नोबेल पारितोषिक विजेत्या कॅनडाच्या कथाकार अॅलिस मन्रो यांचं नुकतंच निधन झालं. स्त्रियांचं आयुष्य देशापरदेशात आजपेक्षा खूप वेगळं असताना मन्रो यांनी लिहायला सुरुवात केली. सर्वच वाचकांना ज्यात आपलंच प्रतिबिंब दिसेल, अशी पारंपरिक ‘आदर्श’ प्रतिमांहून वेगळी पात्रं त्यांनी चपखल उभी केली. आणि प्रचलित अर्थानं ‘स्त्रीवादी’ न म्हणवणाऱ्या या कथांनी स्त्रीजीवन हे पुरुषजीवनाएवढंच संपन्न, नाट्यमय, धांदलीचं आणि तितकंच महत्त्वाचं आहे, हे ठासून सांगितलं...

 ‘लहानपणी पुस्तकं म्हणजे मला जादूचे खेळ वाटत आणि आपण त्या जादूच्या खेळाचा भाग व्हावं असं फार वाटे… काही काळानंतर मला तेवढं वाटणं पुरेसं होईना. मग मी त्या पुस्तकांची नक्कल करत, कॅनडात घडणाऱ्या, मला कळणाऱ्या गोष्टी परत मनानं लिहू लागले. खरं म्हणजे हे तसं चमत्कारिक होतं, पण मी त्याची फिकीर केली नाही. तेव्हा त्या पुस्तकांच्या जगाचा आपण भाग होऊ शकत नाही, तसा आपल्याला अधिकार मिळू शकत नाही, या जाणिवेतून माझ्या मनानं केलेली ती तात्पुरती भरपाईच होती म्हणा ना!… पण तेव्हापासूनच पुस्तकं माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाची होती.’ पुस्तकांच्या जगाचा भाग होण्याचं लहानग्या अॅलिसचं स्वप्न पुढे प्रत्यक्षात उतरलं.

tonglen meditation marathi news
‘टाँगलेन’ची अनोखी गल्ली!
Loneliness, Loneliness of Life , Life Without a Partner, life partner, Emotional Isolation, chaturang article, marathi article,
‘एका’ मनात होती : जोडीदाराशिवायचं एकटेपण!
Rural Medical Center, transfer a organization from old to new generation, daughter in law, mother in law,
सांधा बदलताना : हस्तांतरण..
children rejection of marriage marathi article
इतिश्री : मुलांचा लग्नाला नकार?
pune porsche accident article about parental responsibility for juvenile crime
भरकटलेली ‘लेकरे’?
loksatta chaturang love boyfriend girlfriend chatting flirting College
सांदीत सापडलेले : प्रेमाची थेरं!
my friend article by vinod muley about his beautiful friendship
माझी मैत्रीण: ‘या, स्वागत हैं, वेलकम!’
international mother s day marathi news
स्त्री ‘वि’श्व: मातृत्वाचे कंगोरे

गेल्या आठवड्यात वयाच्या ९२ व्या वर्षी या जगाचा, अतिप्रिय पुस्तकांचा कायमचा निरोप ज्यांनी घेतला, त्या नोबेल पुरस्कार विजेत्या कथाकार अॅलिस मन्रो यांचे हे उद्गार! मन्रो या कॅनडाच्या लेखिकेनं विसाव्या वर्षापासून कथालेखनाला आरंभ केला, वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत लेखन केलं आणि स्वत:हून लेखननिवृत्ती घेतली. केवळ कथा या वाङ्मयप्रकारात लेखन केलेल्या मन्रोंच्या अतुलनीय प्रतिभेचा आणि त्या कथाप्रकाराचाही नोबेल पुरस्कारानं जागतिक स्तरावर मोठा सन्मान झाला होता. त्यांच्या आयुष्यभराच्या ध्यासाची, त्यांनी घेतलेल्या मेहनतीची ही पूर्तता होती.

मन्रो यांच्या १५ कथासंग्रहांमधल्या कथाविश्वाची अगदी थोडक्यात ओळख करून घेतानाही काही गोष्टी ठळकपणे लक्षात येतात. कॅनडासारख्या काहीशा दूरस्थ देशात, ऑन्टेरिओसारख्या परगण्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या, निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मन्रोंच्या कथांची पार्श्वभूमी ही साहजिकच तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाची आहे. त्यांनी त्यासाठी ‘ज्युबिली’ आणि ‘हॅनराटी’ यांसारखी काल्पनिक गावं निर्मिली. या गावात वाढलेल्या, तिथे राहणाऱ्या कुटुंबांतले सदस्य- विशेषत: मुली, स्त्रिया ही त्यांच्या कथांमधली महत्त्वाची पात्रं आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींमधलं सार, त्यातलं मूलभूत सत्य त्यांच्या निरीक्षणातून सुटत नाही. कथालेखनाच्या आपल्या कौशल्याच्या सहाय्यानं त्या ते आपल्यापुढे मांडतात.

‘Lives of girls and women’, ‘Runaway’, ‘The Beggar maid’, ‘Dance of the Happy Shades’, ‘ Too much Happiness’ यांसारख्या त्यांच्या संग्रहांतून अगदी सामान्य लोकांच्या जीवनातल्या घटनांचं वर्णन येतं. त्या घटनांना फार महत्त्व न देता, त्या त्या वेळी तिथल्या माणसांचे मनोव्यापार, त्यांचं परस्परांशी होणारं वर्तन आणि त्यातून दिसणारी त्यांची स्वभाववैशिष्ट्यं यांच्याभोवती त्यांचं कथानक फिरत असतं. त्यातही कुटुंब, कौटुंबिक नातेसंबंध, समाजातले संकेत आणि स्वप्रतिमा या साऱ्या गुंत्यातून मार्ग काढणाऱ्या स्त्रिया या कथांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात. मन्रोंची स्त्रीपात्रं विविधरंगी, भिन्नवयीन, भिन्न स्वभावांची असली, तरी ती आपल्याकडे टी.व्ही.वरील मालिकांमध्ये अनेकदा दिसतात तशी पूर्णपणे दुष्ट, वाईट नाहीत. या स्त्रिया बहुधा आपल्या भावनेच्या आहारी जातात आणि बऱ्याचदा उतावीळ निर्णय घेतात. मग त्यांनाच आश्चर्य वाटतं, की आपण हा निर्णय का घेतला? प्रेमाबाबतीत केवळ वासनेच्या आहारी जाऊन, की केवळ स्त्रीसुलभ उत्सुकतेपोटी? की आपल्यावर घातलेल्या बंधनांचा धिक्कार दर्शवण्यासाठी? की जे करू नका, असं सांगितलं गेलं तेच करू पाहण्याची नैसर्गिक ऊर्मी असते म्हणून?…

मन्रोंनी लेखनाचा आरंभ केला, तेव्हा आधी म्हटल्याप्रमाणे त्या जेमतेम विशीच्या होत्या. लहानपणीच्या दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी, जागतिक आर्थिक मंदी, त्यानंतर होत गेलेला जागतिक व्यापारीकरणाचा, यांत्रिकीकरणाचा सार्वत्रिक प्रसार आणि या गोष्टींचा सामान्यांवर होणारा परिणाम त्यांनी कळत-नकळत अनुभवला होता. जनजीवनाचा बदललेला पोत त्यांना कळत होता. त्या काळी छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया बहुतांशी गृहिणी होत्या. त्यांचं जीवन मन्रोंनी पाहिलं. लहान गावातल्या स्त्रियांचं जगणं मर्यादित होतं. परिस्थितीनं हळूहळू त्यात बदल घडवला. स्त्रियांचं आणि कुटुंबांचं जीवन बदलत गेलं. स्त्रियांचं पुरुषांवरचं अवलंबित्व कमी होत गेलं. मुली, तरुणी, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, मुलींचं वयात येणं, त्यांच्यातली सुप्त स्पर्धा, मैत्री, प्रेमाची अनेक पदरी रूपं, पुरुषांमधली स्वामित्वभावना, जबाबदारी घेण्याची टाळाटाळ, अशा अनेक गोष्टींचे अनुभव त्या घेत होत्या, निरखत होत्या. ते सारे अनुभव त्यांच्या कथांमध्ये उतरले. मात्र या कथा घरगुती भासल्या, तरी ठरीव चाकोरीतल्या, साचेबंद नव्हत्या. मन्रोंच्या निवेदनातला नेमकेपणा आणि भावनिक खोली वाचकांना आकर्षून घेत होती.

मन्रोंच्या कथांमधला काळ सतत एकरेषीय नसतो. कधी त्या वर्तमानातून भूतकाळात जातात, तर कधी उलट घडतं. कथांमधल्या पात्रांच्या आठवणींमधून त्यांच्या जीवनाचा इतिहास कळत जातो. वास्तव जीवनातली गुंतागुंत जाणवत राहते. काही स्त्रीपात्रं- उदा, ‘डेल’, ‘फ्लो’, ‘रोझ’ ही कायम येतात. गुप्तहेर कथांमधल्या डिटेक्टिव्हसारखी. त्या कथांमध्ये एक प्रकारची साखळी आहे. ‘Lives of girls and women’, ‘ The beggar maid’ यांतल्या कथांमध्ये येणारी ही पात्रं. त्यांच्या आयुष्यातल्या भिन्न, भिन्न पातळीवरच्या, काळातल्या घटना दाखवल्यामुळे कादंबरीचा आभास निर्माण होतो. पण यातली प्रत्येक कथा स्वतंत्रपणे, सुटी सुटी वाचता येते. या कथांमधला अवकाश हा कादंबरीसारखा मोठा असतो, असं अनेक अभ्यासकांनी सविस्तरपणे दाखवून दिलं आहे.

मन्रोंना कादंबरी लिहावीशी वाटत होती, पण ‘आपल्याला ती जमत नव्हती,’ असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्या म्हणतात, ‘मला कादंबरी हा प्रकार लिहिण्याच्या दृष्टीनं कळतच नाही. कादंबरीत आकर्षकता कुठे, कशी आणायची, हेच मला समजत नाही.’ एखाद्या लेखकानं आत्मपरीक्षण करत असं स्पष्ट विधान करावं हे तसं विशेषच!

कथांमधली अनेक स्त्रीपात्रं ही विनासंकोच सारे व्यवहार करतात. त्यांची भाषा त्यांच्या वर्तनाशी सुसंगत अशी. ‘Quinnie’ या कथेत दोघी सावत्र बहिणी एकत्र आल्यावर त्यांच्या भिन्न वातावरणामुळे त्यांची भाषा कशी बदलते ते पाहण्यासारखं आहे. मुळात आपल्या मनातली विचारांची गुंतागुंत ही पात्रं आडपडदा न ठेवता स्पष्ट करतात. आपल्या तीव्र इच्छांप्रमाणे ती वागतात. खरं पाहता ही, वा अशी इतर स्त्रीपात्रं संपूर्णपणे आदर्श, चांगली नाहीतच! त्यांच्यामध्ये इतरांप्रमाणे गुणदोष आहेत. हे जीवनवास्तवच आहे. पण त्यांचे दोष जाणवले, की ते आपल्यातही असू शकतात असं जाणवतं. त्यांच्या नायिकांमध्ये आपल्याला आपल्यामधला एखादा तरी चांगला-वाईट समान धागा सापडतोच. मग ती कथा आपल्याला खरी वाटते. आपली वाटते.

‘The children stay’ या कथेची नायिका परपुरुषाच्या आकर्षणात अडकते. दोन लहान मुलांची ही आई घरातून नेसत्या वस्त्रानिशी पळून जाऊन हॉटेलात राहते. ती पळून जाते एका थातूरमातूर वाहिनीच्या खोटारड्या दिग्दर्शकाबरोबर. पण तिनं स्वत:शीच सौदा केला आहे. मुलांबरोबर राहण्याचा. तिच्या पाठुंगळी एक लहान मूल, तर दुसरं बोटाला धरून. त्यांना बीचवरून नेताना त्यांची पावलं वाळूवर उमटतात… पुढे मुलं मोठी होतात. ती आईचा राग करत नाहीत, पण तिला क्षमाही करत नाहीत. ही आई पुढे आणखीन कुणाबरोबर. पण मुलं मात्र कायम तिच्याबरोबर. यात अनेक बाबी सूचकपणे वाचकांवर सोडल्या आहेत.

‘Silence’ ही कथाही अशीच अंतर्मुख करणारी आहे. आपल्या वीस वर्षांच्या मुलीला ‘रिट्रीट’ला पाठवणारी आई प्रथमच मुलगी दूर गेल्यानं अस्वस्थ होते. तिला ठरलेल्या वेळेला घेऊन येण्यासाठी ती तिथे जाते. पण तिथे गेल्यावर मुलगी घरी येण्याचं नाकारते. एवढंच नाही, तर तसा निरोप आईला पाठवते आणि आईसमोर येणंही टाळते. आईला धक्का बसतो. मुलीच्या आयुष्यातली आपली गरज संपली, अशी जाणीव होऊन आई परतते. आपलं मुलांच्या आयुष्यात कुठवर स्थान असतं, आपण ते कसं सांभाळायचं, हा जगातल्या साऱ्याच पालकांना अस्वस्थ करणारा प्रश्न मन्रोंच्या कथेत असा सहजपणे येतो.

मन्रोंच्या कथांची वाचकांवर प्रचंड मोहिनी होती. त्याचं मुख्य कारण होतं, की या कथा वाचकांपुढे जणू आरसा धरतात. त्यांची पात्रं तुमच्या-आमच्यातलीच नव्हे, आपणच आहोत असं वाटत राहतं. कारण त्यांची पात्रं, कथा त्यांच्याशी आधी संवाद साधतात आणि मग आपल्याशी संवाद साधतात. मन्रोंनी जणू आपल्या आयुष्याची चिरफाड करत तत्कालीन समाज, आपलं गाव, त्यातलं बरं-वाईट सारं आपल्यापुढे मांडलं. ते सारं वाचकांना कालसुसंगत वाटलं आणि आजही वाटतं.

या कथा प्रचलित अर्थानं स्त्रीवादी नाहीत. त्यांनी स्त्रीवादाचा झेंडा कधी हाती घेतला नाही. त्यांना त्याबद्दल अनेक मुलाखतींमध्ये विचारलं गेलं. पण मन्रो म्हणतात, ‘मी कोणत्याही वादाचा अभ्यास केलेला नाही. स्त्रीवादाचे सिद्धान्त मला माहीत नाहीत. पण मला जे दिसलं ते मी लिहिलं.’ त्या बऱ्याचदा स्त्रियांविषयी लिहीत असल्या तरी त्यांचं सहानुभूतीपूर्ण चित्रण मुळीच करत नाहीत किंवा त्यांच्याबाबतीत कोणतंही ठाम, निर्णयात्मक मत देत नाहीत. मात्र त्यांच्या कथांमधली स्त्रीपात्रं आपल्याला दाखवतात, की स्त्रीजीवन हे पुरुषजीवनाएवढंच संपन्न, नाट्यमय, गडबडीचं, धांदलीचं आणि तितकंच महत्त्वाचं असतं.

त्यांच्या कथा आपल्याला त्यांच्याबरोबर मोठा मानसिक प्रवास घडवतात, अंतर्मुख करतात. या कथांमध्ये जवळच्यांची आजारपणं, मृत्यू यांचे उल्लेख मधूनमधून, पण आवर्जून आल्यासारखे येतात. त्यातून जीवनाबद्दलची अनिश्चितता जाणवतेच, शिवाय कोणाच्याही जीवनात नियती, संधी आणि त्या त्या क्षणाचे निर्णय किती अनिवार्य ठरतात, हेही अधोरेखित होतं.

अॅलिस मन्रोंच्या कथा या खरं पाहता त्यांचं आत्मचरित्रच आहे. त्या नेहमी म्हणत असत, की त्यांच्या समकालीन समाजात स्त्रियांना मोठ्या शहरांकडे जाण्याची, विशाल जग अनुभवण्याची आस होती. ‘मला माझ्या आयुष्यात तशी आस वाटलीच नाही. माझ्या आईनं मला जगण्यासाठीची सारी सामग्री दिली होती, तीच मला पुरली.’ पण आपण आपल्या आईच्या बाबतीत फार काही करू शकलो नाही, याची खंत, अपराधभाव मन्रोंना असावा. त्या बाबतीत त्या म्हणतात – ‘We say of some things that they can’t be forgiven or that we will never forgive ourselves. But we do forgive- we do it all the time.’ माणसानं क्षमाशील असावं याबाबतीत त्या जे म्हणतात ते किती खरं आहे ना!

meenaulhas@gmail.com