‘आयटी’ असो की शेती, नेतृत्वाची दूरदृष्टी फार महत्त्वाची असते. स्वत:च्या विकासासोबत सर्व सहकारी तसेच ग्राहकांपर्यंतच्या सर्वांचं हित एकजीव करणारा तो आद्या भागधारक अर्थात उद्याोजक. सहकारी, कामगार नव्हे तर त्यांना आपली माणसं मानणाऱ्या उद्याोजकाकडे काय काय असायला हवं?

व्यापारी आणि उद्याोजक यामध्ये फरक कसा करायचा? आर्थिक नफ्या-तोट्याच्या मर्यादेतच ज्याची बुद्धी चालते तो व्यापारी. धन आणि संपत्तीमधला भेद उमजून जो संपत्ती निर्माण करण्यावर भर देतो तो उद्याोजक. पैशाची देवता कुबेर. संपत्तीची देवता लक्ष्मी. पारंपरिक तसबिरीमध्ये तिच्या तळहातातून सोन्याची नाणी बरसताना दिसली तरीही!

‘उद’ म्हणजे आकाशाच्या दिशेने नेणारा योग म्हणजे ‘उद्याोग.’ आकाश म्हणजे विस्तार. उद्याोजक ज्ञानाचा, मानवी गुणवत्तेचा, समाजाच्या जीवनस्तराचा विस्तार म्हणजेच प्रगतीला कारणीभूत होतो. आर्थिक ताकद हे त्याचं साधन असतं, साध्य नव्हे. योग म्हणजे फक्त जोडणं नव्हे तर एकजीव होणं. स्वत:च्या विकासासोबत सर्व सहकारी तसेच ग्राहकांपर्यंतच्या सर्वांचं हित एकजीव करणारा हा ‘आद्या भागधारक’.

एका पडीक गॅरेजपासून सुरुवात करून आज जगभर आपली उत्पादनं निर्यात करणारे एक गृहस्थ मला सांगत होते, ‘‘माझ्यापासून कंपनीची साखळी सुरू झाली म्हणून मी स्वत:ला ‘प्रायमरी स्टेकहोल्डर’ म्हणतो. भले कंपनी ही कायद्याप्रमाणे ‘प्रायव्हेट लिमिटेड’ असेल. माझ्यासाठी मालकी नावाचा विचार कधीच अस्तित्वात नव्हता. लोक जेव्हा तुमची कंपनी असं म्हणतात तेव्हा ते शब्द मी पालक या अर्थी घेतो. मालक या अर्थाने नाही.’’

महात्मा गांधीजींनी कल्पना मांडली होती की, उद्याोजकाने स्वत:च्या कंपनीचे विश्वस्त म्हणून स्वत:ला पाहावे. उत्पादकता आणि समृद्धीचं माध्यम म्हणून स्वत:च्या कर्तृत्व तसेच नेतृत्वाकडे पाहावं. ‘‘म्हणून मला औद्याोगिक कंपनीच्या परिसरातच गांधीविचारांचं कायमचं स्मारक तयार करायचं आहे.’’ खूप वर्षांपूर्वी एका संध्याकाळी, जळगावच्या ‘जैन हिल्स’ परिसरात भंवरलाल अर्थात भाऊ जैन मला सांगत होते. त्यांनी बोटांनी मला तो परिसर दाखवला. नंतर तिथे ‘गांधीतीर्थ’ या नावाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिसर, म्युझियम, अभ्यास केंद्र पाहायला गेलो तेव्हा भाऊंच्या आठवणीच सोबतीला होत्या.

अशा अनेक उद्याोजकांचा सहवास म्हणजे माझ्यासाठी त्यांची मानसिकता समजून घेण्याचा अभ्यासक्रम होता. सुमारे पंचवीस वर्षं ‘गोदरेज’ समूहाबरोबर मनआरोग्याचं काम करताना नवलशेठ म्हणजे एन. पी. गोदरेज आणि त्यांच्या पत्नी सुनुबेन यांचा शुभ्र साधेपणा म्हणजे विश्वस्तवृत्तीच होती. ‘एनपीजी’ एका उघड्या छोटेखानी गाडीतून सारे प्लान्ट्स फिरायचे. दोन-तीन वेळा त्यांच्या शेजारी बसून हा प्रवास करायची संधी मिळाली. कंपनीतल्या हजारो कामगारांचे वैयक्तिक तपशील त्यांना पाठ असायचे. त्यांच्या पारशी हेलकावे असलेल्या मराठीमध्ये लिंगभेद नसायचा, परंतु अपार जिव्हाळा होता. कुणा पांडूची दहावीची मुलगी, एखाद्या बरजोरची आजारी आई, अस्लमच्या मुलीच्या लग्नात त्याला झालेलं कर्ज… हे सारं ते बोलायचे. ‘‘तुम्ही हे लक्षात कसं ठेवता?’’ अचंब्याने मी एकदा विचारलं. ‘‘दे आर अवर पीपल… चेहरा बगितली की सगला आठवते मला,’’ ते म्हणाले.

फक्त सहकारी नव्हेत, कामगार नव्हेत तर आपली माणसं! ‘एक्सेल’ समूहाचे श्रॉफ काकासुद्धा असेच होते. त्यांच्याबरोबर औद्याोगिक क्षेत्रातील व्यसनमुक्तीचे उपक्रम आखत होतो. कंपनीत काम करणाऱ्या एकाच्या तोंडाला सकाळी दारूचा वास येतो हे कळल्यावर काका ‘शॉपफ्लॉअर’ला गेले. आणि त्याला गळामिठी मारली. तो पार शरमून गेला. ‘‘पुढचा महिनाभर मी तुला रोज असाच भेटणार आहे. तुझ्या सवयीचं काय करायचं ते तू बघ.’’ काका बोलल्याप्रमाणे वागणारे होते. तो कामगार आमच्या उपचार कार्यक्रमात स्वत:हून दाखल झाला.

यशस्वी उद्याोजकाकडे काय काय हवं? तैलबुद्धी, स्वत:च्या क्षेत्रातलं ज्ञान, तंत्रज्ञान, भांडवल, व्यवस्थापन कौशल्य आणि? मानसिकतासुद्धा हवीच की अनुरूप अशी. असं म्हणून आपण थांबतो. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करतोच असं नाही. मन:स्वास्थ्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना विविध कंपन्या आमंत्रण देतात ते ‘तणाव नियोजन’ शिकवण्यासाठीचं. खरं तर मानसिकता ही अतिशय प्राथमिक गरज आहे. परिस्थितीला तोंड देण्याचा कणखरपणा वाढवण्यासाठीचं लांब पल्ल्याचं प्रशिक्षण हे ध्येय हवं. उन्नत भावनांच्या शिडकाव्याशिवाय कामावरचं वातावरण बदलत नाही. दाहक भावनांचं नियोजन जितकं महत्त्वाचं तितकंच साधक भावनांचं प्रशिक्षण. आणि हे करणारा नेतृत्वसंघ तयार करायचा तर ठिबक सिंचनासारखं शिक्षण हवं. स्वाध्यायाची सवय लावायला हवी. अभ्यासवर्गातील शिकण्यासोबतच आधुनिक मानसशास्त्राने; नेतृत्वगुण, संघातील चपखल भूमिकांची निवड, वैयक्तिक कार्यशैली अशा सूत्रांभोवती अनेक चाचण्या विकसित केल्या आहेत. त्याचप्रमाणे भावनिक पोषणासाठीची वैयक्तिक संवादसत्रंही घेणं आवश्यक असतं.

सुदैवानं विविध उद्याोगपरिघांमध्ये कार्यरत अशा तीसहून अधिक औद्याोगिक कंपन्यांसोबत सलग चार दशकं काम करण्याचा योग आला. शिकवता शिकवता आपोआप शिकणं सुरू झालं. हा सारा महिमा माझ्या ज्ञानशाखेचा. मन बदलणं हा प्रवास अजिबात सोपा नाही. तो सामूहिक पातळीवर करण्याचा एक प्रयोग ‘सह्याद्री फार्मस्’ या कंपनीसाठी विलास शिंदे या मित्रामुळे घडला. भारतातील एक मोठी शेतकरीप्रधान कृषी कंपनी उभा करणारा विलास हा उत्तम शिक्षक आहे. शेतकऱ्यांची मानसिकता आणि या क्षेत्रातलं वास्तव मला शिकवण्यासाठी दोन तासांचा वर्ग त्याने घेतला. त्यातून उभा राहिला ‘कर्ता शेतकरी’ नावाचा अभ्यासक्रम. हा कार्यक्रम ‘सह्याद्री’च्या सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण तयार करण्याचा अजून एक अभ्यासक्रम. (इंटरनेटवर ‘आवाहन आयपीएच’वर या प्रशिक्षणाचे बेचाळीस भाग तुम्हाला पाहता येतील.) त्यानिमित्ताने एक लेखमाला लिहिली गेली, त्याचं पुस्तक येऊ घातलं आहे. प्रत्येक शेतकरी हा उद्याोजकतेचा दूत व्हावा या विलासच्या ध्येयाला हातभार लागला. सध्या त्या कंपनीच्या संपूर्ण संघाबरोबर नेतृत्वबांधणीचा उपक्रम सुरू आहे.

‘आयटी’ असो की शेती, नेतृत्वाची दूरदृष्टी फार महत्त्वाची असते. उद्याोजक हासुद्धा एक कलाकार असतो. निर्मितीच्या प्रवासातले यशअपयशाचे क्षण पचवून तरीही उत्साहानं पुढे जाणारा. कॅनव्हासवर चित्र काढताना रंगून जाणारा, पण दोन क्षण थांबून, दोन पावलं मागे येऊन स्वत:ची निर्मिती दूरस्थपणे न्याहाळणारा. त्याच्यामध्ये एक अस्वस्थ चळवळ्या दडलेला असतो. त्याला स्वप्नंही नियोजनपूर्वक पडतात. योग्य विचार करून धोका पत्करताना तो कचरत नाही. अडचणींचं निराकरण करताना त्याला मजा येते. कधी दमछाक झाली, तर त्यावर मात करायला तो तयार असतो. शिकण्यामध्ये मृदू आणि कार्यवाहीमध्ये कडक असतो तो. गुणवत्ता हेरणं आणि ध्येयासाठी ती वापरणं हे त्याला जमून जातं.

‘‘आपल्या कंपनीतल्या सर्व जबाबदार लोकांना मला भविष्यासाठी तयार करायचं आहे… तू सहभागी होशील का त्यात?’’ सत्तावीस वर्षांपूर्वी ‘इंडोको रेमेडीज’ या औषध कंपनीचे सर्वेसर्वा असलेले सुरेश कारे माझ्याशी बोलत होते. आम्ही गोव्यामध्ये होतो. माझी अभ्यासूवृत्ती आणि संवादकौशल्य त्यांच्या पसंतीला उतरलं असावं. प्रसंग होता, मास्टर दीनानाथ जन्मशताब्दीचा. मी दीनानाथांच्या व्यक्तिमत्त्वावर एक शोधनिबंध वाचला होता त्या समारंभामध्ये. मी होकार दिला. तिथपासून आजपर्यंत या कंपनीच्या सुखदु:खात आणि चढउतारामध्ये संवर्धक म्हणून सहभागी आहे.

एकविसावं शतक सुरू झालं होतं आणि या कंपनीचं पहिलं महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय ‘ऑडिट’ म्हणजे तपासणी व्हायची होती. या कडक परीक्षेला तोंड देताना आपलं भावनिक नियोजन कसं ठेवायचं, देहबोली कशी वापरायची, प्रश्न विचारल्यावर ते समजून उत्तर कसं द्यायचं हे सारं मी तेव्हापासून शिकवू लागलो. दोन महिन्यांपूर्वी याच कंपनीच्या एका प्लान्टसाठी दिवसभराचं प्रशिक्षण देताना मी हा तपशील त्या टीमला सांगितला. पहिलं ऑडिट यशस्वी झाल्यावर ताबडतोब कारे सरांचा फोन मला आला. त्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचे आभार त्यांनी व्यक्तिश: मानले.

उद्याोगजगतामधल्या अनेक प्रकारच्या कंपन्यांसोबत आमच्या संस्थेचा संघ जेव्हा काम करतो तेव्हा त्या त्या क्षेत्रातले बारकावे कळत जातात. याचा फायदा कुठे होतो, तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबर व्यवसाय मार्गदर्शन चाचण्यांच्या रिपोर्टची चर्चा करताना. ‘‘आधी विचार कर आणि मग निर्णय घे.’’ हा जगातला अतिशय लोकप्रिय सल्ला आहे. विचार करायला शिकवणारे अनेक छोटे प्रशिक्षणक्रम आज आम्ही वापरतो. नियोजनाचा विचार, निर्मितीचा विचार, भविष्याचा विचार असे अनेक विषय त्यात येतात. आधुनिक उद्याोगजगतात, ‘डॉक्युमेंटेशन अँड डेटा’ म्हणजेच दस्तावेजीकरण आणि विदा याला महत्त्व आहे. पण हे करणार कोण, तर मनच! ‘विदानिष्ठा आणि विचार’ असा एक कार्यक्रम यातून तयार झाला. तत्त्वज्ञान, इतिहास या विषयांना उद्याोजकतेशी जोडणारे कार्यक्रम तयार झाले. आग्य्राहून सुटका म्हणजे आणीबाणीचं नियोजन(Crisis Management) तर दांडी यात्रा म्हणजे प्रकल्प नियोजन(Project Management).सध्या दुसरा लोकप्रिय सल्ला आहे ‘ध्यान करा’. पण ध्यान म्हणजे काय याची शास्त्रीय मीमांसा कुणी करत नाही. या विषयावर तीन दिवसांचं निवासी शिबीर घेता येईल, एवढा ऐवज आता तयार झाला आहे.

अगदी नवउद्यामी, छोटे उद्याोजक यांच्याबरोबरही सातत्यानं प्रशिक्षण होत आहे. नाशिकच्या ‘लघुउद्याोग भारती’ या संस्थेबरोबर गेली चार वर्षं या गटासाठी वर्षभराच्या गटसंवर्धनाची तीन आवर्तनं केली. आता चौथं सुरू होईल. पंचवीस ते तीस तरुण-तरुणी ते ज्येष्ठ असा मिश्र गट असतो हा. इतक्या वैविध्यपूर्ण अनुभवातून माझ्यातलाही सामाजिक उद्याोजक घडत असतो. भावनिक संपत्ती निर्माण करून राष्ट्रकारणासाठी त्याचा विनियोग करणारा.

म्हणजे खरं तर आपल्यापैकी प्रत्येकामध्ये एक उद्याोजक लपलेला असतो. कोणताही व्यवसाय-नोकरी करणारी व्यक्ती असो की एखादी गृहिणी किंवा विद्यार्थी असो, नेहमीच्या यांत्रिक चौकटीमधून स्वत:ला सोडवायचं आणि स्वयंस्फूर्तीने काही तरी नवीन करायला पाहायचं. पण त्यात ज्ञान, अनुभव, समज याची वृद्धी अपेक्षित हवी. ज्या काही मोठ्या उद्याोजकांची नावं घेतली त्या सर्वांचे पहिले भागधारक ते स्वत:च होते की, आज ती संख्या हजारो-लाखोंच्या घरात असेल. या प्रवासात अर्थप्राप्ती येईलच, पण ते असेल ओघानं येणारं उत्पादन किंवा परिणाम. फक्त पैशासाठी जगण्याचा विचार उद्याोजकतेला मारक असतो.

‘बिझनेस करायचाय’ असं म्हणणारे काही जण भेटतात. मी विचारतो, ‘‘कशासाठी?’’ उत्तर येतं. ‘‘भरपूर पैसे कमावण्यासाठी.’’ मी मनातल्या मनात हसतो; पण त्यांना हिणवत नाही. व्यापाराची मर्यादा कळली तर त्यातले काही जण तरी उद्याोगाकडे वळतील, अशी आशा मला नेहमीच असते.