भाषेची गोडी गोष्टींच्या पुस्तकांतून अधिक लागते आणि एकदा भाषा समृद्ध होऊ लागली की इतर कौशल्येही सहजपणे विकसित होतात. हे लक्षात घेऊन टोरांटोस्थित डॉ. आशा पावगी यांनी मेळघाटात ‘नचिकेत बाल वाचनालय’ सुरू केलं. आज तेथील २० पेक्षा जास्त वाचनालयांचा पाच हजारांहून अधिक विद्यार्थी लाभ घेत आहेत. त्यातून त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणं सोपं जात आहे. म्हणूनच अशा वाचनालयाची चळवळ आपल्या देशांत तळागाळांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आजच्या बालदिनानिमित्त खास लेख.
आपल्यापैकी अनेकांचं बालपण हे आई-वडील, आजी-आजोबा किंवा शिक्षक अशा मंडळींनी सांगितलेल्या कथा-कहाण्यांनी समृद्ध झालय! गोष्टींतून लहानग्यांना होत जाणारी भाषेची ओळख, पुढे स्वत:च पुस्तक वाचून समृद्ध होणारी त्यांची भाषा आणि इतर आनुषंगिक कौशल्ये असं सर्व एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द होत असे. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मुलांना गोष्टी सांगायला वेळ नाहीए. तर ग्रामीण भागात तशी जाणीवच फारशी नाही. अधिक कुशल, बुद्धिमान, तरल, संवेदशील असं नीतिसंपन्न मनुष्यबळ जर आपल्याला हवं असेल तर त्यासाठी शालेयच नव्हे तर पूर्व शालेय शिक्षणाचा ढाचा समूळ पालटावा लागेल आणि त्यासाठी मुलांना शब्दसंस्कृतीची ओळख शक्य तेवढय़ा लहान वयात करून द्यावी लागेल, जेणेकरून पुढे त्यांच्यात वाचनसंस्कृती वाढीस लागेल.
अनेक देशांत हे प्रयत्न युद्ध पातळीवर केले जात आहेत. परंतु काही मोजके अपवाद सोडले तर आपल्या देशात मात्र अजूनही अशा उपक्रमांची वानवा आहे. भाषा, वाचनसंस्कृती आणि मुलांचा सर्वागीण विकास हाच केवळ ध्यास असणाऱ्या
डॉ. आशा पावगी यांनी ही समस्या आपल्या परीनं का होईना सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. आशा पावगी यांचं वास्तव्य कॅनडातील टोरांटो इथे गेल्या ४५ वर्षांपासून आहे. अनेक अनिवासी भारतीय परदेशात राहूनही आपल्या मातृभूमीप्रति असलेली ओढ, तिच्या विकासाची आस उघडपणे व्यक्त करतात. समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी आर्थिक मदत करतात. त्यातल्याच त्या एक. कॅनडात अगदी लहान मुलांना भाषा शिकवण्याचे जे प्रयत्न केले जातात ते पाहून त्या केवळ अचंबित झाल्या नाहीत तर आपल्या देशातही हे प्रयोग राबवले जावेत यासाठी त्या जिवाचे रान करत आहेत.
डॉ. आशा पावगी (पूर्वाश्रमीच्या आशा काळे) या मूळच्या अमरावतीच्या! अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. बायोकेमिस्ट्री या विषयात एम.एस्सी. झाल्या झाल्याच त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती टोरांटो इथे वास्तव्यास असल्यानं विवाहानंतर त्याही टोरांटो येथे स्थायिक झाल्या. काही काळ स्थिरस्थावर होण्यात गेला. अभ्यासू आशाताईंना निष्क्रिय बसणं शक्य नव्हतं. शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक समस्येकडे बघणं, स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत, त्यामुळे मनात निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं मिळवण्यासाठीची अविश्रांत धडपड हे महत्त्वाचे पैलूदेखील त्यांच्या पीएच.डी.साठी पूरक ठरले. अखेरीस त्यांच्या मेहनतीला फळ आलं आणि त्यांना टोरांटो विद्यापीठानं पीएच.डी. प्रदान केली. ‘ऑन्टेरिओ कॅन्सर इन्स्टिटय़ूट’मध्ये काही र्वष त्यांनी ‘पोस्ट डॉक्टोरल फेलो म्हणून काम केलं. टोरांटो विद्यापीठात रिसर्च असिस्टंट व फॅकल्टी ऑफ फार्मसी म्हणूनही त्या गेले कित्येक र्वष अध्यापन आणि संशोधन करीत होत्या. ‘फंक्शनिंग ऑफ सेल मेम्ब्रेन अंडर नॉर्मल अॅण्ड डिसीज्ड स्टेट’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय राहिला आहे. निवृत्तीनंतर ‘चाइल्ड सायकॉलॉजी’ या विषयावर आशाताईंनी सखोल अभ्यास केला आणि या विषयाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण लेख त्यांनी कॅनडातील मासिकं, वृत्तपत्रांमधून लिहिले आहेत. आज त्याचं आणखी एक स्वप्न प्रत्यक्षात आलंय. अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाटात आदिवासी मुलांसाठी चालवलेल्या, ‘एमएसएसओ’चाच एक प्रकल्प असलेल्या नचिकेत बाल वाचनालयाचा लाभ हजारो मुलं घेत आहेत.
त्यांच्याशी या उपक्रमाविषयी बोलणं झालं तेव्हा कॅनडातील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल डॉ. पावगींनी सांगितलं, ‘‘मी ४५ वर्षांपूर्वी इथं आले आणि इथल्या सामाजिक जीवनाशी माझी नाळ जुळली ती आमच्या घराजवळ असणाऱ्या स्थानिक वाचनालयाद्वारे! इंग्रजी आणि मराठी दोन्हीही भाषांतून वाचायला मला आवडतं. टोरांटोची ‘पब्लिक लायब्ररी सिस्टीम’ अतिशय प्रभावी आहे. इथली संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थाच शिकणं आणि वाचणं याच्यात गुंफली आहे. इथे लोक नियमित वाचनालयात जातात. इथली वाचनालये शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींची प्रमुख केंदं्र आहेत हे लवकरच माझ्या लक्षात आलं.’’
‘‘कॅनेडियन पब्लिक स्कूल बोर्ड आणि पब्लिक लायब्ररी सिस्टीम हे एकाच वर्षी, १९८४ मध्ये सुरू करण्यात आले. कदाचित यामुळेच असं म्हणता येईल की पालकांच्या शिक्षणावर किंवा आर्थिक ऐपतीवर मुलांचं शिक्षण अवलंबून राहू नये ही काळजी इथं घेतली जाते. या वाचनालायांद्वारे अत्युत्कृष्ट सेवा दिली जाते. हे सगळं बघून मी स्तिमित होत होते. मला सारखं असं वाटत होतं की माझ्या देशात हे सगळं का होत नाही, इथल्या सर्व स्तरांतल्या मुलांना वाचनालयं का उपलब्ध असू नयेत? त्यांनाही इथल्यासारखीच सेवा मिळायला हवी. खरं तर जगभरातील सर्वच मुलांना असा ‘अॅक्सेस’ असायलाच हवा!’’
विदर्भातील मेळघाट क्षेत्राचीच निवड आपल्या उपक्रमासाठी का केली या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘‘आपण जिथं जन्मलो, शिकलो-सावरलो आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात ताठ मानेनं वावरण्यासाठी सक्षम झालो त्या मातीचं, तिथल्या माणसांचं आपण काही देणं लागत असतो. कारण आपल्या जडणघडणीत तिथल्या समाज जीवनाचा मोठाच सहभाग असतो. योगायोगानं आपण सुशिक्षित, सुसंस्कृत आणि संपन्न कुटुंबात जन्मलो म्हणून अनेक संधींची कवाडं आपल्याला खुली झाली. मात्र ज्यांच्यासाठी ही कवाडं सदैव बंद राहिली, त्या मागास समाजासाठी आपण काही तरी करावं या उद्देशाने आम्ही ‘नचिकेत बाल वाचनालय’ या उपक्रमाची सुरुवात अमरावती जिल्हय़ातील आदिवासी व इतर मागासवर्गीयांसाठी केली. मुलांना सहज समजतील अशी सोप्या भाषेतील अनेक विषयांतली अक्षरश: हजारो पुस्तकं शोधली आणि विकत घेतली. भाषेची गोडी ही गोष्टींच्या पुस्तकांतून अधिक लागते आणि एकदा भाषा समृद्ध होऊ लागली की इतर कौशल्यं विकसित होण्यास हातभार लागतो, हाच त्या मागचा उद्देश.’’
हे काम अर्थातच एकटीदुकटीचं नव्हे! आपली संपूर्ण प्रशिक्षित टीम त्यांनी या सत्कार्यासाठी तयार केली आहे. ‘नचिकेत बाल वाचनालय’ या उपक्रमाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी
पाडय़ांमध्ये आपल्या टीम सदस्यांच्या मदतीनं त्या हा कार्यक्रम राबवत आहेत. ‘नचिकेत बाल वाचनालय’ ही महाराष्ट्रातील एक नोंदणीकृत विश्वस्त संस्था (चॅरिटेबल ऑर्गनायझेशन) आहे. नि:शुल्क वाचनालयांचं जाळं पसरवणं, औपचारिक शिक्षणात सहकार्य करणं, सांस्कृतिक आणि सामाजिक जाणिवा समृद्ध करणं आणि त्याद्वारे सुसंस्कृत नागरिक निर्माण करणं, मुलांच्यातील सुप्त कलागुण पारखून त्यांना प्रेरणा देणं, कुटुंबांतून वाचनसंस्कृती पोहोचवणं आणि वाढवणं ही ‘नचिकेत बाल वाचनालय’ संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या प्रकल्पाचे लाभार्थी असणाऱ्या अनेकांचे अनुभव या प्रकल्पाशी संबंधित सर्वाचाच हुरूप वाढवणारे आहेत.
मयूरी घाटोळ ही अमरावती जिल्हय़ातील शिरजगाव या जेमतेम दोनेक हजार लोकवस्ती असलेल्या खेडय़ातली मुलगी! ‘काला अक्षर भैस बराबर’ अशा पद्धतीचं घरातील आणि एकूणच आजूबाजूचं वातावरण! गुरं-ढोरं चारून झाल्यावर वेळ मिळाला तर मुलीला शाळेत पाठवण्याची मानसिकता! पण ‘नचिकेत बाल वाचनालया’ने तिला पुस्तकांद्वारे बाहेरच्या जगाची पाऊलवाट दाखवली. विज्ञान हा विषय अनेकांना अवघड वाटतो. पण इथल्या साध्या, सोप्या भाषेतील विज्ञानविषयक पुस्तकांमुळे तिच्यात या
विषयाबद्दल खास आवड निर्माण झाली.
दहावीला उत्तम गुण मिळवून तिला आता अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला आहे. बायोकेमिस्ट्री या विषयात पुढील शिक्षण घेऊन ‘मानवी रक्त’ या विषयात तिला संशोधन करायचं आहे, असं ती सांगते. रुपेश ढोले आणि दिनेश महाजने या ‘जुना धामणगाव’ या खेडय़ातील मुलांच्या घरीही मयूरीसारखीच परिस्थिती! पण ‘नचिकेत’मध्ये येऊन वाचनाची आवड निर्माण झाली आणि आपल्याच गावाला, शेतीला पडत असलेला प्रदूषणाचा विळखा, पाण्याचं दुर्भिक्ष, नापिकी यांचा फटका त्यांना हळूहळू जाणवत गेला. पुस्तकांतून त्यांची कारणंही कळू लागली. या दोघांनाही ‘इकोलॉजी’ या विषयात उच्च शिक्षण घ्यायचं आहे. या दोघांनाही जिल्हा स्तरावर भरवल्या जाणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात त्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या गावासाठी, शेतीसाठी आणि पाण्याच्या प्रश्नावर काही करायची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. याच परिसरातील दहावीच्या चार विद्यार्थिनींना यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. ‘नचिकेत बाल वाचनालया’ने आमच्यातील अभ्यासाची भीती काढून टाकली, असं त्या मुली सांगतात.
शिरजगाव येथील ९ वीत शिकणारी आणि त्यासोबतच ‘नचिकेत’ची ग्रंथालयात मदत करणारी राजश्री तायडे म्हणते, ‘‘मला या वाचनालयातली ‘अ बुक ऑफ मॅजिक’, ‘फन वुइथ मॅथ्स’, ‘प्लॅनेट अर्थ’, ‘मॉम, टेल मी अ स्टोरी’सारखी पुस्तकं खूप आवडतात. ‘अॅस्ट्रोनॉमी’ या विषयात मला पुढचं शिक्षण घ्यायचंय.’’ असे कित्येक प्रेरणादायी किस्से इथे रोज ऐकायला मिळतात.
‘नचिकेत बाल वाचनालय’ हे केवळ मुलांसाठी नाही. कुटुंबीयांचा, आसपास वावरणाऱ्या सर्वाचा सहभाग असलेलं हे अनोखं वाचनालय आहे. या निमित्तानं घरातील बायाबापडय़ा, बाप्ये, ताया, दादा आदी सर्वानी रोज अगदी थोडा वेळ आपल्या घरातील किंवा परिसरातील मुलांना गोष्टी सांगायच्या असं त्याचं स्वरूप आहे. अनेकांना पुस्तकात काय लिहिलं आहे हेच वाचता येत नाही. पण चित्रे बघून गोष्ट काय आहे हे मुलांना शिकवलं जातं. ‘टीम नचिकेत’ यासाठी सर्वतोपरी मदत करते. आधी मोठय़ांना ते या पुस्तकातील गोष्टी समजावून सांगतात. मग ते इतर चार जणांना आणि मग मुलांपर्यंत त्यांच्या भाषेत ती गोष्ट पोहोचवली, सांगितली जाते.
‘एव्हरी चाइल्ड रेडी टू रीड’ हे जगभरातील वाचनालयांनी प्रसारित केलेलं घोषवाक्य या उपक्रमाच्या मुळाशी आहे. निम्न उत्पन्न गटातील स्त्रियांना या वाचनालायाद्वारे पुस्तकं, चित्रवह्य़ा, रंगपेटय़ा सामग्री घरी नेता यावी, अशी व्यवस्था या वाचनालयामार्फत करून देण्यात येते. या मातांना आधी ‘टीम नचिकेत’ संपूर्ण प्रशिक्षित करते आणि मुलांना शाळेत जायच्या वयाच्या आधीपासूनच गोष्टींचं साम्राज्य खुलं कसं होईल यावर भर देते.
यात निवडली गेलेली पुस्तकं ही सहज, सोपे शब्द असणारी, चित्रांचे उत्तम स्पष्टीकरण असलेली, वजनाला हलकी आणि शक्य तो मातृभाषेतून असतील यावर ग्रंथपालाचा कटाक्ष आहे. एकदा का मातृभाषेचं ज्ञान झालं की इतर भाषांतील पुस्तकांचा समावेश थोडय़ा मोठय़ा मुलांसाठी केला जातो. नचिकेत टीमची सदस्य असलेली, कॅनडात वास्तव्य असणारी विदिता पांडे नेमाने वर्षांतून दोनदा भारतात येऊन इथल्या टीमला प्रशिक्षण देते.
२००४ साली सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आज २० हून अधिक बाल वाचनालयं मेळघाटात चालवली जात आहेत. सध्या पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होतो आहे. यासाठी लागणारी जागा व इतर आर्थिक मदत ही ‘एमएसएसओ’ आपल्या निधीतून तर उरलेली देणग्यांच्या माध्यमातून उभी केली जाते. गावात अगदी मोक्याच्या ठिकाणी एखादी जागा भाडय़ानं घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात येतो, जेणेकरून सर्वाना सोयीस्कर होईल. यासाठी स्वयंसेवकांची एक टीम तर काही पगारी ग्रंथपालांची नेमणूक करण्यात येते. शाळेच्या नियमित तासानंतर ४ तासांपर्यंत तर सुट्टय़ांच्या दिवशी दिवसभर हे वाचनालय खुलं ठेवण्यात येतं. वाचनालयात ८०० हून अधिक पुस्तकं असतात, ज्यात वैश्विक, राष्ट्रीय, स्थानिक तसंच नकाशे आदी विभाग संदर्भासाठी आहेत.
नववीचे विद्यार्थी पालक-वाचक मेळावे भरवतात आणि वाचनाचं, गोष्टींचं महत्त्व विशद करून सांगतात. मुलांना सुरक्षित, निवांत जागी सहज हाताळता येतील अशी पुस्तकं इथं प्राधान्यानं ठेवली जातात. वाचनालयातील भिंती उत्तम चित्रांनी रंगवून आणि क्रिएटिव्ह फर्निचर तिथे ठेवून वातावरण प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी प्रत्येक वाचनालयात नचिकेत टीमचे सदस्य जातीने हजार असतात. ही सर्व सेवा नि:शुल्क आहे, हे विशेष नमूद करायला हवं. या उपक्रमाचे प्रमुख सल्लागार म्हणून मुंबईस्थित डॉ. शरद वागळे, उपाध्यक्षा म्हणून अमरावतीच्या डॉ. संजीवनी गणोरकर तर सचिव म्हणून अनघा काळे ही मंडळी काम बघत आहेत.
या उपक्रमाची सुरुवात झाली ती द्रष्टेपणातून आणि तेही जवळपास ३० वर्षांपूर्वी. टोरांटोस्थित डॉ. जगन्नाथ वाणी या सांख्यिकीतज्ज्ञ असलेल्या परोपकारी, दानी व्यक्तीनं कॅनडास्थित अनेक भारतीय विद्वानांना देशासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं की आणि त्या सगळ्यांनी मिळून १९८४ साली ‘महाराष्ट्र सेवा समिती ऑर्गनायझेशन’ (एमएसएसओ) या संस्थेची स्थापना केली. ‘एमएसएसओ’ ही संस्था महाराष्ट्रात धुळे येथे अंधत्व निर्मूलन, शारीरिक विकलांग असलेल्या विशेष मुलांसाठी, तसेच बालमजुरीविरोधात कोल्हापूर येथे, मायक्रो फायनान्सिंगसाठी बहादरपूर येथे, तर ‘नचिकेत बाल वाचनालय’ अमरावती जिल्हय़ातील मागास विभागात असे विविध प्रकल्प राबवत आहे.
डॉ.आशा पावगी या एमएसएसओच्याच एक शिलेदार! डॉ. पावगी यांच्या या कार्याचा गौरव म्हणून टोरांटो येथून प्रसिद्ध होणाऱ्या देसी (ऊएरक) मॅगेझिनने त्यांचा ‘ग्रँट्स देसी अचिव्हर अॅवॉर्ड’ (२०१२) देऊन सन्मान केला आहे. दक्षिण आशियाई देशांतील व्यक्तींना विशिष्ट सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
मेळघाट परिसरात त्यांनी सुरू केलेला हा नचिकेत वाचनालयाचा प्रयोग यशस्वी होताना दिसतो आहे. ‘‘याकडे पायलट प्रोजेक्ट म्हणून बघायला हरकत नाही. हे मॉडेल राज्यभरात राबवलं जावं यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे,’’ असं डॉ. आशा पावगी सांगतात.
केवळ तंत्रज्ञानावर आधारित कौशल्यांनी कुशल मनुष्यबळनिर्मिती होत असेलही पण संवेदनशील समाज हाच सुसंस्कृत आणि प्रगत समाज असतो. भाषिक कौशल्यांच्या अभावी हे मनुष्यबळ केवळ आर्थिक संपन्नता मिळवू शकते, पण समाजाच्या सर्वागीण समृद्धीसाठी भाषा आणि संवेदनशीलता यांचाही विचार आपल्या शिक्षण पद्धतीत प्रामुख्याने व्हायला हवा. आपल्या शैक्षणिक पद्धतीतली ही उणीव हेरून त्यावर नेमका उपाय सुचवण्याचा आणि त्या दृष्टीने पावले उचलण्याचा ‘नचिकेत बाल वाचनालयाच्या माध्यमातून राबवला जाणारा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि अनुकरणीय असाच आहे.
शर्वरी जोशी
sharvarijoshi10@gmail.com