समाजातल्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करत असतात ती प्रवाहाच्या विरुद्ध चालणारी माणसे अर्थात सामाजिक कार्यकर्ते. त्यांच्याच अनुभवांचे हे सदर. दर महिन्याला वेगवेगळ्या कार्यकर्त्यां मांडतील त्यांना जाणवलेला त्या त्या समाजातील स्त्रीच्या प्रगतीचा आलेख. या सदराची सुरुवात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां वसुधा सरदार यांच्या चार लेखांपासून.
वसुधा सरदार या पुणे जिल्ह्य़ातल्या दौंड तालुक्यातील पारगाव येथील ‘नवनिर्माण न्यास’च्या कार्यकारी विश्वस्त आहेत. या न्यासामार्फत परिसरातील १० गावांमध्ये ‘मुक्तशाळा’ चालवण्यात येते. १५ गावांमध्ये २०० बचत गटांमार्फत महिला विकासाचे, प्रशिक्षणाचे विविध उपक्रम राबवले जातात. दारूमुक्तीसाठी विविध मार्गानी चळवळ उभारणी केली जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००३ पासून सेंद्रिय शेतीच्या अवलंबासाठी प्रचार आणि प्रसार केला जातो आहे. त्यापूर्वीही युक्रांदच्या माध्यमातून, स्त्री चळवळींच्या माध्यमातून वसुधा सरदार यांनी सामाजिक कार्य केले. शेती आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘भारत कृषक समाज कृषी पुरस्कार’, ‘किसान रक्षक पुरस्कार’, ‘विवेकरत्न पुरस्कार’ यांसारखे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
मुंबईतल्या गोरेगावात मी वाढले. मुंबईच्या कुशीतलं एक खेडंच होती आमची दिंडोशी. मी इंटरला जाईपर्यंत तिथे वीज नव्हती. शेती आणि डेअरीचा पसारा आणि आबांचं सामाजिक काम यामुळे घरात सतत राबता असायचा. मृणालताई गोरे, बाबूराव सामंत हे धडाडीचे कार्यकर्ते आणि माझे वडील, आबा हे फक्त सहकारी नव्हेत तर जीवश्च कंठश्च मित्र. अशा वातावरणात मी सामाजिक कामात पडणं जणू ‘तय’ होतं. जसं देवआनंदच्या एका गाण्यात ‘जैसे बहार आने पर तय है फुलका खिलना.’
मी मॅट्रिक झाले त्यावर्षी मे महिन्याच्या सुट्टीत बाबा आमटे यांनी पहिली ‘श्रमसंस्कार छावणी’ आयोजित केली होती. ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’तर्फे आम्ही पंधरा-वीस मुलं त्यात सामील झालो होतो. महाराष्ट्रातील उभरती तरुणाई होती तिथे. सकाळी सपाटून काम आणि दुपारी वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानं-चर्चा. बाबांचं सळसळतं चैतन्यमय आणि साधनाताईंचं शांत तेवणाऱ्या ज्योतीसारखं आश्वासक व्यक्तिमत्त्व! पंधरा दिवसांचा हा अनुभव म्हणजे पुढच्या संपूर्ण आयुष्याची शिदोरी ठरला. सामाजिक काम करायचं ही दिशाही नक्की झाली.
परत आल्यावर आमच्या या गटाचं ट्रस्ट मार्फत ‘उत्क्रांती दल’ या नावानं एकत्र भेटणं चालू राहिलं. ट्रस्टमध्ये विविध विषयांवरील कात्रणांचा मोठा संग्रह होता. ही कात्रणं व्यवस्थित चिकटवणं, वाचणं ट्रस्टच्या छोटय़ा-मोठय़ा उपक्रमात सहभाग, बोरिवलीजवळच्या मागाठाणे पाडय़ावरच्या भायला मंगल व इतर आदिवासींच्या शेतात विहीर खणणं, सुधारित पद्धतीने भातलागवड, यातून सामाजिक प्रश्नांची तोंडओळख व्हायला लागली. तेव्हाच ‘मन, मेंदू आणि मनगट’ यांनी संघटितपणे काम करण्याचा वस्तुपाठ मिळाला. पालघर भागातल्या कर्जप्रश्नाच्या निमित्ताने आदिवासी समाजाची ओळख झाली. मुंबईपासून जेमतेम ऐंशी किलोमीटर अंतरावर अफाट दारिद्रय़ होतं. विकासाचं वारं पोचलं नव्हतं. सरकारी योजनांचा पत्ता नव्हता. भूमीमुक्ती आंदोलनामुळे खासगी सावकारांकडून कर्ज मिळण्याचा पारंपरिक मार्ग बंद झाल्यामुळे बँकेकडून पीक कर्ज देऊन त्यांना त्यांच्या जमिनीवर उभे करण्याचा कार्यक्रम आबांनी काही सहकाऱ्यांसह सुरू केला होता. रचनात्मक संघर्षांचा हा प्रयोग अनेक कारणांमुळे अल्पजीवी ठरला. पण मोठय़ा सुट्टय़ांत आणि नंतर वर्षभर तिथे जाऊन राहण्याचा अनुभव मला बरंच काही देऊन गेला.
दादाला आणि मला वागवताना आबांनी मुलगा-मुलगी भेद कधी केला नव्हता. पण समानतेचा अर्थही चांगला समजावून दिला. अनेक कार्यकर्त्यांप्रमाणे एका सुदूर खेडय़ात एकटी राहताना मला एरवी अडचण वाटत नव्हती. पण अगदी पहिल्यांदा तिथे पाळी आली तेव्हा मी गांगरले. घरी आले. आबांनी विचारलं मध्येचशी आलीस? कारण सांगितलं तेव्हा म्हणाले मग? तिथल्या बायकांना पाळ्या येत नाहीत? एवढय़ाशा कारणाने परत आलीस? मेधाताई पाटकरांसारख्या असंख्य कार्यकर्त्यांएवढय़ा हालअपेष्टांत मला दिवस काढावे लागले नाहीत. पण कसंही पडलं तरी चार पायांवर उभं रहाणाऱ्या मांजराप्रमाणे असेल त्या स्थितीत राहायला शिकले.
तिथे राहून काम करत असतानाच अजित सरदार यांच्याशी ओळख झाली. आम्ही दोघंही सामाजिक क्षेत्रातलेच, लग्न मात्र वेगळ्या पद्धतीने पण अरेन्जड् म्हणावं असंच ठरलं. अजित युवक क्रांती दलाचं पूर्णवेळ काम करत होता. आणीबाणीत युक्रांदचे अनेक कार्यकर्ते मिसाखाली तरुंगामध्ये होते आणि आमच्या लग्नाचं निघालं. रजिस्टर्ड लग्नाची नोटीस दिली आणि दुसऱ्याच दिवशी अजितला अटक झाली. तुरुंगात एकवटलेल्या अनेक नेत्यांच्या प्रयत्नांनी शेवटच्या क्षणी पॅरोल मिळाला आणि ठरलेल्या दिवशी २६ जानेवारी १९७६ ला आम्ही विवाहबद्ध झालो. पुढे निवडणुकांची घोषणा होऊन सर्व मिसाबंद्यांची सुटका झाली तो दिवस होता २६ जानेवारी १९७७. आणीबाणी उठल्यावर युक्रांदचं काम पुन्हा सुरू झालं, त्यात मी मुख्यत: कार्यालयीन पातळीवर सहभागी होते. नामान्तर आंदोलनात मात्र युक्रांदप्रणीत ‘समता जुलूस’द्वारा लातूरपासून बीडजवळच्या केजमध्ये अटक होईपर्यंत सर्व जातींच्या कार्यकर्त्यांसह जी पदयात्रा झाली त्यात जातिव्यवस्थेचे अनेक पैलू अनुभवण्यास मिळाले. वर्ग-जात-िलग-भेदांनी चिरफाळलेल्या आपल्या समाजात विकासाचं समन्यायी वाटप आणि सन्मानाने जगण्याची समान संधी या बाबी किती आव्हानात्मक आहेत हे लक्षात येत होतं.
लग्न होऊन पुण्यात राहायला आल्यावर खऱ्या अर्थाने माझा स्त्रीचळवळीशी संबंध आला. नुकतंच १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरं झालेलं होतं. स्त्री प्रश्नांची आणि त्यासंबंधी मांडणीची विविध रूपं समोर येत होती. अत्याचार आधीही होत होते अजूनही चालूच आहेत. पण अत्याचाराच्या प्रकरणांना वाचा फुटू लागली. मंजुश्री सारडाची हत्या, रूपकुंवरचं सतीप्रकरण हे राष्ट्रीय चच्रेचे विषय बनले. मथुरा बलात्कार केस देशभर गाजली. कायद्याचा अभ्यास करताना ‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये’ हे न्यायदानातलं तत्त्व समजलं होतं. त्यामागे सर्वसामान्य समाज पापभीरू आहे कायदा मानणारा व पाळणारा आहे हे गृहीत असतं. स्त्रिया आणि दलितांबाबत मात्र हे गृहीतकच प्रश्नांकित आहे. सर्वसामान्य देवभोळा समाजही राज्यघटनेतली समता, स्वातंत्र्य ही मूल्यं नव्हे; तर पुरुषप्रधानता आणि जातिभेद मानतो असा अनुभव हरघडी येत होता. पुरुष चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून म्हणजे शिक्षा देऊन मोकळा होत होता आणि निष्णात वकिलांच्या साह्य़ाने संशयाचा फायदा मिळून त्यातून सहीसलामत सुटत होता. म्हणूनच मथुरा प्रकरणात ‘कस्टडीतल्या बलात्कारा’बाबत वेगळं तत्त्व प्रस्थापित झालं हा पुरोगामी चळवळीचा एक विजय होता. स्त्रीचळवळीचा मुद्दाम म्हटलं नाही. या संबंधी एक अनुभव सांगण्यासारखा आहे.
एका ग्रामीण कॉलेजात एन.एस.एस.च्या मुला-मुलींनी हॉल खचाखच भरलेला. हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, विडी कामगार महिलांचं लैंगिक-आíथक शोषण असे स्त्री-अत्याचाराचे अनेक पैलू स्पष्ट करणारी पोस्टर्स होती. मी आणि (आता डॉ.प्रा.) श्रुती तांबे आम्ही दोन कार्यकर्त्यांनी ती विशद करून शंका-प्रश्न विचारण्याचं आवाहन केलं. एका विद्यार्थ्यांने हात वर केला. ‘दर वेळी महिलेवर अन्याय होतो असं काही नाही. आमच्या गावात एका बाईचं तिच्या शेजाऱ्याशी ‘लफडं’ होतं. ते तिच्या नवऱ्याला कळलं. मग त्या बाईने स्वत:च आत्महत्या केली. यात पुरुषाची काय चूक?’ मुलांकडून टाळ्यांचा कडकडाट. आम्ही म्हटलं, ‘‘आपण ‘दोघांचं’ लफडं होतं’’ असंही म्हणत नाही. ते बाईचं एकटीचंच! बरं ते उघड झाल्यावर अपराधी भावनेतून तिने स्वत:ला संपवलं. पण त्या शेजाऱ्याने काय केलं? स्वत:च्या एक थोबाडीत तरी मारून घेतली का? आणि मुख्य म्हणजे हा विचार तरी आपल्या मनात आला का? हा महिला विरुद्ध पुरुष असा खुमखुमीचा विषय नाही. पुरुषप्रधानता दोघांच्याही आचारविचारांत भिनलेली आहे. दोघांनी त्यापासून मुक्त होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा.’ हा विद्यार्थीही नंतर येऊन आमच्याशी शांतपणे बोलला. पण समाजप्रबोधनाच्या पातळीवर किती व्यापक आणि किती सूक्ष्म पातळीवर काम व्हायला हवं आहे हे पदोपदी जाणवत असे.
पुणे शहर मोलकरीण संघटनेच्या कामात इतर कार्यकर्त्यांबरोबर सुरुवातीला बराच काळ काम केलं. ‘साद युवती मंच’ हे कॉलेज युवतींसाठी मी सुरू केलेलं व्यासपीठ काही र्वष चांगलं चाललं. या सर्वातून प्रश्नांची समज वाढली. १९८५ मध्ये आबांनी दौंड तालुक्यात पारगावला ‘नवनिर्माण न्यास’ ही स्वयंसेवी संस्था काढली. त्यामार्फत पुन्हा एकदा ग्रामीण महिलांशी जवळून संबंध आला. महिला बचत गट चळवळीमुळे आíथक क्षेत्रात तर त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीने राजकीय क्षेत्रात स्त्रियांना अवकाश उपलब्ध झाला. तो प्रत्यक्ष पदरात पडण्यामध्ये दारू, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, गावसमाजातील विभागलेपणा असे अनेक अडथळे होते. पारगावच्या कामात हेच आमच्या अजेंडय़ावरचे विषय होते. एकत्र येण्याची संधी मिळाल्यावर या साध्यासुध्याशा बायांनी स्वत:त आणि समाजात बदल केल्याचे अनेक सुखद अनुभव आले. कधीतरी ते एका गाण्यात उतरले ते असे :
मनासारखं घडलं बाई। सारं बदललं।
शिकले होते म्हणून बाई सारं बदललं।। आमी मैतरणी बारा तेरा। एक विचार करून सारा।
महिला मंडळ स्थापन केलं। सारं बदललं।।
सभाशिबिरामधून शिकलो। आम्ही हुशार साऱ्या झालो।
गरीब का आमी अडाणी का हो। सारं समजलं।।
प्रौढ शिक्षण सुरू केलं। नाही अडाणी कोणी राहिलं।
भविष्य सारं जळून गेलं। सारं बदललं।।
बचत गटाला आरंभ केला। आयाबायांना आधार झाला।
बँकेचं कर्ज दारात आलं। सारं बदललं।।
गावागावात दारूभट्टी। सुखशांतीशी होती कट्टी।
लाज बाई टाकली भीती मी सोडली। सारं बदललं।।
रसायनांचा वापर भारी। काळी आई झाली आजारी।
सेंद्रिय शेती घेऊन हाती। सारं बदललं।।
स्त्रीसमतेचं नवं धोरण। एकजुटीचं बांधू तोरण।
महिलाशक्ती जागृत झाली। सारं बदललं।।
(क्रमश:)
वसुधा सरदार ajitvasudha@gmail.com