मीनाक्षी दादरावाला meenaxida@gmail.com
धर्ममरतडांचे वर्चस्व, लोकसमजुती, कर्मकांड, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांवर इंदिरा गोस्वामी यांची कादंबरी कठोर प्रहार करते, तर कधी समाजातील तरुण विधवा स्त्रियांचे वंचित जगणे, त्यांच्या दडपल्या गेलेल्या शारीर इच्छा, वासना यांचे मर्मभेदक चित्रण करते. मजूर असोत, तरुण विधवा किंवा बळी जाणारे पशू यांच्या विरोधात धारदारपणे व्यक्त होणाऱ्या इंदिरा गोस्वामी यांच्या लेखणीत समाजातल्या या प्रथा बदलण्याची ताकद आहे.
आसामी साहित्यात इंदिरा गोस्वामी ऊर्फ मामोनी रायसम गोस्वामी यांचे नाव बंडखोर लेखिका म्हणून अग्रक्रमाने घेतले जाते. ‘आधालेखा दस्तावेज’ (अर्धीमुर्धी कहाणी) सारखे आयुष्याच्या अर्ध्या टप्प्यावरील आत्मकथन, अनेक कथा आणि विविध कादंबऱ्या अशी त्यांची विपुल आणि कसदार साहित्यनिर्मिती आहे. ‘साहित्य अकादमी’, ‘आसाम साहित्य सभा’, ‘तुलसी पुरस्कार’ आदी पुरस्कारांबरोबरच भारतीय साहित्यातील मानाचा समजला जाणारा ‘ज्ञानपीठ’सारखा सर्वोच्च सन्मानही त्यांना २००० मध्ये मिळाला याचं कारण कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांवर कठोर प्रहार करणारी त्यांची लेखणी. समाजात वर्षांनुवर्षे चालत आलेलं शोषण मग ते मजुरांचं असो वा विधवांचं त्यांनी ते धाडसाने मांडत समाजबदल घडवून आणला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील आसाममधील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे चित्रण त्यांच्या कादंबऱ्यांमधून आले आहे. समृद्ध, सधन, ब्राह्मण, जमीनदार घराण्यातील इंदिरांवर साहित्याचे आणि शिक्षणाचे फार उत्तम संस्कार त्यांच्या वडिलांच्या शिक्षणाधिकारी पदामुळे झाले. शाळेत असतानाच लेखनाची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नसे. कर्मठ ब्राह्मण घराण्यात जन्माला येऊनसुद्धा त्यांनी जात-पात, मान-अपमान कधी मानले नाहीत किंवा कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेचाही कधी विचार केला नाही. स्वत:ला पटलेले कृतीत आणावयाचे ही ठाम भूमिका असल्याने घरच्या मंडळींचा विरोध पत्करून त्यांनी आंतरजातीय विवाह केला. परिसरातील जमीनदारी, सरंजामदारी वातावरणाच्या बेडय़ा झुगारून देऊन माधवन रायसम अय्यंगार या दाक्षिणात्य अभियंत्याशी त्यांनी लग्न केले. हाही एका अर्थाने प्रवाहाविरुद्ध जाण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. माधवनच्या अपघाती निधनानंतर दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून त्यांनी पुन्हा आपल्या लेखणीला जवळ केले. ‘‘लिहिणं माझ्या रक्तातच आहे. नसांतून वाहतं, लिहिणं थांबलं तर मी गुदमरेन. लिहिणं नसलं तर मी मरेनच,’’असे त्यांनी म्हटले आहे.
इंदिरांच्या लेखनात जम्मू-काश्मीर, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा विविध भारतीय प्रदेशांतील मातीचा वास दरवळताना दिसतो. आपले साहित्य सामाजिक बदल घडविण्यासाठी कारणीभूत ठरायला हवे ही त्यांची आस होती. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आसाममधील बदलत्या सामाजिक जीवनाचे पडसाद उमटलेले दिसतात.
इंदिरा गोस्वामी यांच्या साहित्यात सर्वागीण शोषणाचा मुद्दा प्रामुख्याने आलेला दिसतो. हे शोषण पुलाची बांधकामे करणारे मजूर, विधवा स्त्रिया आणि परंपरेने चालत आलेले पशुबळी, त्या रूढीसमोर मान तुकविणारे लोक यांच्या संदर्भातील आहे. विविध ठिकाणी चाललेल्या नद्यांवरील पुलांच्या बांधकामाच्या ठिकाणी लोखंडी सळ्या, मोठमोठे दगड वाहून नेणाऱ्या कामगारांची ठेकेदारांकडून होणारी पिळवणूक त्यांनी पाहिली. मजुरांची संघटना नसल्याने खासगी कंपन्या ठेकेदारांकरवी त्यांना अत्यल्प वेतन देत. तसेच हवे तेव्हा कामावरून कमी करण्याची मुभाही कंपनी अधिकाऱ्यांना होती. या सर्व अनुभवांनी अस्वस्थ होऊन कामगारांच्या हलाखीचे वर्णन करणारी ‘चिनाबोर स्रोत’ (चिनाबचा प्रवाह) त्यांनी लिहिली. ‘मामरे धारा तरोवार’ (गंजलेली तलवार) ही कादंबरीसुद्धा मजुरांचे शोषण, व्यवस्थापक, बांधकामावरील कामगारांच्या वसाहती यांना कवेत घेणारी कादंबरी आहे.
‘आधालेखा दस्तावेज’ (अर्धीमुर्धी कहाणी) या आत्मकथनाच्या उत्तरार्धात वृंदावन, मथुरा येथे राहणाऱ्या वृद्ध विधवा स्त्रियांच्या विपन्नावस्थेचे वर्णन आले आहे. पूर्व बंगालमधील विविध भागांमधून आलेल्या या विधवांना उत्पन्नाचे काही साधन नसे. स्वत:च्या उत्तरक्रियेसाठीसुद्धा पैसे जपून ठेवावे लागत. उपाशी, अन्नासाठी लाचार झालेल्या या असहाय विधवांची कहाणी त्यांच्या ‘नीलकंठी वज्र’ या कादंबरीत अधोरेखित झाली आहे. या कादंबरीची नायिका सौदामिनी हिच्या चित्रणात इंदिरांच्या त्या वेळच्या निराश आणि दु:खी मन:स्थितीचे रंग उमटलेले दिसतात. आसाममधील उच्चवर्णीय ब्राह्मण कुळातील विधवा स्त्रियांना कोणतेही हक्क नव्हते. संपत्तीमधील वाटा त्यांना दिला जात नसे. ‘उने खोवा हौदा’ (मत्त हत्तीचा वाळवी लागलेला हौदा) या कादंबरीत भारतीय स्वातंत्र्याच्या पाश्र्वभूमीवर आसाममधील सात्राच्या परिसरात घडलेल्या विविध सामाजिक समस्यांचा वेध घेतला आहे. जुन्या परंपरांच्या जोखडासाठी दबलेल्या समाजात हळूहळू नव्या प्रागतिक विचारांचा शिरकाव, गोसाई समाजातील तरुण विधवा स्त्रियांचे वंचित जगणे, त्यांच्या दडपल्या गेलेल्या शारीर इच्छा, वासना यांच्याबरोबरच अतिशय कर्मठ बदलाला नकार देणारी सरंजामशाही परंपरा या सर्वाचे मर्मभेदक चित्रण या कादंबरीत येते. मार्क साहेबसारख्या ब्रिटिश तरुणावर गिरीबालेसारख्या तरुण विधवा स्त्रीने समाजाला असंमत असलेले प्रेम करण्याचे दाखविलेले धाडस आणि स्वबलिदानात त्याची होणारी परिणती हा कादंबरीचा कळसाध्याय आहे. सरू नावाची गोसाई समाजातील विधवा स्त्री समाजव्यवस्थेचा बळी ठरते, तर दुर्गासारखी विधवा स्त्री आपल्या कस्पटासमान, सांदीकोपऱ्यात असणाऱ्या अस्तित्वाशी झगडते. त्यातून सुटकेची पळवाट शोधते. व्यवस्थेच्या विरुद्ध जाणारी दुर्गा यात भेटते. सात्रमधील आपल्या समानशील स्त्रियांसंदर्भात ती एक ठाम भूमिका घेते. आसाममधील उच्चवर्णीय कुळातील विधवा स्त्रियांचा जुन्या कालबाह्य़ रूढींशी चालणारा हा ठाम लढा प्रत्यक्षातसुद्धा परिणामकारक ठरला. विधवा स्त्रियांची अवहेलना आणि विटंबना थांबली. त्यांना वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळू लागला. ‘दक्षिण कामरुप’मधील धर्ममरतडांचे वर्चस्व, लोकसमजुती, कर्मकांड, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांवर ही कादंबरी कठोर प्रहार करते.
पुरुष-सहवासाची स्वाभाविक इच्छा आणि प्रखर जात्यभिमान याच्यातील द्वंद्व इंदिरांच्या ‘वंश’सारख्या कथेत आढळते. बांगारा ब्राह्मण कुळातील तरुण, देखणी विधवा दमयंती पोटासाठी शरीरविक्रय करते, पण पीतांबरसारख्या महार समाजातील महाजनाला सुरुवातीला नाकारते. परंतु ‘हिंदू काय, मुसलमान काय, ब्राह्मण काय, कायस्थ काय एकाच मातीच्या खापराचे तुकडे! ज्याचं मांस चिरलं तर जिवंत उष्ण रक्त धावत येईल अशा अंगाचा फक्त एक पुरुष हवाय् मला’’ अशी आपली वासनाही उघडपणे व्यक्त करण्याचे धाडस तिच्यात आहे. सात्रामधील कर्मठ ब्राह्मण समाजाच्या रीतिरिवाजांना धुडकावून देण्याचा बंडखोरपणा तिच्यात आहे. ती अगतिक नाही.
‘छिन्नमस्तार भानूदरो’ (छिन्नमस्ता -अनुवाद अर्चना मिरजकर) यात आसाममधील कामाख्या मंदिर, त्याच्याशी निगडित लोकश्रद्धा, लोकसमजुती, धार्मिक परंपरा यांचे सखोल चित्रण आले आहे. परंपरेने हजारो वर्षे चालत आलेल्या पशुबळीच्या विरोधात कादंबरीतील व्यक्तिरेखा, छिन्नमस्ताचा जयधारी संन्यासी, ब्रिटिश स्त्री डोरोथी ब्राऊन, चित्रकार रत्नधर आणि विधीबाला आवाज उठवतात.
पशुबळीच्या विरोधात बंड करणाऱ्या आसामी साहित्यिकांमध्ये इंदिरा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दोन विरुद्ध विचारधारांच्या अहिंसा आणि हिंसा यांच्या द्वंद्वात गरिबी, निरक्षरता, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांनी वेढलेल्या कामरुपच्या लोकजीवनाची ही अस्सल कहाणी आहे.
आपल्या लेखनातून इंदिरा यांनी आसाममधील सामाजिक वास्तव प्रखरपणे मांडले आहे. रेडय़ांचे बळी देण्याची प्रथा आसाममध्ये वर्षांनुवर्षे सुरू होती. ‘रक्त पाहणे हा जणू लोकांचा खेळ होता.’ ‘छिन्नमस्ता’ या पाशवी प्रथेला विरोध केल्यामुळे समाजात खळबळ माजली. पण कालांतराने इंदिरांचे विचार समाजाला पटू लागले. या कादंबरीचा थेट परिणाम समाजावर झाला. स्त्रियांनी आणि तरुणांनी आंदोलने केली. कामाख्या मंदिरात नेपाळच्या राजालाही पशुबळीपासून दूर जावे लागले.
‘थेंगफक्री तहसीलदाराची ब्राँझ तलवार’ या कादंबरीत ब्रिटिश राजवटीत करवसुली करणाऱ्या, घोडय़ावर बसून तलवार फिरवणाऱ्या धाडसी थेंगफक्रीची कहाणी आली आहे. ज्या काळात आसाममध्ये बालविवाह सर्रास सुरू होते, सती जाणाऱ्या स्त्रिया होत्या, उंबरठय़ाबाहेर पडण्याची स्त्रियांना मुभा नव्हती, त्या काळात थेंगफक्री गावागावातून करवसुली करण्यासाठी घोडय़ावरून फिरत असे. लोककथा, लोकसमजुती यांच्या सामग्रीतून इंदिरा यांनी थेंगफक्रीची व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. सफाईने तलवार चालवणारी थेंगफक्री नंतर भूमिगत बोडो आंदोलनात सामील होते.
इंदिरा गोस्वामी स्वत:ला मानवतावादी लेखिका मानत असत. मानवतावादी लेखकाच्या लेखनात स्त्रीवाद आपोआप येतो असे त्यांचे मत होते. वृंदावनातील विधवा स्त्रियांबद्दल त्यांनी निर्भीडपणे आणि मोकळेपणाने लिहिले. जननिंदेची, समाजाच्या विरोधाची पर्वा केली नाही. समाजात स्त्रियांच्या प्रश्नांवर जागृती व्हावी असे त्यांना वाटत असे आणि आपण लेखिका असल्याने हे सामाजिक प्रबोधनाचे काम आपण करू शकलो याविषयी त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे.
सगळ्या भारतीय भाषांसाठी इंदिरा गोस्वामी यांचे लेखन ही सन्मानाची गोष्ट झाली आहे. स्वत:कडे, आयुष्याकडे कठोर अलिप्तपणे पाहण्याची ताकद, जगणे आणि त्यातले सगळे ताण व्यक्त करण्याचे कलात्मक बळ परिसराची विविधता, शोषणाची गुंतागुंत ओळखायची चिंतनक्षमता हे सगळे त्यांच्या साहित्यातून व्यक्त होत असताना जगाविषयी तुच्छताभाव किंवा कडवटपणा जाणवत नाही, तर असते अपार करुणा आणि सहानुभाव, समजूतदारपणा!
निवडक पुस्तके
आत्मकथन
आधालेखा दस्तावेज (अर्धीमुर्धी कहाणी)
कादंबरी
चिनाबोर स्रोत (चिनाबचा प्रवाह) मामोरी धारा तलवार (गंजलेली तलवार)
नीलकंठी वज्र
उने खोवा हौदा (मत्त हत्तीचा वाळवी लागलेला हौदा)
chaturang@expressindia.com