उंधियूची भाजी ज्या कंदाशिवाय पूर्ण होत नाही तो कंद म्हणजे कोनफळ. बाहेरून साधारण सुरणासारखं दिसणारं पण आतून जांभळ्या रंगाचं हे कोनफळ पौष्टिक तर आहेच शिवाय चवदार आणि पोटभरीचं आहे. कोनफळात पचनाला आवश्यक असं फायबर, क आणि ब6 जीवनसत्व, पोटॅशियम, िझक, मॅग्नेशियम आणि बिटा कॅरोटिन आहे. कोनफळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलोस्टोरॉल कमी होण्यास मदत होते, शरीरातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
कोनफळाची साल काढून किसलं तर कीस अतिशय बुळबुळीत होतो पण तो कीस शिजला किंवा कोनफळ उकडलं की बुळबुळीतपणा नावालाही राहात नाही.
कंद-चीज पॅनकेक
साहित्य पाव किलो कंद, पाव वाटी चीज, प्रत्येकी अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि जिरं, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीला मीठ, तिखट, तेल.
कृती – कंदाची साल काढून तो किसावा. किसात मीठ, तिखट, दाण्याचं कूट, जिरं घालवून कालवावं, तव्यावर चमचाभर तेल टाकून त्यावर हा कीस पातळ पसरावा एक बाजू झाल्यावर पॅनकेक उलटावा. वर चीज आणि हिरवी मिरची पसरावी आणि एक मिनिट झाकण ठेवावं. चीज वितळलं की पॅनकेक काढावा आणि गरम खावा.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com