डॉ. आनंद नाडकर्णी                                 

शालेय अभ्यासातलं इतिहास या विषयाचं पाठय़पुस्तक हातात पडण्याआधी बाबासाहेब पुरंदरे आणि गो.नी. दांडेकर यांची लेखननिर्मिती मनावर उमटली हे किती छान झालं! आधी आकर्षण, प्रेम आणि नंतरचा खोल अभ्यास अशी साखळी असेल तर तो प्रवास थ्रिलिंग होऊन जातो. तर अशा सुरुवातीमुळे मी इतिहासाचा, खासकरून शिवकाल, स्वातंत्र्य समराचा शतकभराचा काळ, दुसरं महायुद्ध अशा कालखंडांचा पक्का ‘फॅन’ बनत गेलो. या छंदाचे मला काही अनपेक्षित फायदे झाले. शाळेमध्ये असताना ‘राजा शिवछत्रपती’ मुखोद्गत असल्यानं शाळेत कुठेही ‘ऑफ तास’ असला की मला पाचारण केलं जायचं. किल्ली मारली की मी फर्माईशीनुसार, अफजलखान-शाहिस्तेखान अशी आख्यानं सुरू करायचो आणि पस्तिसाव्या मिनिटाला योग्य उत्कर्ष बिंदूवर थांबायचोदेखील. त्यामुळे माझ्या वर्गातील अभ्यासाचा तास अधिकृतपणे चुकायचा आणि परिसरातील पत वाढायची, असा दुहेरी फायदा होता.

आवडत्या कालखंडांवरची आणि व्यक्तींवरची पुस्तकं वाचणं आणि जमवणं हा भाग ओघानं आलाच. तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू झाल्यावर असं लक्षात आलं की, ज्या व्यक्तीनं लिहिलेला ग्रंथ वाचायचा, त्या व्यक्तीचं जीवन, तो काळ लक्षात यायला हवा. शंकराचार्य, आचार्य विद्यारण्य (पंचदशी ग्रंथ), ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद,  विनोबा अशा व्यक्तींच्या बाबतीत हे आपोआप घडत गेलं. व्यक्तीने लिहिलेले विचार वाचताना ती व्यक्ती दिसायला पाहिजे, आपल्याशी बोलायला हवी. ‘गीतारहस्य’ वाचायचं तर लोकमान्य टिळक मंडालेमध्ये कसे राहात होते ते डोळय़ापुढे आलं पाहिजे. जेलरने दिलेल्या पेन्सिलीने (शाईचं पेन नव्हे) आधीच क्रमांक घातलेल्या कागदांवर, तीव्र विरोधी तपमानामध्ये एकतान झालेले लोकमान्य आणि त्यांच्या अंगाखांद्यावर निर्धोकपणे बागडणारे पक्षी डोळय़ासमोर दिसू लागले की ‘गीतारहस्य’ आपल्या मनात मुरायला लागतं.

इतिहासातील व्यक्ती, घटना आणि नातेसंबंध, भावनिक आरोग्याला जोडण्याची सुरुवात टिळकांपासूनच झाली. आपल्या पत्नीच्या निधनाची वार्ता कळल्यावर काय वाटलं असेल लोकमान्यांना. ते होते दूरदेशीच्या तुरुंगात. सहा-साडेसहा वर्षांनी तिथून परत येतेवेळी पुण्याजवळ हडपसरला त्यांची खास आगगाडी थांबली तेव्हा त्यांचा ‘सेल्फटॉक’ कसा होता? अभ्यासातून मला उत्तरं मिळत गेली. दिशा सापडत गेली. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी) या विषयावरचे अभ्यासवर्ग घेताना टिळकादिकांचे दाखले विनासायास मिळू लागले. ऐकणाऱ्यांना सुलभपणे कळून जायचा तो मुद्दा.

 अशाच एका वर्गामध्ये पुण्याच्या, ‘स.प.’ महाविद्यालयाच्या दोन प्राध्यापिका होत्या. त्यांना वाटले की, माझा लोकमान्यांवरचा अभ्यास गाढा आहे. त्यांच्या महाविद्यालयात दरवर्षी,

१ ऑगस्टला त्यांच्या वक्तृत्व सभेच्या उद्घाटनाचं अभिभाषण द्यायचं असतं. त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि तेही जानेवारी महिन्यात, म्हणजे सहा महिने नोटीस देऊन.

आजवरच्या निर्हेतुक वाचनाला काही विशिष्ट सूत्रामध्ये गुंफून सादरीकरण करण्याचा पहिला प्रयोग, हा असा सुरू झाला. टिळकांच्या जीवनाचे, दोन प्रधान हेतू किंवा उद्दिष्टे होती. एक होता ज्ञानहेतू तर दुसरा कर्महेतू. ‘मी राजकारणाच्या धकाधकीत पडलो नसतो तर गणिताचा प्राध्यापक झालो असतो,’ हे त्यांनीच लिहून ठेवलं आहे. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण, त्यांना ही उद्दिष्टं कशी मिळाली, त्या दोन टोकांमध्ये त्यांची ओढाताण कशी झाली याचं चित्र, संबंधित पुस्तकांच्या वाचनातून स्पष्ट होत गेलं. या दोन उद्दिष्टांचा समन्वय म्हणजे ‘गीतारहस्य’ असं त्या ग्रंथाकडे पाहता आलं आणि युरेका! . . . नव्या दमानं ‘गीतारहस्य’ वाचलं. माझ्या कपाटामध्ये, महापुरुषांच्या पुस्तकांचे खण असतात. त्याची सुरुवात टिळकांपासून झाली. शिवाजी महाराजांचा खण आधीपासूनच होता.

आता हे सारं नुसतं बोलायचं कसं?  चला, स्लाइड्स डिझाइन करूया. श्रोते-प्रेक्षकांना समोर शब्द ‘दिसले’ तर बारकावे नीटपणे दाखवता येतात. शब्दार्थ, भावार्थ, गर्भितार्थ, मथितार्थ असे पदर उलगडता येतात. पण फक्त मजकुराच्या स्लाइड्स असतील तर ते किती बोअिरग होईल. चला, फोटो मिळवूया. नेटवरून, पुस्तकांमधून फोटो गोळा करायला लागलो. त्यातील काही फोटो आपल्या नेहमीच्या पाहण्यातले नव्हते. त्या त्या महान् व्यक्तीच्या अधिकृत छायाचित्रात आपण त्यांना कोंडूनच टाकतो, आपल्या दृष्टिकोनाला. माझ्या संग्रहात विवेकानंद, गांधीजी, नेताजी अशांचे विविध प्रसंगातले फोटो आहेत. ते पाहतानाच मजा येते.

अशा प्रकारे माझं पहिलं सादरीकरण तयार झालं आणि यथावकाश सादर झालं. त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. पण सुरू झालेला अभ्यास थांबतो थोडाच. नवे तपशील, नवी माहिती. लोकमान्य टिळक विषयक सादरीकरण अडीच तासाचे होते. सव्वा तासाचे दोन अंक. माझी अवस्था खजिन्याच्या किल्ल्या मिळालेल्या माणसासारखी झाली होती.

इतिहासातील व्यक्तींकडे ‘माणूस’ म्हणून पाहिलं तर ते सारे तपशील जिवंत होतात. त्यांच्या विचार, भावना, वर्तनाला समजून घेताना, त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वालाच एक उत्कृष्ट आरसा दिसतो. आणि हा जादूचा आरसा शिकवणारा असतो. भूतकाळाचा वर्तमानाशी असलेला संबंध नेमकेपणानं दाखवणारा असतो. वा! वा! माझ्यासाठी इतिहास हा ज्ञानहेतू आणि मनआरोग्य प्रबोधन हा कर्महेतू! लोकमान्यांनी दोघांना कसं जुळवून आणलं पाहा.

आता शिवराय खुणावू लागले. शिवचरित्राचा आवाका आकाशाएवढा. थबकलो. विचार केला. आपण ‘केसस्टडी’ हा अॅिप्रोच घेऊया. प्रथम डोळय़ासमोर आली, ‘आग्य्राहून सुटका’. महाराजांच्या जीवनातील या प्रसंगामध्ये प्रत्यक्ष शस्त्र वापरलंच गेलं नव्हतं. सारं काही झालं ते मन:शक्तीच्या बळावर. आपत्तीकाळामध्ये भावनांचं नियमन आणि विचारांचं नियोजन कसं करायचं याचा वस्तुपाठच की! ‘केसस्टडी’ म्हणजे एक कहाणी. पण ती समजून घ्यायची तर अभ्यास विस्तृत करावा लागतो. आजवर श्रद्धेनं वाचलेला शिवकाल आता विचक्षणपणे विंचरायला लागलो. नवी पुस्तकं घेतली. नेटवरून मिळतील ते नेटके संदर्भ शोधले. अशी सारी सादरीकरणाची तयारी. अशा एका अभ्यासाला मला सरासरी एक वर्ष लागतं. कारण अन्य विषयांमधल्या, कर्तव्यांमधल्या परायणतेला पर्याय नसतो. एका अर्थानं हे अभ्यास ठरतात ‘ज्ञानविसावा’, तणाव नियोजनाचं साधन. महाराजांनी सुटकेसाठी शुक्रवार सायंकाळच का निवडली किंवा संभाजीराजांना मथुरेला पोचवायचं नियोजन कसं आखलं अशा प्रश्नांना उत्तरे मिळाली की आनंद होतो. इतिहास आपल्याला सारे तपशील देतो असे नाही. इतिहासलेखनाची विविध साधने वापरताना त्यातील लिहिणाऱ्याच्या भूमिका वेगवेगळय़ा असतात. आग्य्राच्या दरबारात घडलेल्या नाटय़ाची वर्णनं ‘आलमगीरनामा’ वेगळं करणार, दिल्लीतला इंग्रज रेसिडेंट वेगळं लिहिणार आणि राजस्थानातील राजांचे दूत वेगळा अहवाल पाठवणार. एखाद्या घटनेच्या विविध कोनांकडे, विविध दृष्टिकोनांमधून कसं पाहता येतं हे कळतं. आपापलं सत्य शोधणारे किमान तीनशेसाठ ‘अंशाचे’ दृष्टि‘कोन’ असणार हे आकळणं म्हणजे मानसिक आरोग्याचा केवढा मोठा धडा!

या कालखंडातील महाराजांच्या विचार-भावनांचा आपल्या परीनं मागोवा घेताना, आपलं शिवप्रेम डोळस बनतं असा अनुभव आला. सत्तेच्या राजकारणासाठी शिवप्रभूंचा पुण्यप्रभाव वापरणारी परंपराही महाराष्ट्राला नवीन राहिलेली नाही. पण त्यांच्याकडून नेमकं काय शिकायचं? या तयार सादरीकरणासोबत मी ‘Crisis Management’ अर्थात् ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावरचं वेगळं सादरीकरण तयार केलं. आता कार्यक्रम सादर करण्याचे दोन मार्ग तयार झाले. एकपात्री रंगमंच प्रयोग आणि छोटय़ा गटासाठी असेल तर या प्रयोगानंतर तपशीलवार चर्चा करणारी कार्यशाळा. विविध औद्योगिक संस्थांसाठी तसेच लष्करी-निमलष्करी दलांसाठी कार्यशाळा घेऊ लागलो. त्यात मुंबईच्या

‘फोर्स-वन’ या कमांडो फोर्सचाही समावेश आहे. नाशिकच्या ‘आर्मस्ट्राँग लॉजिस्टिक’ कंपनीमध्ये महाराजांच्या व्यवस्थापन तत्त्वांचा अगदी सततचा वापर जाणतेपणे करण्यात येतो. तिथे हे सत्र साडेचार तास चाललं. नाशिकमध्येच या सादरीकरणाचे किमान पाच प्रयोग झाले.

आपलाही अभ्यास मजेत चालतो आणि लोकांनाही उपयुक्त ठरतो, या अनुभवानंतर अजून एक विस्तृत सादरीकरण तयार झालं, ‘शिवाजी-द सीईओ.’ हे सादरीकरणही मी भारतभर खासकरून औद्योगिक क्षेत्रात करू लागलो. करोना साथीच्या काळामध्ये या विषयाचे पाच भाग आणि लोकमान्य टिळक विषयक सादरीकरण यू-टय़ूबवर चढले. आणि अनेकांपर्यंत पोहोचले. भारतीय लष्करातील अधिकारी ते उद्योजक या साऱ्यांना त्यातून दृष्टी आणि स्फूर्ती मिळाली. वर उल्लेख केलेल्या आर्मस्ट्राँग कंपनीचा विनीत माजगावकर प्रथम भेटला तो एका रेस्टॉरंट बाहेर. तो अगदी प्रेमानं भेटला, कारण यू-टय़ूबवरचे शिवरायांच्या व्यवस्थापनाचा प्रत्येक भाग तो नियमितपणे प्रशिक्षणासाठी वापरतच होता. त्या मैत्रीतून मी त्यांच्या कंपनीत या विषयावरच्या प्रत्यक्ष कार्यशाळा घेऊ लागलो. आणि आता त्या सर्वाचा मित्रच बनलो.

‘इति ह आस’ म्हणजे ‘हे असे घडले!’ आणि हिस्टरी या शब्दामागच्या ‘हिस्टर’ या शब्दाचा अर्थच आहे शिकलेला, ज्ञानी माणूस. मनआरोग्याच्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांला समाजापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीच्या भाषण-चर्चा-मुलाखतींपेक्षा नवीनच मार्ग मिळाला होता. आणि इतिहासाच्या पानांमधून अनेक आकर्षक व्यक्तिरेखा मला साद घालायला लागल्या होत्या. त्यात गांधीजी होते, सुभाष बाबू होते. विवेकानंद, विनोबा होते, महाराष्ट्राची संत परंपरा होती आणि इतरही काही खास महापुरुष!

 पुढच्या दोन दशकांमध्ये म्हणजे आजपर्यंत हे अभ्यास कसे फुलारले आणि त्यांनी उमेद कशी वाढवली ते पाहूया पुढच्या लेखांकात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

anandiph@gmail.com

(‘शिवाजी-द-सीईओ’चे सर्व भाग आवाहन आय.पी.एच. या चॅनेलवर उपलब्ध. ‘लोकमान्यांची तितिक्षा हा पॉडकास्ट, याच चॅनेलवर उपलब्ध आहे.)