पावटा ही वनस्पती शेंगवेल या प्रकारात मोडते. पावटय़ाच्या हिरव्यागार शेंगा भाजीसाठी उपयोगात आणल्या जातात. मराठीत पावटा, संस्कृतमध्ये निष्षाव, इंग्रजीमध्ये हायशिन्थबेन, तर शास्त्रीय भाषेत लाबलाब परपुरिअस या नावाने ओळखली जात असून तो पॅपिलिओनसी या कुळातील आहे. पावटा या वनस्पतीच्या वेलीची फुले जांभळी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. त्याची पाने ही लांब दांडय़ाची असतात. पावटय़ाच्या देठ हा लांब मऊ असतो. पावटा वेलाची लागवड भाजी उत्पादनासाठी संपूर्ण भारतात केली जाते. शेतामध्ये, घराजवळ तसेच घराजवळील परसबागेमध्ये याचे उत्पादन घेतले जाते. खाण्यासाठी भाजी म्हणून पावटय़ाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

औषधी गुणधर्म
आयुर्वेदानुसार पावटा हा दीपक, पाचक, बलकर, वेदनाशामक, स्तंभक व ज्वरघ्न आहे. आधुनिक शास्त्रानुसार पावटय़ामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय पिष्टमय पदार्थ ब व क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामध्ये असणाऱ्या या औषधी गुणधर्मामुळेच त्याचा वापर विविध आजारांवर केला जातो.

nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
mangroves survey in mumbai
खारफुटीचे नव्याने सर्वेक्षण; महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर सर्वेक्षण करणार
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे

उपयोग
० जर आम्लपित्ताचा त्रास होऊन पोटामध्ये जळजळ व वेदना जाणवत असतील तर त्या थांबविण्यासाठी पावटय़ाच्या शेंगाचा काढा करून पिण्यास द्यावा.
० काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी अति प्रमाणात रक्तस्राव होतो व त्या रक्तस्रावामुळे पोटात वेदनाही होतात. अशा वेळी पावटा गुणकारी ठरतो. पावटय़ाचा रस अर्धा कप सकाळी व संध्याकाळी पिण्यास दिल्याने त्याच्या स्तंभक व वेदनाशामक गुणांमुळे मासिक रक्तस्राव कमी होऊन पोटातील वेदना थांबतात.
० जर तापाचा वेग जास्त प्रमाणात वाढला असेल तर शरीराचा ताप कमी करण्यासाठी पावटय़ाचा रस पिण्यास द्यावा.
० भूक कमी लागणे, अपचन, आम्लपित्त या विकारांवर पावटा गुणकारी ठरतो. पावटा खाल्ल्याने शरीरातील आमाशयाला (जठराला) बल मिळते व त्यातून वरील आजार कमी होतात.
० शरीरावर बऱ्याच दिवसांची जुनी जखम झालेली असेल तर ती जखम भरून येण्यासाठी व तेथील वेदना कमी करण्यासाठी पावटय़ाच्या शेंगाची भाजी करून नियमित खावी व पावटय़ाचा कल्क जखमेवर लावावा.
० कान ठणकत असेल तर अशा वेळी पावटय़ाचा गाळलेला रस कानात २ थेंब टाकावा. यामुळे ठणका लगेचच कमी होतो.
० अंगावरून पांढरे पाणी जात असेल (श्वेतस्राव) तर पावटय़ाचा काढा करून अर्धा कप दोन वेळा घ्यावा.
० ओटीपोट व कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी पावटय़ाची भाजी नियमितपणे आहारात खावी.
० आयुर्वेदामध्ये पावटे व वाल या दोन्ही भाजीच्या शेंगांना निष्पाव हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. या वनस्पतींची बरेचसे गुणधर्म सारखे आहेत.

सावधानता
पावटा या वनस्पतीचा औषधी म्हणून सर्व अंगाचा उपयोग केला जातो. फक्त मुळाचा उपयोग केला जात नाही. कारण मूळ हे काही प्रमाणात विषारी असते. त्याचा वापर केल्यास शरीराला ते बाधू शकते.

डॉ. शारदा महांडुळे sharda.mahandule@gmail.com