जगणं बदलताना : वस्त्रवलय वस्त्रवलय

‘‘सगळं समजतंय. कुणीतरी ‘स्टायलिस्ट’ नव्या फॅशनची लहर आणतो आणि तुम्ही वेडय़ा त्याच्या मागे जाता.

अपर्णा देशपांडे adaparnadeshpande@gmail.com
माणसाच्या बाहेरचं वलय किती झगझगीत, यावरून त्याची किंमत ठरवली जावी आणि हा शिरस्ताही नेहमीचाच व्हावा, इतकं  आता जगणं बदललं आहे. अशा वलयांमध्ये सर्वात महत्त्वाचं मानलं गेलं वस्त्रवलय. पेहराव फक्त नीटनेटकं  दिसण्याचा, आत्मविश्वासाचा भाग राहिले नाहीत. केवळ समारंभांसाठीच नव्हे, तर समाजमाध्यमांवरच्या प्रत्येक फोटो वा ‘रील’साठी नवीन पोशाख असावा, असा आग्रह रुजला. त्याबरोबर एक विचित्र संस्कृती बोकाळली- तीच ‘सगळ्यांनी बघितलंय’ संस्कृती.

करोनाच्या टाळेबंदीनंतर, खूप मोठय़ा काळानंतर काही अटींसहित काही मॉल्स उघडले आणि घशाला कोरड पडल्यावर हपापल्यासारखं पाणी प्यावं तसे लोक ‘रिव्हेंज शॉपिंग’ करत सुटले! बाजारातील गर्दी बघितली की कापरं भरतंय अंगात. अर्थात, आम्हीही त्याला अपवाद नव्हतो. आमच्या कन्येच्या मैत्रिणीचं लग्न काय ठरलं, तिची इतकी खरेदी सुरू झाली, की वाटलं आता जागतिक बँकेचं कर्ज काढायची वेळ येते की काय! तसं नाही म्हणायला याआधी दिवाळी किंवा महाविद्यालयाचं स्नेहसंमेलन, अशा  खर्चाच्या दृष्टीनं धडकी भरवणाऱ्या समारंभांसाठी खिसे रिकामे करून झाले होते; पण आताची बाब वेगळी होती.

हे बालमैत्रिणीचं लग्न होतं. ‘कध्धीच आणि कुण्णी कु ण्णीच न बघितलेले’ कपडे मुलीला हवे होते. कारण एका सणाला किंवा समारंभाला घातलेला ड्रेस, मग तो कितीही ‘भारी’ का असेना, एकदा त्याचे फोटो ‘इन्स्टाग्राम’ किंवा इतर ‘सो.मि.’ (सोशल मिडीया) वर टाकले, की यांच्या नजरेतून त्याची किंमत बरीच उतरलेली असते. म्हणजे कपडेखरेदी फक्त फोटो काढण्यासाठीच होते की काय अशी शंका यावी, इतकं त्या ‘इन्स्टा फोटो’ला किंवा ‘रील’ला

(व्हिडीओ) महत्त्व देतात हल्ली या मुली.

आता लगेच येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमासाठी हा घातलेला ड्रेस नाही चालणार, हा महान शोध बिचाऱ्या आईवडिलांना मुली किशोरवयीन झाल्या की आपोआप लागतोच. कारण त्या वयापासूनच वस्त्रवलयाचं आकर्षण वाटायला सुरुवात झालेली असते. अतिलाड, भरपूर वेळ आणि जड खिसा या  विनाशक घटकांनी मुलींची, हा ड्रेस ‘सगळ्यांनी बघितलाय’ (स.ब.) ही स्फोटक मानसिकता तयार होते.  अभ्यासाअंती, असंही आढळलं आहे, की मुलगे निदान  इतक्या मोठय़ा प्रमाणात या ‘स.ब.’ संघटनेचे  सभासद नसतात किंवा या बाबतीत इतके जास्त छळवादी नसतात. त्यांच्या पालकांच्या अडचणी तर वेगळ्याच आहेत. ‘कपडय़ांना घाणेरडा वास येतोय रे.. आता तरी हा अंगातला शर्ट धुवायला टाक!’ असं त्यांना ेसांगावं लागतंय!

तर या सुखासीन आयुष्य जगणाऱ्या, जगण्याची फारशी काळजी नसलेल्या  मुली साधारणत: थोडय़ा कळत्या वयाच्या झाल्या, की लगेच त्यांच्यात आपल्या दिसण्या आणि राहाण्याबद्दल प्रचंड सजगता येते आणि त्या ‘स.ब.’ संघटनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्यां होतात. नवीन ड्रेस घालून स्वछायाचित्र (सेल्फी) कशी, कोणत्या कोनातून काढायची, त्या वेळी तोंड किती वेडेवाकडं करायचं, ओठ ‘पप्पी घेतल्यासारखे’ ( हसू नका हो, ‘पाऊट’ म्हटलेलं चालतं, तर ‘पप्पी’ का नको ?) वीतभर पुढे आणायचे, असलं घातक तंत्रज्ञान यांना न शिकवता अवगत होतं. कधी कधी या कटात त्यांचा मातृवर्गदेखील सामील असतो. सेल्फी नको असेल, साधारण फोटो हवा असेल, तर बाबा जमातीला यात जबरदस्तीनं कामाला लावण्यात येतं.

या माताभगिनींना कसं समजत नाही, की प्रत्येक प्रसंगी नवा कोरा कपडा घालणं हे सोळा सोमवार सारखं व्रत नाहीये! आणि असले ‘चोचले’ (शब्द ‘टोचले’ असतील तर क्षमा असावी.) सांभाळायला आपण कु ठल्या राजाच्या घरात जन्म घेतलेला नाहीये! प्रसिद्धीसाठी नितनवीन कपडय़ांत विविध माध्यमांवर फोटो टाकले जातात, तिथे यांचे फोटो किती लोक बघतात? मागे मी एका लग्नाला गेले होते. एक ओळखीतली ललना शेजारी येऊन बसली.

‘‘बघितलंत का ते?’’ तिची नजर फुलपाखरासारखी भिरभिरत होती.

‘‘हो, छान आहे नाही नवरी मुलगी?’’ मी आपली बावळट! लग्नात नवरा-नवरीकडे नाही, इतरत्र बघत आजचा ‘फॅशन ट्रेंड’ अभ्यासायचा असतो, हे ज्ञान माझ्याकडे नव्हतं.

‘‘नवरी नाही हो! ती बघा ना मालिनी.. मागच्या ‘स्वयंवर हॉल’च्या लग्नातसुद्धा हीच साडी नेसली होती.’’ (यांच्या लक्षात बरं राहातं!.. इति मी मनात.) ‘‘नवरा इतकं रग्गड कमावतो, तरीही!’’

‘‘का बरं? एक साडी दुसऱ्यांदा नेसली तर जेवायला मिळत नाही की काय? मग तर मला अनेक समारंभांतून उपाशीच जावं लागेल.’’ माझ्या या खोचक उत्तरावर ती उठून निघूनच गेली बिचारी.

‘‘राणीच्या पार्टीसाठी एक नवीन ड्रेस घ्यावा लागेल मम्मा.’’ अशीच एक लाडावलेली कन्या उद्गारली.

‘‘आता पुन्हा? अगं, परवाच आणलायस ना तू? तो लांब, पायघोळ, महागडा..’’

‘‘तो सगळ्यांनी बघितलाय गं! तू पाहिलंस ना परवा.. प्रियांका चोप्रानं अ‍ॅवॉर्ड फंक्शनला घातलेला ड्रेस पुन्हा एका पार्टीला घातला, तर गॉसिप चॅनेलवर किती चर्चा झाली. एक चप्पलसुद्धा पुन्हा नाही वापरत त्या- दीपिका, आलिया वगैरे.’’

‘‘तू काय प्रियांका, दीपिका आहेस का? त्या ‘सेलिब्रिटी’ आहेत गं बाई. त्यांचं कामच आहे ते.’’

‘‘काय गं आई! तुला माहितेय का, ‘इन्स्टा’वर माझ्या फोटोला किती ‘लाईक्स’ आलेत. मग आम्ही पण आमच्या जगातले ‘सेलिब्रिटी’ होतो ना. तुला नाही कळणार ते.’’

‘‘सगळं समजतंय. कुणीतरी ‘स्टायलिस्ट’ नव्या फॅशनची लहर आणतो आणि तुम्ही वेडय़ा त्याच्या मागे जाता. आपण फक्त एक विद्यार्थी आहोत. आपलं संपूर्ण लक्ष स्वत:ला घडवण्याकडे असावं. आपल्या खिशाला हे चोचले परवडतात का? आपल्या शरीरावर ती वस्त्रं शोभतात का? त्याची खरंच आपल्याला गरज आहे का.. याचा विचारच नाही. खोटय़ा भपक्यात का जगता गं तुम्ही?’’

‘‘इट्स न्यू वर्ल्ड मॉम! रोज नवीन स्टाईल ‘डिझाइन’ होते. त्यासाठी सजग राहावं लागतं. तुम्हा लोकांना तो भपका वाटू शकतो, पण माझ्या मैत्रिणी कशा राहातात पाहतेस ना तू? प्रत्येक वेळी बाहेर पडताना नवीन कपडा असतो अंगावर. जितका तुमचा ‘स्टाईल सेन्स’ चांगला, तितकं तुम्हाला लोक ‘फॉलो’ करतात. आता यावर तू जास्त लेक्चर नको देऊस! ’’ म्हणत लेक हात झटकून निघून गेली. तिची आई विचार करत तिथेच बसली.

जगणं खरंच बदललंय, मान्य. पण अजून ज्यांचं करिअरदेखील झालेलं नाही, ज्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, तिथे अशा भ्रामक गोष्टींना का इतकं महत्त्व द्यावं? आता हे सगळं कसं आटोक्यात आणायचं? इतर पालकही आपल्या मुलींना अशी मोकळीक देतात.. मग आपण नेमकी काय भूमिका घ्यावी?.. आईच्या मनात प्रश्नच प्रश्न होते. तिच्या बंद मुठीतून थोडी वाळू निसटल्यासारखी वाटली तिला.

सध्या करोनामुळे अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरातून काम करत असल्यानं नव्या खरेदीला थोडाशी का होईना, खीळ बसली आहे. तरीही ‘सेल’च्या आमिषानं भरपूर होणारी आणि बहुतेक वेळा नंतर अनावश्यक ठरणारी ऑनलाइन खरेदी आहेच.

आधी म्हटलं, त्याप्रमाणे तुमचं ‘करिअर’च फॅ शनशी संबंधित असेल तर गोष्ट वेगळी. पण इथे मुद्दा ‘स.ब.’चा अर्थात के वळ सगळ्यांनी बघितलंय (किं वा बघून ‘बोअर’ झालंय) म्हणून प्रत्येक वेळी नवीन वस्तू खरेदी करत सुटण्याचा आहे. फॅ शन हा यातील सार्वत्रिक दिसणारा भाग असल्यानं अधोरेखित होतो. परंतु निष्कारण भारंभार घेतले जाणारे बूट, दर काही महिन्यांनी नवीन मॉडेल ‘लाँच’ झालं म्हणून बदलला जाणारा सुस्थितीतला मोबाइल, हेडफोन, अगदी दर काही वर्षांनी के वळ पत वाढली म्हणून बदलली जाणारी उत्तम चालणारी मोटार, यांचीही तीच गोष्ट! त्यामुळे ‘स.ब.’ संघटनेच्या सदस्य फक्त तरुण मुलीच असतात असा समज बाळगायचं काहीच कारण नाही.

एक गोष्ट मान्य करावी लागेल, की बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करताना काही मापदंड सांभाळणं गरजेचं आहे. व्यावसायिक जगात देहबोली, आत्मविश्वास आणि स्वत:तील कौशल्यं इतरांपुढे प्रभावीपणे मांडताना पेहरावही तसा असला पाहिजे हे मान्य. काही मोजके, पण नीटनेटके कपडे असणं आवश्यक आहे. तुम्ही जितक्या लवकर ते स्वीकारता, तितक्या लवकर  स्पर्धेच्या जगात आत्मविश्वासानं वावरता. पण केवळ आपल्या आर्थिक सुबत्तेचं प्रदर्शन म्हणून किं वा इतरांचा पाणउतारा करायचा किं वा इतरांना दाखवण्यासाठी म्हणून वस्त्रवलयाच्या मागे धावणं चुकीचं नाही का. ज्या अ‍ॅप्सवर फोटो टाकून मिरवता येतं, अशी काही अ‍ॅप जरी बंद केली, तरी फॅ शनच्या दिखाऊ वस्तूंवरचा खर्च सरळ अर्धा होईल.

छोटय़ा शहरातील सर्वसाधारण कुटुंबातील मुली शिकतात, शहरात मोठय़ा कंपन्यांत नोकरीला लागतात. आता घरची परिस्थिती थोडी बदलेल, म्हणत उत्साहानं कामाला लागतात. पण पहिल्या काही दिवसांतच त्यांना आजूबाजूला काम करणाऱ्या अत्यंत रेखीव, उंची वस्त्रं ल्यालेल्या संगमरवरी मूर्तीसारख्या तरुणी दिसतात. पायाच्या नखापासून ते माथ्यापर्यंत चकचकीत, आरस्पानी. रोज एक नवीन वस्त्र धारण करणाऱ्या. या मुली त्यांच्याशी नकळत तुलना करतात, हा चकचकाट जपण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात. ‘स्त्री आणि बाह्य़ सौंदर्य’ या विषयावर एक परिसंवाद ऐकलेला आठवतो. सौंदर्य प्रसाधनं, सौंदर्य वाढवणारी पार्लर्स या मुद्दय़ावर  एक मुलगी, पूर्वा तावातावानं बोलत होती. ‘‘मुलींनी किंवा स्त्रियांनी असं म्हणजे असंच दिसलं पाहिजे, ही नियमावली कुणी केली? शहरात साधारणत: २५ हजार रुपये महिना कमावणारी मुलगी स्वत:चा राहाण्या-जेवणाचा, जाण्यायेण्याचा, दोन-चार कपडय़ांचा खर्च करू शकते. थोडी रक्कम घरी पाठवू शकते. पण उठसूट भुवया कोरा, गरम मेण लावून हात-पाय भाजून घ्या, केस ‘इस्त्री’ करून या आणि जणू स्वत:ला गहाण ठेवून प्रसाधनं आणा, ही भलतीच पद्धत कुणी सुरू केली?  स्वच्छ, नीटनेटके, टापटीप कपडे घालावेत, इतकं पुरेसं नाही का? रोज एक नवीन कपडा घातला म्हणून हातातील काम लवकर आणि शिस्तीत होतं का? ज्ञानाचा महागडय़ा कपडय़ांशी काय संबंध? समाजातल्या महान व्यक्तींच्या साधेपणाकडे पाहून आपण काही शिकणार नाही का?’’ तिच्या तडफदार बोलण्यावर ते खूप टाळ्या पडल्या होत्या. पण प्रत्यक्षात अत्यंत यशस्वी, स्वत:ला सिद्ध के लेल्या किं वा संतपदाला पोहोचलेल्या काही व्यक्ती सोडल्यास  साधी राहाणी अमलात आणणाऱ्या सामान्य माणसाला बाजूला सारलं जातं, कमी लेखलं जातं, हा अनुभव आहे.  म्हणजे एक तर तुमच्याभोवती अत्युच्च ज्ञानाचं, यशाचं वलय असावं.. अन्यथा किमान वस्त्रांचं (जे फार काळ टिकत नाही) असं आहे का?

वस्त्रवलयाचं वाढतं महत्त्व आजच्या बदलत्या शहरी जीवनशैलीचा एक भाग आहे हे सत्य पचवायला जड वाटलं तरी ते आहे हे नक्की. फक्त ते वलय जपताना आपल्या सगळ्या मर्यादांचं भान असणं गरजेचं आहेच, पण त्याचबरोबरीनं बाह्य़ वलय जपताना त्याच्या आतला माणूस, त्याचं माणूसपण जपणं अधिक महत्त्वाचं.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jagna badaltana author aparna deshpande importance of clothes purposes and importance of clothing zws

ताज्या बातम्या