प्रिय राम,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेहमीप्रमाणे आजही बकुळीच्या मंद सुगंधाने जाग आली. मॉर्निग वॉक करून येताना बकुळीची फुलं वेचायची आणि अलगद माझ्या उशाशी ठेवायची ही तुझी गेल्या अनेक वर्षांची सवय. डोंबिवलीहून ठाण्याला राहायला आलो तरीही बकुळ वृक्ष तुला भेटतच राहिला आणि तुझा नेम अखंडित राहिला. तुझ्या अबोल प्रीतीची रीतच न्यारी. कुठल्याही महागडय़ा भेटीशिवाय आपल्या सहजीवनातील प्रत्येक दिवस व्हॅलेन्टाइन डे झाला. होतोय.. तुझं हे ऋ ण अभिमानाने मिरवण्यासारखं. त्यासाठीच हे अनावृत पत्र. माझ्या भावना थेट तुझ्यापर्यंत पोहोचवणारं.
मी अनेकदा बोलून दाखवलंय तरीही आज पुन्हा सांगते की आपल्या ३८/३९ वर्षांच्या सहप्रवासात असे अनेक प्रसंग आले की जे केवळ तू पाठीशी होतास म्हणूनच निभावले. स्टेट बँकेतली माझी ३० वर्षांची नोकरीही तुझ्याच आधाराने तरून गेली. कारण झोपेच्या बाबतीत मी सूर्यवंशी आणि तुझी झोप कावळ्याची. यामुळे मी उठण्याआधीच बऱ्याचशा (वेळकाढू) कामांचा उरका पाडलेला असायचा. कधी दाणे भाजून कूट कर, कधी आठवडय़ाचं साईचं दही घुसळून लोणी काढून कढव, तर कधी बिरडं सोलून ठेव अशी किती तरी. त्यातही तुझ्या कुठल्याही कामाची जातकुळी बघत राहावी अशी..म्हणजे कपडे वाळत घालताना टोकाला टोक जुळलेलं आणि सुकलेल्या कपडय़ांच्या घडय़ा इस्त्री फिरवल्यासारख्या. याबाबतीत मी व मुलं म्हणजे दुसरं टोक. परंतु तू आमच्याकडून मदतीची फारशी अपेक्षा केली नाहीस, ते आमच्या पथ्यावर पडलं म्हणा! मुख्य म्हणजे हे सर्व तू आपलं औषधाचं दुकान सांभाळून केलंस याचं मला कोण कौतुक वाटायचं..आजही वाटतं.
तुझं हे गुणगान बँकेत लंच टाइमला डबा खाताना माझ्याकडून सहज गायलं जायचं आणि ऑफिसमधल्या समस्त ताई-माई अक्कांना चघळायला विषय मिळायचा. ‘सुपर मॅन’ हे त्यांनी तुला दिलेलं टोपणनाव. बँकेची वेळ संपल्यानंतर थांबून काम करण्याचं माझं श्रेयही तुलाच बहाल व्हायचं. काय मोठं नवल थांबली तर.. घरात गेल्यावर हातात आयतं ताट मिळालं तर कोणीही थांबेल. असे शेरे नेहमीचे.
त्या वेळचा एक प्रसंग मनात जशाच्या तसा जागा आहे.. श्रावणातल्या एका शुक्रवारी मी माझ्या बँकेतल्या दोन मैत्रिणींना घरी जेवण्याचं आमंत्रण दिलं. ठाण्यात राहणाऱ्या त्या दोघी केवळ सुपरमॅनला बघायचं म्हणून ऑफिस सुटल्यावर डोंबिवलीला यायला (एका पायावर तयार झाल्या. बँकेची वेळ सकाळी ११ ते ६. सकाळी निघण्यापूर्वी मी अर्धीमुर्धी तयारी करून ठेवली होती..पुरण वाटून तयार होतं, बटाटे उकडलेले होते. पण नेमका त्याच दिवशी पावसाला ऊत आला आणि ट्रेन ठप्प झाल्या. तुला कळवायचं तर त्या वेळी आपल्याकडे लॅण्डलाइनही नव्हती. शेवटी रात्री ८ वाजता घरी पोहोचलो तर दार उघडं आणि पुरणपोळ्यांचा खमंग वास सुटलेला. म्हणालास, ‘‘रेडिओवरच्या बातम्यांत गाडय़ांचा गोंधळ समजला, तुझी धावपळ होऊ म्हणून दुकान मदतनीसावर सोपवून आलो..’ नवरानामक प्राण्याने समजून-उमजून निगुतीने केलेला तो पुरणावरणाचा स्वयंपाक, लखलखीत धुतलेला ओटा..हे सारं बघून (त्या शॉकने) खरं तर माझ्या त्या मैत्रिणींना जेवणच गेलं नाही. पुढे बरेच दिवस बँकेतील समस्त महिलावर्गाला हा विषय पुरला. आपापल्या नवऱ्यांचे उद्धार होत राहिले. शेवटी आमच्यातल्यांतच एका मुरलेल्या लोणच्याने या चर्चेला पूर्णविराम दिला. म्हणाली, ‘घरोघरी निराळी तऱ्हा. हवा असेल जर सुखी निवारा तर आहे तोच म्हणा बरा..’ असो.
दुसऱ्याच्या मनाची जपणूक हा तुझा हेवा वाटावा असा गुण. यामुळे निर्मळ आनंदाचे अनेक क्षण माझ्या आयुष्यात आले. एकदा कुठल्याशा समारंभासाठी मी एक खास साडी घेतली होती. पण माझ्या वेंधळ्या स्वभावामुळे तिच्यावरचा ब्लाऊज शिवायचाच राहिला. लक्षात आलं तेही त्याच दिवशी सकाळी. जीव अगदी चुटपुटला. मुलगी म्हणाली, ‘‘आई तुझ्याकडे शंभर साडय़ा आहेत. नेस की त्यातली एखादी.’’ ‘हो, आता तेच करायला हवं’ म्हणत मी कामावर गेले. संध्याकाळी घरी येऊन बघते तर काय बाहेरच्या सोफ्यावर साडी आणि मॅचिंग ब्लाऊज माझी वाट बघतोय. माझा हिरमोड होऊ नये म्हणून माझा एक फिटिंगचा ब्लाऊज उसवून त्यानुसार ते कापड बेतून, घरच्या मशीनवर तू शिवलेला तो कटोरी फॅशन ब्लाऊज व ती साडी नेसून जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा माझा पायारथ जमिनीच्या चार बोटं वर धावत होता. ही तुझी कृती खरंच स्वप्नवत. कुणालाही विश्वास वाटू नये अशी. पण मी खरंच नशीबवान की तू मला नवरा म्हणून मिळालास. अगदी हाडामांसाचा.
माझं दुसरं बाळंतपण पार पडलं ते निव्वळ तुझ्या जिवावर. डिंक-अळिवाचे लाडू करण्यापासून, बाळाची झबली- टोपडी शिवण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या तू लीलया पेलल्यास. तुझ्या हातचे गरमागरम फुलके खाऊन मीही टमाटम फुगले एवढाच काय तो तोटा!
दुसऱ्यांना आनंद देण्याचा तुझा परीघ केवळ माझ्यापुरता मर्यादित नाही हेही मला पक्कं ठाऊक आहे. अभ्यासपूर्वक आत्मसात केलेल्या आयुर्वेदिक ज्ञानाचा उपयोग तू अनेक अडल्या-नडल्यांसाठी करतोस, त्यासाठी स्वत:चा खिसा रिकामा करतोस याचा मला प्रचंड अभिमान आहे.
खरं तर लग्न हे न जुळलेल्या गुणांशीच लागलेलं असतं हे मला आपल्या उदाहरणावरून शंभर टक्के पटतं..मी वाऱ्याशीही बोलणारी तर तुझ्या ओठांची घडी कायम मिटलेली. मला ओळखी करण्याची, चार माणसं जमवण्याची हौस तर अकेला चलो हे तुझं सूत्र. माझा रामशास्त्री बाणा तर तुझा सोडून द्या, जाऊ द्या हा पंथ. मी नाचरी, एकाच वेळी सतरा धोंडय़ावर पाय ठेवून दमछाक करून घेणारी तर तू सर्व गोष्टी धीराने, संयमाने घेणारा, माझ्या वस्तू घरभर पसरलेल्या, तुझ्या मात्र जागच्या जागी..(यावर माझी आवडती चारोळी.. घर दोघांचं असतं, एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं.).. अशी संपूर्ण भिन्न व्यक्तिमत्त्वं असूनही एकमेकांची संगतसोबत आपणा दोघांनाही हवीहवीशी वाटते. याचं कारण विरुद्ध ध्रुव परस्परांकडे आकर्षिले जातात हे तर नसावं?
मुलं आपापल्या घरटय़ात उडून गेल्यावरही एकमेकांना आपापल्या आवडीच्या क्षेत्रात स्वैर संचार करण्याची मुभा दिल्यानं आपलं कसं छान चाललं नै! आताशी माझा बराचसा वेळ आजूबाजूच्या मुलांच्या शिकवण्या घेण्यात जातो आणि उरलेला कॉम्प्युटरवर. तू घरात निरनिराळे प्रयोग करण्यात मग्न. मात्र तुला काम करताना बघणं हा देखील माझा एक छंद आहे बरं! तुझं प्रत्येक काम म्हणजे एक कलाकृती असते. मग ते सुरीने बारीक (अगदी किसल्यासारखी) भाजी चिरणं असो वा जुन्या चादरींची पायपुसणी शिवणं असो किंवा घरातल्या उपकरणांची दुरुस्ती. ज्याला हात लावशील त्याचं सोनंच होणार. पुण्यात राहणाऱ्या माझ्या सुनेच्या अथवा ऑस्ट्रेलियातील लेकीच्या डब्यात वेगवेगळे छान छान पदार्थ दिसायला लागले की त्यांच्या मित्रमैत्रिणी ओळखतात.. घरी डॅडी आलेले दिसतात..’
गेल्याच महिन्यात आपल्याकडे माझी ८० वर्षांची आत्या व तिचे यजमान चार दिवस आले होते ना. जाताना ते आत्याला काय म्हणाले माहीत आहे, ‘आता यापुढे आपल्या घरचा पहिला चहा मीच बनवणार.’ ज्योतीने ज्योत पेटते म्हणतात ती अशी.
अजून बरंच काही लिहिण्यासारखं आहे. पण काही गोष्टी न बोलता समजून-उमजून घ्यायच्या असतात हे तूच तर शिकवलंयस. शेवटी गुरू ठाकूर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या चार ओळी फक्त तुझ्यासाठी.. माझ्या व्हॅलेन्टाइनसाठी..
तुझा स्पर्श झाला असा जीवनाला
जणू लाभले पंख वेडय़ा मनाला
रित्या ओंजळीला दिले तूच तारे
मलाही न कळले कसे गीत झाले!

कायम तुझीच
माधवी

माधवी रामकृष्ण शिंत्रे
madhaveeshintre@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day special letter for your partner
First published on: 13-02-2016 at 01:11 IST