शहरातून गावाकडे..

 माझ्या घरातील लोकांना माझ्या या चळवळींविषयी काहीच माहितीच नव्हती

Indian social activist Chetna Sinha
दुष्काळग्रस्त भागातील असल्यामुळे विजय यांच्या आंदोलनासाठी सतत बैठका चालू असत.

म्हसवडला आल्यावर जाणवलं की आपण खूप व्यापक विचार करतो आहोत. समाजपरिवर्तनाचा लढा पुकारतो, बदल घडवायचा आहे, असं सांगतो पण रोजच्या जीवनात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे तर किती छोटे-छोटे प्रश्न असतात आणि ते त्यांचे हक्कही असतात. म्हणजे संडास असणे, ही स्त्रियांसाठी हक्काची गोष्ट आहे. त्याच्यासाठी लढा द्यावा लागावा? अशा परिस्थितीत काम करताना मी विचलित व्हायची. असं वाटायचं की आपण असं कसं काम करू शकणार? पण शेवटी मनाशी पक्कं केलं की हे रोजचे छोटे-छोटे प्रश्न आहेत ते सोडवता-सोडवताच खरी परिवर्तनाची लढाई उभी राहील. आणि यातूनच स्थापना झाली ती माणदेशी फाऊंडेशनची..’’

सांगताहेत माणदेश बँकेची स्थापना करून स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्यभान देणाऱ्या चेतना सिन्हा. त्यांचे सलग चार लेख.

पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांसाठी विशेषत: निम्न आर्थिक वर्गातील स्त्रियांमध्ये आर्थिक भान यावे, त्यांना उद्योगांसाठी कर्जे मिळावीत  यासाठी पहिली बँक काढणाऱ्या चेतना सिन्हा. या बँकेचे वैशिष्टय़ म्हणजे ती स्त्रियाच चालवतात. स्त्री-उद्योजिकांना आधारभूत ठरेल यासाठी त्यांनी ‘वूमन चेंबर ऑफ कॉमर्स’चीही स्थापना केली, त्याचबरोबरीने उद्योजकतेचे प्रशिक्षण देता यावे यासाठी या ग्रामीण स्त्रियांसाठी बिझनेस स्कूलचीही स्थापना त्यांनी केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच माणदेशीतील स्त्रिया आर्थिक स्वतंत्र झाल्या आहेत. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मुंबईमधून एम.कॉम.चे शिक्षण घेऊन  म्हसवडसारख्या ग्रामीण आणि दुष्काळी भागात येईन, अशी कल्पना मी कधीच केली नव्हती. माझे वडील मगनलाल खिमजी गाला यांचे नळबाजार-भेंडीबाजार भागात एक दुकान होते.  कुमकुमबेन आणि मगनलाल यांच्या कुटुंबात जन्मलेली मी तिसरी मुलगी. मुलगी म्हणून जन्माला आले असले तरी माझ्यावर तशी कुठलीही परंपरागत बंधने नव्हती. शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले. ‘मास्टर्स टय़ुटोरियल हायस्कूल’मधून शालेय शिक्षण पूर्ण करीत साधारण १९७५ मध्ये मी मुंबईच्या ‘लाला लजपतराय कॉलेज’मध्ये कॉमर्स शाखेत दाखल झाले.

योगायोगाने त्याच काळात इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली. त्याविरोधात देशभर सुरू झालेल्या चळवळीचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांच्याकडे आले. त्या वेळी अनेक विद्यार्थी संघटना त्यांच्या आंदोलनात जोडल्या गेल्या. त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन देशभरातील लक्षावधी युवक रस्त्यावर उतरले. मी त्यापैकीच एक होते. आणीबाणीविरोधी आंदोलनातून बांधल्या गेलेल्या संघटनेतून काही कायमस्वरूपी काम उभे राहावे, या उद्देशाने प्रेरित होऊन ग्रामीण भागात काम करण्याच्या दृष्टीने या गटाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली. आंदोलनामध्ये वेगळ्या प्रकारचा जोश होता. देश बदलायचा होता. त्या वेळी असेही म्हटले जायचे की बदल घडवायचा असेल तर गावाकडे वळले पाहिजे. त्या वेळी आम्ही तरुणवर्ग खूपच तडफदार होतो, सर्वामध्ये बदल घडवून आणण्याचा जोश होता आणि तो मुंबईत राहून होणार नव्हता. त्यासाठी ग्रामीण भागात काम उभे राहिले पाहिजे, या जिद्दीतून माझे लक्ष ग्रामीण भागाकडे वेधले गेले.

महाराष्ट्रामध्ये नामांतरची चळवळ सुरू होती. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायला पाहिजे म्हणून ती चळवळ होती आणि संपूर्ण महाराष्ट्रात जेवढय़ा तरुण संघटना होत्या त्या सर्व या चळवळीत सामील झाल्या होत्या आणि त्यातच ‘संघर्षवाहिनी’देखील होती. मी या ‘संघर्षवाहिनी’तर्फे चळवळीत सामील झाले. मलाही तुरुंगामध्ये जायला लागले. महाराष्ट्रात निरनिराळे कार्यक्रम संघर्ष वाहिनीद्वारा राबविले जायचे, त्यात माण तालुक्यात रोजगार हमी योजनेमध्ये लोकांना काम मिळायला पाहिजे यासाठी चळवळ चालू होती. या आंदोलनामध्ये विजय गुरव नावाच्या तरुणाचादेखील सक्रिय सहभाग असे. साऱ्या आंदोलनात हा तरुण अग्रभागी असे. असेच एकदा एका नियतकालिकाने छापलेल्या बातमीमध्ये का कोण जाणे पण विजयचे नाव विजय सिन्हा असे छापले. खरे तर त्या काळात हे कार्यकत्रे आपली आडनावे फारशी लावतच नसत. पण त्या बातमीदाराने विजय गुरव याऐवजी सिन्हा लावले. चुकून आलेले नाव त्यांना कायमचे चिकटले. याच काळात माझा आणि विजय यांचा परिचय झाला आणि दोघांच्याही आयुष्याची वाट एकच आहे हे लक्षात आले. विजय सातारा जिल्हय़ातील, माण तालुकामधील म्हसवड गावामधील रहिवासी होते. म्हसवडची ओळख माणदेश अशी आहे. माण हे कोणा जागेचे नाव नसून नदीचे नाव आहे. इथे पाऊस खूप कमी पडतो त्यामुळे बाराही महिने ही नदी कोरडीच असते. येथील अधिकतर शेळ्या-मेंढय़ा पाळणारे लोक चारा-पाण्याच्या शोधात स्थलांतर करतात. हा जो माणदेशी इलाका आहे, तेथील लोक अभिमानानं म्हणतात, ‘आम्ही माणदेशी माणसं.’

दुष्काळग्रस्त भागातील असल्यामुळे विजय यांच्या आंदोलनासाठी सतत बैठका चालू असत. आंदोलनासाठी महिला कार्यकर्त्यांची गरज पडायची. कारण स्थलांतरामुळे अधिकतर स्त्रिया रोजगार हमीच्या कामावर गेलेल्या असायच्या. म्हणून विजय नेहमी संघर्ष वाहिनीला विनंती करायचे की, महिला कार्यकर्त्यां पाठवून द्या. याच निमित्ताने मला सातारा जिल्हय़ातील म्हसवड येथे जाण्याचा योग आला. रोजगार हमीची कामे इथल्या महिलांना मिळावीत, वेळेवर पगार मिळावेत, यासाठी आंदोलन सुरू होते त्यात माझीही भूमिका वाढत गेली. महिला कार्यकर्ती म्हणून या महिलांशी संपर्क वाढत गेला तसा माझा विजय सिन्हांशीही संपर्क वाढला. विजय पाणीप्रश्नावरदेखील लढा द्यायचे, त्यात मीपण सहभागी असायचे. माझी दुहेरी भूमिका सुरू झाली. एका बाजूला आंदोलनामध्ये सहभागी होत होते तर दुसऱ्या बाजूला मुंबई विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षणही सुरू होतेच.

६ डिसेंबरला झालेल्या नामांतरविरोधी चळवळीत मला आयुष्यात पहिल्यांदा अटक झाली. आंदोलनामध्ये भाग घेणं आणि अटक होणं हे व्यक्तिगत माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. एका बाजूला मला ज्या वेळेला अटक झाली त्या वेळेला बऱ्याच महिला महाराष्ट्रातून आणि संघर्षवाहिनीतून आल्या होत्या. आम्ही येरवडा जेलमध्ये होतो याचा आम्हाला अभिमान वाटायचा, असं वाटायचं की सुरुवातीला आम्हाला राजकीय कैदी म्हणून वागणूक द्यावी म्हणजे तुरुंगामध्ये तुम्हाला गुन्हेगारी करणाऱ्या लोकांबरोबर ठेवले जात नाही हे एक आणि दुसरं तुम्हाला सकाळचा जो नाश्ता मिळतो त्याच्यात ब्रेड-बटर आणि चहा मिळायचा. साधारणपणे बाकीच्या कैद्यांना कांजी मिळते. सर्वात मोठा फरक तुम्हाला स्वतंत्र बॅरेगेटस, खोल्यांमध्ये ठेवले जाते. आम्ही जवळजवळ ४० संघर्ष वाहिनीचे लोक, युवक क्रांती दल, राष्ट्रीय सेवा दल वगैरे संघटनाचे लोक येरवडा तुरुंगात होतो. आतमध्ये आम्ही कार्यशाळा घ्यायचो, चर्चासत्र आयोजित करायचो, पुस्तके मागवायचो. त्या दरम्यान आम्ही खूप पुस्तकं वाचली व आम्हाला दर बुधवारी तुरुंगमधील पुरुषांना भेटायला संधी मिळायची. या भेटीदरम्यान आम्ही तुरुंगामध्ये काय करतो याची चर्चा व्हायची. अटक झालेले लोक तर तुरुंगामध्येही आंदोलन करायचे. त्या दिवसांत मी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आणि चळवळीतील नेत्यांचा, आणीबाणीतल्या नेत्यांचा भरपूर अभ्यास केला. याव्यतिरिक्त आम्ही खूप खेळायचोदेखील. या तुरुंगात मौजमजा, खेळ हा अनोखा अनुभव आम्ही सर्वानी अनुभवला.

माझ्या घरातील लोकांना माझ्या या चळवळींविषयी काहीच माहितीच नव्हती. आणि अर्थात मलाही अंदाज नव्हता की याचा परिणाम माझ्या अटक होण्यापर्यंत होईल. मी घरातल्यांना पत्र लिहून पाठवले. थेट येरवडा तुरुंगामधून पत्र आलेले पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. तोपर्यंत मला अटक झालीय याचीही त्यांना कल्पना नव्हती. घरी परतल्यावर मी आईशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. घरातल्यांना सगळं ऐकून माझं कौतुकही वाटत होतं पण त्याच वेळी मी मुलगी असल्याने त्याचीही भीती होती. मुलीनं हे करावं का? तिच्या लग्नात यामुळे अडथळा तर येणार नाही ना? माझ्या काळजीपोटी अशा अनेकविध चर्चा घरात चालायच्या. मात्र माझे वडील उदारमतवादी होते. ते नेहमी सांगायचे की, ‘‘या गोष्टी सोप्या नाहीत, तुला खूप आव्हाने पेलावी लागतील, तुझी इच्छा असेल तर तू कर, मी तुला थांबवणार नाही.’’ आणि त्यांनी कधीच अडवले नाही व त्यांच्यामुळे हा प्रवास सोपा झाला. पण त्यामुळे हेही लक्षात आले की, आमच्या काळात तरुणांवर करियरचा ताणही नव्हता, जेवढा तो आता आहे. हा ताण पालकांकडून नव्हे तर समाजव्यवस्थेमधून येत असतो. समाजाचीच व्यवस्था अशी असते की, तुम्हाला चांगली नोकरी नसेल तर तुम्हाला कोणीही किंमत देत नाही. त्यातून हा ताण निर्माण होतो. मी त्या वेळी या नोकरीच्या घोडदौडीमध्ये सामील नव्हते, आमचे तरुणपण चळवळीत भाग घेणे, समाजपरिवर्तन करणे, साहित्य वाचणे अशा वातावरणामध्ये गेले, ज्याला आजची तरुण पिढी मुकते आहे, याची मला खंत आहे.

मी आणि विजय सतत चळवळीत सक्रिय असल्यामुळे, संपर्क वाढला आणि मी लग्न करून म्हसवडला राहायला आले. मी जेव्हा विजयच्या घरी गेले तेव्हा दुसऱ्या दिवशी मला संडासला जायचे होते. मी विजयला विचारले, ‘‘मला टॉयलेटला जायचे आहे.’’ विजयने सांगितले, ‘‘मागे, म्हणजे खुल्यावर जावं लागेल.’’ बरोबर काठी घेऊन जायला सांगितले.’’ मी विचारलं, ‘‘का?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘डुक्कर आदी प्राणी असतात.’’  त्या क्षणी मला वाटले मी जी आंदोलनाची भाषा बोलते, ती पुस्तकातच बरी आहे. सत्य तर हे आहे की गावच्या बायकांना संडासासाठी उघडय़ावर जावे लागते. खरं पाहिलं तर, आपल्याला सर्वात जास्त मोटारसायकल आणि चारचाकी गाडय़ा माण तालुक्यातच दिसतील. पण गावातल्या स्त्रियांना मात्र शौचास उघडय़ावर बसावे लागते. समाजपरिवर्तन करायचे, संपूर्ण क्रांती घडवून आणायची हे सगळं पुस्तकी ज्ञान वाटायला लागलं. वास्तव परिस्थिती अशी समोर आल्यावर माझं पहिलं आंदोलन उभं राहिलं, स्त्रियांना गावामध्ये शौचालय पाहिजे, या कारणासाठी मी उपोषण केलं.

वाटलं, आपण खूप व्यापक विचार करतो आहोत. समाजपरिवर्तनाचा लढा पुकारतो, बदल घडवायचा आहे, असं सांगतो पण रोजच्या जीवनात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे तर किती छोटे-छोटे प्रश्न असतात आणि ते त्यांचे हक्कही असतात. म्हणजे संडास असणे, ही महिलांसाठी हक्काची गोष्ट आहे. ती खरं तर प्रत्येक मनुष्याची मूलभूत गरज आहे. तरी त्याच्यासाठी लढा द्यावा लागावा? आजआठवून हसू येतं की, मुंबईहून ग्रामीण भागात मी आले ती संपूर्ण क्रांती करायला आणि इथे माझ्याच दररोजच्या जीवनात संघर्ष निर्माण झाला. बस वेळेवर येत नाही, बससाठी तीन-तीन तास उभं राहायला लागतं. दोन-दोन दिवस वीज, लाइट नाही. इथे मुंबईत लोकल ट्रेन काही मिनिटं उशिरा आली की वाटतं आपला अख्खा दिवस खराब गेला. आणि इथे म्हसवडला येऊन, बस तीन तास येत नाही म्हणून दुसऱ्याच गावात मुक्कामाची वेळ येते. अशा परिस्थितीत काम करताना मी विचलित व्हायचे. असं वाटायचं की आपण असं कसं काम करू शकणार? पण परत वाटायचं, या गावातील सगळे लोक तसेच राहतात ना, पण ते विचलित होत नाहीत. तेव्हा मी मनाशी पक्कं केलं की हे रोजचे छोटे-छोटे प्रश्न आहेत ते सोडवता-सोडवताच खरी परिवर्तनाची लढाई उभी राहील. आणि यातूनच स्थापना झाली ती माणदेशी फाऊंडेशनची..

चेतना सिन्हा  chetna@manndeshi.org.in

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कार्यकर्त्यांच्या नजरेतून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian social activist chetna sinha article on rural women empowerment