मंजिरी घरत

एकविसावं शतक ‘गट मायक्रोबायोटाचं’ असं म्हणतात. अर्थात आपल्या आतडयांमध्ये असलेल्या मित्र-शत्रू जंतूंवर, त्यांचं संतुलन घडण्या-बिघडण्यानं आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर सध्या भरपूर संशोधन सुरू आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक हिप्पोक्रेटच्या विधानाकडेच ते बोट दाखवतंय- की ‘सर्व व्याधींची सुरुवात पोटातून होते’! या माध्यमातून अनेक शारीरिक आणि मानसिक आजार बरे करण्याचे प्रयोग यशस्वी होताहेत. ‘आहार हेच औषध’ हे लक्षात घेऊन केवळ आहारावर लक्ष केंद्रित केलं, तर दीर्घकालीन आरोग्याची गुरुकिल्लीच हाती लागेल, असंच या बाबतीतलं संशोधन सांगतंय.

IPL 2024 Match Ticket Price Updates in Marathi
IPL 2024 : गुणतालिकेत नीचांकी, तिकीटं उच्चांकी; आरसीबीच्या मॅचच्या तिकिटाला मात्र ५० हजारांचा भाव
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: केकेआरविरुद्ध ८३ धावांची खेळी करूनही विराट कोहली का होतोय ट्रोल? RCBचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी

आज वाढदिवसाचा बेत जंगी होता. तीन मजली केक, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स.. नंतर पिझ्झा आणि आइस्क्रीम. सर्व पाहुणे मंडळी- विशेषत: बच्चे कंपनी अगदी खूश होती. सर्वांनी त्यावर ताव मारला आणि मंडळी सुस्त होऊन घरी पोहोचली. एव्हाना केक आणि पिझ्झ्यामधला मैदा पोटाच्या आत चिकटला होता. मंडळी झोपी गेली गाढ. झोप उडाली होती, ती मात्र ‘त्या’ वसाहतीतल्या इवल्याशा जीवांची! त्यांना रुचेल आणि पचेल असं जेवणात काहीच नव्हतं. ते हताश होऊन उपाशीपोटी वाट पाहात राहिले पुढच्या जेवणाची.  कोणाबद्दल बोलतोय आपण? कोण हे इवलेसे जीव? कुठे असतात ते? आणि का आपण फिकीर करावी त्यांची?.. 

आपण बोलतोय आपल्या आतडयात असलेल्या सूक्ष्मजीवांच्या वसाहतींबद्दल. आपल्या प्रत्येकाच्याच शरीरात, त्वचेवर, तोंडात आणि विशेषत: पचनसंस्थेत (Gut) अनेक सूक्ष्मजीव असतात. सर्वाधिक असतात मोठया आतडयात- शंभर ट्रिलियन (एकावर १४ शून्य!). म्हणजे शरीरातल्या एकूण पेशींपेक्षा

१० पटींनी अधिक संख्येनं असलेले हे सूक्ष्मजीव- म्हणजे जिवाणू, विषाणू, यीस्ट कायम अधिवास करत असतात आपल्या आतडयात. या निवासी सूक्ष्मजीवांच्या वसाहतींना म्हणतात ‘गट फ्लोरा’, ‘मायक्रोफ्लोरा’ किंवा ‘मायक्रोबायोटा’. त्यांची लाखोंनी जनुकं असतात, त्यांना ‘मायक्रोबायोम’ म्हणतात. एकूण साधारण दोन किलो वजन भरतं या ‘फ्लोरा’चं. निसर्गानंच जन्मापासूनच आपल्या पदरात हे दान टाकलं. एरवी आपण जंतूप्रादुर्भावाला किती घाबरतो! करोनानंतर तर अधिकच. मग इतक्या अब्जावधी सूक्ष्मजीवांचं काही तरी प्रयोजन असेल ना? हो, असतं ना! आपला आणि त्यांचा अलिखित करार असतो जणू. त्यांना आसरा आणि खाद्य आपण पुरवतो आणि ते आपली देखभाल करतात. जन्मत:च  मातेकडून हे विरजण आपल्या पचनसंस्थेला मिळतं. यात बरेवाईट सर्वच जीवजंतू असतात, पण बहुसंख्य हे उपयुक्त, आपले मित्र असतात. काही नावं वानगीदाखल बघू या- लॅक्टोबॅसिलस, एसिडोफिलस, बिफिडोबॅक्टिरियम, स्ट्रेप्टोकोकस, वगैरे. आपली जनुकं आणि जीवनशैली, वय आणि सभोवताल  आपला स्वत:चा, खास जंतूसमुदाय घडवतात. प्रत्येक व्यक्तिगणिक हा ‘फ्लोरा’ भिन्न. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे इथं तंतोतंत लागू पडतं.

व्यक्तीच्या मलाची (स्टूल्स) चाचणी करून ‘फ्लोरा’त कोणते सूक्ष्मजीव आहेत याचा अंदाज येऊ शकतो. कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये या सूक्ष्मजीवांची देवघेव विविध मार्गे होऊ शकते आणि त्यामुळे एकमेकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मोठया आतडयात ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या जीवनपद्धतीनुसार सूक्ष्मजीव सुखेनैव नांदत असतात. एका जातीचे जिवाणू जे पदार्थ बनवतात, ते दुसऱ्या जातीच्या जिवाणूंना पूरक असतात. अशा प्रकारे त्यांचं ‘सिंबायोसिस’ असतं. हा सूक्ष्मजीवसमुदाय (सोयीसाठी नुसतं ‘फ्लोरा’ म्हणू) जेव्हा समृद्ध आणि संतुलित असतो, त्यांचा आपसात आणि आपला आणि त्यांचा सलोखा असतो, तेव्हा आपली तब्येत सुरळीत राहते. आपल्यासाठी ही एक मोठी ढाल असते. अंतर्गत आणि बाहेरून येणाऱ्या उपद्रवी जंतूंपासून आतडयाचं संरक्षण,   जीवनसत्त्व ‘के’ आणि ‘बी-१२’ची निर्मिती, ऊर्जा निर्मिती, चयापचय नियंत्रण, आतडयातल्या पेशींचं कर्करोगापासून नियंत्रण, रोगप्रतिकार- शक्ती मजबूत ठेवणं, क्षुधाशांती झाल्याचा निरोप मेंदूला देणं, अशी अनेक कामं हे सूक्ष्मजीव करत असतात. अन्न, तंतुमय पदार्थ हे त्यांचं खाद्य. त्याचं विघटन करून ‘शॉर्ट चेन फॅटी अॅ सिडस्’, मेंदूवर काम करणारी अनेक रसायनं (सिरोटोनिन) सूक्ष्मजीव बनवतात.

 पचनसंस्थेला दुसरा मेंदू म्हणतात. कारण आतडयांमध्ये लाखोंनी मज्जापेशी असतात. या दोन्ही मेंदूंमधील (गट-ब्रेन अॅरक्सिस) हॉटलाइन संवादात महत्त्वाची भूमिका हे सूक्ष्मजीव बजावत असतात. त्यामुळे मानसिक आणि भावनिक आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होतो. ‘गट फीलिंग’(आतून येणारी भावना) या ब्रेन अॅिक्सिसशी संबंधित आहे. हा ‘फ्लोरा’ विविध जातींच्या सूक्ष्मजीवांनी संपन्न, तितकं आपलं आरोग्य उत्तम. जपानी लोक खूप दीर्घायुषी आणि निरोगी असतात. या लोकांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या ‘फ्लोरा’मध्ये खूप जैवविविधता आढळली. पण जर का या ‘फ्लोरा’चं संतुलन बिघडलं (डिसबायोसिस) की मग मात्र तब्येतीचं तंत्रही बिनसतं. आतडयातल्या बऱ्यावाईट जिवाणूंचं संख्याबळ बदलतं. मित्र कमी, शत्रू वाढतात. त्यांच्या कारवाया चालू होतात. शत्रूजंतू घातक रसायनं निर्माण करतात. दाह (इन्फ्लेमेशन) सुरू होतो आणि अनेकानेक आजारांचं मूळ हे यात असतं.

मधुमेह ‘अथेरोस्क्लेरोसिस’, इरिटेबल बॉवेल सिण्ड्रोम, लठ्ठपणा, आतडयास सूज, आतडयाचा कर्करोग, जंतूसंसर्ग, ऑटोइम्युन आजार, फॅटी लिव्हर, त्वचाविकार, अॅडलर्जी इतकंच नाही तर पार्किन्सन्स, नैराश्य, अल्झायमर(विस्मरण) होण्यामध्येही बिघडलेला ‘फ्लोरा’ हे महत्त्वाचं कारण असू शकतं हे अभ्यासांती लक्षात येत आहे.

हा फ्लोरा कधी बिघडतो?  या सूक्ष्मजीवांची वाढ मुख्यत: आपण काय खातो त्याप्रमाणे होत असते. न पचलेलं अन्न, चोथा, तंतू (फायबर्स) हे मुख्यत: यांचं अन्न. आपण जे खातो त्यात तंतू- पटकन पचन न होणारी कबरेदकं (‘रेझिस्टन्ट स्टार्च’- मोठया आतडयात त्याचं

कि ण्वन होतं.) नसतील तर सर्व अन्न सहजी विघटन होऊन लहान आतडयातून शोषून रक्तात जातं. मग पुढच्या टप्प्यावर मोठया आतडयात भुकेले सूक्ष्मजीव काय खाणार?.. लेखाच्या सुरुवातीला वर्णिलेल्या पार्टीच्या मेनूमध्ये जंतूंयोग्य खाद्य काहीच नव्हतं. अशा वेळी उपासमारीनं मित्र जिवाणू मरू लागतात, शत्रू  मात्र टिकाव धरतात. इथे खरी दु:खभरी कहाणी चालू होते. जे आपले मित्रजंतू  असतात, त्यांना सकस, पोषक आहार आवडतो. तर शत्रू गटातल्या जिवाणूंना सगळं वाईटसाईट आवडतं! चांगलं खाल्लं की गुणी जंतूंची पैदास, तर वाईट खाल्लं की रोगकारक शत्रूजंतूंची पैदास, हे सोप्पं सूत्र लक्षात ठेवायचं! 

या गुणी सूक्ष्मजीवांना जपण्यासाठी काय करायचं? सर्व प्रकारच्या भाज्या, फळं, शेंगा, डाळी, कोंडयासहित धान्यं, ताजं दही, दूध, आंबवलेले पदार्थ, मुरवलेले पदार्थ, ड्रायफ्रुटस्, मोड आलेली कडधान्यं, अशा आहारातून मित्रजंतू (प्रोबायोटिक) किंवा त्यांचं खाद्य (प्रीबायोटिक) आपल्या पोटात जातात. आपला ‘फ्लोरा’ समृद्ध करतात. 

प्रक्रिया केलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तळलेले स्नॅक्स, जंक फूड, बऱ्याचशा मिठाया, असं अती प्रमाणात चरबीयुक्त, अती कबरेदकं असलेलं, अती प्रमाणात प्रक्रियायुक्त खाणं खाल्ल्यानं रोगकारक सूक्ष्मजीवांची वाढ होते.  प्रक्रियायुक्त पदार्थात(पॅकेज्ड फूड) भरपूर साखर, मीठ, पदार्थाच्या टिकाऊपणासाठी, चविष्ट करण्यासाठी वेगवेगळे इतर घटक असतात. फायबर नसतात किंवा अत्यल्प असतात. शत्रूजंतूंना साखर प्रिय. आपल्या जिभेला असे पदार्थ आवडत असले, मोहमयी वाटत असले, तरी ते गुणी जिवाणूंना आवडत नाहीत.

‘गुड न्यूज’ अशी, की आतडयातला हा जंतूसमुदाय जर बिघडला असेल, तर तो आपण प्रयत्नपूर्वक बदलू शकतो. अपायकारकपेक्षा उपकारक जंतूंची संख्या वाढवू शकतो. औषधं फारशी न देता केवळ आहार बदलून- म्हणजे आतडयातल्या ‘फ्लोरा’त बदल घडवून अनेक शारीरिक मानसिक आजार बरे करण्याचे प्रयोग यशस्वी होताहेत. ‘आहार हेच औषध’ हे खरंच.

‘स्टूल्स’ची (मलाची) तपासणी हळूहळू महत्त्वाची होणार आहे. त्यात मित्र/ शत्रू जंतू किती, कोणते, हे निष्कर्ष पुढील उपचारांचा आधार बनतील. ‘मलरोपण’ म्हणजे ‘फिकल ट्रान्सप्लांट’ ही उपचारपद्धती आणि ‘मल कॅप्सूल’लादेखील मान्यता मिळाली आहे. जर आतडयातील या फ्लोराचं इतकं महत्त्व आहे. ‘घडलंय  बिघडलंय’चे मुख्य सूत्रधारच ते आहेत. तर तो जपायला जाणीवपूर्वक प्रयत्न केलेच पाहिजेत. सोपा, स्वस्त असा हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. आपल्या  खाण्याच्या सवयी आवडी निवडी गेली काही वर्ष बदलत आहेत. मार्केटिंगचा प्रभाव जास्त आहे. जीवनशैलीनं होणाऱ्या आजारांचे आलेख चढते आहेत. आतडयातली ही सूक्ष्मसेना ‘असेल तर सूत, नाही तर भूत’ आहे. या भुतांना सरळ ठेवून त्यांच्याकडून आपल्या आरोग्यासाठी विधायक काम करून घायचं, तर जाणीवपूर्वक आपल्या ‘फूड हॅबिट्स’वर काम करणं जरुरीचं आहे. त्यामुळे पुढे जाऊन आजार टाळायला मदत होणार असेल, तर  अजून काय हवं?

थोडा विचार केल्यास लक्षात येतं, की यासाठी फार वेगळं काही करायची गरज नाही. आपलं पारंपरिक भोजन हे उत्तम आहे. त्यात आपला आणि आतडयातल्या जीवजंतूंचा व्यवस्थित विचार केला आहे. रुची, पोषण, या सर्व दृष्टीनं त्याची आखणी केलेली आहे. यात आलटून पालटून सर्व भाज्या, कोशंबिरी खायच्या. पण तसं बऱ्याचदा होत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास दुधी, कोहळा, भोपळा वगैरे भाज्यांमध्ये विद्राव्य तंतूमय पदार्थ ‘सोल्युबल फायबर’ भरपूर असतात. मित्रजीवांच्या ते अगदी आवडीचं.

पण मुलांना आवडत नाही, म्हणून कित्येक घरांत अशा भाज्या हद्दपार असतात.  जाणीवपूर्वक यात बदल व्हायला हवा. तेच ते कायम खाण्यापेक्षा जितकं खाण्यात वैविध्य, तितका ‘फ्लोरा’ समृद्ध होतो. प्रोसेस्ड, तळकट,गोडधोड किती खायचं यावरही थोडं नियंत्रण असायला हरकत नाही. बहुतांशी घरात स्त्री ही ‘आरोग्य आणि किचन मॅनेजर’ असते. काय करायचं, कसं, किती, हे बहुतांशी तिच्या हातात असतं. मुलं आणि कुटुंबाच्या आवडीनिवडीनुसार करावं लागतं, हे खरंय; पण त्यास वळण देण्याचं काम आणि प्रयोगसुध्दा स्त्रियांना नक्कीच करता येतात.

आतडयातल्या सूक्ष्मजीवांची दुनिया अनोखी आहे. आरोग्य आपल्या आतडयात आहे, हे उमजतंय. आपल्या निरोगी भविष्यासाठी आता यापुढे रोज, ‘मी जेवलो, पण माझे ते आतडयातले मित्र  जेवले का? असा विचार मनात यायला हरकत नाही. ते खूष तर आपली तब्येत खूष!

symghar@yahoo.com