बुवा-बाबांच्या शोषणाला समाजातील सर्वच स्तरांतील लोक बळी पडतात. नीताला मूल होण्यासाठी सदाबाबाने तरंगणाऱ्या गडव्याचा चमत्कार करून दाखवला, पण तिने योग्य वेळी ‘अंनिस’चे कार्यालय गाठल्यामुळे तिचे शोषण थांबले. समाजाची ही दुबळी मानसिकता दूर करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे.
अगतिकता, अस्थिरता, अपराधी भावना, मानसिक आजार, आरोग्यविषयक सुविधांचा अभाव, या आणि अशाच कारणांमुळे लोक बुवाबाजीकडे आकृष्ट होतात. मग बुवा-बाबा-माता त्यांना नादाला लावतात. अनेकदा अगदीच क्षुल्लक चमत्कार करून ते लोकांना आकृष्ट करतात. त्यांचे चेले भोंदूंची बेमालूमपणे जाहिरात करत असतात. बुवा-बाबांकडे जाणाऱ्यांची प्रतवारी ठरलेली आहे. गावाकडची एखादी बाई मुलगा आजारी पडला म्हणून भगताकडे जाते. जरा शिकलेला माणूस मोठ्या (?) बाबाकडे जातो, तर प्रसिद्धीच्या झोतातल्या व्यक्ती बडे राजकारणी, व्यापारी एखाद्या नावाजलेल्या (?) बुवाकडे जातात. बुवा-बाबाला नादावलेले बहुसंख्य अनेकदा शोषणाचे बळी ठरतात.
नीताचं लग्न होऊन आठ वर्षं उलटली. मूल-बाळ होत नाही म्हणून सासरघरी कुरबूर सुरू झाली. डॉक्टर ते बुवा-बाबांचे उपाय सुरू झाले. डॉक्टरांनी ‘दोघांची तपासणी करावी लागेल,’ असं सांगूनही नीताचे पती मात्र डॉक्टरकडे जात नव्हते. तशातच नीताच्या सासूला कुणीतरी सदाबाबाची महती सांगितली. नीता बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली समंजस, हुशार, चुणचुणीत तरुणी. तिची पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही घरच्यांनी तिच्या लग्नाचा बार उडवून दिला. नीताचे पती द्वीपदवीधर. एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होते. घरची आर्थिक स्थिती उत्तम होती.
एक दिवस नीताची सासू नीताला सदाबाबाच्या दरबारात घेऊन गेली. सदाबाबाने नीताची समस्या जाणून घेतली. नीताला बाबाने उदी व धागा दिला. बिदागी घेतली व पुन्हा आठ दिवसांनी बोलावलं. बाबाच्या दरबारात नीताच्या येरझारा सुरू झाल्या. सुरुवातीला २-३ वेळा नीताची सासू तिच्या सोबत गेली होती. नंतर ती नीताला एकटीलाच बाबाकडे पाठवू लागली. नीताला सदाबाबाकडे जाणं आवडत नव्हतं, परंतु सासरच्या लोकांच्या इच्छेखातर ती जात होती. आता सदाबाबा तिला दरबार संपल्यावरही त्याच्या समोर बसवून ठेवत होता. काहीबाही मंत्र म्हणायला सांगत होता. नको तिथे स्पर्श करत होता. ही बाब नीताने सासू व नवऱ्यालाही सांगितली. परंतु ते नीताचं बोलणं गांभीर्याने घेत नव्हते. एका गुरुवारी सदाबाबाने नीताशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. नीता तिथून जीव घेऊन पळाली. तिने थेट आमचं कार्यालय गाठून आम्हाला सर्व वृत्तांत सांगितला. आम्ही तिला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्याविषयी सांगितलं. परंतु तिने फिर्याद देण्यास नकार दिला. ‘माझा संसार मोडेल,’ असं ती म्हणाली. नीताची घालमेल, असहायता बघून आम्ही हेलावून गेलो. सदाबाबावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सदाबाबाला दरबारात जाऊन रंगेहाथ पकडायचं ठरवलं. आम्ही सहकारी दरबाराची पाहणी करून आलो. पंचेचाळिशीच्या आसपास असलेला धिप्पाड शरीरयष्टीचा सदाबाबा. दर गुरुवारी त्याचा दरबार भरत होता. गावाच्या बाहेरच्या बाजूला त्याचं घर व घराच्याच बाजूला बाबाचा आश्रम होता. या आश्रमात एका मोठ्या सभागृहामध्ये लोक रांगेत बसत. सभागृहाच्या आतल्या बाजूला एका खोलीत बाबाची बैठक होती. रांगेने एकावेळी एकाच प्रश्नकर्त्याला बाबाचे चेले आत सोडत होते. बाबाला त्याच्या बैठकीच्या ठिकाणाहून संपूर्ण सभागृृह दृष्टिक्षेपात येत होते.
सदाबाबाची ख्याती दूरवर पसरलेली होती. आम्ही तिथे आलेल्या लोकांशी जाणीवपूर्वक चर्चा करत होतो. प्रत्येक जण बाबाची महती सांगत होता. गुणगौरव करत होता. एक निवृत्त शिक्षणाधिकारी बाई बाबाकडे नोकरी काळातील न्यायालय प्रकरणाबाबतची समस्या घेऊन आल्या होत्या. शिक्षण खात्यात प्रमुख पदावर असलेली व्यक्ती एवढी अंधश्रद्ध असेल तर शिक्षणाचा उपयोग काय? असा प्रश्न पडतो. सदाबाबासमोर प्रत्येक प्रश्नकर्ता जाऊन बसल्यावर तो एका गडव्यात तांदूळ ओतून त्या गड्व्यातील तांदळावर छोट्या त्रिशुळाने मारायचा, काही वेळाने त्रिशूळ हातात धरून गडवा अधांतरी तोलायचा. डोळे मिटून कसला तरी साक्षात्कार झाल्याचा आव आणत प्रश्नकर्त्या भक्तांच्या प्रश्नाचं उत्तर सांगायचा.
पुढच्याच आठवड्यातल्या गुरुवारी तिथं जाण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणे मी व माझे सहकारी सकाळी नऊ वाजताच सदाबाबाच्या गावी पोहोचलो. मदतीसाठी पोलीस ठाणे गाठले. रीतसर अर्ज दिला. आम्हाला फार कष्ट न पडता पोलीस मदत मिळाली. दोन पोलीस हवालदार व आम्ही कार्यकर्ते सदाबाबाच्या दरबाराच्या दिशेने निघालो. सकाळी ११ वाजता संबंधित गावात पोहोचलो. अन्य सर्व कार्यकर्ते व पोलीस बाबाच्या दरबारापासून काही अंतरावर गाडीतच थांबले. मच्छिंद्र वाघ व मी बाबाच्या दरबारात प्रश्नकर्ते भक्त म्हणून रांगेत बसलो. एक कार्यकर्ता दरवाजाजवळ थांबवला. (दरबारात जाताना वेशभूषा, केशभूषा काही आवश्यक ते बदल केले.) भक्ताच्या प्रश्नावर उपाय सांगत, गंडे-दोरे देऊन रांग पुढे सरकत होती. तेवढ्यात सदाबाबाला एक फोन आला. फोन येऊन गेल्यानंतर बाबा मोठ्या आवाजात म्हणाला, ‘पोलिसांचा फोन आहे.’ ते म्हणतात, ‘दरबार बंद करा, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’वाले येणार आहेत,’ असे बाबाने सांगताच दरबारातील लोकांनी ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. आमच्याच समोर आम्हाला शिव्या देणं सुरू होतं. काही भक्त म्हणत होते, ‘‘येऊ तर द्या त्यांना, त्यांचे हात-पाय मोडून हातात देऊ, बाबा दरबार चालूच ठेवा.’’ सदाबाबाला पुन्हा एका हितचिंतक पोलिसाचा फोन आला. ‘‘ताबडतोब दरबार बंद करा,’’ दुसऱ्या फोनमुळे सदाबाबाची चलबिचल झाली. तोपर्यंत मला बोलावलं गेलं. मला माझी समस्या विचारली. ‘घरात सुख नाही, पैसा टिकत नाही, भाऊबंदांनी जमीन बळकावली.’ असं मी सांगितलं. बाबाने गडवा अधांतरी तरंगवत मला मूठभर राख, झेंडूची फुलं, एक लिंबू दिला. राख घरात टाकायला सांगितली. लिंबू कापून फुलं व लिंबू भाऊबंदांच्या घराच्या दिशेने फेकायला सांगितलं व पुन्हा १५ दिवसांनी बोलावलं. बाबाच्या चेल्यांनी माझ्याकडून २०० रुपये घेतले. माझ्यानंतर स्त्रीवेशातील मच्छिंद्र वाघांनी ‘मला मूलबाळ होत नाही,’ असं बाबाला सांगितलं. बाबाने त्यांच्या स्तनावरून (कृत्रिम स्तन) हात फिरवायला सुरुवात करताच वाघांनी भरभर साडी सोडली आणि पुरुष वेशातील खरे मच्छिंद्र वाघ समोर उभे राहिले. वाघ सदाबाबासमोर उभे असतानाच मी आमचे अन्य कार्यकर्ते व पोलिसांना बोलावून घेतलं. या सर्व प्रकाराने बाबा गोंधळला. बाबाकडे जमलेला जमावही घाबरला. थोड्या वेळापूर्वी ‘अंनिस’ला शिव्या घालणारे, ‘पोलीस आले तर आम्ही पाहू. बाबा दरबार चालू ठेवा’, म्हणणारे आता बाजूला सरकले. पोलीस व आम्ही कार्यकर्त्यांनी सदाबाबाला गाडीत बसवून पोलीस ठाण्याला आणलं. तिथे आणल्यानंतर बाबाने काही प्रतिष्ठितांना फोन केले. बाबाचे हितचिंतक पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले. मात्र दरबारात गुरगुरणारं कोणीही बाबासोबत पोलीस ठाण्यात आलं नव्हतं. तिथे आल्यानंतरही सदाबाबा मोठ्या आवेशात चालत-बोलत होता. त्याच्याकडे असलेले संपर्क, भक्तगण व अन्य यंत्रणा त्याला कायद्याच्या कचाट्यातून अलगद सोडवेल अशी त्याला खात्री असावी.
तत्पूर्वी बाबाच्या दरबारातील वस्तूंचा पंचनामा वगैरे सोपस्कार पार पडले होते. आम्ही त्याचाच गडवा घेऊन त्यात तांदूळ भरून त्याचीच कृती करून तो अधांतरी तरंगवून दाखवला. ‘तू लोकांची फसवणूक करतो,’ हे बाबाला सांगितलं. वेळ पुढे सरकत गेली तशी बाबाला खात्री पटली की, आपली सुटका होणार नाही. बाबाने पवित्रा बदलला. मधूनच पोलीस ठाण्यामध्ये असलेले बाबाचे हितचिंतक हवालदारही बाबाला गुन्हा कबूल करून माफीनामा लिहून देण्याबाबत सुचवत होते. हे आमच्या नजरेतून सुटलं नव्हतं. हळूहळू सदाबाबा हतबल झाला. पोलीस निरीक्षकांना तो विनवू लागला. ‘‘साहेब मला सोडा, मी पुन्हा असं करणार नाही.’’ आम्हालाही सांगत होता की, ‘‘माझी चूक झाली, पुन्हा असं माझ्या हातून घडणार नाही.’’ त्यावेळी बाबाचे एक-दोन हितचिंतक तिथं होते. त्यांच्या मार्फत बाहेर बाबाने माफी मागितल्याचा निरोप गेला. त्यामुळे बाहेरची गर्दी ओसरायला सुरुवात झाली होती. लोकांच्या मनातून ‘बाबाचा अधांतरी तरंगणारा गडवा’ जाणं आवश्यक होतं. त्यासाठी बाहेर जमावासमोर स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने गडवा अधांतरी तरंगण्याचा प्रयोग करून दाखवला. त्यामागील विज्ञानही सांगितलं.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्र दोन्ही माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या. बाबाचा दरबार बंद झाला. नीताचा नवरा, सासू, व सदाबाबाकडे येणारे अन्य भक्त यांच्या डोक्यातून अंधश्रद्धा हद्दपार करण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक खूप प्रयत्न करावे लागले. मध्ये काही काळ गेल्यानंतर नीताच्या सासूशी संपर्क साधला. नीताला मूल व्हावं, घरात नातवंडं खेळावीत असं वाटणं साहजिक आहे. परंतु त्यासाठी योग्य तो मार्ग चोखाळा. वैद्याकीय मदत घ्या. डॉक्टरांच्या उपचाराने नक्कीच यश येईल. असं वारंवार सांगितलं. नीता व तिचा नवरा दोघांनी डॉक्टरांकडे जाणं आवश्यक असल्याचं समजावलं. नीताच्या सासूची मानसिकता बदलली. उपचाराची दिशा बदलली.
चमत्कार हे बुवाबाजीचं महत्त्वाचं साधन आहे. चमत्काराच्या आधारे ते लोकांना आकर्षित करतात. विश्वातील प्रत्येक गोष्ट कार्यकारणभावाने बद्ध आहे. प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे. आपोआप काहीही घडत नाही. हा वैज्ञानिक दृष्टिकोन पाठ्यपुस्तकातून शिकवला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार अंगीकारणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असल्याचे राज्यघटना सांगते. असं असलं तरीही कार्यकारणभाव ओलांडणारी कोणती तरी शक्ती अस्तित्वात आहे. बुवा-बाबा-माता त्याआधारे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे चमत्कार करतच असतात. अशी मानसिकता घेऊन समाजातील अनेक लोक वावरत असतात. अशी मानसिकता घेऊन वावरणारे लोक गरीब-श्रीमंत-शिक्षित-अशिक्षित, सर्व जाती-धर्मांत असतात. कायदा-सुव्यवस्थेचे काही रखवालदारही याला अपवाद नाहीत. भारतीय संविधानाच्या कक्षेत, कायद्याच्या मर्यादेत काम करणाऱ्यांना मदत करण्यापेक्षा भोंदू बाबाचे हितचिंतक म्हणून ते काम करतात.
स्त्रीचा जन्मच अस्वागतार्ह वाटणाऱ्या समाजात, मुलगी जन्माला घातल्यास तिचं लग्न होणं, तिला अपत्य होणं त्यात तो मुलगाच असणं अत्यावश्यक असतं. अन्यथा त्या स्त्रीला वांझ, निपुत्रिक म्हणून कुटुंब, आप्तेष्ट, समाज छळतो. अशा स्त्रियांना अपत्यप्राप्तीसाठी अनेकदा चुकीच्या मार्गाला नेलं जातं. तिथं अनेकदा त्यांचं शारीरिक शोषणच होतं. समाजाच्या याच मानसिकतेचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक सदाबाबा टपलेलेच असतातच. यासाठी गरज आहे ती प्रबोधनाची.
ranjanagawande123@gmail.com
(सदर लेखातील नावे बदललेली आहेत.)