शुभदा चंद्रचूड
काळजीवाहकांची ‘घरपोच’ सेवा देणाऱ्या ‘नर्सेस ब्युरो’ची संकल्पना तुलनेनं आधुनिक आहे. वैद्याकीय देखभालीची, शुश्रूषेची गरज असलेले रुग्ण आणि त्यांना त्यांच्या घरी वा घरपोच व्यक्तिगत सेवा देणारे काळजीवाहक ‘मावशी’ किंवा ‘मामा’ यांची सांगड घालून देणं हाच ‘नर्सेस ब्युरो’ या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे. आपल्याकडे या संस्थांचा उदय आणि त्यांची लक्षणीय वाढ विसाव्या शतकाच्या अखेरीस आणि या शतकाच्या सुरुवातीला झाली. वैद्याकीय सेवेमधलं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल.

आजकाल आपण बघतो की, अशी सेवा पुरवणाऱ्या संस्थांचं पेवच फुटलेलं आहे. आपल्या राज्यात विशेषत: पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांत अशा संस्थांची संख्या काही शेकड्यांत आहे. नेमकी कधी सुरुवात झाली याची माहिती जरी आज उपलब्ध नसली तरी सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वीच मुंबईत अशा तऱ्हेची सेवा पुरवणाऱ्या संस्था चालू झाल्या. सुरुवातीपासूनच अशी सेवा त्या काळात दुर्मीळ असल्याने ती सहसा परवडण्याजोग्या दरात उपलब्ध नव्हती. साहजिकच समाजात काही ठरावीक सधन वर्गालाच या सेवेचा लाभ घेणं त्यावेळी शक्य होतं. पण हळूहळू एका बाजूला मध्यमवर्गीय कुटुंबातल्या अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण विशेषत: मुंबईसारख्या महानगरीत झपाट्याने वाढलं आणि दुसऱ्या बाजूला काळजीवाहकांची अशी घरपोच सेवा देणाऱ्या संस्थांची संख्याही वाढली. थोड्या-फार परवडण्याजोग्या दरात ही सेवा उपलब्ध होऊ लागली.

पुण्यामध्ये सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी अशी सेवा पुरवणाऱ्या संस्था उदयाला आल्या. त्याचं कारणही त्याकाळी होतं. मुंबईहून निवृत्तीनंतर पुण्यात येऊन स्थानिक होणाऱ्या ज्येष्ठांची वाढती संख्या! वैद्याकीय मदतीची गरज असलेल्या त्यापैकी काहींनी या घरपोच सेवेचा पर्याय निवडायला सुरुवात केली. राज्याच्या इतर भागांत काही तुरळक मोठी शहरं सोडली, तर आजही ही सेवा पुरवणाऱ्या संस्थांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मर्यादित आहे.

या सगळ्या संस्था ‘शॉप अॅक्ट’खाली नोंदणीकृत आहेत. पण यापैकी फारच थोड्या संस्था ‘महाराष्ट्र स्टेट नर्सिंग कौन्सिल’च्या नोंदणीकृत आहेत. याचं एक कारण असंही असावं की, ‘तातडीची वैद्याकीय सेवा’ या सदराखाली येणारी ही सेवा असताना ती पुरवणाऱ्या या ‘नर्सेस ब्युरो’वर ‘महाराष्ट्र स्टेट नर्सिंग कौन्सिल’चं कोणतंही कायदेशीर नियंत्रण किंवा अंकुश नाही. ‘महाराष्ट्र स्टेट नर्सिंग कौन्सिल’ ही संस्था ‘महाराष्ट्र नर्सेस अॅक्ट १९६६’, ‘महाराष्ट्र स्टेट नर्सिंग कौन्सिल अॅक्ट १९७१’ आणि ‘महाराष्ट्र नर्सिंग सब अॅक्ट १९७३’ यांच्या आधारभूत मार्गदर्शक तत्त्वांच्या चौकटीत काम करते. याच्या नियमावलीत कालपरत्वे वेळोवेळी सुधारणा केल्या गेल्या आहेत. मुळात देशपातळीवरच्या मुख्य ‘इंडियन स्टेट नर्सिंग कौन्सिल’च्या वेगवेगळ्या राज्यांत मिळून अशी एकूण ३२ ‘स्टेट नर्सिंग कौन्सिल्स’ आहेत. नर्सिंगचं प्रशिक्षण, कार्यपद्धती ठरवणं. या व्यवसायावर नियंत्रण ठेवणं, देशभरात खासगी आणि सरकारी वैद्याकीय यंत्रणांमार्फत योग्य, दर्जेदार नर्सिंग सेवा पुरवली जाईल याची खातरजमा करणं याकरिता देशभरात समान निकष प्रस्थापित करण्याची या संस्थेची जबाबदारी आहे.

कशी असते ‘नर्सेस ब्युरो’ची कार्यपद्धती? याबाबत पुण्यात कार्यरत असलेल्या नर्सेस ब्युरोच्या कीर्ती भिडे सांगतात, ‘‘आमची संस्था २० वर्षांपूर्वी माझ्या सासूबाईंनी चालू केली. त्या पाठीमागे मुंबईत नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा स्वत:चा सुमारे ४० वर्षांचा दांडगा अनुभव होता. मी त्यांना सहकार्य करायचं ठरवलं. त्यावेळी पुण्यात ही कल्पना नवीनच होती. ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला लागणारी वैद्याकीय मदत आणि सोबत काळजीवाहकाच्या रूपात घरपोच मिळते आहे हे लक्षात आल्यावर त्यांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळू लागला. आमची संस्था ‘शॉप अॅक्ट’खाली नोंदणीकृत आहेच शिवाय ‘महाराष्ट्र स्टेट नर्सिंग कौन्सिल’चीही नोंदणीकृत आहे. आमच्याकडे ५०-६० स्त्रिया काळजीवाहक म्हणून काम करतात. रुग्णांचा मदतनीस म्हणून आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची देखभाल करण्याचं प्राथमिक जुजबी काम आम्ही त्यांना शिकवतो.’’ या ब्यूरोची कार्यपद्धती या क्षेत्रात सध्या काम करणाऱ्या संस्थांचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अनघा सावंतांच्या लेखात याचा सविस्तर ऊहापोह झाला आहेच.

प्रामुख्याने प्रशिक्षित नर्सेस पुरवणारे आणि मदतनीस स्वरूपाचे ‘मावशी’ आणि ‘मामा’ पुरवणारे असे दोन तऱ्हेचे नर्सेस ब्यूरो आज अस्तित्वात आहेत. त्यातही ‘प्रशिक्षित’ नर्सेस असा दावा करणाऱ्या काही संस्थांमधल्या नर्सेस सरकारमान्य ‘नर्सिंग प्रशिक्षण संस्थां’मार्फत प्रशिक्षित असतातच असं नाही. ‘मदतनीस’ स्वरूपात ‘मावशी’ किंवा ‘मामा’ यांची सेवा पुरवणाऱ्या ‘नर्सेस ब्युरो’त अशांना रुग्णांना मदत कशी करायची, अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाची शुश्रूषा कशी करायची याची जुजबी माहिती ब्युरो चालकाकडून दिलेली असते.

बहुतेक ब्युरोंमधून आधी त्यांच्याकडे काम करणाऱ्या स्त्रियांच्या ओळखीतून इच्छुक स्त्रिया चौकशी करतात. सहसा अशा इच्छुक उमेदवारांचा इंटरव्ह्यू ब्युरो चालकांकडून घेतला जातो. त्यामध्ये उमेदवाराचं प्रशिक्षण, कामाचा अनुभव याविषयीची माहिती ब्युरो चालकांकडून घेतली जाते. त्यासोबतच इच्छुक स्त्री-पुरुषांचं आधारकार्ड, अॅड्रेस प्रूफ याची माहितीही घेतली जाते. इच्छुक स्त्री-पुरुषांमध्ये विधवा, परित्यक्ता स्त्रियांची संख्या सर्वाधिक आहे. कामाची नितांत गरज असलेल्या गरीब, गरजू, सामाजिक स्तरातून या स्त्रिया येतात. यांचा वयोगट सहसा वयाची २५ ते ५५ वर्षं इतका असतो.

यांच्या कामाची वेळ बहुतेक ठिकाणी दिवसपाळीचे दहा तास आणि रात्रपाळीचे बारा किंवा तेरा तास अशी असते. सहसा सकाळी नऊ ते संध्याकाळी सात अशी दिवसपाळीची वेळ असते, तर रात्री आठ ते सकाळी आठ किंवा नऊ अशी रात्रपाळीची वेळ असते. काही ब्युरो रुग्णाच्या घरीच राहून सेवा देणारे काळजीवाहकही पुरवतात. रुग्ण आणि त्यांच्या घरच्यांच्या या मावशींच्या कामाबद्दल काही तक्रार असेल तर ती नेमकी कशाबद्दल आहे हे ब्युरो चालकांना पाहावं लागतं. अशा वेळी रुग्ण, रुग्णाच्या घरचे लोक आणि मावशी यांच्याशी एकत्र बसून बोलून परस्पर संवादातून तक्रार सोडवली जाऊ शकते. अन्यथा दुसरी व्यक्ती बदलून देणं ब्युरोला भाग असते.

काळजीवाहकांच्या सेवेच्या दरावर कुणाचं नियंत्रण नाही किंवा ते ठरवण्याची कुठलीही कायदेशीर चौकट, नियम नाहीत. सहसा शहरागणिक रुग्ण चालता बोलता आहे की अंथरुणाला खिळलेला आहे. रुग्णाला विशेष शुश्रूषेची गरज आहे की नाही, प्रशिक्षित काळजीवाहक मदतनीस स्वरूपाचे काळजीवाहक, कामाच्या ठिकाणापर्यंतचं अंतर अशा काही निकषांप्रमाणे हे दर बदलतात. या सेवेचे पुण्यासारख्या शहरात प्रतिदिन ६०० रुपये ते ८०० रुपये असे दर आहेत, तर मुंबईसारख्या शहरात ‘नर्सेस ब्युरो’च्या सेवेचे दर प्रतिदिन ८०० रुपये १५०० रुपयांपर्यंत आहेत. २४ तास सेवा देणाऱ्या काळजीवाहकाचा मासिक दर ३० हजार ते ते ७० हजार रुपये या श्रेणीत आहे. काळजीवाहकांचं वेतन थेट रुग्णांकडून, दर दहा दिवसांनी, पंधरा दिवसांनी किंवा मासिक दिलं जातं. ‘नर्सेस ब्युरो’चं कमिशन रुग्णाकडून ब्युरोला वेगळं दिलं जातं. तर काही ठिकाणी ते काळजीवाहकाच्या वेतनातच अंतर्भूत असतं आणि काळजीवाहक ते कमिशन ‘ब्युरो’ला चुकतं करतात.

काळजीवाहकाचं काम लहान मुलांची काळजी घेणं, त्यांना सांभाळणं या इतकंच कौशल्याचं आणि सतत समजून घेण्याचं काम आहे. रुग्ण व्यक्ती ही ‘रुग्ण’ आहे, ती तिच्या शारीरिक-मानसिक दुखण्यांनी ग्रस्त आहे. म्हणून अशी व्यक्ती चिडचिडी, सहज न ऐकणारी, त्रागा करणारी, कुरकुर करणारी असू शकते. अशा व्यक्तींची काळजी घेताना स्वत:चा अहंकार, घरचे ताणतणाव बाजूला ठेवून काळजीवाहकाने आपलं काम अत्यंत समजूतदारपणे करण्याची गरज असते. त्याकरता ‘नर्सेस ब्युरों’कडून काळजी- वाहकांना नुसत्या शुश्रूषेचं नाही, तर रुग्णाची मानसिकता जाणून घेऊन समंजसपणे काम करण्याचं प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे. ‘नर्सेस ब्युरो’कडून हे शक्य नसेल तर किमानपक्षी त्यांनी आपल्या काळजीवाहकांना कामाला सुरुवात करण्यापूर्वी असं प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडून किंवा तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन दिलं पाहिजे. घरातल्या रुग्ण व्यक्तीला काळजीवाहकाची सेवा मिळण्याचा हा पर्याय अनेक अर्थांनी उत्तमच आहे. पण स्वत: रुग्ण, त्याच्या घरातले लोक आणि काळजीवाहक यांचं एकमेकांशी उत्तम जुळणं हा त्यातला कळीचा मुद्दा आहे.
परस्परांच्या अपेक्षा जाणून घेऊन परस्पर विश्वास, आदर आणि संवादातूनच हे नातं हळूहळू दोन्ही बाजूंनी विकसित होऊ शकतं. एवढं मात्र नक्की.
smcmrc@gmail.com