टॉमबॉय मनीषा, मुलांचेच खेळ खेळण्यात तिला रस. संक्रांत आली की पंतग उडवण्यापेक्षा काटाकाटी करत तो मिळवणं यातच तिला रस. पण लग्न झालं आणि तिच्यातला तो स्वच्छंदीपणा संपलाच. आणि शेवटी तर ..
जानेवारी महिन्यातल्या संक्रांतीचा दिवस उजाडला आणि रंगीबेरंगी विविध आकाराच्या पतंगांनी आकाशात गर्दी केली की तिची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. बरीच वर्षे झाली आता त्या घटनेला. काटलेले पतंग पकडण्यासाठी हातात भल्या मोठय़ा काठय़ा सांभाळत धावणारी मुलं आणि पतंग पकडण्यासाठी उडालेली धुमश्चक्री पाहिली की अजूनही वाटतं कुठूनतरी शीळ घातली जाईल आणि हातातला पतंग उंचावत ती खुणावेल, ‘ये, पतंग पकडलाय, तुझ्यासाठी!’
खरं तर ती माझ्या मित्राची बहीण आणि माझ्या बहिणीची मैत्रीण. पण आपल्या भावाचा मित्र आणि मैत्रिणीचा भाऊ म्हणजे आपलाही तो भाऊच असं मानण्याचे ते दिवस होते. आमच्या भागात पतंग उडविणारे आणि त्यातही रस्त्यावर मारामाऱ्या करत पतंग पकडणाऱ्यांची संख्या जास्त होती. एक दिवस भरदुपारी अचानक गलका झाला आणि मी घराच्या गॅलरीत धावलो. आमच्या गॅलरीतून संपूर्ण रस्ता दिसत असे. रस्त्यावर दोन-चार लांब काठय़ा घेऊन १०-१२ मुले एक पतंग पकडण्यासाठी झुंजत होती आणि इतक्यात एका उंच मुलाने उंचीचा फायदा घेत पतंग पकडला. इतरांनी तो फाडू नये यासाठी आपला हात उंच धरत त्याने आमच्या घराच्या दिशेने नजर टाकली आणि शिटी मारत मला हात दाखवला. ‘काय वाह्य़ात पोरं आहेत. चल अभ्यासाला बस’ म्हणत मातोश्री करवादल्या आणि अस्मादिक आतमध्ये वळले.
थोडय़ाच वेळात आमच्या घराची बेल वाजली. दरवाजात तोच ‘मुलगा’ उभा होता. मुलगा कसला ती मनीषा होती. हातात तो पंतग आणि तो आपण पकडलाय याचा भरगच्च आनंद चेहऱ्यावर, ‘काय रे, इतका हात करतेय, जरा हात हलवला असतास तर काय बिघडलं असतं का?’ तिनं तोफ डागली. लांब हाताचा शर्ट बाह्य़ा दुमडून घातलेला आणि हाफ पॅण्ट. केस चक्क बॉबकट केलेले. पतंग पकडताना झालेल्या धुमश्चक्रीमध्ये पार शर्ट चुरगळून थोडी अंगाला माती लागलेली. एक ध्यानच दिसत होती ती. तसं त्यांच्या घरातही मोकळं वातावरण होतं. दोन भाऊ आणि एक बहीण असलेल्या मनीषाला लहानपणापासूनच टॉमबॉय म्हणून वावरायला आवडायचं. शाळेतल्या कब्बडीच्या संघात असणारी मनीषा तशी मुलांचेच खेळ जास्त खेळायची. तिला सात वेगवेगळ्या प्रकारच्या शिटय़ा वाजवायला यायच्या. शाळेतल्या तिच्या वर्गातल्या सगळ्या मैत्रिणींना तिचा हेवा वाटायचा कारण ती कोणत्याही वेळी बिनधास्तपणे कुठेही फिरायची. तिला भीती कधी वाटलीच नाही. मनीषामध्ये आणखी एक गुण होता आणि तो म्हणजे ती कोणत्याही प्राण्याला माणसाळवायची. रस्त्यातले भटके कुत्रे हे तिचे जीवाभावाचे सोबतीच असायचे. कायम बरोबर असणारे.  
कोणाशीही पटकन मैत्री करणारी आणि प्रत्येकाला मदतीचा हात देणारी मनीषा अभ्यासातही हुशार होती. मुलांबरोबर गोटय़ा, पतंग आणि क्रिकेट खेळणारी आणि त्यांच्याशी प्रसंगी झगडून, भांडून तरीही त्यांना आपलेसे करून घेणारी मनीषा प्रत्येकाला आपली जीवाभावाची मैत्रीण, बहीण वाटत होती. मनीषाची मोठी बहीण तशी शांत होतीच, पण तिचे दोन्ही भाऊदेखील मीतभाषीच होते. त्यांच्यात असलेली अभ्यासातली हुशारी तिच्यात असली तरी पहिल्या दहात येणं तिला कधीच जमलं नाही. कलासक्त असलेली मनीषा दहावीनंतर जे.जे. स्कूल ऑफ आर्टला गेली नसती तरच नवल होते! शाळेत असताना कायम बहिणीकडे येणारी मनीषा नंतर महाविद्यालयीन वातावरणात रुळली आणि हळूहळू तिचं येणं कमी झालं. मात्र कधीही घरी आली की संपूर्ण घराचा ताबा घेत वेगवेगळे किस्से सांगत सर्वाना मनमुराद हसवून एखाद्या वावटळीसारखी निघून जायची. स्वत:चा छाप सोडून!
 मनीषाचा प्रेमविवाह झाला. अर्थात ते स्वाभाविक होते म्हणून कोणाला आश्चर्य वाटले नाही. मात्र त्यानंतर जे काही कानावर येत गेलं ते मात्र तिच्या स्वभावाच्या पूर्णत: विरोधातलं होतं. तिचा नवरा आखातामध्ये नोकरीस होता आणि मनीषा आपल्या सासरी. तिच्या सासरच्या मंडळींना तिचा मोकळा स्वभाव आवडत नव्हता की काय माहीत नाही. पण त्यांच्याकडून तिला खूप त्रास सुरू झाला. तिच्या सगळ्याच गोष्टींवर बंधनं आली. तिला मारझोड व्हायची म्हणतात. टॉमबॉय असणारी मनीषा हळूहळू  घरातून बाहेर पडायलाही घाबरू लागली.
एकदोनदा तर सासरच्या मंडळींनी तिला भररात्री घरातून बाहेर काढलं. अंधाराला घाबरून तिनं इमारतीच्या गच्चीचा आधार घेतला. या तिच्या एकटेपणाला साथ होती ती इमारतीतल्या आत्तापर्यंतच्या तिच्या मित्र बनलेल्या कुत्र्यांची. त्यांना ते कसं क ळायचं कुणास ठाऊक!
मी मनीषाला शेवटचं पाहिलं तेव्हा ती अचेतन होती. दोन वेळा आपल्या नवऱ्याकडे ती जाऊन आली होती. पहिल्यांदा जाऊन आली तेव्हा ती प्रचंड खूश होती. पण दुसऱ्यांदा गेल्यावर परतली ती दुसऱ्यांच्या खांद्यावरूनच! कोणी म्हणतात तिने आत्महत्या केली, कोणी म्हणे तिची हत्या झाली. खरं कारण कोणालाच कळलं नाही. पण जिच्या आयुष्यात वेगवेगळ्या रंगांची उधळण होती तिच्या आयुष्यात केवळ काळाच रंग का उरला हे कोणीच सांगू शकलं नाही.
 आजही आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून येतं तेव्हा तिची आठवण मनावर पुन्हा अशीच तरंगू लागते आणि वाटतं, कुठूनतरी शीळ येईल, कोणीतरी हात उंचावून हातातला पतंग दाखवेल आणि खुणावेल, ‘ये, पतंग पकडलाय, तुझ्यासाठी!’