऑनलाइन वर्गाबद्दलच्या समस्या लक्षात आल्या. लहान मुलांना ‘लॉग इन’ करता येत नसल्यानं पालकांना काम सोडून त्यांच्यासोबत बसावं लागतं, तर सात-आठ तास सलग अभ्यास करण्यानं मोठी मुलं कंटाळून जातात. त्यात अशा शिक्षणाची सवय नसल्यानं विद्यार्थ्यांना ते पटकन आत्मसात करता येत नाही. ऑनलाइन शिकताना विद्यार्थ्यांच्या बाजूचा माइक ‘म्यूट’ असल्यानं त्यांना नेमकं किती कळलंय हे शिक्षकांना कळत नाही. अनेकदा घरात दोन भावंडं असली तरी फोन एकच असतो. विशेषत: ग्रामीण भागातल्या कित्येक मुलांकडे ‘अ‍ॅन्ड्रॉइड’ फोन नाहीत. फोनला ‘रेंज’ची समस्या आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. काही पालकांना ‘डेटा पॅक’ विकत घेणंच परवडत नाही. गैरहजर राहण्याबद्दल विचारलं तर मुलं सांगतात, की बाबा शेतावर किंवा कामावर फोन घेऊन गेलेत. त्या मुलांना धीर द्यावा लागतो, की तुमचा ‘बुडलेला’ अभ्यास नंतर करून घेण्यात येईल. त्याशिवाय आम्ही विषयांनुसार ‘यू टय़ूब लिंक’ या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर टाकतो. एखादा विषय शिकवून झाला की ‘गूगल फॉर्म’च्या साहाय्यानं एक पर्यायी प्रश्नपत्रिका ‘लिंक’च्या स्वरूपात देतो. म्हणजे त्यांना विषयाचं आकलन नेमकं किती झालंय ते आम्हाला कळतं.’’

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारीमध्ये ‘कलचाचणी’ होते. १ मे रोजी त्याचा निकाल आला आणि सर्वच समुपदेशकांकडील कॉल्सच्या संख्येत वाढ झाली. चंद्रपूर येथील समुपदेशक मुग्धा कानगे सांगतात, ‘‘अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी विद्यार्थी आम्हाला कलचाचणीचा निकाल कळवतात. त्यावर आधारित अहवाल बनवला जातो. त्यात विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठल्या क्षेत्रांत आहे, त्यानुसार त्यानं कोणतं क्षेत्र निवडावं, त्या क्षेत्रांतील संधी आणि आव्हानं याबाबत समुपदेशन करण्यात येतं.’’ त्यांच्यासाठी ‘महा करिअर मित्र’ हे ‘पोर्टल’ अत्यंत उपयुक्त ठरतं. त्या आधारे जूनपासून विद्यार्थ्यांना वेगवेगळी राज्यं, तिथली शहरं, शिकवले जाणारे अभ्यासक्रम, शिष्यवृत्त्या आणि सुमारे ११४८ प्रवेश परीक्षांची माहिती दिली जाते. बारावीनंतर परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना तिथल्या विद्यापीठांची आणि प्रवेशपद्धतींची माहिती हेल्पलाइनवरून देण्यात येते. करिअरबाबत समुपदेशन करताना विद्यार्थ्यांचा कल आणि क्षमता याचा विचार केला जातो.

हिंगोलीमधील समुपदेशक दिलीप चव्हाण ग्रामीण विद्यार्थ्यांचा अनुभव सांगतात. ‘‘खेडेगावांतील पालकांचा कल पारंपरिक अभ्यासक्रमांकडे असतो. (उदा. ‘डीएड’, ‘बीएड’ आणि तत्सम अभ्यासक्रम). त्यांना नवीन अभ्यासक्रमांची माहिती नसते, आणि ते निवडण्याची मानसिकताही नसते. यंदा हेल्पलाइनच्या माध्यमातून शाळाशाळांचे गट बनवून विद्यार्थ्यांना अशा अभ्यासक्रमांची माहिती आम्ही दिली. उर्दू माध्यमातील एका दहावीच्या विद्यार्थिनीला अशाच एका वेगळ्या अभ्यासक्रमासाठी शहरात जाण्याची इच्छा होती. पण तिच्या वडिलांनी विरोध दर्शवला. तेव्हा मी तिला एका महाविद्यालयातील मुलींचा वर्ग शोधून दिला आणि मुलींच्या वसतिगृहात तिची सोय केली. एकमेकांना न भेटता केवळ हेल्पलाइनच्या माध्यमातून तिची सोय झाली.’’

पेण येथील समुपदेशक साईनाथ पाटील सांगतात, ‘‘विद्यार्थी हेल्पलाइनवरून अभ्यासक्रमांची चौकशी करतात तेव्हा तो अभ्यासक्रम केल्यावर नोकरी मिळेल का, हे आवर्जून विचारतात. मग मी त्यांना समजवतो, की यशस्वी करिअर करणं म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या कामातून केवळ पैसा नव्हे, तर आनंद, समाधान मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणं महत्त्वाचं.  विद्यार्थ्यांना चिंता होती, की पुढे वसतिगृहात राहणं, खाणावळीत जेवणं धोक्याचं आहे. यावर मी सरकारी वसतिगृहांचा पर्याय सुचवला.’’

चंद्रपूर येथील समुपदेशक अनिल पेटकर यांना मध्य प्रदेश, गुजराथ, नागपूर येथून या काळात अनेक फोन आले. अस्वस्थ मन:स्थितीतल्या पालक आणि विद्यार्थ्यांना ते सांगत, की भूतकाळात रमू नका, भविष्याची चिंता करू नका. वर्तमानात जगा. स्वस्थ राहा, प्राणायाम, योग करा. आपोआप तुमच्या मनातल्या भावनांचा उद्रेक हळूहळू शांत होईल. या काळातली दोन उदाहरणं ते सांगतात, ‘‘एक मुलगा ‘नीट’ परीक्षेचा अभ्यास करत होता, पण त्याचं अभ्यासात लक्ष  लागत नव्हतं. यावरून वडील खूप चिडले आणि त्याच्या एक कानशिलात भडकावली. मुलगा कमालीचा बिथरला. वडिलांनी मार्गदर्शनासाठी हेल्पलाइनवर फोन केला. मी त्यांना सांगितलं, की झालं गेलं विसरून तुम्ही त्याच्या जवळ जा. त्याला फिरायला न्या, त्याच्या आवडीच्या विषयांवर बोला. थोडय़ा दिवसांत त्या वडिलांचा फोन आला. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलाशी प्रेमानं बोललो. आता आमची छान मैत्री झाली आहे. आणखी एक प्रकरण- नववीतली मुलगी. आई-वडिलांशी अचानक तुटकपणे बोलू लागली, भांडू लागली. ती या कुटुंबातली दत्तक मुलगी असल्याचं तिला नुकतंच कळलं होतं आणि त्यावरून ती अस्वस्थ झाली होती. ‘मला माझ्या खऱ्या आई-वडिलांकडे पाठवा,’ म्हणू लागली. हे घडल्यावर या आईनं हेल्पलाइनवर फोन केला. मी त्या मुलीशी बोललो. समजुतीनं काही गोष्टी सांगितल्या.  म्हटलं, की एका डायरीत तुझे विचार लिही. तुला आई-बाबांचा राग का येतो तेही लिही. वडिलांना सांगितलं, की तुम्ही तुमच्या मुलीला जवळच्या एखाद्या अनाथालयात घेऊन जा. तिथली छोटी मुलं, त्यांचं आयुष्य तिला जवळून पाहू द्या. वडिलांनी तसं केलं, आणि तिच्या स्वभावात आमूलाग्र बदल झाला. काही वेळा विद्यार्थ्यांच्या भावनिक उलथापालथीवर अशा प्रकारे समुपदेशन करून फुंकर घालावी लागते.

शेवटी शैक्षणिक, मानसिक, भावनिक समस्या कोणतीही असो, विद्यार्थ्यांचं हित हेच आम्हा सगळ्या समुपदेशकांचं एकमेव लक्ष्य असतं.’’

हेल्पलाइन क्रमांक

स्मिता शिपुरकर, मुंबई : ९८१९०१६२७०

मुग्धा कानगे, चंद्रपूर : ९४२२५७१३७३

अनिल पेटकर, चंद्रपूर : ७०३८५९४२०१

प्रशांत पाटील, पुणे : ९४२००२८४४१

साईनाथ पाटील, पेण : ९३९५०९८९५

दिलीप चव्हाण, औरंगाबाद : ९८२२७०६१०२ mahacareermitra.in ८६००२२५२४५