‘टेनेसी बन्स अ‍ॅण्ड कंपनी’ ही कॉर्डिया हॅरिंग्टनची कंपनी. १९९६ साली सुरू झालेली ही कंपनी आज हॅम बर्गर्स आणि इंग्लिश मफिन्स् जगभरातील सहाशेहून अधिक रेस्तराँना पुरवते. मिनिटाला हजार बन्स तयार करण्याचा तिचा धडाकेबाज वेग आश्चर्यचकित करणारा आहे. ही कंपनी काढण्यापूर्वी कॉर्डियाने कन्स्ट्रक्शन कंपनी काढणे, बससेवेची फ्रँचायझी घेणे आदी कामे केलीच, पण ‘मॅकडोनाल्डस्’ची फ्रँचायझी घेणारी ती पहिली स्त्री ठरली. त्यातूनच जन्म झाला तो यशस्वी ‘बन लेडी’चा..

कॉर्डिया हॅरिंग्टन ‘टेनेसी बन्स अ‍ॅण्ड कंपनी’ची सीईओ! कॉर्डियाला ‘बन लेडी’ म्हणूनच ओळखले जाते. तिला तिची या नावाची ओळखही विशेष आवडते. कारण ‘बन्स’ बनवण्याच्या तिच्या कौशल्यामुळे तिला संपत्ती आणि ख्याती प्राप्त झाली आहे.  
 सुप्रसिद्ध रेस्तराँ साखळी ‘मॅकडोनाल्डस्’ मधले ‘इंग्लिश मॅक मफिन्स्’ असोत, ‘ओ’ चार्ली’ मधले बटरी रोल्स किंवा केएफसीमधील बिस्किट्स असोत, आग्नेय अमेरिका किंवा चिली प्रांतात मिळणारे हे सर्व पदार्थ म्हणजे या ‘बन लेडी’च्याच कंपनीची उत्पादने! आणि हो, हे फक्त या तीन कंपन्यांपुरतेच नाही. ‘पेरकिंस’, ‘पेपरिज फाम्र्स’ आणि ‘शीट्ज रुबी टय़ुसडे’सारख्या बडय़ा कंपन्याही ‘बन लेडी’वरच अवलंबून राहतात.
आज कॉर्डिया एका मोठय़ा कंपनीची सीईओ आहे! पण तिचा इथवरचा प्रवास सहज, सोपा नाही! आपल्या छोटय़ा छोटय़ा स्वप्नांना वास्तवाच्या तप्त भट्टीत भाजून तिने सोनेरी बनवले आहे.
आपल्या अपुऱ्या उत्पन्नात जिथे महिन्याची दोन टोके सांधणे अवघड असते, अशा कुटुंबात कॉर्डियाचा जन्म झाला. दुसऱ्याने वापरून टाकून दिलेले कपडे वापरत कॉर्डिया मोठी झाली. ‘मॅकडोनाल्डस्’सारख्या रेस्तराँमध्ये कुटुंबासमवेत जाणे म्हणजे सर्वच कुटुंबासाठी मोठेच अप्रूप होते.  
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला काही काळ तिने जपानमधील कान्साई गैदाई विद्यापीठात पदवीसाठी प्रयत्न केला. पण आर्थिक अडचणींमुळे तिला ते सोडून द्यावे लागले. विवाहानंतर ती पतीसमवेत फ्रँकलीन टेनेसी इथे वास्तव्यास असताना तिने आपले शिक्षण पूर्ण केले आणि अर्कान्सास विद्यापीठातून तिने ‘बी. एस्सी.’ची पदवी मिळवली.
कॉर्डिया आपल्या जीवनप्रवासाबद्दल सांगते, ‘‘माझा दुसरा मुलगा हा अपेक्षित तारखेच्या दोन आठवडे अगोदर जन्मला. त्यामुळे माझी जरा धावपळच  झाली. त्या दिवशी माझ्या एका रिअल इस्टेट प्रॉपर्टीचं क्लोजिंग होते. मी या बाळाला पहाटे पाच वाजता जन्म दिला, पण मला स्वत:चे आणि बाळाचे कौतुक करायला वेळ नव्हता. मी त्याला एका बास्केटमध्ये निजवले. त्या बास्केटसहित माझ्या ऑफिसमध्ये सकाळी ९ वाजता मी पोहोचले आणि तो व्यवहार पूर्ण केला.’’
तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तर ऑफिस आणि घर यातली तिची ओढाताण अधिकच वाढली. याच दरम्यान कॉर्डियाने आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता ती तीन अपत्यांची ‘सिंगल मदर’ होती आणि म्हणूनच तिला अधिक जबाबदारीने वागायला हवे होते. पतीपासून विभक्त झाल्यामुळे एकाकी पडलेल्या कॉर्डियाला आपल्या मुलांसमवेत शक्य तेवढा अधिक वेळ घालवावा असे वाटे. पण तिच्या बांधकाम व्यवसायाशी निगडित करियरमुळे तिला ते शक्य होत नसे.
मात्र, दुर्दम्य इच्छाशक्ती हेच एकमेव भांडवल कॉर्डियाजवळ होते. त्याच्या बळावर कॉर्डियाने रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला. आपल्याजवळ असलेली सर्वच्या सर्व पुंजी (५८७ अमेरिकन डॉलर) तिने या व्यवसायात लावली. भाडय़ाने घेतलेली अपुरी जागा आणि प्लायवूडचा साइन बोर्ड अशा परिस्थितीत तिने आपले ऑफिस थाटले. प्रामाणिकपणा आणि मेहनती स्वभावामुळे या व्यवसायात तिचा लवकर जम बसला. बिल्डर घरे बनवण्याच्या आधीच कॉर्डिया त्यांची विक्री करून मोकळी होत असे. तिच्यातील उत्स्फूर्तता आणि चिकाटी बघूनच ती पुढे जाऊन काहीतरी विशेष करणार याबद्दलचे आडाखे तिच्या संपर्कातले लोक बांधू लागले होते.
असे करताना तिच्या लक्षात आले की ज्या झपाटय़ाने आपण घरांची विक्री करतो, त्या वेगाने बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिक घरे बनवत नाहीत आणि जर बनवली तर त्यांच्या गुणवत्तेत फरक पडतो. आणि ग्राहकांची नाराजी ओढवून घेणे कॉर्डियाला परवडणारे नव्हते. तिने यावर एक उपाय शोधला आणि स्वत:चीच कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली. उत्तम दर्जा आणि वेगाने होणारे बांधकाम यामुळे  तिचा व्यवसाय लवकरच नावारूपाला आला.
रिअल इस्टेट व्यवसायात तिला संपूर्ण वेळ आपल्या व्यवसायासाठी द्यावा लागे. कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ  लागले. म्हणून आपले कुटुंबदेखील नीट बघता येईल आणि व्यवसायही सांभाळता येईल असे काही तरी करण्याची इच्छा कॉर्डियाच्या मनात मूळ धरू लागली. ‘मॅकडोनाल्डस्’या जगप्रसिद्ध रेस्तराँ कंपनीची फ्रँचायझी तिने घ्यावी असे तिच्या काही मित्र-मैत्रिणींनी सुचवले. हे करत तू तुझ्या मुलांसाठी पण वेळ काढू शकशील हे मित्रांचे म्हणणे कॉर्डियाला मनोमन पटले आणि ती पुढील तयारीला लागली.
कॉर्डियाने ‘मॅकडोनाल्डस्’ची फ्रँचायझी मिळवली आणि एफिंगहम, इलिनोइस या जेमतेम दहा हजार वस्तीच्या गावात तिने आपले पहिले ‘मॅकडोनाल्डस्’ रेस्तराँ सुरू केले. कॉर्डिया ही ‘मॅकडोनाल्डस्’च्या इतिहासातली पहिली महिला फ्रँचायझी आहे.
 या खेडय़ात रेस्तराँ सुरू केले तरी तिथे नीट रस्ते नव्हते. मग कॉर्डियाने तिथल्या एका मोठय़ा बससेवेचीही फ्रँचायझी घेतली. ग्रे हाउंड बससेवेसाठी तिने काही रक्कम कर्जाऊ  घेतली आणि त्या बसचा थांबा तिच्या रेस्तराँच्या पार्किंग लॉटपाशी येईल, अशी काळजी घ्यायलाही ती विसरली नाही. या बसच्या ८८ फेऱ्या रोज होत असत. उन्हाळ्यात ही संख्या १२० पर्यंत जायची. त्यामुळे कॉर्डियाचा व्यवसाय लवकरच भरभराटीला आला.
‘सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या अमेरिकेतील ४० ‘मॅकडोनाल्डस्’ रेस्तराँपैकी माझे एक होते.’ हे कॉर्डिया अभिमानाने सांगते. तिच्या अशा खटपटय़ा स्वभावामुळे तिला अडचणींचा कधी बाऊ  वाटत नसे. किंबहुना प्रत्येक अडचण ही एक संधीच आहे, अशा दृष्टीने ती त्या आव्हानाकडे पाहत असे.
मॅकडोनाल्डस्च्या फ्रँचायझीच्या निमित्ताने तिला रोजच जवळपासच्या गावी जावे लागे. मग मुलांना पाहण्यासाठी तिने एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला आपल्या घरी ठेवून घेतले. कॉर्डिया पहाटे  तीन वाजता बाहेर पडत असे आणि दिवस उजाडता घरी परतत असे, जेणेकरून मुले जागी झाली की त्यांना आई दिसली पाहिजे. पण या सर्व धावपळीमुळे कॉर्डिया अक्षरश: रडकुंडीला येत असे.
‘या काळात मुलांच्या काळजीने, व्यवसायातील ताण-तणावामुळे मी रोज रडत असे, याची खरंच गरज आहे का असा विचारही माझ्या मनात कित्येकदा येत असे. पण मुलांच्या भविष्यासाठी मला थोडे कठोर होणे भाग होते,’ असे कॉर्डिया सांगते.
‘मुले थोडी मोठी झाल्यावर ही मुलगी दुसरीकडे शिक्षणासाठी निघून गेली. मुलांना घरी सांभाळणारे कोणी नसल्याने मी त्यांना     अनेकदा रेस्तराँमध्ये तसेच मीटिंग्जनाही सोबत घेऊन जात असे. माझी मुले मला रेस्तराँची लॉबी व रेस्टरूम धुवायला मदत करत.’
कॉर्डियाला पहिले रेस्तराँ चालवण्यात तिच्या मुलांनी खूप मदत केली होती. आपण ज्या हलाखीच्या परिस्थितीत आपले बालपण घालवले तसे आपल्या मुलांना घालवावे लागू नये यासाठी तिची धडपड होती आणि म्हणूनच आपला व्यवसाय अधिक वाढवण्याची तिची मनीषा होती.
आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने मग लवकरच तिने आणखी दोन ‘मॅकडोनाल्डस’ रेस्तराँ सुरू केले. ‘या काळात माझ्या सर्वागाला परफ्युमऐवजी फ्रेंच फ्राईजचाच घमघमाट येत असे’, असे ती विनोदाने सांगते.  
‘‘ज्या वेळी मी बेकरीचा व्यवसाय सुरू केला, त्या वेळी माझे तीन रेस्तराँ सुरू होते. त्या सोबतच माझी तीन मुले, अडीचशेहून अधिक कामगार माझ्या भरवशावर होते. त्या दरम्यान वर्षभरात मी १ लाख मैल एवढे ड्रायव्हिंग केले आहे. हे सारेच माझ्यासाठी फार सहज होते, सोपे होते असे मी अजिबात म्हणणार नाही. कित्येकदा मी मनातून कोलमडले, शरीराने थकले. पण कुठल्या तरी आंतरिक ऊर्जेने मला नेहमीच वाट दाखवली आणि मला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढले आहे’’, असे कॉर्डिया प्रामाणिकपणे सांगते.
याच दरम्यान कॉर्डियाला ‘मॅकडोनाल्डस’ने ‘बन’ कमिटीवर नियुक्त केले. माझे सहकारी मला ‘बन’ या शब्दावरून चिडवत असत! पण त्यांना आणि कदाचित मलाही कुठे ठाऊक होते की हाच शब्द मला कॉर्पोरेट जेटमधून विविध जगप्रसिद्ध बेकरींना भेटायला घेऊन जाणार आहे ते!
ती सांगते, ‘माझ्या खऱ्या प्रशिक्षणाची सुरुवात याच दरम्यान झाली. मला ग्वाटेमालाचे तीळ आणि रशियाचे पीठ याबद्दलचे बरेच ज्ञान मिळाले. इतर बेकऱ्यांच्या मनाने आपण अधिक क्षमतेने आणि वेगाने बन्स निर्माण करू शकू असा आत्मविश्वास माझ्यात बळावू लागला.’
हळूहळू ‘मॅकडोनाल्डस’च्या व्यवस्थापनाला तिच्या वेगवान आणि उत्कृष्ट बन्सची किती गरज आहे हे तिने पटवून दिले. अशा तऱ्हेने ‘टेनेसी बन कंपनी’ची सुरुवात १९९६ साली कॉर्डियाने केली. ही कंपनी आज हॅम  बर्गर्स आणि इंग्लिश मफिन्स जगभरातील सहाशेहून अधिक रेस्तराँना पुरवते. मिनिटाला हजार बन्स हा धडाकेबाज वेग आश्चर्यचकित करणारा आहे. आपल्या उत्पादनांना तितक्याच वेगाने अपेक्षित स्थळी पोहोचता यावे यासाठी आता कॉर्डिया इतर लॉजिस्टिक्स कंपन्यांवर अवलंबून नाही. ‘लेडी बन्स ट्रकिंग’ ही कंपनी तिने याकरता स्वत:च स्थापन केली. आता आपल्या उत्पादनांना जगभरात पोहोचवण्यासाठी कॉर्डियाने एक शिपिंग कंपनी स्थापन केली आहे. तसेच आपल्या उत्पादनांच्या निगराणीसाठी एक ‘कोल्ड स्टोरेज कंपनी’ही सुरू केली आहे. ‘टेनेसी बन’ला आंतरराष्ट्रीय ओळख आणि मान्यता मिळावी हेच कॉर्डियाचे स्वप्न आहे.
२००७ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी कॉर्डियाच्या कंपनीला भेट दिली आणि तिच्या बेकरीची एक सफर केली. अमेरिकेतील स्त्रियांच्या, सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या पहिल्या २५ कंपन्यांमध्ये कॉर्डियाच्या कंपनीचा समावेश असल्याने हा मान तिला मिळाला होता. नुकतेच तिला फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेच्या नशविले  गावाच्या बोर्डावरही नियुक्त केले गेले.
‘मिनी पर्ल कॅन्सर फाऊंडेशन’ बोर्डाचीही ती सदस्य आहे. १८ रोनाल्ड मॅकडोनाल्डस हाऊसेसला ती आर्थिक साहाय्यता करते, त्याचप्रमाणे चीनमधील ‘बेथेल’या अनाथाश्रमालाही तिची संपूर्ण मदत आहे. अत्यंत खडतर बालपण वाटय़ाला आलेल्या पण म्हणूनच कदाचित समृद्धीची आत्यंतिक आस असणाऱ्या आणि आपल्या ध्येयाकडे संपूर्ण क्षमतेनिशी कूच करणाऱ्या प्रामाणिक, कष्टाळू, कल्पक अशा कॉर्डियाचा जीवनपट म्हणजे खरी अमेरिकी यशोगाथा वाटते.   

Portfolio RATHMANI METALS AND TUBES LIMITED
माझा पोर्टफोलियो : ‘पोर्टफोलिओ’ला देई पोलादी ताकद ! रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड
Grill coriander garlic fish recipe in marathi
ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश; असा बनवा कुरकुरीत मसाला फिश फ्राय
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती