‘‘आधुनिक काळातील विविध भाषांमध्ये लिहिणाऱ्या कवयित्रींच्या कविता म्हणजे स्त्रीवादी काव्याची सुरुवात, विकास आणि तिच्या आत्मभानाचा परिघ रुंदावणारी कविता आहे. स्त्री ही सार्वत्रिक आहे आणि तिची सुखदु:खेही सारखीच आहेत याचे एक सजग भान बहुभाषिक कवयित्रींच्या कवितांमध्ये आढळले.’’ ‘गेटवे लिट फेस्ट’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय साहित्यातील स्त्री-शक्ती’ या बहुभाषिक स्त्री साहित्य संमेलनात भारतभरातील ५० लेखिका सहभागी झाल्या होत्या. त्यातील काही लेखिकांचा हा परिचय…
स्त्री म्हणून जगताना बाईला विविध प्रकारचे अनुभव येत असतात. वेगवेगळ्या आघाडय़ांवर ती लढत असते. जगण्याच्या धकाधकीत आयुष्याच्या खडतर वाटेवर चालताना स्त्री-वेदनेचे हुंकार विविध माध्यमांतून विविध भावांतून आविष्कृत होत असतात. तिच्या संघर्षांच्या, पुरुषप्रधान समाजात स्वत:चे अस्तित्व टिकवण्याच्या वाटा सर्वदूर अनेकदा सारख्याच असतात. मग मातीत राबणारी आपली सर्जनशीलता कष्टांमध्ये शोधणारी ‘सहज गं सये खुरपता खुरपता सांगावंसं वाटलं. खाली वर झाली माती आणि बाईचं काळीज भेटलं’, असं म्हणणारी कल्पना दुधाळ असो किंवा खाकी वर्दी परिधान करून पोलिसी खात्यात नोकरी करणारी, खात्यात बाईवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारी ‘मॅगेझिनीतून सुटलेल्या गोळी’सारखे जिचे शब्द थेट काळजाला भिडतात ती बालिका ज्ञानदेव असो वा घरातील कामे भराभर उरकून आपल्यातील निर्मितीशीलतेला टाइपरायटरने कागदावर उतरू पाहणारी परदेशस्थ लेखिका अरिका याँग सा असो, अशा समानशील लेखिका सर्वच काळात आढळतात, याचा अगदी ताजा अनुभव अगदी अलीकडे आला. निमित्त होते ‘एलआयसी गेटवे लिट फेस्ट’चे. मुंबईमध्ये या साहित्य सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
‘गेटवे लिट फेस्ट’चे हे चौथे वर्ष. साहित्य, रंगभूमी, चित्रपट अशा कला क्षेत्रांमधील नामवंत लेखिका, दिग्दर्शिका या तीन दिन दिवस चाललेल्या संमेलनात मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. भारतीय साहित्यातील या वर्षीच्या संमेलनाचे प्रमुख सूत्र होते, ‘वुमन पॉवर इन इंडियन लिटरेचर’. विविध साहित्य प्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या, सतरा भारतीय भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पन्नास जणी या संमेलनात सहभागी झाल्या होत्या. या संमेलनात ज्ञानपीठ पारितोषिकविजेत्या उडिया भाषेतील प्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिभा राय यांच्यापासून झारखंडमधील दुर्गम भागातून आलेल्या जेसिंता करकेट्टा या तरुण लेखिकेपर्यंत अनेक जणी सहभागी होत्या. जुन्या-नव्या पिढीला एकत्र आणणारे हे खुले व्यासपीठच होते. आजच्या लेखात या संमेलनात समावेश असलेल्या काही लेखिकांच्या साहित्याचा परिचय करून देत आहोत.
‘गेटवे लिट फेस्ट’चा या वर्षीचा ‘वुमन ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार बेबी हालदर या बंगाली लेखिकेला मिळाला. बेबी ही पेशाने मोलकरीण. धुणं, भांडी, झाडू, पोछा या आपल्या सीमित अवकाशात राहणारी. मुन्शी प्रेमचंद यांचे नातू पुरातत्त्व शास्त्रज्ञ प्रबोधकुमार यांच्या गुरगावच्या घरी ती काम करीत असे. पुस्तकांच्या मांडणीवरची धूळ झटकताना, पुस्तके चाळण्याचे तिचे कुतूहल प्रबोधकुमारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. काही महत्त्वाचे लेखक वाचावयास सांगितले. तस्लिमा नसरीन यांच्या ‘आमार मेयबेला’ हे आत्मकथन बेबीच्या हातात पडल्यानंतर तिने ते झपाटल्यासारखे वाचून काढले. समाजातील गरीब आणि वंचित घटकांमध्ये मुलगी म्हणून जगणे किती भीषण आहे हे तिला तस्लिमांच्या लेखनामधून समजले. जणू तिच्या निर्मितीशीलतेला, लेखनाला प्रकाश दाखवणारे दारच होते ते! जणू काही ती आपलीच कथा आहे असे तिला वाटले. उत्साहाने तिने नंतर इतर लेखकांचे लेखनही वाचले. प्रबोधकुमारांनी तिला वही आणि पेन देऊन लिहिते केले, स्वत:चे अनुभव शब्दबद्ध करण्यास सांगितले. घरातील सगळी कामे उरकून बेबी रात्री लिहीत असे. साध्या सरळ भाषेतील तिचे आत्मकथन ‘आलो अंधारी’ – ‘लाइफलेस ऑरडिनरी’ बंगाली भाषेत २००२ मध्ये प्रसिद्ध झाले. या पुस्तकाला चांगली लोकप्रियता लाभली. प्रबोधकुमार यांनी त्याचा हिंदीमध्ये अनुवाद केला आहे. मोलकरणींचे कष्टप्रद अनुभव चित्रित करणाऱ्या या पुस्तकाला सुरुवातीपासूनच खूप लोकप्रियता मिळाली. २००५ मध्ये मल्याळम् आणि २००६ मध्ये इंग्रजीमध्ये या आत्मकथनाचे भाषांतर झाले. अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ‘इंडियाज् अँजेलाज् अॅशेस’ असा गौरव केला. ही आत्मकथा एकूण २१ भाषांमध्ये भाषांतरित झाली असून त्यातील तेरा भाषा परदेशी आहेत.
प्रतिभा राय आपल्या मातृभाषेत, उडिया भाषेत लेखन करणाऱ्या सिद्धहस्त लेखिका. इरावती कर्वे यांनी ज्याप्रमाणे ‘युगान्त’मधून द्रौपदीच्या व्यक्तिरेखेचा वेगळ्या दृष्टीतून विचार केला त्याचप्रमाणे प्रतिभा राय यांनी ‘याज्ञसेनी’ या आपल्या कादंबरीत द्रौपदीला वेगळ्या तऱ्हेने पाहिले आहे. रुळलेली मळवाट सोडून स्वत:ला पटलेल्या मार्गाने जाण्याचे धाडस, बंडखोरी आणि माणुसकीचे मूल्य त्यांच्या लेखनातून प्रत्ययाला येते. स्वत:चा शोध लेखणीच्या आधारे त्यांनी सुरू केला आणि म्हणूनच त्यांच्या साहित्यातील स्त्री स्व-ओळखीचे मापदंड स्वत:च निर्माण करते. समानता, प्रेम, शांतता आणि सर्वसमावेशकता या पायावर समाजाची उभारणी झाली पाहिजे असे त्यांना वाटते. वर्ग, जात, धर्म आणि लिंगभेद यावर आधारलेल्या समाजव्यवस्थेला त्यांचा विरोध आहे. स्वत:ला त्या मानवतावादी मानतात. स्त्रीच्या म्हणून असणाऱ्या खास विशेषांचे भरणपोषण व्हावे, पण त्याचबरोबर पुरुषप्रधान समाजात तिला माणूस म्हणून स्वीकारले जावे, असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या मते साहित्याची भाषा ही वैश्विक असते म्हणून साहित्याला किंवा कोणत्याही भाषेला राजसत्तेच्या कुंपणाआड बंदिस्त करू नये. ‘लिट फेस्ट’सारख्या बहुभाषिक संमेलनात देशाच्या विविध भागांमधून आलेले साहित्यिक भेटतात, विचारांची देणावघेवाण होते म्हणून अशी संमेलने व्हायला हवीत, हा त्यांचा आग्रह आहे.
या ‘लिट फेस्ट’मध्ये मल्याळी, तमिळ, काश्मिरी, सिंधी, तेलुगु, पंजाबी अशा विविध भाषांमध्ये लेखन करणाऱ्या स्त्रिया एकत्र आल्या होत्या. मराठी भाषेचे प्रतिनिधित्व अभिनेत्री नीना कुलकर्णी, कवयित्री मलिका अमरशेखआणि प्रज्ञा दया पवार यांनी केले. मलिकांच्या ‘वाळूचा प्रियकर’ या पहिल्याच कवितासंग्रहात स्त्रीवादाचा स्पष्ट उच्चार आहे. स्त्रीच्या प्रतिमांशी निगडित असे आदर्श त्यांची कविता धुडकावून लावते. प्रखर राजकीय आणि सामाजिक जाणीव त्यांच्या कवितेतून अनेकदा व्यक्त झाली आहे. सामोऱ्या आलेल्या अनेक विषयांवर अतिशय धीटपणे आपल्या प्रतिक्रिया त्या नोंदवतात. भारतीय समाजरचनेतच स्त्री-समस्येची मुळे आहेत याची जाणीव त्यांच्या आत्मचरित्रातून दिसते. प्रज्ञा दया पवार दलित कवितेच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी कवयित्री. ‘अंत:स्थ’, ‘उत्कट’, ‘जीवघेण्या धगीवर’ हे कवितासंग्रह, ‘आसवं खरी ठरावी म्हणून’ हा कथासंग्रह, तर खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंबीयांवर झालेल्या अन्याय, अत्याचारांचे चित्रण करणारे ‘धादांत खैरलांजी’सारखे नाटक, ‘केंद्र आणि परिघ’ असे स्तंभलेखन अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांचे लेखन आहे. दलित, स्त्री व महानगरातील वास्तव या तीनही घटकांच्या चिंतनाचा परिणाम त्यांच्या लेखनात प्रत्ययाला येतो. आधुनिक काळातील विविध भाषांमध्ये लिहिणाऱ्या कवयित्रींच्या कविता म्हणजे स्त्रीवादी काव्याची सुरुवात, विकास आणि तिच्या आत्मभानाचा परिघ रुंदावणारी कविता आहे. स्त्री ही सार्वत्रिक आहे आणि तिची सुखदु:खेही सारखीच आहेत याचे एक सजग भान या बहुभाषिक कवयित्रींच्या कवितांमध्ये आढळले.
इंदू मेनन ही केरळस्थित लेखिका पटकथाकार असून तिचा समाजशास्त्राचाही अभ्यास आहे. लेखनाची वेगळी शैली, लिखाणातील ताजेपणा हे विशेष असून स्त्री जाणीव जागृतीची नवी क्षेत्रे त्यांनी धुंडाळली आहेत. स्वरूपाराणी यांनी तेलुगु दलित स्त्री लेखकांमध्ये आपली ठळक मोहोर उमटवली आहे. स्त्री म्हणून, दलित म्हणून होणाऱ्या दुहेरी शोषणाविरुद्ध त्यांची कविता बंड करते. आपल्याकडील हिरा बनसोडे यांच्या ‘फिर्याद’ किंवा ‘संस्कृती’ या कवितांची आठवण व्हावी असे स्वरूपाराणींचे लेखन आहे. चळवळीमध्ये सक्रिय असल्याने विषमता, अन्याय याविरुद्धची चीड त्यांच्या लेखनातून जोरकसपणे व्यक्त होते. मेघालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असणारी पॅट्रिशिया मुखीम हीसुद्धा चळवळीमधील सक्रिय कार्यकर्ती आहे. मेघालयातील लष्करी हुकूमशाहीला तिने आव्हान दिले. स्वत: एका संस्थेची स्थापना करून अन्यायाविरुद्ध लढत राहिली.सध्या ती दिल्लीमधील राष्ट्रीय संरक्षण सल्लागार समितीची सदस्य आहे.
पंजाबीत लेखन करणाऱ्या निरुपमा दत्त याही अशाच धडाडीच्या लेखिका. त्यांचे बहुतांशी लेखन पंजाबीमधूनच झाले आहे. मीनाक्षी रेड्डी माधवन या तरुण पत्रकाराने ‘यू आर हियर’ या आपल्या पुस्तकात ब्लॉगवरील स्वत:विषयीच्या कबुलीजबाबांचे संकलन अतिशय धिटाईने आणि तटस्थतेने केले आहे.
उदयोन्मुख दलित लेखिका वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये जोमदारपणे लिहीत आहेत. नलिनी जमिला या केरळमधील लेखिकेला एके काळी परिस्थितीची गरज म्हणून देहविक्रयाकडे वळावे लागले. तिचे ‘एका वेश्येचे आत्मकथन’ ही आत्मकथा खूप गाजली. अत्यंत प्रांजळ आणि वास्तवाचे यथातथ्य चित्रण करणाऱ्या या आत्मचरित्राला खूप लोकप्रियता मिळाली.
आस्वती शशिकुमार, मर्सी मार्गारेट, निघत साहिबा, रेखा सचदेव पोहनी, जेसिंता केरकट्टा या सर्वाना २०१७ चा केंद्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला आहे. या सर्वच लेखिकांमध्ये चैतन्य ऊर्जा जाणवत होती. आस्वती शशिकुमार मल्याळी भाषेतील लेखिका असून तिचा ‘जोसपिंटे मामन’ हा लघुकथा संग्रह प्रसिद्ध झाला आहे, तर ‘कन्नू’ हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. व्यवसायाने अभियंता असणाऱ्या आस्वतीला शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला. तमिळमधील लेखिका मानुषी हिच्या कवितांमधून स्वशोधाचा प्रयत्न दिसतो. रेशन कार्ड, आधार कार्ड यांवरील दस्तावेजीकरण म्हणून असणाऱ्या आपल्या जुजबी ओळखीपेक्षा कवितेतून आपली ओळख अस्तित्व सिद्ध केले पाहिजे, हा तिचा आग्रह आहे. निघत साहिबा ही काश्मिरी लेखिका मानुषीप्रमाणेच स्त्रीवादी विचारसरणीचा पुरस्कार करते. ‘जर्द पाने की डायर’ हा तिचा कवितासंग्रह. झारखंडमधील जेसिंता या कवयित्रीने घरातील गरिबी, सततची मारपीट, या सगळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कवितेला आपलेसे केले. चिकाटीने शिक्षण पूर्ण करून पत्रकारिताही केली. सातत्याने नकार आणि विरोध पचवत आपल्या आतील आवाजाला तिने जिवंत ठेवले. सिंधी भाषेत लिहिणारी रेखा सचदेव पोहनी डाएटिशियनचा व्यवसाय सांभाळून एक असिम ओढ म्हणून कवितेला जपते, तर बंगालीमध्ये नाटककार म्हणून कारकीर्द गाजवणारी रुक्कया रे सीतेच्या प्रतिमेचा स्त्रीवादी विचारसरणीतून विचार करते. शब्दांऐवजी कथ्थक नृत्यशैलीतून स्वत:ला भावलेली गांधारी संजुक्ता वाघ व्यक्त करते.
या सर्वच सर्जनशील लेखिका, अभिनेत्री, नाटककार समान विचार करणाऱ्या, वाचणाऱ्या, प्रश्न पडणाऱ्या आणि ते प्रश्न धीट आवाजात समाजाला विचारणाऱ्या स्त्रिया आहेत. स्त्री मग ती कुठल्याही प्रांतातील किंवा कोणत्याही भाषेत लेखन करणारी असो, तिची वेदना आणि दु:ख, तिचे सोसणे नेहमीच समानधर्मा स्त्रियांना आवाहन करीत असते, कारण या सर्वाना जोडणारी या दु:खाची नाळ एकच आहे.
‘‘मिटू तरी कसे, कसे खोलू रुखे ओले
असे दोन्ही डोळे, कुठे बोलू मनातले?’’
असा प्रश्न पडलेल्या सर्व लेखिकांना ‘गेटवे लिट फेस्ट’ने बोलते केले हे या लिट फेस्टचे श्रेय म्हणायला हवे.
– मीनाक्षी दादरावाला
meenaxida@gmail.com