आपण सर्वजण ‘वेळेचं व्यवस्थापन’ (Time Management) ही संकल्पना ऐकत- ऐकतच मोठे होत असतो. वेळेचं हे व्यवस्थापन शिकवणारी अनेक पुस्तकं, लेख जगभर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अधिक परिणामकारक पद्धतीने हे नियोजन कसं करावं याच्या काही उपयुक्त टिप्स देणारेही अनेक व्हिडीओ, रील्सही आहेत. वेळेच्या योग्य नियोजनाबद्दल सल्ले द्यायला सगळ्यांनाच आवडतं, मग ते आपले मित्रमैत्रिणी, शिक्षक, सहकारी असोत किंवा वरिष्ठ. आपणही ते सल्ले ऐकून वेळेच्या नियोजनाच्या मागे लागतो. पण गणित फसतंच. का होतं असं?

याचं उत्तर कदाचित तुम्हाला बुचकळ्यात टाकू शकेल. मुळात ‘वेळेचं व्यवस्थापन’ ही संकल्पनाच चुकीची आहे. ज्याला आपण वेळेचं व्यवस्थापन म्हणतो तो वास्तविक स्वयंशिस्तीचा भाग आहे. त्या त्या वेळी त्या त्या कामासाठी स्वत: उपलब्ध असणं याच्याशी हे व्यवस्थापन संबंधित आहे. त्यामुळे खरं तर वेळेला स्वत:च्या चौकटीत बसवायचं नसून स्वत:ला वेळेच्या चौकटीत बसवायचं आहे. सजगतेने वा ‘माईंडफुल’ जगण्याचा विचार करताना आपण ही संकल्पना बारकाईने समजून घ्यायला हवी, म्हणजे मग वेळेचं योग्य नियोजन करण्याचा ताण येणार नाही.

grandmother, illness, fear, chemotherapy, school, family, courage, support, childhood,
सांदीत सापडलेले: आजारपण!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
only child, parenting, parents, child,
दु:ख ‘एकुलत्या एक’ मुलांचं!
mazhi maitrin childhood marathi news
माझी मैत्रीण: मैत्रीचं माहेरघर
menstruation, mental health, women, puberty, stress, dysmenorrhea, PMS, PMDD, hormonal changes, reproductive health, anxiety, depression, menstrual cycle,
मासिक पाळीतील मानसिक आरोग्य
tendency to experience fear genetics of fear and anxiety disorders
‘भय’भूती : भयाचं पॅकेज!
how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद
schizoid personality disorder chaturang article
स्वभाव – विभाग : अलिप्त मी!

हेही वाचा : जेंडर बजेटिंग : विनियोगावर ठरणार यशापयश!

एकीकडे आपलं तर्क करणारं मन वास्तवाला धरून विचार करत असतं आणि दुसरीकडे मात्र आपल्या मेंदूचा त्या तार्किक मनाला वरचढ ठरणारा भाग आपल्या नकळत गुपचूप काम करत असतो. आपल्या प्रेरणा, भावना आणि वागण्या-बोलण्यात पुन्हा पुन्हा डोकावणाऱ्या विचारपद्धती या साऱ्याचं उगमस्थान म्हणजे आपलं सुप्त मन. उदाहरणादाखल कार चालवण्याच्या कौशल्याचा विचार करू या. अगदी सुरुवातीला कुठले गिअर्स केव्हा वापरायचे, कुठे कधी पाय ठेवायचा आणि कुठल्या आरशात कधी पाहायचं याबाबत आपण अगदी दक्ष असतो, पण जेव्हा सरावाने आपण उत्तम गाडी चालवायला शिकतो, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अजिबात विचार करावा लागत नाही. सगळं काही आपोआप होतं. आपल्या सुप्त मनात या साऱ्या प्रक्रियेची नोंद आधीच झालेली असल्यामुळे साहजिकच आपल्याला याचा रोज विचार करायची गरज पडत नाही. आपण अगदी सहज काहीही विचार न करता गाडी चालवू शकतो. आपल्या सुप्त मनाचं आपल्या वर्तनावर कसं नियंत्रण असतं याचं हे एक उदाहरण.

सुप्त मनाची दोन प्रमुख कार्यं असतात, एक म्हणजे तुमचं संरक्षण करणं आणि दुसरं म्हणजे समोर घडणाऱ्या गोष्टींची शब्दश: नोंद घेणं. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या संभाव्य धोक्यांचा ते सातत्याने शोध घेतं आणि त्यापासून तुमचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने ताबडतोब आवश्यक त्या हालचाली करतं. शिवाय, त्याला पुरवल्या जाणाऱ्या माहितीचा ते सरळसोट, शब्दश: अर्थ लावतं, मात्र कधी कधी त्याचे नको ते परिणाम होतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही स्वत:ला सूचना केलीत, की ‘गुलाबी हत्तीचा विचार करायचा नाही!’ तर तुमचं सुप्त मन तुमच्या डोळ्यासमोर तत्काळ गुलाबी रंगाच्या हत्तीची प्रतिमा उभी करतं आणि मग तुमचं तार्किक मन तो विचार बाजूला सारायचा, काढून टाकायचा प्रयत्न करू लागतं.

हेही वाचा : सेंद्रिय तांदळाचा शाश्वत सुगंध!

सुप्त मनाकडून या शब्दश: लावल्या जाणाऱ्या अर्थाचा आपल्या वर्तणुकीवर मात्र परिणाम होतो. जेव्हा आपण ‘वेळेचं व्यवस्थापन’ म्हणतो, तेव्हा आपल्या सुप्त मनाला ‘वेळेचंच व्यवस्थापन’ करण्याचा संदेश दिला जातो. मग जेव्हा आपण त्यासंबंधी असलेल्या एखाद्या लेखाचा किंवा व्हिडीओचा सखोल विचार करत असतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की, आपण खरं तर आपल्या वागण्यात बदल करतोय, वेळेत नाही. या परस्परविरुद्ध संदेशाने सुप्त मनाचा गोंधळ उडतो आणि परिणामत: आपल्या जुन्या सवयींना बाजूला सारून नवे बदल घडवायला ते विरोध करतं. या नव्या बदलांपासून आपल्याला वाचवण्यासाठी ते त्याच्या मूळ स्थितीत परत जातं आणि आपण पुन्हा आपल्या जुन्या सवयींप्रमाणेच वागू लागतो.

सुप्रसिद्ध लेखक रॉबिन शर्मा ‘द मंक हू सोल्ड हिज फेरारी’ या आपल्या पुस्तकातून एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात, ‘‘आपल्याकडे सर्व गोष्टींची समृद्धी असो किंवा अभाव असो, आपण टेक्सासमध्ये राहत असू किंवा टोकियोमध्ये, आपल्या सर्वांकडे चोवीस तासांचाच एक दिवस असतो. जीवनात अपवादात्मक यश मिळवणाऱ्या आणि जीवनात खूप कमी किंवा मुळीच यशस्वी न झालेल्या लोकांमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो, हे चोवीस तास ते कशा पद्धतीने वापरतात, याचा!’’ दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास वेळेला स्वत:च्या चौकटीत कोणीही बसवू शकत नाही! मग आपण ‘वेळेचं व्यवस्थापन’ असा शब्दप्रयोग का करतो?

समाजाच्या ‘झालंच पाहिजे’ नि ‘केलंच पाहिजे’च्या बंधनात जगत असताना आपण आपलं जीवन आणि वेळेशी असलेलं आपलं नातं मात्र गुंतागुंतीचं करून ठेवलं आहे. सगळ्या गोष्टीत घाई आणि त्या घाईची चढलेली झिंग हा आपल्या स्वभावाचाच एक भाग बनून गेलाय. या सगळ्या घिसाडघाईला आपणच जबाबदार आहोत हे मान्य करायचं सोडून आपण नेहमी ‘मला पुरेसा वेळच नसतो!’ असं म्हणत वेळेवरच त्याचं खापर फोडतो. एका संशोधनानुसार, ९२ टक्के लोकांना ‘पुरेसा वेळ न मिळाल्याने’ ध्येयं साध्य करता येत नाहीत.

हेही वाचा : माझं मैत्रीण होणं!

तुम्हा वाचकांचा समावेशसुद्धा वरील प्रकारच्या लोकांमध्ये व्हावा, अशी माझी इच्छा नाही. उलट तुम्ही सर्वांनी ‘वेळेचं व्यवस्थापन’ ही संकल्पना तुमच्या शब्दकोशातून हद्दपार करावी, अशीच माझी इच्छा आहे. या संकल्पनेतले बारकावे समजून घेतल्यामुळे तुमचं लक्ष ‘स्वत:च्या चौकटीत वेळेला बसवण्या’वरून ‘वेळेच्या चौकटीत स्वत:ला बसवण्या’वर केंद्रित व्हायला मदत होईल.

वेळेची आणि मेहनतीची प्रचंड मागणी असलेली नोकरी करणारा सुबोध आणि उर्मिला ही त्याची जवळची मैत्रीण. या दोघांच्या संवादातून मी ही संकल्पना अधिक उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतो.

सुबोध : (उसासा टाकत) उर्मिला, नोकरी आणि कुटुंबाला वेळ देता देता आणखी कोणत्याही गोष्टीसाठी माझ्याकडे वेळच उरत नाही. त्यामुळे कित्येक दिवसांपासून इच्छा असूनही मी ना नव्या कोर्सला प्रवेश घेऊ शकत ना माझ्या छंदासाठी वेळ काढू शकत.

उर्मिला : हो, हल्ली सगळ्यांनाच या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. मला सांग, तू दर आठवड्याला किती तास काम करतोस?

सुबोध : साधारणपणे पंचावन्न तास.

उर्मिला : हा वेळ खूप होतोय, पण तरी ठीक आहे. रोजच्या प्रवासात किती वेळ खर्च होतो?

सुबोध : रोजचे जवळपास दोन तास.

उर्मिला : म्हणजे आठवड्याचे चौदा तास झाले आणि अंघोळ, दात घासणे इत्यादी वैयक्तिक स्वच्छतेच्या कामात तुझा किती वेळ जातो?

सुबोध : साधारण दिवसातला एक तास.

उर्मिला : बरं, म्हणजे या हिशोबाने आठवड्याचे सात तास झाले. तुझी रोजची झोप किती होते?

सुबोध : अंदाजे साडेसहा तास.

उर्मिला : म्हणजे आठवड्याचे साडेपंचेचाळीस तास झोपेचे. याव्यतिरिक्त जेवण्यात, टीव्ही बघण्यात, सोशल मीडिया, वर्तमानपत्र या सगळ्यांत आणि तुझ्या कुटुंबासोबत घालवलेला वेळ किती असतो?

हेही वाचा : सांधा बदलताना : मन करा रे थोर!

सुबोध : दिवसातले अंदाजे चार तास.

उर्मिला : म्हणजे या सगळ्या गोष्टीत आठवड्याचे २८ तास जातात. आता आपण सगळ्यांची बेरीज करू. ५५ तास कामाचे, १४ तास प्रवासातले, ७ तास व्यक्तिगत स्वच्छतेचे, साडेपंचेचाळीस तास झोपेचे आणि कुटुंबासोबत आणि स्वत:च्या करमणुकीसाठी घालवलेले २८ तास. म्हणजे सगळ्यांची एकूण बेरीज, आठवड्याचे सुमारे १५० तास.

सुबोध : (विचारात पडून) थांब! आठवड्याचे एकूण तास १६८. मग उरलेले १८ तास कुठे गेले?

उर्मिला : तेच तर! जर हे १८ तास विभागून पाहिले तर दिवसाचे दोन तास तुझ्या लक्षातही न येता सुटून जात आहेत. अनेक लहानसहान गोष्टी करताना वेळ कसा निघून जातो, काही कळत नाही.

सुबोध : आणि मी इथं माझ्या छंदांसाठी आणि ध्येयासाठी वेळ काढता येत नाही म्हणून वैतागलोय.

उर्मिला : हो, पण ते समजून घेण्यासारखं आहे. जेव्हा आपण आपल्या चौकटीत वेळ बसवायचा विचार करतो, तेव्हा असं नेहमीच घडतं, पण आपण जर अनावश्यक कामात जाणारा वेळ वाचवला, कामाचं योग्य नियोजन केलं, तर असं लक्षात येईल की, आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा अधिक वेळ मिळतोय आपल्याला! थोडक्यात, जर आपण स्वत:ला शिस्त लावली, तर आपोआपच मिळणारा वेळही अधिक असेल.

हेही वाचा : इतिश्री : मिठी की थप्पड?

सुबोध : छान! मी असा विचारच कधी केला नव्हता. खरोखरच याप्रमाणे वागायला हवं.

उर्मिला : नक्कीच. अगदी तू रोजच्या दिवसभरात एक तास जरी काढू शकलास, तरी आठवड्याचे सात तास मिळतील तुला. रोज एक तास जादा मिळाल्यावर तू तो कसा कारणी लावशील आणि स्वत:च्या प्रगतीच्या दिशेने कशी वाटचाल करशील याचा विचार करून बघ. लक्षात घे, आपल्यापैकी प्रत्येकाकडेच आठवड्याचे १६८ तासच असतात. आपण त्यांचा वापर कसा करतो यावर सगळं अवलंबून आहे. आपला वेळ कुठे आणि कसा खर्च होतो यावर बारकाईने लक्ष ठेवून आपल्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींसाठी आपण वेळ काढू शकतो.

सारांश, असा दृष्टिकोन अंगीकारला, तर आपल्या स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो. वेळेसारख्या कधीही बदल न होणाऱ्या आणि अचल गोष्टीचं नियोजन करण्यापेक्षा स्वत:ला वेळेच्या चौकटीत कसं बसवता येईल यावर लक्ष केंद्रित करा. आपला अवांतर जाणारा वेळ कामाचं योग्य नियोजन करून भरून काढता येतो आणि यामुळे आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि आपल्या छंदांसाठी आपल्याला वेळ मिळू शकतो. सजग जीवनाच्या प्रवासात ‘वेळेचं व्यवस्थापन’ ही संकल्पना मागे टाका आणि स्वयंशिस्तीवर, स्वत:ला वेळेच्या चौकटीत बसवण्यावर भर द्या. सतत निरनिराळ्या गोष्टींकडे लक्ष पुरवण्याची मागणी करणाऱ्या जगाशी जुळवून घेताना दृष्टिकोनात झालेला हा बदल तुम्हाला निश्चितच समतोल साधण्यास मदत करेल.

sanket@sanketpai.com