|| दीपक घैसास

स्त्रियांमधील सर्जनशीलता आणि प्रतिभा हा समाजाचा वा देशाचा अमूल्य ठेवा असतो. या गुणांचा वापर उद्योगासारख्या क्षेत्रात करून घेणे हे निकडीचे आणि अनिवार्य होत चालले आहे. काही उद्योग अजूनही पुरुषप्रधान उद्योग आणि काही स्त्रीप्रधान व्यवसाय म्हणूनच ओळखले जातात. उद्योगातील तंत्रज्ञान जसजसे विकसित होत जाईल तसतसे त्याचे शिक्षण घेण्यात मुला-मुलींना समान संधी मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच समानता येऊन देशाच्या अर्थकारणाला मोठा लाभ होईल.

आज जगभरातील उद्योग क्षेत्रातील स्त्रियांचे योगदान लक्षणीय आहे. जगभरात २० कोटी स्त्रिया उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे त्या स्त्रियांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर होतेच, पण जगाच्या सामाजिक अर्थकारणालाही बढावा मिळतो. परंतु जगभरात निरीक्षण केल्यावर लक्षात येते की यापैकी बहुसंख्य स्त्रिया या कमी कुशल कामावर आहेत आणि त्यांना मिळणारा पगारही पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. त्यांच्यापैकी काही तर अनारोग्यकारी उद्योगांमध्ये काम करतात आणि त्याचा परिणाम दुर्दैवाने त्यांच्या मुलांवरही होताना आढळतो. अर्थात प्रगत आणि भारतासारख्या प्रगतिशील देशांमध्ये स्त्रियांचा उद्योगातील उच्च पदांवरही वाढता सहभाग दिसून येत आहे. उद्योगात स्त्री-पुरुषांना समान संधी मिळावी याकरिता बऱ्याच देशांत आणि उद्योगांत जोमाने प्रयत्न सुरू आहेत, पण अशी समानता येण्यास अजून काही वर्षे किंवा दशकेही लागतील अशी शंका आहे.

वास्तविक स्त्रियांमधील सर्जनशीलता आणि प्रतिभा या कोणत्याही समाजाचा वा देशाचा अमूल्य ठेवा असतो. आजवर कुटुंब चालवण्यासाठी, पुढच्या पिढीवर संस्कार करून ती घडवण्यासाठी या ठेव्याचा उपयोग करून घेण्यात आला. पण समाजाने केवळ एवढय़ावरच समाधान न मानता स्त्रियांमधील या गुणांचा उद्योगासारख्या क्षेत्रात वापर करून घेणे हे निकडीचे आणि अनिवार्य होत चालले आहे. आज उद्योगजगात ३० टक्के कार्यशक्ती ही स्त्रियांची आहे. पण यातील बहुतांश स्त्रिया या कमी प्रतीच्या कामात गुंतवल्या जातात.

शेती आणि कापड उद्योगात यातील बहुसंख्य स्त्रिया काम करताना दिसतात. उद्योगातील तंत्रज्ञान झपाटय़ाने बदलत असताना आणि समानतेची संधी देण्यास समाज बांधलेला असताना या स्त्रियांनी अशा कमी दर्जाच्या कामात का गुंतून राहावे? याची तीन प्रमुख कारणे दिसतात. तरुण स्त्रियांना तंत्रशिक्षणाची संधी नसणे हे प्रमुख कारण. नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण जोपर्यंत या स्त्रियांना मिळू शकत नाही तोपर्यंत उद्योगातील उच्चपदस्थ कामे मिळणे त्यांना दिवसेंदिवस कठीण होत जाईल. शेती वा कुटीर व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियाही बहुतेक जुन्या आणि पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. त्यांनाही त्या त्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्याचा कामात वापर करून घेण्याचे कौशल्य शिकवण्याची गरज आहे.

दुसरे प्रमुख कारण म्हणजे उद्योगातील स्त्रियांना मिळणारा कर्ज पुरवठा. वास्तविक कर्ज परताव्यामध्ये स्त्रीवर्ग चोख असूनसुद्धा स्त्री-पुरुषांना कर्ज पुरवठय़ामध्ये समान वागणूक मिळताना दिसत नाही. स्वत:च्या हिमतीवर आपल्या उद्योगाची प्रगती साधणाऱ्या स्त्रियांना कर्ज पुरवठय़ामध्ये प्राथमिकता मिळणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाबरोबरच उद्योगांमध्ये प्रत्यक्ष उत्पादनात, अवजड यंत्रांवर काम करण्याची संधी, हे तुमचे क्षेत्र नाही म्हणून नाकारली जाते. उद्योगातील कामांची – फक्त पुरुषांनी करायची कामे, अशी संकल्पना आता अस्तंगत होणे गरजेचे आहे. म्हणजे अगदी रॉक-ड्रीलरपासून अवजड यंत्रे चालवण्यापर्यंतचे शिक्षण स्त्रियांनासुद्धा देण्याची गरज आहे. भारतात याची अगदी छोटय़ा प्रमाणात सुरुवात होत आहे. अगदी रिक्षा चालवण्यापासून आज सामरिक विमाने चालवण्याची कामे ही स्त्रिया आत्मसात करत आहेत. उद्योगातील तंत्रज्ञान जसे विकसित होत जाईल तसे त्याचे शिक्षण घेण्यात मुला-मुलींना समान संधी मिळणे आवश्यक आहे. पोलिसांपासून पायलटपर्यंत आणि पानवाल्यापासून ट्रक चालकापर्यंत काम करण्याची संधी जेव्हा जास्तीतजास्त शिक्षित स्त्रियांना उपलब्ध होईल तेव्हाच समानता आणता येऊ शकेल आणि त्याचा देशाच्या अर्थकारणाला मोठा लाभ होईल.

मुंबई-पुण्यासारख्या महाराष्ट्रातील बहुतेक शहरांत आज स्त्री-पुरुष खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. तरीही काही उद्योग अजूनही पुरुषप्रधान उद्योग आणि काही स्त्रीप्रधान व्यवसाय म्हणूनच ओळखले जातात. समाजाने पुरुषप्रधान म्हणून मानलेल्या उद्योगांत वा व्यवसायात जेव्हा स्त्रिया शिरकाव करतात आणि स्वत:च्या हिमतीवर कौशल्याच्या जोरावर उद्योगात प्रगती करतात तेव्हा मात्र त्यांना काही अडचणींना तोंड द्यावे लागते. मुळात त्यांची पुरुषांमध्ये काम करताना स्वीकारार्हताच नसते. त्यामुळे प्रत्येक वेळी समान संधी असताना त्यांना पुरुषांपेक्षा जास्त सर्जनशील आणि प्रतिभावान असल्याचे सिद्ध करायला लागते. आणि याचा अहोरात्र मानसिक ताण त्यांच्या कामावर परिणाम करत असतो. उद्योगात स्पर्धात्मक काम करत असताना कामाचे जास्तीचे तास, उशिरापर्यंत चालणाऱ्या मीटिंग्ज आणि या सगळ्यात घर आणि काम यामध्ये ताळमेळ जपणं पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त त्रासदायक ठरतं. अर्थात अशा उद्योगांमध्ये वावरणाऱ्या आणि प्रगती करणाऱ्या स्त्रिया या ऑफिसमधील महिला मंडळांपासून दूर राहून, कोणत्याही सवलतीची अपेक्षा न ठेवता पुरुषांसारखंच काम करून दाखवताना दिसतात. खास करून ज्ञानावर आधारित उद्योगांमध्ये जसे संगणक क्षेत्रामध्ये आज स्त्री-पुरुष ५०: ५० टक्के आहेत आणि कामाच्या बाबतीत त्यांच्यात काहीही फरक जाणवत नाही. अर्थात अशा क्षेत्रात आज पगार ठरवतानाही स्त्री-पुरुष भेदभाव केला जात नाही. पुरुषप्रधान व्यवसायांतही अगदी सैन्य, पोलिसांपासून पूजा सांगणाऱ्या भटजींपर्यंत स्त्रियांचा सहभाग झालेला दिसतो.

काही उद्योग-व्यवसाय स्त्रीप्रधान मानले जातात. जसे पाळणा घरे, नर्सिग, समाजसेवा, बालशिक्षण, ग्रंथपाल, हवाई सेविका, लेखनिक वगैरे आणि काही उद्योग-व्यवसायात स्त्री-पुरुष समानतेने दिसतात जसे वकिली, वैद्यकीय, लेखापाल, हॉटेल व्यवसाय, नोकऱ्या देणाऱ्या संस्था वगैरे. पाळणा घरे वा बालशिक्षण यात आजही फक्त स्त्रियाच काम करताना दिसतात. पण वैद्यकीय, वकिली, लेखापाल, सल्लागार वगैरे व्यवसायांमध्ये स्त्री-पुरुष समानता येताना दिसत आहे. माझ्या मते, उद्याच्या भारतात कोणताही उद्योग वा व्यवसाय पुरुषप्रधान वा स्त्रीप्रधान राहू नये. या सगळ्या उद्योगात जर स्त्री-पुरुषांना समान संधी द्यायची असेल तर त्याकरिता लागणारे प्रशिक्षण मिळण्याचीही समान संधी दोघांना मिळणे जरुरी आहे.

पण माझ्या मते उद्योग-व्यवसाय निवडण्याची वा बदलण्याची ही समान संधी स्त्री-पुरुषांना मिळणे जरुरी आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात हे शक्य आहे. अमेरिकेतील माझी एक मैत्रीण आज यशस्वी डॉक्टर आहे. पण वय १४ वर्षे ते २२ ती एक उत्तम नर्तिका होती, अगदी ब्रॉडवेच्या नाटय़गृहांमध्ये! पण नंतर तो व्यवसाय सोडून तिला वैद्यकीय व्यवसाय निवडावासा वाटला आणि त्याप्रमाणे वय वर्षे २३ ते ३० तिने तो अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पुढे वैद्यकीय व्यवसायातही तेवढेच नाव कमावले. अशी संधीची समानता, व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य हे भारतात मिळत नाही. एकदा का बारावीत आणि स्पर्धा परीक्षेत ठरलं की तेच शिक्षण घ्यायचे आणि तोच व्यवसाय वा उद्योगात आयुष्य काढायचे. यात संधीची समानता कशी येणार? अर्थात त्याकरिता तेवढे उद्योग असणं जरुरी आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची जरुरी आहे. समाजाची आणि कुटुंबाची स्वीकारार्हता जरुरी आहे. जास्तीतजास्त रोजगार निर्माण करणे ही प्राथमिक जबाबदारी सरकारने आणि समाजाने ओळखणे महत्त्वाचे आहे. अशा प्रगतीच्या वातावरणात स्त्री-पुरुष समानता राबवणे सोपे होते. अन्यथा मुळात कमी रोजगारांसाठी जास्त पुरवठा असेल तर जबरदस्तीने समानता आणणे सामाजिक स्वास्थ्याला हानीकारक ठरण्याचा धोका मला दिसतो आहे.

तरीही समानता आणि प्रगती या दोन्ही हातात हात घालून पुढे गेल्या तर ते देशाच्या अर्थकारणाला आणि सर्व समाजाला सर्वोत्तम ठरेल. उद्योगजगतात आज जगभरातील एक निरीक्षण असे दर्शवते की ज्या उद्योगांचे नेतृत्व स्त्रिया करत आहेत त्या उद्योगांमध्ये खर्च बचत सर्वाधिक चांगली दिसते. अर्थात याचा परिणाम त्या उद्योगांच्या नफ्यावर आणि अर्थात प्रगतीवर दिसून येतो. ‘जनरल मोटर्स’सारख्या महाप्रचंड कंपनीची धुरा सांभाळणारी स्त्री, जगातील सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती आहे. भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी यांनी ‘पेप्सी’च्या प्रमुखाचे पद भूषवले आहे. ‘ओरॅकल’सारखी संगणक क्षेत्रातील मोठी कंपनी आज सॅफ्रा कॅटझ ही स्त्रीच चालवत आहे. तर आय.बी.एम.पासून फिडॅलिटीपर्यंतच्या कंपन्यांचे नेतृत्व स्त्रियांनी केले आहे. त्यामुळे उद्योगात स्त्रिया नेतृत्वाची कोणतीही उंची गाठू शकतात आणि उद्योग व्यवस्थितपणे चालवतात याची कोणी शंका बाळगण्याचे कारण नाही. अगदी पुण्याच्या अरुणा भट यांच्याकडे पाहा. पती अशोक भट यांचे अपघाती निधन झाल्यावर या बाईंनी तो व्यवसाय तेवढय़ाच उमेदीने सांभाळला आणि ‘केप्र’सारखी मसाल्यांची कंपनी नावारूपाला आणली. मिरजेच्या आपटे कुटुंबातील स्त्रियांनी खाद्यपदार्थ बनवण्याची आणि त्याचे उत्तम वितरण करण्याच्या उद्योगात जी प्रगती केली आहे ते बघून आश्चर्य नाही तर साहाजिक गोष्ट वाटते.

येणाऱ्या काळात भारतीय शहरात उद्योग क्षेत्रात मग तो स्वत:चा उद्योग असो वा मोठय़ा उद्योगातील उच्च पद असो, समान संधी स्त्रियांची वाट बघत असणार आहे. त्यांनी ती चुकवू नये. समाजाच्या स्वीकारार्हतेची तमा बाळगू नये. एक व्यक्ती म्हणून स्वत:च्या प्रतिभेला पूर्ण वाव मिळेल त्या उद्योग-व्यवसायाचा जरूर स्वीकार करावा. ग्रामीण स्त्रीलाही अशी संधी समानता मिळणे ही आपल्या समाजाची जबाबदारी आहे. एका कार्यक्रमात एका स्त्रीने प्रश्न विचारताना वाईट तोंड करून म्हटले मी काही उद्योजक नाही, साधी होम मेकर आहे, मी प्रश्न विचारू का? त्या वेळी सर्वासमक्ष मी त्यांना म्हटले तुम्ही साध्या कशा? होम-मेकर हा समाजातला सर्वात महत्त्वाचा उद्योग आहे. तुम्ही उद्याचा समाज तयार करण्याचा वसा घेतला आहे आणि तोही कुठलाही पगार न घेता! तुमचं देशाच्या अर्थकारणात निर्णायक योगदान आहे. समाज जेव्हा अशा विचारांना मान्यता देईल तेव्हा स्त्रीबद्दलचा आदर वाढेल आणि मग उद्योगात आपोआप समान संधी उपलब्ध होतील.

deepak.ghaisas@gencoval.com