व्यसनाधीनतेवर उपचार करणाऱ्या ‘मुक्तांगण’ या संस्थेने कालच, २९ ऑगस्टला चाळिसाव्या वर्षात पदार्पण केलं. स्थापनेपासून आरोग्य आणि विकासाच्या ध्येयाकडे झालेली वाटचाल, ध्येयं आणि आजची आव्हानं यात सतत बदल होत असतात. तरीही ही संस्था म्हणजे अजस्त्र आव्हानांपुढे धीर न सोडता काम करत राहण्याचं सामर्थ्य देणारी माणसाच्या विकासाची प्रयोगशाळा आणि जनचळवळ कशी आहे, या अर्थपूर्ण प्रवासाविषयी…

दिनांक २९ ऑगस्ट १९८६. सकाळी साडेदहा-अकराची वेळ. पुण्याच्या सरकारी मनोरुग्णालयाचा परिसर. एका प्रशस्त सभागृहामध्ये व्यासपीठावर बाबा आमटे, त्यांच्या कमरेच्या व्याधीमुळे पलंगावर अर्धवट बसलेले, पहुडलेले. मला त्यांचे स्नेहाळ डोळे दिसत आहेत कारण त्याच व्यासपीठाच्या विरुद्ध बाजूला सूत्रसंचालन करणारा मी. समोरच्या नाट्यगृहसदृश अंधारामध्ये चमकणारे चार चष्मे. पु.लं., सुनीताबाई, सुनंदा (डॉ. अनिता अवचट) आणि बाबा (डॉ.अनिल अवचट). ‘आज व्यसनाधीनतेच्या आजारावर उपचार करणारी एक संस्था जरी सुरू होत असली तरी, ही माणसाच्या विकासाची प्रयोगशाळा आहे, जनचळवळ आहे’ असे मी बोलतो. बाबा आणि पुलंच्या आशीर्वादाची भाषणं होतात. आणि आम्ही ‘आमच्या’ केंद्राच्या इमारतीकडे जाऊ लागतो. तयार होऊनही वापरात नसलेल्या त्या इमारतीला उद्दिष्टाचं सौंदर्य लाभलेलं असतं. दाराशी ‘बजाज’ कंपनीच्या समुपदेशक त्यांच्या एका व्यसनाधीन कर्मचाऱ्याला घेऊन आलेल्या असतात. ‘‘हे खरं उदघाटन!’’ पु. ल. देशपांडे म्हणतात.

त्या दिवशी महादेव घारे व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी दाखल झाले. कळवण्यास अत्यंत आनंद होतो की, आमच्या या शकुनाच्या महादेवाने (सुनंदाचे शब्द) संस्थेबरोबरच आरोग्याची एकूण ४० वर्षं पूर्ण केली आहेत. विचार करत होतो, संस्था नेमकी का स्थापन होते, कशी वाढते, कशी टिकते? संस्था म्हणजे सतत व्यक्त होत जाणारं ध्येय. आरोग्य आणि विकासाकडे नेणाऱ्या ध्येयांची सिद्धी व्हायला अनेक पिढ्या लागतील. कार्यकर्ते म्हणजे या उद्दिष्टांचे वारकरी. आपण माध्यमस्वरूप आहोत याचा विसर व्यक्तीला पडला की संस्थेची सरंजामशाही होऊ लागते.

‘मुक्तांगण’ सुरू झालं तेव्हाची भेडसावणारी समस्या होती गर्द अर्थात ब्राऊन शुगरची व्यसनाधीनता. त्या काळात मुंबईच्या ‘केईएम’ रुग्णालयात आधी ‘आरएमओ’ आणि ‘एमडी’ झाल्यावर व्याख्याता म्हणून काम करणाऱ्या माझ्याकडे उत्साहाची कमतरता नव्हती. देणगी म्हणून मिळालेला ‘स्लाइड प्रोजेक्टर’ घेऊन मी मुंबईतील अशा ठिकाणी कार्यक्रम करायचो जिथे मी प्रथमच जात असायचो. मालवणी वस्तीचे टोक असू दे की रमाबाई नगर वस्तीचा मध्य; परळ नायगावची रंगारी बदक चाळ असू दे की खटाव इमारत, धारावीत रेल्वे रुळांच्या शेजारी, अँटॉप हिलच्या शाळेमध्ये, फोरास रोड -ग्रॅन्ट रोडच्या वेश्या व्यवसायाच्या बाजारात, जनजागरण करणं हाच ध्यास होता. महालक्ष्मीची सफाई कामगारांची वसाहत, माहिमचा कोळीवाडा, भिवंडीतल्या पॉवरलूमने गजबजलेल्या गल्ल्या! अडीच वर्षांमध्ये सुमारे साडेपाचशे भाषणं झाली. लोकांच्या सोयीने वेळ आणि तारीख ठरायची. सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत. बहुतेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते टॅक्सी भाडे द्यायचे आणि माईकची सोय करायचे. दरम्यान, ‘केईएम’च्या मनोविकार विभागात मी व्यसनमुक्तीच्या गट उपचाराचे दर आठवड्याला सहा गट घ्यायचो. बाह्यरुग्ण विभाग आणि वॉर्डातील रुग्ण ही कामे होतीच. फक्त अज्ञानामुळे सामान्य माणसे व्यसनाला बळी पडू नयेत ही प्रामाणिक इच्छा आणि आपल्या प्रयत्नांचा परिणाम काय होणार याचा विचार डोक्यात नव्हता. ‘एवढं करून उपयोग काय?’ हा प्रश्न मनात आला की शंकासुराने ताबा घेतलाच असं समजावं.

या काळातच एका गणपती उत्सवाच्या दिवसांमध्ये अनिल आणि सुनंदा माझ्या ठाण्याच्या घरी आले. सुनंदाचं माहेर म्हणजे ठाण्याचं सोवनी कुटुंब. त्यांच्या मित्रकुटुंबातला एक मुलगा गर्दमध्ये अडकलेला. सवयीप्रमाणे मी माझी कामाची रेकॉर्ड लावली आणि अनिलबाबाचे डोळे चमकले. त्यानंतर दोन महिने तो माझ्यासोबतच राहिला. मध्ये मध्ये पुण्याला घरी जायचा. ती आमच्या नात्याची सुरुवात आणि म्हटलं तर संस्थेचीही. पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये त्याची लेखमाला प्रसिद्ध झाली. पुलं आणि सुनीताबाईंनी स्वत:हून अर्थसहाय्य देऊ केलं. आधी देणगी आणि मग संस्थेची नोंदणी असा तो प्रकार झाला.

संस्था सुरू झाल्यावर सुनंदामधल्या ‘वेगळ्या’ मानसोपचारतज्ज्ञाला एक जोमदार उद्दिष्ट मिळालं. तिने स्वत:ला या कामात झोकून दिलं. दिवसरात्र विचार फक्त रुग्णांचा. तिच्यासोबत बसून रुग्ण पाहणं हा माझ्यासाठी शिकण्याचा सुवर्णकाळ. ती मला तिचा या क्षेत्रातला गुरू म्हणायची. माझ्यासाठी ते बरोब्बर उलटं होतं, पण एकमेकांपासून आणि रुग्णमित्रांकडून शिकत राहण्याचं मूल्य तेव्हापासून संस्थेमध्ये रुजलं.

फक्त व्यसनापासून दूर राहणं नव्हे, तर अधिक चांगला माणूस बनण्यासाठी ‘मुक्तांगण’ आहे हा बाबाचा दृष्टिकोन. म्हणून इथल्या निवासी उपचारात संगीत, नाटक, ओरेगामी, मातीकला-मूर्तिकला अशी विविध सत्रे असतात. व्यसनमुक्तीचा ‘अभ्यासक्रम’ असतो. विविध विषयांवर अभ्यासवर्ग असतात. समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत मंडळींबरोबर गप्पा मारण्याचा योग रुग्णमित्रांना येतो. इथे सण साजरे होतात. व्यसनमुक्तीचे वाढदिवस साजरे होतात. आळसावलेले रुग्ण आणि सुस्त कर्मचारी आमच्याकडे दिसणार नाहीत. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या काही व्यसनमुक्ती (?) केंद्रांमध्ये रुग्णांना शारीरिक मारहाण केली जाते. ‘मुक्तांगण’मध्ये आल्यावर इकडचे खेळकर वातावरण पाहून काही रुग्णमित्र चक्रावतात. परिसरात आलात तर पावणेदोनशे व्यसनी माणसांच्या सहवासात आहेत अशी भावनाही मनाला शिवणार नाही. आम्हा सर्वांनाही इथे सुरक्षित वाटतं. कार्यकर्त्यांच्या गटामध्ये मोठ्या संख्येने मुली-स्त्रिया आहेत. साऱ्या जणी मुक्तपणे वावरतात. याचं श्रेय मुक्ताला (पुणतांबेकर, आमची संचालक) द्यायला हवं. तिला साथ मिळाली फुलाआत्या (प्रफुल्ला मोहिते) आणि सोनाली काळेची. मुक्ताच्या स्वभावात सुनंदाची आखीवरेखीव योजकता आहे. आणि बाबामधली काळजीवाहू मन:स्थितीसुद्धा. निर्मितीक्षमता वाढवण्यासाठी बाबाने स्वत:मधल्या काळजीचा उपयोग केला होता. छोट्या दिसणाऱ्या मुद्द्यांनाही हलकं न मानणं हे मुक्ताने बरोबर उचललं आहे.

मला इथे कोणीच डॉक्टर, सर म्हणत नाहीत. मी सगळ्यांचा आनंदकाका असतो. संस्थेचा विद्यामान अध्यक्ष ही झूल कागदोपत्रीच असते. रुग्णमित्रांबरोबर होणाऱ्या माझ्या गटचर्चा दोन भागांच्या असतात. पहिला तास असतो सर्वांसाठी. त्यानंतरचा अर्धा-पाऊण तास स्वेच्छेने केलेली प्रश्नोत्तरे. आमच्या गप्पांमध्ये सखोल प्रश्न विचारले जातात.

‘व्यसनाच्या काळामध्ये इतकी वाईट कृत्ये घडली आहेत माझ्याकडून. माझ्या चांगुलपणावर मीच विश्वास कसा ठेवू?’

‘व्यसनाधीन राहिलो शेवटपर्यंत तर कुणाचे काय नुकसान होणार? तसेही कुटुंबाने मला नाकारलेच आहे. माझी इच्छाशक्तीच जर व्यसनमुक्तीसाठी महत्त्वाची आहे तर मुक्तांगणची गरजच काय?’ आहेत की नाहीत जबरदस्त प्रश्न. व्यसनाच्या साखळ्यांमधून मुक्त झाल्यावर ही बुद्धी आणि प्रतिभा योग्य उद्दिष्टांसाठी वापरली जाते. आज माझे जवळजवळ ६० टक्के सहकारी स्वत: व्यसनमुक्तीच्या प्रवासातून गेले आहेत. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, त्यांच्या सोबत घेणं हा माझा शिरस्ता. ‘मुक्तांगण’चं जेवण अगदी साधं, पण रुचकर असतं. रोजच्या रुंद, वर्तुळाकार १५०० चपात्या आमच्या ‘सहचरी’ स्वयंपाकघरात बनवतात. या साऱ्या व्यसनाधीन मित्रांच्या पत्नी. इथले ४० टक्के कार्यकर्ते प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक आहेत. मी धरून तीन मनोविकारतज्ज्ञ आहेत. आता तरुण सहकाऱ्यांची पाचवी पिढी आली आहे. या सगळ्यांसाठीसुद्धा मी दर महिन्याला शिकवणी घेतो. समुपदेशनाचे बारकावे सांगणाऱ्या पावणेदोनशे स्लाइड्स तयार केल्या आहेत. दीड तासांत त्यातल्या पाच-सहांवर चर्चा होते. कौशल्य प्रदान करताना घाई नको. जे शिकतो ते झिरपून रुजायला हवं. हे सारे जण आता माझ्यासोबत रुग्ण मित्रांशी बोलतात. जसा मी सुनंदासोबत बसायचो. आता रुग्णसभा, कुटुंबसभा नियमितपणे ऑनलाइनसुद्धा होऊ लागल्या आहेत. त्यातली उपस्थितीसुद्धा लक्षणीय असते.

संस्थेच्या प्रशासकीय कामकाजात क्वचित संभ्रम निर्माण झाला की मुक्ताचा मला फोन असतो. तिचं आणि माझं एक शब्दांपलीकडचं समीकरण आहे. सुनंदा तसेच बाबा जेव्हा आम्हाला शरीरस्वरूपात सोडून गेले त्याच्या पुढच्या दिवशी आम्ही दोघे ‘मुक्तांगण’ला उपस्थित होतो. सगळ्या सहकाऱ्यांबरोबर संवादसभा घेण्यासाठी. कोणत्याही परिस्थितीत काम निरंतर सुरूच हवं.

महाराष्ट्रातल्या २४ शहरांमध्ये आमच्या मासिक पाठपुरावा सभा होतात. मी आणि मुक्ता वर्षातून एकदा तरी तिथे जातो. जुलैमध्ये मी संभाजीनगरची सभा घेतली तर ऑगस्टमध्ये कराडची. संस्थेच्या चाळिशीमधला प्रवेश, कराड ते कोल्हापूरपर्यंतच्या रुग्णमित्रांबरोबर मी साजरा केला. आणि त्याच दिवशी तिथल्या ‘गाडगे महाराज महाविद्यालया’त तरुणाईशी संपर्कही साधला. १९८२ मध्ये चालू झालेली ही भाषणांची भिंगरी अजूनही सुरूच आहे. कारण आजची आव्हानं बदलली आहेत. ‘स्क्रीन’ नावाचा घटक आता मनाला नमवतो, दमवतो आहे. अंमली पदार्थांचे अक्षरश: ऑनलाइन (अर्थात बेकायदेशीर) स्टोअर्स निघाले आहेत. खेळाच्या नावाखाली चाललेल्या जुगारांमुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबं आम्ही पाहात आहोत. लॉटरीपायी देशोधडीला येणारी माणसं, मोठ्या संख्येनं व्यसनाधीन होणाऱ्या स्त्रिया…किती सांगू? पुन्हा व्यसनांचे सरताज असे तंबाखू आणि मद्या हे सम्राट राज्य करतच आहेत अबाधितपणे.

समोरचं आव्हान कितीही अजस्त्र असलं, तरीही धीर न सोडता काम करत राहण्याचं सामर्थ्य आम्हाला आमच्या संस्थेने दिलं आहे. सुनंदा आणि बाबा आता आपल्यामध्ये नाहीत असे आम्हाला प्रकर्षाने वाटतच नाही. कारण ते आपली ऊर्जा आहेत यावर आमचा ठाम विश्वास आहे. ४० वर्षांच्या या अर्थपूर्ण प्रवासाबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा सोहळा करण्यापेक्षा आजपर्यंत मदत केलेल्या ४० हजार कुटुंबांच्या संख्येत रोज भर घालण्यामध्येच आमचं साफल्य आहे.

‘मुक्तांगण’मधल्या माझ्या खोलीमध्ये उजव्या बाजूला एक टीव्ही पडदा आहे. त्यावर परिसरातल्या विविध भागांत चालणाऱ्या हालचाली ‘सीसीटीव्ही’वर पाहायला मला आवडतं. २२-२५ चलचित्रं असतात ती. घड्याळाप्रमाणे कामं सुरू असतात. माझ्यासमोरच अनिल-सुनंदाचा फोटो आहे. ‘चाळिशी गाठली आपल्या संस्थेने’ मी त्यांना सांगतो. बाबा ‘मस्त’ असं म्हणत बासरी वाजवतो आणि सुनंदा शांतपणे तिचं या जगातलं अखेरचं वाक्य मला सांगते, ‘‘अजून खूप काम करायचं आहे.’’ भरल्या डोळ्यांनी मी होकारार्थी मान हलवतो.

anandiph@gmail.com