नीलिमा किराणे

अनेक कामं एका वेळी सांभाळताना, समतोल राखताना तारेवरची कसरत झाल्यासारखी वाटतेय?… विशेषत: नोकरी करणाऱ्या स्त्रियांना, त्यातही लहान मुलाची जबाबदारी असलेल्यांना असं पुष्कळदा वाटतं. मग थोडा वेळ घ्या… फक्त स्वत:साठी! विचार करा, प्रत्येक गोष्टीत ‘परफेक्ट’ असण्यापेक्षा काही गोष्टी चिमूटभर कमी करण्याने खरंच काही फरक पडेल का?

vaibhav anil kale death former army officer col vaibhav anil kale killed in gaza
अक्षम्य संकेतभंगाचे बळी
women in war
पराकोटीचा छळ, जबरदस्तीने विवाह, बलात्कार, मानवी तस्करी अन्…; महिलांचा युद्धात ‘असा’ जातो बळी
gadchiroli Naxalites marathi news, gadchiroli naxal marathi news
गडचिरोली: पोलीस- नक्षल चकमकीत कमांडर वासूसह दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान, घटनास्थळाहून मोठा शस्त्रसाठा जप्त
Mothers day special
“एक दिवस माझा मुलगा म्हणाला की, मीही तुझ्याबरोबर भांडी घासायला येतो अन्…” वाचा, घरकाम करणाऱ्या महिलांचे अनुभवकथन….
Rambhau Ingole, Vimalashram,
विमलाश्रमच्या रामभाऊ इंगोले यांना आर्थिक मदतीची गरज, दानशूर व्यक्तींना आवाहन
tadoba andhari tiger project, nayantara tigeress, tigeress did hunt, nayantara tigeress did hunt, tigeress did hunt hide it in water,nimdhela buffer zone, Nayantara tigeress in tadoba, tadoba in Chandrapur, tadoba news, tiger news, Chandrapur news,
VIDEO : ‘नयनतारा’ला ‘भोला’ अन् ‘शिवा’ची भीती! शिकार लपवण्यासाठी ‘ति’ने काय केले, एकदा पहाच…
Labor, died, Kalyan East,
पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून कल्याण पूर्वेत मजुराचा खून
long term investment, early investment planning, financial planning in todays world, loss minimization, risk optimization, achieve finanacial goals, portfolio in share market, share market, mutual fund, health insurance, bank repo rate, loan, inflation, investment, returns, profit, loss, financial article,
मार्ग सुबत्तेचा : दीर्घकाळासाठी नियोजन करताना…

गाणं गुणगुणत जिया घरात शिरली तेव्हा घरी अवनीदी आलीच होती.

‘‘आज खुशीत?’’ कॉफीचा कप तिच्या हातात देत अवनीनं विचारलं.

‘‘अर्थात! किती दिवसांनी भेटतेयस तू अवनीदी! आर्यनच्या वेळी मी नोकरी सोडल्यापासून निवांत भेटणं, गप्पा मारणं जमलंच नाहीये.’’

अवनी नात्यानं जियाची मावसबहीण. तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी, पण ‘फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड’ सबकुछ! आर्यन वर्षाचा होऊन दिवसाचा बराच वेळ आजीबरोबर एकटा राहायला लागल्यावर जियानं हल्लीच नवीन नोकरी स्वीकारली होती. आर्यनला घेऊन त्याची आजी एका लग्नासाठी गावी गेली होती आणि त्यामुळे अवनी जियाच्या सोबतीला आली होती.

‘‘काय म्हणतोय तुझा ‘परदेसी पिया’? आणि तुझं नवीन ऑफिस?’’ अवनीनं विचारलं.

‘‘शांतनु अमेरिकेत मजेत आहे. माझ्या ऑफिसचं म्हणशील तर लोक चांगले आहेत, काम मला आवडतंय, माझ्याही कामाबद्दल अजून कुणी थेट नाराजी दाखवली नाहीये, पण…’’

‘‘आहेच का तुझा पण?’’

‘‘अगं, आपण १०० टक्के देतो आहोत ना, असं सतत मनात येतं. आधीच्या ऑफिसची सवय झाली होती. मी काम बरोबर करतेय याची खात्री असायची, कामं पटापट व्हायची, भारी वाटायचं. नवीन ऑफिसमध्ये थोडं दडपण वाटतं. सकाळी घरचं आणि आर्यनचं जमेल तेवढं आटपून निघते, तरीही ऑफिसला कधी कधी उशीर होतोच. आर्यन आता आजीपाशी राहतो, तरी मी तीन-चार वेळा घरी फोन करते. कधी तरी त्याला बरं नसेल, तर अचानक सुट्टी घ्यावी लागते. नवीन कामातल्या काही प्रोसेस माहीत नसतात, मग कुणाला विचारायला अवघड वाटतं, कधी कधी डेडलाइन चुकते. ऑफिसमध्ये तोंडावर कुणी बोललं नाहीये, पण कुजबुज असते. अस्वस्थ वाटतं. पूर्वी असं नव्हतं. नेहमी ‘अॅन एक्स्ट्रा माइल’ देणारी ‘परफेक्शनिस्ट’ अशी माझी ओळख होती! आता बऱ्याचदा प्रश्न पडतो, की असं का?… मी कामाला माझे १०० टक्के देतेय ना?…’’

एक ‘पॉझ’ घेऊन जियानं पुन्हा सुरुवात केली- ‘‘संध्याकाळी मी घरी पोहोचते तेव्हाही तेच! आर्यन दाराकडे डोळे लावून बसलेला, सासूबाई थकलेल्या दिसतात. कधी एखादा टोमणा मारतात. मग वाईट वाटतं. आर्यनला बरं नसताना ऑफिसमध्ये अडकले तर जास्तच. आपण घर, आर्यन किंवा ऑफिस, कोणालाच न्याय देऊ शकत नाही असं वाटून चिडचिड होते. काही सहकारी किती बिनधास्त काम टाळतात. मग माझीच जबाबदारीची जाणीव एवढी तीव्र का? आपण आयुष्यात काही मिळवू शकू का? असे प्रश्न ‘रोलरकोस्टर’ सारखे गरगर फिरवत राहतात. तू इतक्या सहजपणे कसं जमवतेस सगळं अवनीदी?’’ या प्रश्नावर काही तरी आठवून अवनी हसली. म्हणाली,

‘‘माझी सोनू लहान असताना मलाही असाच ‘आयडेंटिटी क्रायसिस’ आला होता. अस्वस्थ असल्यावर डायरी लिहायची माझी सवय तुला माहीतच आहे. तशीच एकदा डायरी लिहायला घेतली. सहज मागची पानं चाळली, तर मागच्या वर्षभरात लिहिलेलं सर्व काही पुन्हा पुन्हा तेच-तेच होतं. इतके दिवस त्याच तक्रारी, तेच प्रश्न उगाळत आपण तिथल्या तिथेच गरगरतोय, याचा मला धक्काच बसला. मी स्वत:ला प्रश्न विचारला, ‘सोनू मोठी होईपर्यंत बरीच वर्षं परिस्थिती अशीच असणारे. कायम अशा ताणात राहतेस की नोकरी सोडतेस? नोकरी हवीच. तर मग तू कुठे बदल करू शकतेस?…’ ’’

‘‘मग?’’

‘‘या प्रश्नाचं उत्तर शोधताना आणखी प्रश्न वर आले. हळूहळू त्या अस्वस्थतेच्या मुळाशी पोहोचले. मला सांग जिया, १०० टक्के याचा तुझ्या मते नेमका अर्थ काय? घर, ऑफिस, आर्यन, कुठे कुठे आणि काय काय परफेक्शन अपेक्षित आहे तुला?’’ अवनीनं विचारलं.

‘‘ऑफिसला वेळेवर पोहोचायलाच हवं, जास्त रजा नकोत, घेतलेले निर्णय, केलेलं काम बरोबर आणि वेळेतच व्हायला हवं, लोकांच्या कमेन्ट, कुजबुज नको, कामाचं अॅप्रिसिएशन झालं पाहिजे… आर्यनशी गप्पा, खेळणं, फिरायला नेणं, त्याचं जेवण, झोप, सगळ्या गोष्टी वेळेवर आणि नीटच व्हायला हव्यात, सासूबाईंवर जास्त ताण नको, शांतनुशी रोज कॉल व्हायला हवा, तो येतो तेव्हा त्याच्यासोबत पुरेसा वेळ द्यायला हवाच…’’ जियाची यादी बघून अवनीच तिला आणखी मुद्दे सुचवू लागली-

‘‘…शिवाय सणवार व्हायला हवेत, नातेवाईकांच्या भेटीगाठी, शॉपिंग, कौटुंबिक कार्यक्रम… आर्यन मोठा झाल्यावर त्याची शाळा, अभ्यास, खेळ, अॅक्टिव्हिटीज् परफेक्ट हवं, पुढे सासूबाईंचं आजारपण… सांगत राहा तू! आदर्श पत्नी, सून, आई…’’

‘‘बापरे, पुढचं पण… भीती वाटते गं!’’

‘‘तेच सांगतेय मी!’’ अवनी म्हणाली, ‘‘परफेक्शन’च्या यादीला अंतच नसतो. ‘स्टँडर्ड १०० टक्के’ असं काही नसतंच. प्रत्येकाची ‘परफेक्शन’ची व्याख्या वेगळी असते. पूर्वीच्या ऑफिसमध्ये तुला ‘भारी’ वाटायचं, कारण नव्या नवलाईचा उत्साह होता, ‘कम्फर्ट झोन’ निर्माण झालेला होता. शिवाय सासरी-माहेरी घरची फारशी जबाबदारी नव्हती, शांतनु इथे होता. आता दोन वर्षांनंतर आणि अनेक आघाड्यांवर लढत असल्यावर पूर्वीच्या कामाने भारी वाटेल का? आता किती तास काम केलं या निकषापेक्षा कसं केलं, हे महत्त्वाचं ठरतं ना? वाढत जाणाऱ्या यादीतलं प्रत्येक काम, प्रत्येक वेळी आणि तेही तुझ्या मनातल्यासारखं ‘परफेक्ट’च करणं शक्य आहे का? सध्या नोकरी नवीन असताना?… विचार स्वत:ला.’’

‘‘नाही शक्य, म्हणजे आयुष्यभर कमी कमी वाटत दिवस काढायचे?’’

अवनी म्हणाली, ‘‘मी जेव्हा बदलावर विचार करायला लागले ना जिया, तेव्हा ‘परफेक्शन’, जबाबदारी, काम, बांधिलकी, म्हणताना मला नेमकं काय हवंय ते तपासायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं, या शब्दांच्या आदर्शवादी व्याख्या लहानपणी मोठ्यांचं, शिक्षकांचं ऐकून, पाहून, पुस्तकं वाचून बनल्या, खोलवर रुजल्या. पण त्यावर आपण स्वत:चा विचार केलेलाच नाही. पुढे घर, शाळा, ऑफिस, संसार सगळीकडे त्या रुजलेल्या कल्पना ‘परफेक्ट’, या चष्म्यातून आपण स्वत:ला, प्रसंगांना ‘जज्’ करत गेलो, जातो. प्रत्यक्षात प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी आदर्श थोडीच वागता येतं? पण आपण वस्तुनिष्ठ ‘डेटा’ तपासतच नाही. त्या कल्पनांच्या सावल्या ताण, अपराधीभाव मात्र वाढवतात.’’

‘‘हो गं! ऑफिसला उशीर झाला, माझ्या आठवणीनं आर्यन रडला, सासूबाई कंटाळल्या की मनात अस्वस्थता, चिडचिड होते. त्या ताणामागे अपराधीभावच असतो.’’ जियाला पटलंच.

‘‘हे चक्र उलगडायला लागल्यावर समजतं, की गोष्टी कल्पनेत नव्हे, वास्तवात घडवायच्या असतात. त्याही चोवीसच तासांत! त्यात एक मिनिटसुद्धा वाढवणं आपल्या हातात नसलं, तरी आदर्शवादी व्याख्या आपल्या वास्तवाशी जुळवून बदलून घेणं शक्य आहे.’’

‘‘हो. आपल्या बहुतेक अपेक्षा कल्पनेच्या जगातूनच असतात!’’ जियाला पटलंच हे.

‘‘मनातल्या कल्पना आणि प्रत्यक्ष स्थिती यातला घोळ स्पष्ट झाल्यावर सोपं झालं. चोवीस तासांचं गणित जुळवायचं, तर कामांचा प्राधान्यक्रम ठरवायची सवय करावी लागेल हे मला तेव्हा कळलं. आपल्या डोक्यात सर्व जण आदर्शवाद ठासून भरतात, मात्र तसं येता-जाता फुकटात कुणी ‘प्रायॉरिटी’ ठरवायला शिकवत नाही. ते अनुभवातून, वाचून किंवा कार्यशाळेत जाऊन, किंमत मोजून शिकावं लागतं!’’

‘‘खरंय. मग तू काय केलंस?’’ जिया उत्सुकतेनं म्हणाली.

‘‘मग काय? एकलव्यगिरी सुरू केली! कार्यक्षम लोकांचं निरीक्षण केलं. काम आठवलं, की छोट्या पॅडवर, मोबाइलच्या नोट्समध्ये अपेक्षित तारखेसह लिहून ठेवायचे. नंतर ‘प्रायॉरिटी लिस्ट’ बनवायचे. हल्ली जोडीला मोबाइल अॅप वापरते.’’

‘‘एवढं करायला वेळ कुठून आणलास?’’

‘‘तुला एक सिक्रेट सांगते जिया! घरातून बाहेर पडल्यावर बऱ्याचदा जवळच्या एका कॅफेमध्ये कॉफी घेत मी दहाएक मिनिटं शांत बसते. दिवसांतल्या कामांचं ‘कंपायलेशन’ करते. पूर्वी स्वत:साठी थोडाही वेळ घेणं हा गुन्हा वाटायचा. पण आता शांत अशा ‘मी टाइम’ची गरज मला पक्की कळलीय. त्या छोट्याशा ‘ब्रेक’मुळे घरातली धांदल मागे राहते आणि ऑफिससाठी एकाग्रता मिळते. दिवसाचा साधारण आराखडा हातात आल्यावर कुठे घाई करायला हवी, कुठे लवचीकता चालेल. कुठे नकार द्यायचा तेही लक्षात येतं. ताण कमी होतो. मी माझ्या गरजेप्रमाणे, जाणीवपूर्वक ‘मी टाइम’ घेते. ऑफिसमध्ये कटकट झाली असेल तर संध्याकाळी येताना कॉफीसाठी थांबते. ऑफिसच्या कामासाठी तेवढा वेळ थांबलेच असते की! मग स्वत:साठी का नाही? घरात शिरताना मन शांत हवं. माझ्याही मनावर ‘अॅन एक्स्ट्रा माइल’चा प्रभाव होताच. पण आता माझी माझी नवी संकल्पना मी केलीय- ‘अ क्वार्टर माइल लेस’ किंवा ‘अ फरलॉन्ग लेस’! मराठीत- ‘चिमूटभर कमी’. तर, बघ आता, जुन्या आदर्श अपेक्षा ‘लॉजिकली’ बदलून तुझ्या प्रश्नांचं चक्र थांबतंय का.’’ अवनी म्हणाली.

‘‘हे सिक्रेट भारी आहे दी! आणखी काही टिप्स?’’

‘‘सध्या एवढंच पुरे सखे! जबाबदारी, काम, बांधिलकीच्या मनात रुजलेल्या व्याख्या शोधायच्या, मग त्या सध्याच्या परिस्थितीशी जुळवायच्या हे प्रत्येकाचं आपापलं असतं. त्यासाठी पुष्कळ वेळ लागणारे तुला. मात्र आळशीपणासाठी आणि बिनधास्त काम टाळायला समर्थन म्हणून मात्र माझ्या टिप्स वापरायच्या नाहीत हं!’’

‘‘मी कधी तशी वागू शकेन का दी? माझं ‘१०० टक्के’वालं चक्र १०० टक्के थांबलेलं नसलं, तरी हे ऐकून त्याचा वेग कमी होतोय खरा. थँक यू!’’ अवनीच्या गळ्यात हात टाकत जिया म्हणाली.

neelima.kirane1@gmail.com