|| प्रतिमा कुलकर्णी

विविधतेत एक असलेला आपला भारत देश याच कारणाने सुंदर आहे. आपल्या शेजारच्या घरातला माणूस वेगळी भाषा बोलतो, वेगळं जेवण जेवतो, वेगळे सण साजरे करतो.. ही विविधता आहे, म्हणून आपण एके काळी एक महान देश होतो आणि पुन्हा भविष्यात महान बनण्याची स्वप्नं बघू शकतो. कारण आपली कवाडं खुली आहेत..

लोकसत्ताच्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये कुलदीप सिंग कोहलींचे लेख येतात. जणू काही ते स्वत: समोर बसून बोलतायत असा भास व्हावा इतक्या सहज आणि सुंदर मराठीत लिहिलेले लेख! नितीन आरेकरांचं अप्रतिम शब्दांकन! त्या सुंदर मराठी भाषेत लिहिलेल्या लेखांमधूनही कुलदीप-पाजींचं पंजाबीपण लपत नाही. कारण त्यांची जगण्याची पद्धत, माणसांशी वागण्याची पद्धत, चांगल्यावरचा विश्वास, एक दिलदारपणा, सगळे माझेच आहेत ही वृत्ती.. आणि इतर अनेक गुण. हा पंजाबीपणा मनाला मोहवतो, कधी त्याचा हेवाही वाटतो- आपण तसे का वागू शकत नाही हा प्रश्न पडतो.

लगेच त्याचं उत्तरही मिळतं- कारण – मी मराठी आहे! दुरभिमान नाही, पण माझ्या ‘मी’ असण्यात मी मराठी असण्याचा फार मोठा वाटा आहे आणि त्याचा मला रास्त अभिमान आहे.

१९९९ मध्ये ‘प्रपंच’ करण्याआधी मी आणि माझ्या टीमने दोन हिंदी मालिका केल्या होत्या. त्या मी लिहिल्याही होत्या आणि त्यांनी मला खूप समाधान दिलं होतं. तरीही आता मराठी मालिका लिहायची, करायची म्हटल्यावर जसजशी ती माणसं दिसायला लागली तसतसा माझा आनंद वाढत गेला. एकदा एडिटिंग रूममध्ये काम करता-करता माझ्या एडिटरला- भक्ती मायाळूला म्हटलं- ‘‘मला खूप मजा येतेय- कुजके आणि खडूस संवाद लिहायला!’’ भक्ती खूप हसली- म्हणाली, ‘‘मराठी संवाद कुजके आणि खडूस असतात?’’ म्हटलं- ‘‘हो!’’ ही विशेषणं मी प्रेमाने आणि कौतुकाने वापरली होती हे तिला बरोबर कळत होतं. मराठी माणसाचे पाय कायम जमिनीवर असतात. कुठच्याही गोष्टीतली मेख त्याला बरोबर कळते आणि त्यामुळे तो कशातच गुरफटत नाही, कशानेच वाहवत जात नाही. अर्थात व्यक्ती-व्यक्तीमध्ये फरक असतो, पण एका विशाल अर्थाने मराठी अ‍ॅटिटय़ूड हा असा असतो. म्हणूनच महाराष्ट्र देशाला प्रणाम करताना गोविंदाग्रज म्हणतात-

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा.. भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा.. जेव्हा पी. सी. बरुआ प्रेमामध्ये ‘आकंठ’ बुडलेल्या आणि प्रेमभंगामुळे आत्मनाश ओढवून घेणाऱ्या देवदासची कहाणी पडद्यावर रंगवतात, त्याच काळात, थोडं मागे-पुढे शांतारामबापूंचा ‘माणूस’चा नायक ‘‘आयुष्य हे प्रेमभंगाच्या दु:खात बुडून राहण्यासाठी नाही, तर ते जगण्यासाठी आहे!’’ हा संदेश देऊन जातो. हे असं सगळं असल्यामुळे मराठी पात्र मला जशी आणि जितकी कळतात, तितकी खोलवर मला बाकी भारतीय माणसं कळत नाहीत आणि त्यामुळेच मराठी माणसं रंगवायला खूप जास्त मजा येते.

याचा अर्थ असा खचितच नाही की मला ‘फक्त, केवळ’ मराठी आवडतं- हिंदी भाषेवर, हिंदी साहित्यावर माझं प्रेम आहे. प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणू, श्रीलाल शुक्ल, मत्रेयी पुष्पा हे आवडते लेखक आहेत. इंग्लिश साहित्याने फार लहानपणीच भुरळ घातली होती.

कवितेमध्ये इंग्लिश, मराठी हा भेद कशाच्या जोरावर करायचा?

मर्ढेकर म्हणतात-

पानात जी निजली येथे

इवली सुकोमल पाखरे,

सांग जातील आता कोठे

निष्पर्ण झाडीत कापरे..

आणि किट्स म्हणतो-

व्हॉट एऽऽल्स दी नाईट अ‍ॅट आम्र्स

अलोन अ‍ॅन्ड पेलली लॉइटिरग

द ग्रास हॅज विदर्ड फ्रॉम द लेक

अ‍ॅन्ड नो बर्ड्स सिंग..

या दोन्ही कविता आपल्या काळजाच्या त्याच तारा छेडतात, तोच उदास, हुरहूर लावणारा, तरीही सुंदर- असा अनुभव देतात, आपल्याला श्रीमंत करून जातात.

शेक्सपिअरनेही लहानपणीच वेड लावलं होतं. ज्या वयात ही माणसं नक्की काय बोलतायत ते कळत नव्हतं, त्याही वयात त्यात काहीतरी गंमत आहे, या लेखकाच्या भाषेमध्ये आपल्या ‘दिलाला सुकून’ द्यायची ताकद आहे, हे जाणवत होतं यात काही शंकाच नाही. असं असतानाही-शिवाजी मंदिरमध्ये नाटकाला गेलं, ऑर्गनचे सूर वाजले, नांदी सुरू झाली की जे होतं, त्याची तुलना कशाशीच करता येत नाही.

आता आपण सगळेच सगळ्या प्रदेशातली गाणी ऐकतो, गातो.. नाच पाहतो, नाचतो.. पण ‘आपल्या’ प्रदेशाच्या संगीताचा परिणाम काही वेगळाच होतो. तुतारीचा आवाज आला की अंगावर रोमांच उठतात, घशात आवंढा येतो आणि हृदयाचे ठोके जलद होतात. गुजराती लोक ज्या डौलात गरबा खेळतात, पंजाबी लोक ज्या जोशात भांगडा नाचतात, त्यावरून कळतं की त्यांच्या नसा-नसात त्यांची प्रादेशिक ओळख आहे. कदाचित या गोष्टी ‘जीन्स’मधून येत असाव्यात!

जपानमध्ये मी नवी होते तेव्हाची गोष्ट आहे- मी अजून रुळले नव्हते, भाषा येत नव्हती, अन्न गोड लागत नव्हतं- तेव्हा टीव्हीवर लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकला/पाहिला आणि वाटलं- येस! माझं या देशाशी नातं जुळू शकेल! सहज गंमत म्हणून एक गोष्ट सांगते ती ही की, त्यांच्या ओकिनावा बेटाचं संगीत आपल्या संथाल संगीताच्या खूप जवळ जाणारं आहे. खूप लांब आपला देश सोडून गेल्यामुळे तिथे गेल्यावर संथाल संगीत मला जवळचं वाटलं! संगीत म्हणून ते अप्रतिम आहेच, आधीही ते आवडत होतंच, पण आता त्यात आणखीन एक नवीन छटा मिसळली गेली! तिथे प्रत्येक प्रदेशाचं वेगळं लोकसंगीत, वेगळे नाच असले तरी मुळातच देश छोटा आहे! ५ बेटांचा मिळून झालेल्या त्या देशात कमालीचा सारखेपणा – युनिफॉरमिटी – आहे! सामाजिक रचना अशी की एक प्रकारचं रेजिमेंटेशन आहे. ते अंगवळणी पडेपर्यंत फार ताप होत होता. त्यावेळी या संगीताने मला खूप आधार दिला.

विविधतेत एक असलेला आपला भारत देश याच कारणाने सुंदर आहे. आपल्या शेजारच्या घरातला माणूस वेगळी भाषा बोलतो, वेगळं जेवण जेवतो, वेगळे सण साजरे करतो.. ही विविधता आहे, म्हणून आपण एके काळी महान देश होतो आणि पुन्हा भविष्यात महान बनण्याची स्वप्नं बघू शकतो. कारण आपली कवाडं खुली आहेत..

आज सगळं जग जवळ येतंय- आपण एक होणं गरजेचं आहे. पण एक म्हणजे समान- युनिफॉर्म नाही. आपापली ओळख जपून, जागवून, समृद्ध करत आपण एक व्हायचं आहे. मला मराठी असण्याचा अभिमान आहे, तसंच कुणाच्या झुलू असण्याचा, कुणाच्या फिनिश असण्याचा आदर पण आहे. आमच्या लहानपणी जग आजच्यासारखं जवळ येण्याआधी आम्हाला पेन फ्रेंड्स असायचे. म्हणजे कुठच्या दूरच्या देशात असलेली किंवा असलेला कुणी- त्याच्याशी पत्रातून संवाद साधायचा. खूप मजा असायची. त्यावेळी माझ्या एका मत्रिणीची पेन फ्रेंड एक फिनलंडची मुलगी होती. तिचं नाव होतं टूइरटू टूइरमो. आम्ही खूप हसायचो त्या नावाला. पण तसंच तीही प्रतिमा कुलकर्णी या नावाला हसली असेल तर? तिथे माझी अस्मिता आड येता कामा नये!

गेली ३२ वर्ष मी ज्या आध्यात्मिक मार्गाची साधक आहे, तो एक जागतिक मार्ग आहे. जगभर ७० देशांत त्याच्या शाखा आहेत, त्याची सुरुवात जपानमध्ये झालेली असली तरी तिथे आम्हाला आपापल्या सांस्कृतिक, प्रादेशिक जाणिवा जाग्या ठेवायला, त्याला खतपाणी घालायला शिकवलं जातं. आमच्या गुरूंच्या शब्दात सांगायचं झालं तर भविष्यातलं सुंदर जग हे एका रंगाचं असणार नाही. तर तो एक विविधरंगी फुलांचा सुंदर गुच्छ असेल किंवा अनेकरंगी वस्त्रांची सुंदर गोधडी असेल. मी त्या जगाची, २१ व्या शतकाची नागरिक आहे- माझी ओळख आहे – मराठी!

pamakulkarni@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

chaturang@expressindia.com