रोजच्या जगण्यात अनेक प्रश्न पडतात, समस्या येतात, अपयश येतं, दु:खं येतं; त्याने माणूस निराश होऊन जातो. विवेक की भावना असा प्रश्नही अनेकदा जगण्याला ब्रेक लावतो. मग संघर्ष सुरू होतो. काय खरं काय खोटं कळेनासं होतं. अशा वेळी मदतीला येतात विचारवंत , सम्यक विचारांची माणसं. जे त्यांच्या अभ्यासातून, अनुभवातून विलक्षण आत्मभान देतात. या सदरातून अशाच नामवंत व्यक्तींचे विचार वाचायला मिळतील दर शनिवारी..

प्रिय ओशो,

सध्या माझ्या मनात संघर्ष चालू आहे. एका बाजूला मी इतरांबरोबर पुरेशा स्पष्टपणानं आणि हुशारीनं व्यवहार करतो. आणि दुसऱ्या बाजूनं अत्यंत भावनाशील नि:संदिग्ध, धूसर आणि बेसावधपणे अशी वागणूक होते.. परंतु तीच माझी वागणूक मला खरी वाटते.. मी माझ्या मनाशी खूणगाठ बांधतो की पूर्ण सत्यानं वागायचं आणि नंतर मी गोंधळात पडतो. ध्यानधारणेमुळे पटकन माझं दडपण निघून जातं.. परंतु मुळातून मार्ग सापडत नाही. असं आहे का.. की स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टी मला नकोच आहेत?

प्रेमतरंगा..

तुला ज्या अडचणींशी सामना करावा लागतोय तो जवळजवळ प्रत्येकाला करावा लागतो, कारण माणूस जन्माला येताना इतर प्राण्यांसारखा पूर्ण विकसित स्वरूपात येत नाही. कुत्रा हा पूर्ण विकसित असतो, कोणतीही नवी गोष्ट त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीही भर टाकत नाही. त्याचं मूळ व्यक्तिमत्त्व जसं असतं तसंच राहतं. सिंह हा सिंहच राहतो. तो जगतो सिंह म्हणून मरतोही सिंह म्हणून. फक्त मनुष्यप्राणी हा अनेक शक्यता घेऊन जन्माला येतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला विविध कंगोरे निर्माण होऊन.. खूप निरनिराळ्या स्तरांवर त्याचा विकास होत असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे सारे दरवाजे उघडे असतात.. त्याच्याकडे  जबरदस्त गुणवत्ता असते. अर्थात ती नि:संदिग्ध असते. माणूस या प्राण्याला पूर्णत्व नाही. मनुष्यासारखा सृष्टीतील उच्च दर्जाच्या प्राणिमात्राला पूर्णत्व नसणं.. तो अपूर्ण असणं ही खरं पाहता गोंधळात टाकणारी परिस्थिती आहे. परंतु ही गोष्ट एका अर्थानं विशेष आहे. कारण अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये जन्माला येऊन नंतर वाढ होताना क्रांतिकारी परिवर्तन होण्यासाठी निसर्गानं त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. अगदी गाभ्यामध्ये ज्या गोष्टी उत्कट इच्छा असेल, त्याप्रमाणे तो आपला विकास करू शकतो..

अर्थात यामध्ये अडचणीही येतात. कारण आपल्या प्रारब्धात पुढे काय आहे याविषयी तो अज्ञानी असतो. स्वत:चं भविष्य तो सांगू शकत नाही. त्याचा सगळा प्रवास अज्ञातात चाललेला असतो.. चांगलं ते मिळवावं या आशेनं तो जीवन जगत असतो परंतु खात्री कोणीतच देता येत नाही. त्यामुळे मनात सतत भीती! हे करावं का करू नये!.. तुमचं ध्येय तुम्ही गाठू शकाल? का मृत्यूला सामोरे जाल?.. तुम्ही चालत असलेला मार्ग योग्य आहे का नाही? अशा अनेक प्रश्नांच्या जंजाळात मार्गक्रमणा करावी लागते. तुम्ही कोणत्याच गोष्टीची खात्री देऊ शकत नाही. यामुळे अनेक अडचणींशी सामना करावा लागतो.. मंडळी दुसऱ्याचं अनुकरण करायला लागतात. कारण तो मार्ग सोपा असतो. प्रत्येकजण एका विशिष्ट मार्गावरून चालत असतो आणि ‘जमाव हा महामार्गावरून चालत असतो.’ जमावाबरोबर राहणं माणूस जास्त पसंत करतो कारण त्यामुळे एकटं असणं टाळता येतं – आणि मनामध्ये एक प्रकारची अशी भावना असते की एवढे सगळे लोक चुकीच्या मार्गावरून जाणार नाहीत.. एखादा चूक करू शकतो, पण एवढे लोक कशी काय चूक करतील.. या भावनेनं माणूस हजारोंच्या गर्दीत सामील होत असतो.. परंतु ही भावना फार विचित्र आहे. कारण उलटपक्षी गर्दी ही नेहमीच चुकीचं वागत असते.

कारण त्यातल्या प्रत्येक मनुष्याचं स्वतंत्र व्यक्तित्व आणि स्वतंत्र भविष्य असतं. गर्दीला असं कोणतंच प्रारब्ध नसतं. म्हणूनच ज्या ज्या वेळी तुम्ही गर्दीबरोबर मार्ग चालत असता त्या वेळी तुम्ही आत्महत्येच्या मार्गानं चालत असता.

ज्याक्षणी तुम्ही ख्रिश्चन म्हणून जन्माला येता, हिंदू म्हणून जन्माला येता, मुसलमान म्हणून जन्माला येता त्या क्षणापासून तुमचं स्वत्व संपुष्टात येत असतं. तुमच्या अस्तित्वाचा स्वतंत्र मार्ग संपलेला असतो. आता कोणत्याही आशेला जागा उरलेली नसते. आता जास्तीतजास्त तुम्ही एक सुंदर नक्कल म्हणून जीवन जगता.. तुमचं मूळ स्वरूप म्हणून, तुमचं अस्तित्व केव्हाच संपतं – आणि अस्सलपणा नसेल तर समाधान मिळत नाही, सुख लाभत नाही, आनंद नाही, साफल्य नाही. जीवनाचा उत्साह वाटत नाही, अर्थपूर्णता नाही. काहीच नाही. उलट नैराश्य, चिंता, कंटाळवाणेपणा – अर्थशून्यता, घुसमटलेपण यांनी आपण ग्रासून जातो. अर्थात लाखो लोकांच्या बाबतीत हेच घडत असतं, कारण त्यांचं मन म्हणजे साध्या गणितासारखं असतं. त्यामुळेच गर्दीमध्ये हजारोंच्याबरोबर सामील होण्यापेक्षा स्वत:चा स्वतंत्र एक मार्ग निवडा. अर्थातच फारच थोडय़ा मंडळींना हे जमलेलं आहे. ज्यांचा स्वत:च्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे, ज्यांचा जीवनावर विश्वास आहे, प्रकृतीवर विश्वास आहे, तेच लोक सखोल विश्वासाच्या आधारावर आपला स्वत:चा मार्ग निवडू शकतात आणि त्यावरून मार्गक्रमणा करतात. स्वत:च्या बुद्धिमत्तेवर जितका तुम्ही भरवसा ठेवाल तितकी ती आणखीन बहरून येईल. समूहामध्ये, गर्दीमध्ये बुद्धिमत्तेचा काहीही उपयोग नाही. उलटपक्षी गर्दीमध्ये बुद्धिमत्ता असणं हे धोकादायकच आहे. कारण गर्दीला बुद्धिमान लोक कधीच नको असतात. गर्दीला फक्त आंधळा विश्वास ठेवणारी मंडळी हवी असतात. गर्दीशी प्रामाणिक राहणारी मंडळी हवी असतात. सत्तेला, देशाला, स्पर्धेला प्रामाणिक असलेली मंडळी हवी असतात. स्वत:शी प्रामाणिक असणं नको असतं. हा सगळा प्रामाणिकपणा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गुलामीची ती सुंदर नावं आहेत. आणि गुलाम असलेला मनुष्य स्वत:चं भविष्य कधीच घडवू शकत नाही. हे तर त्रिकालाबाधित सत्य.. तुम्हाला स्वतंत्रपणे जगायचंय का तर मग तुमचं पहिलं पाऊल स्वातंत्र्याच्या वातावरणात पडलं पाहिजे, शेवटचं पाऊलसुद्धा स्वातंत्र्यात पडलं पाहिजे आणि पहिलं पाऊल स्वातंत्र्यात असेल तर शेवटचं पाऊल स्वातंत्र्यात पडू शकेल. परंतु तुमचं पहिलं पाऊलच जर का गुलामीत असेल तर शेवटचं पाऊल फक्त गुलामीतच असणार हे उघड आहे. सध्या माझ्या मनात संघर्ष चालू आहे. असं तू म्हणतोस. कुठला संघर्ष.. हा संघर्ष आदर्शामधला संघर्ष आहे, नीतिमत्तेमधला संघर्ष आहे. हा मार्ग स्वीकारावा का तो मार्ग धरावा. हे करावं का ते करावं संघर्ष याचा अर्थ कोणतीतरी  गोष्ट तुला ‘निवडायची’ आहे. आणि जोपर्यंत तुझं ‘निवड करणं’ संपत नाही तोपर्यंत तुझ्या मनातला संघर्ष तसाच राहणार. निवड न करता जागरूक राहणं याविषयी मी तुला काही मार्ग शिकवतो.. निवड करणं सोडून दे.. बघ संघर्ष संपतो का नाही! उत्स्फूर्तपणे जगायला प्रारंभ कर, भविष्याबद्दल फार विचार करू नको.. असं वागण्यानंच नैराश्य येणार नाही, अपयशाचं दु:ख होणार नाही. या सर्व भावना केव्हा येतात? तर तू काहीतरी विशिष्ट गोष्टींचा आग्रह धरून ठरवतोस की जी गोष्ट तुझ्या कधीच हातात नसते. कारण भविष्य कुणाच्याच हातात नसतं. पूर्वीची म्हण होती. ‘माणूस ठरवतो आणि दैव ते उधळून देतं!’ तिथं कोणीही देव किंवा दैव उधळून देणारं नसतं. प्रत्यक्षात उधळून देणारे तुम्ही स्वत: असता. कसे? तर जे अज्ञातात आहे त्याला निश्चित स्वरूप तुम्ही द्यायला बघता. जीवनाचा वाहता प्रवाह गोठवून देऊन त्याचं बर्फाचं डबकं करायला बघता.

तुम्ही जर निवडविरहित आयुष्य जगायचं ठरवलंत, उत्स्फूर्तपणे जगायला सुरुवात केलीत, जीवनाचा क्षण न् क्षण आनंद घ्यायला सुरुवात केलीत, समोर उभ्या ठाकणाऱ्या प्रत्येक गोष्टीला योग्य तो प्रतिसाद दिलात तर तुमच्या  विकासाचं अंतर तुम्ही वेगानं पार कराल. एक क्षणही तुम्ही निराश होणार नाही. येणारा प्रत्येक क्षण जास्तीचा आनंद आणि साफल्य प्राप्त करून देणारा ठरेल. नैराश्य येण्याऐवजी तुम्हाला प्रकृतीविषयी कृतज्ञताच वाटेल.. ‘‘प्रकृती दयाळूपणानं प्रत्येक क्षणाला मला नवीन संधी देते आहे की ज्यामुळे मी चांगल्या पद्धतीनं माझा विकास करू शकतोय. नवीन अनुभव घेऊ शकतोय, नवीन काहीतरी शोधू शकतोय.’’

नेहमी तुम्ही करता काय? तर समोर एखादा विशिष्ट आदर्श ठेवून त्याप्रमाणे वागण्यासाठी स्वत:चं आयुष्य आखून घेता. खरं म्हणजे भविष्यात अपयश पदरी येणारं असतं. प्रत्येक पायरीवर तुमच्या दृष्टीसमोरच्या गोष्टी या पाहिजे तशा घडत नसतात.. आणि मग अंती नैराश्य पदरी पडतं. मनातला संघर्ष वाढत वाढत जातो. प्रत्येक पाऊल टाकताना तुम्ही विचार करता की हे टाकू का नको.. अशा गोंधळाच्या अवस्थेमुळे तुमचं प्रत्येक पाऊल अपयशाकडे नेणारं ठरतं. आणि मग तुम्ही सतत दु:ख आणि कंटाळवाणेपणा या भावनेनं घेरले जाता. निरोगी मन:स्थिती संपुष्टात येते आणि आध्यात्मिकदृष्टय़ा तर तुम्ही आजारीच ठरता.

ओशो

(पुढील भाग १४ जानेवारीच्या अंकात)

(स्वत:चा शोध – ओशो, अनुवाद – प्रज्ञा ओक, मेहता पब्लिशिंग हाउस)