खोल डोहात फुटावे असंख्य बुडबुडे तशा फुटताहेत हजारो किंकाळ्या रोज
चिमुकल्या गर्भाशयाच्या.
डोंगर-दऱ्यांतून घुमताहेत सूर भेसूर अश्रूंच्या प्रपातांचे
शरीरावर कोसळणारे मुंगळे पसरत चालले आहेत
घरदार, नदी, पहाड पादाक्रांत करत.
मुली धावताहेत सैरावैरा
शोधत द्रौपदीला वस्त्र पुरवणाऱ्या कृष्णाला.
तर तोच शोधत असतो जागा
गोपींनी उतरवलेली वस्त्र लपवण्यासाठीची.
हताश मुली शिरतात गाभाऱ्यात
तर आत काहीच दिसत नाही काळोखाशिवाय
मागे परततात वेगानं
तर दारं बंद होत जातात प्रकाशाची.
युगानुयुगे अंधार अंगावर घेत चित्कारत राहातात त्या मिटल्या ओठांनी.
मुली धावताहेत निरंतर मनातल्या मनात
नेमकं कोणापासून वाचवायचं आहे स्वत:ला हेही विसरल्यात मुली.
त्या बसून राहातात घरटय़ातल्या पाखरांसारख्या चिडीचूप.
नुसत्या चाहुलीनेही ठोका चुकतो छातीचा.
पंखांचा फडफडाट करत त्या ओढून घेतात स्वत:ला आत आत
आपल्याच गर्भात.
मुलींना वाटतं मुटकुळं करावं स्वत:चं आणि लोटून द्यावं आत.
बंद करून दार गर्भाशयाचं स्वस्थ पडून राहावं उबदार.
पण फोडलेल्या दारातून कोसळत राहातात वीर्याचे उन्मादी लोट.
मुली थरथरत राहातात पावसानं झोडपलेल्या वेलीगत.
मुली मरतात रोज हजारो मरणं
मरताना त्यांच्या डोळ्यांत उतरत नाही माजावर आलेल्या पुरुषांची छबी.
की उन्मत्त सत्तेचा हिंस्र चेहरा
उमटतं फक्त आश्चर्य.
आपल्या तोंडात पुरुषार्थ कोंबणाऱ्या
त्याच्या मनगटावरचा लाल पिवळा धागा कोणाच्या विश्वासातून रंगला असेल?
असा प्रश्न पडतो त्यांना
क्रूसाला लटकवलेल्या आपल्या सताड उघडय़ा डोळ्यांनी
मुली पाहात राहतात त्या धाग्याकडे
त्याच्यामागच्या असंख्य कहाण्या आठवत मुली मिटतात डोळे कायमचे
तेव्हा थिजलेल्या डोळ्यांत साचत जातं थारोळं
संस्कृती नावाच्या काळ्याकभिन्न वास्तवाचं.
– नीरजा