शांघायमध्ये भारतीय पदार्थ करून त्यांची गोडी परदेशी लोकांना लावण्याचं काम डिंपल पहिलजानी, स्मिता सिंग आनंदाने आणि उत्साहाने करीत आहेत. अगदी शेव, पापडी, मठरी या पदार्थाबरोबरच समोसे, कचोरी, बटाटेवडे, ब्रेड रोल्स, व्हेज पफ, आलू टिक्की इतकेच नव्हे तर चिकन टिक्का, मसाला रोगन जोश, पनीर मटर, पालक पनीर, दाल तडका, लच्छा पराठाची चव त्यांनी तिथे लोकप्रिय केली आहे. आवडीतून व्यवसाय घडतो तो असा..

आज अनेक लोक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये काही काळासाठी वास्तव्य करताना दिसतात तर काही कायमच्या वास्तव्यासाठी जात असतात. अशा वेळी प्रत्येकजण आपल्या मूळ संस्कृती परंपरांना त्या त्या ठिकाणी घेऊन जात असतो. जेव्हा स्त्रिया अशा दुसऱ्या देशात स्थायिक होण्यासाठी जातात तेव्हा त्या आपली खाद्यसंस्कृती आवर्जून घेऊन जातात आणि त्याचा प्रचार, प्रसार आणि आपली कलासुद्धा स्थानिक लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात. आजघडीला अमेरिका आणि इंग्लंडमध्ये भारतीयांचं प्रमाण अधिक आहे. तसंच आखाती देशांतही भारतीय स्त्रिया बऱ्याच मोठय़ा प्रमाणात खाद्यविषयक व्यवसाय करताना दिसतात. परंतु चीनसारखा देश, जिथे भाषेत आणि खाण्यापिण्यामध्ये प्रचंड तफावत आहे, तिथेही भारतीय स्त्रियांनी व्यवसायातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चीनमध्येही भारताच्या सर्वच राज्यांतील लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यातल्याच एक डिंपल पहिलजानी आणि स्मिता सिंग. त्यांनी खाद्यपदार्थाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून तो लोकप्रिय केला आहे. त्या करत असलेले मूळचे भारतीय पदार्थ इतर देशांतून आलेल्या लोकांमध्ये प्रिय झाले आहेतच, पण चिनी लोकांनाही आवडताहेत असं अनुभवास येतं.

शांघायमध्ये जवळपास ५००० भारतीय लोक आहेत. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेले असल्यामुळे त्यांच्या खाण्याच्या आवडी-निवडीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यानुसार आवडते पदार्थ बनवून देणारं जर कुणी असेल तर परक्या देशात देखील खाण्याची चंगळच होईल आणि हे जिभेचे चोचले हे लोक शांघायमध्ये खरोखर पुरवू शकतात. जे इथे एकटे राहतात किंवा नवरा-बायको दोघेही नोकरी करतात त्यांच्यासाठी हे फार सोयीचं आहे. इथे घरगुती जेवणाचे डब्बे पुरवणारा एक भारतीय ‘महाराज’ आहे. तसंच भारतीय उपाहारगृहात काम करणारी आणि सकाळी लोकांना भाजी-पोळीचे डब्बे करून देणारी चायनीज मिस् ज्यो पण आहे. या मिस् ज्योच्या पोळ्या आणि मी घरी केलेल्या पोळ्यांमध्ये फारच थोडा फरक होता. मुंबई-पुण्यामध्ये गणपती, दिवाळीच्या दरम्यान मोदक आणि फराळाचे पदार्थ करून देणाऱ्या बऱ्याच भगिनी आहेत तशा आमच्या शांघायमध्येसुद्धा ऑर्डरवर पदार्थ बनवून देणाऱ्या मैत्रिणी आहेत. त्यातल्या दोघींची ही ओळख.

डिंपल पहिलजानी सहा वर्षांपूर्वी इथे आली. दोन्ही मुलं शाळेत गेली आणि पती कामावर गेला की काय करावं हा मोठाच प्रश्न असायचा. तिला वेगवेगळे गोड पदार्थ किंवा लाडू/ बर्फी बनवून बघण्याची आवड होती. ते तिथे भारतात करणं सोपं होतं पण इथे मात्र बऱ्याच वस्तू मिळत नसत. तरीही तिने थोडंफार बनवून बघायला सुरुवात केली. अशीच एकदा गुरुद्वारामध्ये ती स्वत: घरी बनवलेली मिठाई घेऊन गेली. ही घरी बनलेली मिठाई लोकांना फार आवडली. तेव्हा तिच्या मैत्रिणीने डिंपलला लोकांकडून ऑर्डर घेण्याबद्दल सुचवलं. डिंपलला जरा संकोच वाटला कारण असं तिने कधीच केलं नव्हतं. पण त्या मैत्रिणीने आग्रहच धरला आणि स्वत:साठीच ऑर्डर दिली.

अशा रीतीने ४ वर्षांपूर्वी डिंपलचं काम हळूहळू सुरू झालं. सुरुवातीला जम बसायला जरा वेळ लागत होता. कारण आरोग्याविषयी जागरूक लोक मिठाई कमीच खातात. मात्र ‘खारे पदार्थ कराल का?’ असं लोक विचारायला लागले तेव्हा तिने शाकाहारी पदार्थाची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. तिच्याकडे आता जवळपास वर्षभर खाऱ्या पदार्थाच्या म्हणजे स्नॅक्सच्या ऑर्डर्स असतात. सगळ्या प्रकारची शेव, पापडी, मठरी या टिकाऊ पदार्थाबरोबरच समोसे, कचोरी, बटाटेवडे, ब्रेड रोल्स, व्हेज पफ, आलू टिक्की असे सगळे प्रकार ती ऑर्डर घेऊन बनवून देते. मला वाटलं होतं की मठरी वगैरेसारखे प्रकार तिच्याकडे लगेच तयार मिळतील. पण ती असं तयार सामान विकत नाही, कारण तिला वाटतं ते ताजं ताजं बनवलेलं जास्त चांगलं लागतं. हे पदार्थ खूप टिकाऊ नसल्यामुळे बनवून साठवून ठेवले तर त्यांना वास येतो. त्यामुळे कुठल्याही पदार्थाची ३ ते ४ दिवस आधी ऑर्डर द्यायला लागते. मला देखील तिचा हा विचार योग्यच वाटला आणि तिने बनवलेल्या वस्तू एवढय़ा लोकप्रिय का आहेत ते देखील लक्षात आलं.

अनेक लहान-मोठय़ा पाटर्य़ामध्ये मी तिने बनवलेले स्नॅक्स खाल्ले आहेत. अत्यंत चविष्ट आणि उत्तम गुणवत्तेचे हे पदार्थ असतात. ती उत्साहाने म्हणाली, ‘‘मी जे तेल घराच्यासाठी वापरते किंवा बटाटे अथवा इतर साहित्य घरी वापरते तेच या ऑर्डर्ससाठीही वापरते. कुठल्याही होलसेल बाजारातून काही आणत नाही.’’ कारण मुळात नुसताच पैसा कमावणे हा तिचा उद्देश नाही. जे काम आवडतं ते ती करतेय. त्यामुळे जेव्हा मुलांच्या परीक्षा असतात किंवा ती आजारी असते तेव्हा ती ऑर्डरला चक्क नाही म्हणून सांगते. ती म्हणते, ‘‘मुलं, त्यांची जबाबदारी प्रथम.’’ जेव्हा कुटुंबातले लोक त्यांच्या कामात व्यग्र असतात तेव्हा ती तिचा उद्योग करते.

‘‘पण मग तुझ्या मिठाईच्या आवडीचं काय?’’, मी विचारलं. त्यावर डिंपल म्हणाली की, ‘‘मिठाई ही केवळ काही विशेष समारंभांपुरती बनवली जाते.’’ गणपती, दिवाळी आणि होळी या तीन सणांच्या वेळी तिला मिठाईच्या भरपूर ऑर्डर्स असतात. मावा बर्फी, मोहनथाल, चॉकलेट बर्फी, काजू कतली, मोतीचूर लाडू असे एक से एक चविष्ट पदार्थ ती बनवते. एक आवड म्हणून एगलेस बेकिंगचा कोर्सही तिने केलाय. अगदी खास भारतीय बेकरीमधील ‘नानकटाई’ ती उत्तम बनवते. तिला रोज दोन तास मदत करायला तिची चिनी मदतनीस येते.

आवड आणि वेळ आहे म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय आज आकाराला आला आहे. लोक आवडीने ते पदार्थ खातात याचंच तिला जास्त समाधान आहे.

दुसरी आणखी एक मैत्रीण मला भेटली ती शांघाय कम्युनिटी सेंटरमध्ये स्मिता सिंग. ‘सीसीएस’मध्ये भारतीय स्वयंपाककला शिकवते. ज्या दिवशी तिचा क्लास असतो त्या दिवशी अख्ख्या सेंटरमध्ये तोंडाला पाणी सुटावं असा सुगंध दरवळत असतो. स्मिता ही अत्यंत उत्साही आणि महत्त्वाकांक्षी तरुणी आहे. दिल्लीमध्ये वाढलेल्या स्मिताला वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि खायला अतिशय आवडतं. आपल्या देशात एवढे भिन्न प्रांतीय पदार्थ आहेत की ते सगळे आपल्याला बनवता यायला हवेत, असं तिला नेहमी वाटे. त्यातूनच तिच्या कुकिंगच्या करिअरची सुरुवात झाली. त्यातच तिच्या नवऱ्याला खाण्याची अतिशय आवड आहे, त्यामुळे तो तिला सतत नवीन पदार्थ बनवायला प्रोत्साहन देत असतो. असं करता करता तिने व्हेज-नॉनव्हेज पदार्थाच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. हळूहळू ओळखीच्या लोकांमध्ये तिच्या पदार्थाची प्रसिद्धी झाली. मग मात्र तिने अजिबात मागे वळून पाहिलं नाही.

नुसत्या ऑर्डर पुरवून ती थांबली नाही तर तिने कुकिंग क्लासेसही सुरू केले. शांघाय हे शहर अनेक देशांच्या लोकांनी गजबजलेलं असतं. सगळ्यांना भारतीय पद्धतीचं जेवण फार आवडतं. त्यातून कुणी जर घरी बनवून देत असेल तर फारच उत्तम. स्मिता खूप अभिमानाने सांगत होती, तिचे ७० टक्के ग्राहक परदेशी आहेत. त्यांना भारतीय रेस्टॉरंटपेक्षा स्मिताने बनवलेला चिकन टिक्का, मसाला रोगन जोश, पनीर मटर, पालक पनीर, दाल तडका, लच्छा पराठा हे आणि असे अनेक पदार्थ अतिशय आवडतात. विदेशी लोक गुणवत्ता आणि स्वच्छतेला जास्त महत्त्व देतात आणि त्याची काळजी स्मिता अगदी तंतोतंत घेते.

सुरुवातीला, व्यवसाय नवीन असण्याच्या काळातही ती न लाजता सगळ्या ओळखी किंवा अनोळखी लोकांशीसुद्धा तिच्या कुकिंगबद्दल बोलत असे. मग हळूहळू १-२ करत आता तिला आठवडय़ाला खूप ऑर्डर मिळू लागल्या. ३०-४० लोकांची पार्टी असो किंवा १०-१२ ची असो, आता तिचं काम भरपूर वाढलं आहे.

तिच्याकडे मदतीला म्हणून एक पूर्णवेळ बाई आहे आणि कधी जर जास्त काम असलं तर अजून एकीला ती बोलावते. भाज्या धुणे, चिकन अथवा मटन साफ करून कापून देणे, या सगळ्या गोष्टी या मदतनीस करतात. बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे तिचे अत्यंत ‘बिझी’ वार आहेत आणि शनिवार, रविवार ती ‘फूड नेटवर्क’ येथे ऑर्डरनुसार पदार्थ देते. या ऑर्डर भरपूर मोठय़ा असतात. तिला दिवसाला १० तास काम करावं लागतं. पण हे तिचं आवडतं काम असल्यामुळे त्यात तिला एक वेगळंच समाधान मिळतं. तिच्या कामाच्या वेळी तिचा नवरा त्यांच्या मुलीला सांभाळतो.

याशिवाय तिचे स्वत:चे  ‘द सोल करी’  नावाने ‘इंडियन कुकिंग’चे क्लासेस सुरू केले आहेत. त्याशिवाय ‘टेस्ट डिस्कव्हरी’ नावाच्या कुकिंग स्कूलमध्येही ती शिकवते. हे सगळं करताना काय काय अडचणी येतात ते सांगताना ती म्हणाली, ‘‘मुख्य अडचण येते खाद्य सामानाची. अचानक काही संपलं तर इथे एकच भारतीय किराणा आणि इतर साहित्य मिळण्याचं दुकान आहे. त्या दुकानात बरेचदा काही वस्तू संपलेल्याच असतात. मग ऑनलाइन ऑर्डर करावं लागतं, शेनझेन किंवा हाँगकाँगमधून. तसंच या वस्तूंच्या किमती भारताच्या मानाने दुप्पट, तिप्पट असतात. पण त्याला काही इलाज नसतो.

तिच्या या सगळ्या मेहनतीचं खरं फळ मिळेल जेव्हा तिचं स्वत:चं रेस्टॉरंट काढण्याचं स्वप्न पूर्ण होईल. ती म्हणाली, ‘‘मी आज हे जे करतेय तो पाया मजबूत करतेय. अजून बरंच पुढं जायचंय.’’ या स्वप्नपूर्तीसाठी तिचा नवरा आणि तिची ६ वर्षांची मुलगी या दोघांचा तिला पूर्णपणे पाठिंबा आहे. बरेच वेळा ऑर्डर्स पोचवायला ती तिच्या मुलीला गाडीतून घेऊन जाते. तेव्हा तिची मुलगी सगळे डब्बे अगदी व्यवस्थित सांभाळते. आणि आईलाच सांगते, ‘‘एक दिवस आपलं रेस्टॉरंट नक्की असेल.’’ ती म्हणते मोठ्ठी स्वप्न बघा आणि त्यांना पूर्ण करण्याच्या मागे लागा. सगळ्या अडचणींना सामोरे जा, पण हिंमत सोडू नका. तुमची स्वप्न एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होतील. स्मिताशी बोलणं संपवताना मलाही असंच वाटत होतं, तिचं स्वप्न नक्की पूर्ण होईल.

या उदाहरणांवरून असं लक्षात येतं की जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कुणीही व्यक्ती चांगला व्यवसाय सुरू करून चांगले बस्तान बांधू शकते. स्त्रियांना उपजतच सतत उद्योगात राहायला आवडते. शिवाय त्यांच्यामध्ये संवाद साधण्याची क्षमताही अधिक असते. मग त्यातूनच विचारांची आणि रीतीभातींची देवाण-घेवाण शक्य होते. नवे नवे पदार्थ करून बघणे आणि ते आवडीने दुसऱ्याला खाऊ घालणे याचीही त्यांना आवड असते. त्यामुळे खाण्याची आवड आहे तिथे तिथे भारतीय महिला आपली खाद्यसंस्कृती पोहचवणारच हे नक्की. एकाच देशातून आलोय हे परदेशात गेल्यावर समजले तर त्यांचे ऋ णानुबंध अधिक घट्ट होतात. तसेच ते एकमेकांना मदत करायलाही तयार असतात. अशा एकमेकांना पूरक ठरणाऱ्या व्यक्तींमधूनच व्यवसाय सुरू होतो त्याचा दर्जा ठेवण्याकडे लक्ष दिले जाते आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याला सहजच वाव मिळू शकतो. अशाच अनेक स्त्रिया आपले भारतीयत्व जपत जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहेच याचा नक्कीच अभिमान वाटतो.

अपर्णा वाईकर chaturang@expressindia.com