शब्दांकन : वैशाली चिटणीस, रेश्मा भुजबळ,  प्रसाद हावळे

गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात १५ हजारांहून अधिक अल्पवयीन मुलामुलींवर लैंगिक अत्याचार घडले. हा आकडाच बोलका आहे. आपण आपल्या मुलांकडे कसं बघतो हे सांगणारा! कथुआ प्रकरण घडल्यानंतर याविरोधात कठोर पावलं उचलण्याचे संकेत मिळत आहेत, मात्र बहुतांशी घटनांमध्ये गुन्हेगार जवळचीच माणसे असतात. विश्वासाचं, प्रेमाचं वातावरण निर्माण करण्यात देश, समाज म्हणून आपण कुठे कमी पडतो आहोत, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.  काय म्हणताहेत नामवंत, विचारवंत या प्रकरणांच्या निमित्ताने.. समाज म्हणून काय वारसा मागे ठेवणार आहोत आपण?

पुरुषांमधला सतान ठेचायचा कसा?

कथुआ आणि उन्नाव इथल्या घटनांचा जितका निषेध करावा तितका कमीच आहे. सामाजिक पातळीवर या अशा मानसिकतेला विविध आयाम असले तरी, जिथं प्रेम नाही, तिथं शक्तीच्या जोरावर अशा गोष्टी करणं हे पौरुषत्वाला शोभणारं नाही. या घटनांमध्ये घडलेलं रानटीपणाचं दर्शन हे किळस आणणारं आहे. खरं तर याला रानटी म्हणणं हेही योग्य वाटत नाही. याचं कारण पशूंमध्येसुद्धा प्रेमाशिवाय मीलन होत नाही. जेव्हा स्त्री-पुरुष संबंध हे केवळ प्रेमाच्या आधारावरच जोडले जायचे अशा काळापासून मानवी समाज म्हणून आपण दूर जात असताना हे सारं घडत आहे, असं मला वाटतं.

या घटना त्यांच्या त्यांच्यापुरत्या मर्यादित नाहीत. त्यांची एक साखळीच गेल्या काही काळात तयार होताना दिसते आहे. पुन्हा अशी कृत्यं करण्यासाठी कुठल्या तरी धर्माचे, जातीचे आधार शोधले जात आहेत. ज्या विचारसरणीतून हे असे आधार शोधले जातात, ती गेल्या काही काळात सातत्याने वेगवेगळ्या गोष्टी घडवताना दिसते. त्यामुळे याही क्रौर्यामागे ती विचारसरणी सक्रिय नसेलच, असं म्हणवत नाही.

मुख्य म्हणजे २०१८ मध्येच हे क्रौर्य नव्यानं समोर आलं आहे, असंही नाही. याआधी अशा घटनांमागे पुरुषसत्ताक व्यवस्था आणि जातिव्यवस्थात्मक मानसिकता क्रियाशील होतीच. मात्र या मानसिकतेला आता धार्मिक उन्मादी वातावरणाचाही हातभार लागत असल्याने त्याची तीव्रता अधिक वाढली आहे. प्रत्येकच घटनेमध्ये हे दाखवता येईल असंही नाही. पण तपशिलात गेल्यास हे सारं कामी येताना दिसतं.

आताच्या घटना पाहिल्यास, याला आणखी एक आयाम जोडलेला दिसून येतो. तो म्हणजे, शासनव्यवस्थेच्या हस्तक्षेपाचा. या अशा घटनांवर शासनव्यवस्थेनं लगाम ठेवणं गरजेचं असतं, नव्हे ते त्यांचं कर्तव्यच आहे. परंतु इथे शासनव्यवस्थेने जो हस्तक्षेप करायला हवा होता, ती तो करताना दिसत नाही.  त्यामुळे अशी कृत्यं करणाऱ्यांना वाटतं की शासनव्यवस्था आपल्या पाठीशी आहे, आपल्या क्रौर्याला पूरक आहे. त्यामुळे शासनव्यवस्थेने यात ठोस पावले उचलावीत आणि ते कठोरपणे व जलदगतीनं व्हावं असं वाटतं. मात्र शासनव्यवस्था सध्या तरी या घटनांकडे सुटय़ा सुटय़ा स्वरूपात पाहण्यात, किंबहुना दुर्लक्षच करताना दिसते आहे. उलट निकाल कसे लावावेत, पुरावे कसे नष्ट करावेत यातच शासनव्यवस्थेला रस असल्याचं गेल्या काही काळात दिसून आलं आहे.

एकूणच जगभर कुटुंबसंस्थेचं विघटन, जागतिकीकरण, त्यातून आलेलं दुभंगलेपण, त्या दुभंगलेपणातून घडणाऱ्या गोष्टी अशा अंगानेही या घटनांकडे पाहणं आवश्यक आहे. त्याची मानसशास्त्रीय कारणं आताच्या अर्थव्यवस्थेतही पाहावी लागतील. समोरच्याबद्दल एकप्रकारची बेदरकार वृत्ती हे आताच्या काळाचं लक्षण बनलं आहे. एकूणातच आपलं काही चुकतं आहे असं कुणालाच वाटत नाहीये. समाजातल्या अल्पसंख्यांना ते वाटलं तरी बहुसंख्यांपर्यंत ते पोहोचवावं कसं, हेही आव्हान आहे. अशा घटनांविषयीचा राग त्या त्या वेळेला उफाळून आला तरी पुढे चळवळीत, सामूहिक कृतीत त्याचं रूपांतर होताना दिसत नाही.

ही अशी कृत्यं करणाऱ्यांना कायद्याने दहशत बसेल, परंतु दहशतीने प्रश्न सुटणार नाही. भीतीपोटी फार काही बदल होतात, असं चित्र नाही. पुरुषांमधला सतान ठेचायचा कसा, हाच प्रश्न आहे. तीव्रतम शिक्षा करावीच, पण तेवढय़ानेच सारं काही साध्य होणार नाही. पुरुषांना बदलवणे हाच त्यावरचा उपाय आहे. तो बदल घडवून आणणं प्रबोधनाशिवाय शक्य नाही. ही बिकट वाट आहे; तरीही ती चालावीच लागेल.

सतीश काळसेकर

 

स्त्रीत्वाचा वारसा पुढे न्यावा

गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या ज्या बातम्या माध्यमांमधून आल्या, त्यातून हिंस्र वृत्तीचा जो पगडा समाजावर बसला आहे,

तो समाजावर दिसतो आहे. अशा घटना घडत आलेल्या आहेत. पण त्यांचं यावेळी झालं ते उघड समर्थन धक्कादायक होतं. समाजात घृणा, तिरस्कार आणि हिंसा या प्रवृत्ती पसरल्या आहेत, हे पुन्हा एकदा अनुभवायला आलं. यात राजकारणाचा एक हिडीस चेहरा समोर आला. ज्या देशात सध्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, तिथे त्यांच्यासमोर असा समाज असेल तर ते पूर्ण मनुष्यजातीसाठीच चिंताजनक आहे.

दोन वर्षांपूर्वी हरियाणामध्ये मुलींच्या एका शाळेत मुलींना स्वच्छतागृह मिळावं यासाठी संप करावा लागला होता. तो जवळजवळ अडीच महिने चालला होता. त्याच्याकडे मंत्री दुर्लक्ष करत होते. मुलींविषयीची अनास्था शिगेला पोहोचली आहे, हेच अशा उदाहरणांमधून दिसतं.

बऱ्याच वेळा राजकारणात तिरस्कार हा लोकांचे समुदाय एकत्र आणण्यासाठी, भावना भडकावण्यासाठी वापरण्यात येणारं शस्त्र, तंत्र म्हणून असतं. पण मोबिलायझेशन हे तिरस्कार वाढवण्याचं शस्त्र, तंत्र म्हणून वापरणं हे इतिहासात क्वचितच घडलेलं आहे. जर्मनीमध्ये ज्यूंच्या विरोधात तिरस्कार वाढवण्यासाठी ते वापरण्यात आलं. त्याचप्रमाणे दलित, स्त्रिया आणि विविध प्रकारचे अल्पसंख्याक यांच्या विरोधात तिरस्कार वाढवण्यासाठी या शस्त्राचा वापर करण्यात आला. हे राजकारण देशाला बेचिराख करू शकतं. गेल्या हजार वर्षांत भारतातली संतपरंपरा आणि स्वातंत्र्यासाठी झालेलं आंदोलन या दोन्हीमध्ये स्त्रीत्वाचा गौरव केला गेला. सध्या जे उद्दाम पुरुषत्व मिरवलं जातं, त्याला नाकारून पुन्हा एकदा स्त्रीत्वाचा आपला सांस्कृतिक  वारसा समाजापुढे आणण्याची वेळ आलेली आहे.

डॉ. गणेश देवी

 

आरोपींना दहशत बसायलाच हवी

गेल्या काही दिवसांत लहान मुलींच्यावर झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी आपण सारेच व्यथित झालो असलो तरी एकमेकांवर दोषारोप करून या समस्येची उकल होणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचा खून, बलात्कार, लुटालूट अगर खंडणी यांसारख्या गुन्ह्य़ांना पािठबा नसला तरी असे गुन्हे करणाऱ्यांना आपल्या पक्षात सांभाळून त्यांच्या दहशतीचा वापर निवडणुकीत करावयाचा हे बहुतेकांना मान्य झालेले दिसते म्हणूनच अनेक आरोपी विधिमंडळात बसलेले आपल्याला दिसतात.

लहान मुलींवर होणाऱ्या बलात्कारांबद्दलच्या काही अडचणी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. एकतर दारिद्रय़ामुळे किंवा बालसुलभ वृत्तीमुळे या लहान मुलींनी घरापासून लांब खेळायला जाणे ही सहज गोष्ट आणि त्यांचा बालपणातला अधिकार आहे. याला त्या वेळेला संरक्षण फक्त  सहृदय आणि माणुसकी असलेल्या समाजाचे असते. हीच गेल्या काही दिवसांत समाजात वाढत चाललेल्या कटुतेने कमी होत चालले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बलात्काराच्या बातम्या येतात आणि त्या बातम्या विसरून जाईपर्यंत त्या खटल्यांचे निकालच येत नाहीत. याला अनेक कारणे असली तरी जर परदेशी असलेल्या फिर्यादीचा खटला एका महिन्यात निकालात काढा, असं सर्वोच्च न्यायालय सांगू शकते तर अशा मुलींवर झालेल्या बलात्काराचे खटलेसुद्धा तीन महिन्यांमध्ये निकालात निघाले पाहिजेत, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाला देता येईल.

तिसरी गोष्ट, पोलीस ठाण्यात गरीब कुटुंबातून आलेली ही असाहाय्य, पीडित मुलगी आणि ज्याच्यावर आरोप आहेत असा सत्तेचा पाठबळ असलेला आरोपी हा सामना बरोबरीचा नसतो. अशा पोलिसांना कर्तव्य चुकीबद्दल फक्त काही दिवस निलंबित करून भागणार नाही तर त्यांना कठोर शिक्षा देणारे कायदे अस्तित्वात पाहिजेत. जर एखाद्या बलात्कारासंबंधी योग्य फिर्याद पुराव्यासह ठाण्यात आली तरी जर ठाणेदाराने किंवा पोलीस अंमलदाराने ती नोंदली नाही किंवा योग्य ती कारवाई सुरू केली नाही तर त्याला त्या गुन्ह्य़ाचा साथीदार म्हणून आरोपींच्या यादीत समाविष्ट केले पाहिजे. शिवाय अशा घटनांची चर्चा करत असताना माध्यमांची सुद्धा काही जबाबदारी आहे. तपासाला ज्यामुळे साह्य़ होईल आणि तपासात मुद्दाम दिरंगाई करणारे कोणी असेल तर माध्यमांनी त्याकडे लक्ष वेधले पाहिजे. संशयाचा अतिरेक करून एकंदर कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आणि न्यायालय यांच्याबद्दल लोकमानसात अविश्वास निर्माण करण्याने काहीच साध्य होणार नाही.  लहान मुलींवर बलात्कार झाल्यास फाशीच्या शिक्षेचे संकेत दिले जात आहेत. याची चर्चा मागे झाली आहे. जर फाशीच होणार असेल तर मग बलात्काराबरोबर फिर्यादीला मारूनच टाकले तर, असं आरोपीला वाटण्याचा संभव असतो, त्यामुळे बलात्कारानंतर हत्येचे गुन्हे वाढू शकतात. याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मूळ प्रश्न असा आहे की, न्यायालयात शिक्षा होणार आहे याची खात्री आणि दहशत आरोपींना बसण्यासाठी न्यायसंस्थेला आपण काय मदत करू शकतो याचा सरकार, माध्यमे आणि नागरिक या तिघांनीही विचार केला पाहिजे.

नरेंद्र चपळगावकर

 

संवेदन जागं होणं गरजेचं

एकापाठोपाठ अत्यंत घृणास्पद घटनांनी गेले काही दिवस आपण सारेच व्यथित झालेलो आहोत. माणूस बनण्याचा आपण गेली हजारो र्वष प्रयत्न करत आहोत, तरीही आपल्यातलं पाशवीपण अजून संपलेलं नाही, हे अशा घटनांमधून जाणवत राहतं. अलीकडच्या या घटनांची तुलना मला इतर कशाशीच करता येत नाहीये. ज्या प्रकारच्या यातना देऊन हे क्रौर्य करण्यात आलं ते माणुसकीला काळिमा फासणारं आहे.

ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ते कोणत्या धर्माचे आहेत याच्यावरून जर अन्यायाची तीव्रता आपण ठरवत असू तर यापेक्षा चमत्कारिक दुसरं काहीही नाही. एक प्रकारचा निर्लज्जपणा आपल्यात आला आहे- माणूस म्हणून, समाज म्हणून, या विश्वाचे नागरिक म्हणून.. आपण कल्पनाही करू शकत नाही की, एखाद्या लहान मुलीवर बलात्कार झाला आहे आणि वकील व इतर लोक असं घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहेत. मात्र हे घडलं आहे. अशावेळी, अत्यंत अमानुष पद्धतीने वागणाऱ्या या नराधमांना माणसुकीचा न्याय     तरी का लावावा, असं वाटतं.

काळ जसा पुढे सरकत आहे तसे मानवी समाज म्हणून आपण अधिक प्रगल्भ होत आहोत, असा एक समज आहे; त्या समजालाच धक्का पोहोचवणारं वास्तव आपल्याच देशात समोर आलं आहे. खरं तर स्थानिक आणि जागतिक असं काही सुटं राहिलेलं नाही. मानवी प्रजाती म्हणून आपण एका ऱ्हासकाळात वावरत आहोत. जगभरात एकाच काळात एकाधिकारशाही, हुकूमशाहीकडे झुकणाऱ्या राजवटी सत्तास्थानी येताना आपण पाहत आहोत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष होणं असो, वा रशियात कावेबाज पुतिन पुन्हा सत्तेत येणं असो, एकाच माणसाच्या हाती आर्थिक-राजकीय सत्ता एकवटणं हे सारं जग अनुभवत आहे. भारतही यास अपवाद नाही. नजीकच्या भूतकाळात तरी मानवी समाजाने हे एकाच वेळी अनुभवलेलं नाही.

‘मी, माझा आणि मला’ एवढाच विचार दृढ होताना दिसत आहे. याच्याआधी मूल्यांविषयीचा आदर, मूल्यांचा धाक मानवी समाजामध्ये होता. परंतु आजच्या एकंदर स्वार्थभावापुढे ती मूल्यव्यवस्थाच नाहीशी होते की काय, असा प्रश्न पडतो. हे असं घडणं मानवी प्रजातीच्या ऱ्हासकाळाचं चिन्हं वाटतं. कुठल्याही प्रजातीचा जन्म, विकास आणि ऱ्हास हे चक्र सुरू राहणारच; पण आपल्या कृतीने हा ऱ्हास आपण अधिक जवळ आणतो आहोत, असं वाटतं.

निव्वळ आपल्या देशाचा विचार जरी केला तरी, आपल्याकडच्या मध्यमवर्गामध्ये एक संवेदन नेहमी जागं असायचं. आर्थिक, जातीय अशा सर्वच अर्थानी आपल्यापेक्षा खालच्या स्तराबद्दल या वर्गाला कणव, आस्था होती. नव्वदीनंतर मात्र मुक्त अर्थकारणाने सारंच चित्र बदललं. या बदलात, आपल्याकडे असलेल्या जबाबदारीचं भानच मध्यमवर्ग विसरून गेला आहे. दिसेल त्याच्यावर झडप मारायची आणि ओरबाडून घ्यायचं, अशी वृत्ती सर्वत्र दिसते आहे. या साऱ्यांत मध्यमवर्गाकडे असलेला विवेकच त्याच्यापासून दुरावला आहे. अनेक जाती, धर्म, वंश, भाषा आणि सहअस्तित्व हा आपल्या जगण्याचा भाग होता. तशी सहिष्णुता इथं होती. तिलाच मी ‘भारतीयता’ असं म्हणतो. भारतीय समाजाचं ते फार मोठं मूल्य आहे; किंबहुना भारताने जगाला दिलेली ती देणगीच ठरावी. परंतु आज तेच मूल्य आपल्याकडेच पायदळी तुडवलं जाताना दिसतंय. ते करण्यामागे भय पसरवणं हाच हेतू आहे, हे स्पष्ट आहे. मात्र मध्यमवर्गाचं संवेदन जागं झालं तर हे असं विस्कटणं आपण थांबवू शकू, पुढच्या पिढय़ांसाठी ते आवश्यक आहे.

रंगनाथ पठारे

 

पुरुष माणूसझालेला नाही..

उन्नाव, कथुआ यांसारख्या घटना मानवजातीच्या पुरुष नावाच्या घटकाच्या रक्तात फार आधीपासून आहेत. माणूस हा बलात्कारीच आहे. या माणसाला बलात्कारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न समाजरचनेने फार पूर्वीपासून केला आहे. पण तो अजूनही पुरेसा बाहेर आलेला नाही. आजही स्त्री दुय्यम आहे, वासनेचे यंत्र म्हणूनच वापरली जाते. पुढे माणसानेच काल्पनिक अशा धर्माचा शोध लावला, जातींचा शोध लावला. काल्पनिक जाती आणि धर्म हे खरे आहेत, असे मानणाऱ्या मनोरुग्णांची संख्या जगभर प्रचंड वाढली आहे.

त्याच्या आधीपासूनच स्त्री ही संपत्ती, स्त्री हे यंत्र अशा प्रवृत्तीची पुरुषसत्ताक पद्धती येथे होतीच. तीच पद्धत धर्म आणि जातींची जेव्हा मिती मिळाली तेव्हा अधिक कट्टर झाली. धर्म आणि जातींचं मूळ बलस्थान पुरुषसत्ताक पद्धतीतच आहे. धर्माच्या स्थापना, जातींच्या स्थापना या पुरुषांनीच केलेल्या आहेत आणि पुरुषांचे अधिकाधिक लाड करता यावेत, यातनं या व्यवस्था जन्माला आल्या आहेत. पुरुषांच्या सुखासाठीच जाती आणि धर्म आहेत. त्या काल्पनिक धर्मामध्ये पुरुष स्त्रीला सुखाची एक वस्तू म्हणून वापरू शकतो, अशी सगळ्या धर्मामध्ये सोय आहे. मग ही वस्तू आणि संपत्ती असं जर तिचं स्वरूप झालं असेल तर धर्माची मिती घेऊन जेव्हा दुसऱ्या काल्पनिक धर्मावर चढाई करण्याची वेळ येते तेव्हा दुसऱ्या धर्माच्या बाया पळवणं, त्यांच्यावर बलात्कार करणं, हाही एक धर्माचा रिवाज आहे. तो जातींमध्येही आहे. त्यामुळे त्यांना वाटतं आपला धर्म, आपली जात जिंकते. बाईच्या शरीरावर बदला घेण्याची ही धार्मिक संस्कृती जगभर तयार झाली आहे.

धर्म सांगतात पापं करू नका, मात्र पाप करणाऱ्या कुणालाही धर्मानं बहिष्कृत केल्याचं दिसून येत नाही. बलात्कार दोन कारणांमुळे होतात एक वासनेमुळे आणि दुसरे जाती आणि धर्माच्या कारणांमुळे. जाती, धर्माचं उच्चाटन झालं तर काही प्रमाणात बलात्कार कमी होतील, असं मला वाटतं. उन्नाव आणि कथुआच्या रूपानं मला हा धडा वाटतो.

माणूस हा मुळात एक प्राणी आहे, त्याचा प्राणीपणा अजूनही संपलेला नाही. माणसाचं वैशिष्टय़ असं आहे की माणसानं विकसित होताना बलात्कार शोधला. ती व्यवस्था इतर पशूंमध्ये आढळत नाही. निसर्गानं माणसाच्या बाबतीत एक अशी चमत्कृती करून ठेवली आहे की माणसाच्या वासना कायम प्रज्वलित असतात. त्या भागवण्याचे मार्ग समाजरचनेने आखून दिले आहेत तरीही निसर्गत: माणसामध्ये एक बलात्कारी वृत्ती आहे. या बलात्कारीवृत्तीवर आळा घालावा म्हणून समाजरचनेने काही आदर्श नियम तयार केले आहेत. पण माणूस हा या आदर्श समाजरचनेचे नियम पाळताना दिसत नाही. तो समाजरचनेच्या आदर्श संकल्पनांचं, कुटुंबव्यवस्थेचं, आदर्श राजकारणाचं ढोंग करतो आहे. पुरुषाची बलात्कारी वृत्ती आजही समाजाला नडते आहे.

बलात्काऱ्याला ज्या काही क्रूर शिक्षा द्याव्यात, असं सुचवलं जातंय ते मला मान्य नाही. कारण आपल्या समाजरचनेमध्ये, कुटुंबरचनेमध्ये जे काही संस्कारांचे दोष आहेत ज्यात पुरुष हा पुरुष म्हणून घडवला जातो आणि तर काही पुरुष बलात्कारी म्हणूनच घडवले जातात. असे पुरुष घडवण्याची समाजाची, कुटुंबाची जी ‘साधना’ आहे तिचा पूर्णपणे नायनाट केल्याशिवाय बलात्कार थांबणार नाहीत. बलात्काराला कायद्यानं आळा घालता येईल, असं मला वाटत नाही.

मला फक्त देशाच्या भवितव्याची काळजी नाही वाटत, हे जगभर चालू आहे. पुरुष जोवर ‘माणूस’ होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. पुरुषाला आदर्श, नैतिक माणूस करण्याची यंत्रणा सगळ्या जगभर उभारल्याशिवाय आणि त्यात धर्म नकोत, कारण धर्म आणि जाती या पुरुषातलं पुरुषीपण अधिक कट्टर करतात आणि पुरुषी गुन्हे करण्याची सवलतसुद्धा देतात, जोवर धर्म आणि जाती नष्ट होत नाहीत तोवर या धार्मिक आणि जातीय बलात्कारांचं प्रमाण संपणार नाही. तसंच याव्यतिरिक्त होणाऱ्या बलात्कारांचे प्रमाण कमी करायचे किंवा संपवायचे असेल तर पुरुषाला ‘माणूस’ करण्याची आदर्श, नैतिक पुरुष करण्याची संस्कार रचना उभी करावी लागेल. हे थांबलं तर स्त्रिया माणूस म्हणून मोकळेपणाने श्वास घेऊ लागतील.

राजन खान

 

ज्ञानवेत्त्यांनी समर्थ ज्ञान निर्माण करावे

राग, लोभ, मोह, मत्सर, काम, मद हे अध्यात्मशास्त्रात षड्रिपू समजले जातात.

भारत आध्यात्मिक भूमी आहे, असे म्हटले जाते.

षड्रिपुंना जिंकणे हे अध्यात्मशास्त्रात एक प्रमेय आहे.

षड्रिपुंना जिंकणे याची पद्धत एकतर उकललेली नाही किंवा षड्रिपू जिंकणे अत्यंत अवघड आहे, हे नागरिकांना गुपचूपपणे आकळलेले आहे. म्हणून अध्यात्म हे हळूहळू मागे टाकले जातेय.

षड्रिपू न जिंकताच आध्यात्मिक होण्याचा मोह अनेकांना होतो. अशांचे ढोंग वेळोवेळी उघड होत गेले. यातूनही अध्यात्म मागे पडले.

आणि धर्म पुढे केला गेला. धर्म- म्हणजे धर्मविधी आणि धार्मिक प्रतीके. ते सोपे आहे.

धर्म पुढे आला. याचा आणखी एक पैलू आहे.

श्रीमंत होणे, संपत्ती निर्माण करणे, अभिमानी होणे, सत्ता मिळवणे, समर्थ होणे.. हे अध्यात्मात बसत नाही, हे भारतीयांतल्या सामान्यातल्या सामान्यांनाही माहीत असते. अध्यात्माची तशी जाण सामान्यांनाही असते. आणि संपत्ती निर्माण करणे, अभिमानी होणे, सत्ता मिळवणे, वासनापूर्तीसाठी कार्यरत राहणे.. हे तर हवे आहे. मग काय करायचे?

धर्मविधी करायचे, धार्मिक प्रतीकांचा घोष करायचा.

आणि श्रीमंत व्हायचे, संपत्ती निर्माण करायची, अभिमानी व्हायचे.. आणि पुढे ‘सामथ्र्यवान’ व्हायचे.

सामथ्र्यवान होणे, शक्तीशाली होणे- याच्याशी एकूण चिंतन होत आहे सभ्यतेच्या पातळीवर, तसेच व्यक्तीच्या पातळीवर.

सामथ्र्य वाढवणे हे वस्तूंनी समर्थ होणे याच्याशी निगडित झालेले आहे. वस्तूंमध्ये शरीर, संपत्ती, शस्त्रे.. येतात. शारीरिक सामथ्र्य, संपत्तीचे सामथ्र्य, शस्त्राचे सामथ्र्य.. हे येते.

संपत्तीने समर्थ होताना लोभ वाढतो. शस्त्रांनी समर्थ होताना हिंस्रपणा वाढतो. शारीरिकपणे समर्थ होताना मद वाढतो.

लोभाने आर्थिक उचापती होताहेत. हिंस्रपणाने खून, तोडफोड होतेय. मदाने दहशत वाढतेय, अशक्तांवर अत्याचार होताहेत. मदाने काम वाढतोय, अशक्तांवर शारीरिक अत्याचार, बलात्कार होताहेत.

सभ्यता समर्थ व्हावी लागते. समर्थ सभ्यता समर्थ ज्ञानशाखांमुळे होते. समर्थ शास्त्रज्ञ, समर्थ तत्त्ववेत्ते, समर्थ साहित्यिक, समर्थ कलावंत समर्थ ज्ञानशाखा निर्माण करतात.

माणूस काय आहे? माणूस किती, कसा चांगला आहे? किती, कसा वाईट आहे? चांगले म्हणजे काय? वाईट म्हणजे काय? विश्वाच्या नियमात चांगले, वाईट यांचे नियम काय?.. या अशा गहन प्रश्नांचा सातत्याने बुद्धी पणाला लावून शोध घेणाऱ्या, लावणाऱ्या व्यक्तींमुळे सभ्यता समर्थ होत राहते. हे वर्षांनुवर्षे, पिढय़ान्पिढय़ा करावे लागते. अंतिम उत्तरे उतावळेपणे देणे निर्थक, निरुपयोगी असते.

माणसातला वाईटपणा वरचेवर उफाळत असतो. तात्कालिक उपाय करावे लागतात. जर गहन, समर्थ संशोधन, ज्ञान सभ्यतेत नसेल, तर हे उपाय गोंधळ निर्माण करतात, उपायाच्या दिशा सापडत नाहीत. माणसातला वाईटपणा उफाळून येणे आणि तोच गोंधळ होत राहणे असे होत राहते.

गेली सत्तरेक वर्षे (आधीचीही कित्येक वर्षे) भारतीय सभ्यतेचा अवकाश प्रामुख्याने राजकारण्यांनी आणि समाजकारण्यांनी व्यापलेला आहे. राजकारण्यांचे आणि समाजकारण्यांचे गहन प्रश्नांशी नातेच नसते. सभ्यतेत ज्ञानवेत्ते असले, तर राजकारण्यांना, समाजकारण्यांना गहन प्रश्नाचे भान तरी येऊ शकते.

सभ्यतेच्या अवकाशात मुख्य स्थान समर्थ ज्ञानवेत्त्यांना हवे.

भारतातल्या ज्ञानवेत्त्यांनी समर्थ ज्ञान निर्माण करावे आणि सभ्यतेच्या केंद्रस्थानी यावे.

हे घडेल?

श्याम मनोहर