डॉ. शुभांगी पारकर

गंभीर शारीरिक आजारांशी सामना करताना हताश झालेले, तसेच करोनासारख्या महासाथींमध्ये नैराश्य अनुभवणारे रुग्ण आत्महत्या करण्याच्या घटना ठिकठिकाणी लक्षणीय संख्येनं दिसून आल्या आहेत. इथे तो आजार हे व्यक्तीच्या समस्येचं खरं मूळ नसून आजाराशी जोडलेला समाजाचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन, भेदभावाची व हीन वागणूक, भावनिक-आर्थिक कोंडी रुग्णांना आत्महत्येस प्रवृत्त करते असं समोर येतं. यातली काही कारणं समाज म्हणून आपल्याच हातातली आहेत. त्याकडे लक्ष दिलं, तर शारीरिक आजारांचा सामना करायला आपण व्यक्तींना मानसिक बळ देऊ शकू.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा
Can weight loss drugs prevent heart attacks
वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?

मुंबईतील शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयातील एका रुग्णानं २०१५ मध्ये आत्महत्या केली. औषध प्रतिरोधक (ड्रग रेझिस्टंट) क्षयरोगाशी झुंजणारा तो रुग्ण त्या वर्षी रुग्णालयातच आत्महत्या करणारा तिसरा रुग्ण होता. हादरवून टाकणारीच बातमी होती ती. त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या परिचारिकांनी माहिती दिली, की या आघाडीच्या क्षयरोग रुग्णालयातल्या इतर काही रुग्णांप्रमाणेच या रुग्णालाही त्याच्या कुटुंबीयांनी तिथेच सोडून दिलं होतं. नंतर त्याचा मृतदेह त्याच्या एका नातेवाईकाकडे सोपवण्यात आला होता आणि त्या नातेवाईकालाही त्याच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रातून कळली होती. दुर्दैवाची बाब ही, की रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये दिलेला संपर्क क्रमांक चुकीचा होता. म्हणून नातेवाईकांचा शोध घेणं प्रशासनाला जमलं नव्हतं. या आजाराच्या कलंकापासून (stigma) स्वत:ला वाचवण्यासाठी, हताश झालेली अनेक कुटुंबं अशा क्षयबाधित रुग्णांना रुग्णालयात सोडून, बनावट पत्ते आणि चुकीचे दूरध्वनी क्रमांक देऊन गायब होतात.

अशाच एका ३० वर्षांच्या रुग्णानं क्षयरोगाशी लढण्याची इच्छाशक्ती गमावली होती, कारण त्याचं कुटुंब त्याला शारीरिक आणि मानसिक आधार देण्यात स्वारस्य दाखवत नव्हतं. आपली आई आपल्याला केव्हा भेटायला येईल याची वाट पाहात हा तरुण शेवटच्या श्वासापर्यंत तळमळत होता. आई आलीच नाही आणि प्रतीक्षा करणं असह्य झाल्यानं त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून त्याला वाचवण्यात डॉक्टरांना जरी यश आलं, तरी रोगात २० किलो वजन झालेल्या त्याच्या शरीरानं साथ सोडली. त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्याला भेटायला म्हणून गेलेल्या त्याच्या मामांना कळलं, की त्या तरुणाचा मृतदेह शवागारात आपल्या प्रियजनांची वाट पाहात आहे! शेवटी त्याच्या पार्थिवावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केला.

सरकारी टीबी रुग्णालयात निधन झालेल्या अनेक रुग्णांचा शेवटचा प्रवास एकाकी होतो. इतर रुग्णालयांत नातेवाईकांची आणि अभ्यागतांची गर्दी असते, इथे मात्र निर्जन आणि ओसाड वॉर्ड दिसतात. नातेवाईक सुरुवातीला काही दिवस येतात, पण जेव्हा त्यांना समजतं, की या रुग्णांचा प्रवास खडतर आहे, बराच वेळ यात जाणार आहे, तेव्हा ते जाणीवपूर्वक पटलावरून अदृश्य होतात. परंतु लगेच आपण या प्रियजनांना दोष देण्याची घाई करू नये. हे कुटुंबीयसुद्धा आपली लहान मुलं वा ज्येष्ठ नागरिक अशा नातेवाईकांबरोबर लहान घरांमध्ये राहात असतात. रुग्णालयातल्या भेटीदरम्यान संसर्ग होण्याचं भय सर्वानाच असतं. बऱ्याच जणांना वाटतं, की क्षयरोगापेक्षा त्याच्याबरोबर असणारा सामाजिक कलंकच अनेक क्षयग्रस्त लोकांना खच्ची करत त्यांचा जीव घेतो. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चनसारख्या लोकप्रसिध्द अभिनेत्यानं त्यालाही टीबी झाला होता हे जाहीररीत्या कबूल केल्यानंतर अनेक रुग्णांचं मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढला असण्याची शक्यता आहे.

अलीकडच्या काळात असं दिसून आलं आहे, की एचआयव्हीबाधित लोकांमध्ये आत्महत्याप्रवण विचार जास्त असतात. शिवाय त्यांच्यात सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत आत्महत्येनं मृत्यू होण्याची शक्यता शंभर पट अधिक आहे. संशोधनातून असं नमूद झालं आहे, की या मंडळीमध्ये आत्महत्येचा धोका वाढण्यासाठी अनेक संभाव्य घटक कारणीभूत ठरू शकतात. यामध्ये रोगाची प्रगत स्थिती आणि गुंतागुंत, न्युरोलॉजिकल बदल आणि सामाजिक कलंक अंतर्भूत आहेत.

‘पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिन, अमेरिका’ इथे जगभरातील १,८५,००० हून अधिक एचआयव्हीग्रस्त लोकांच्या माहितीचं विश्लेषण करून त्यांच्यातले जोखमीचे घटक एका अभ्यासात पाहिले गेले. त्यानुसार एचआयव्ही रुग्णांमध्ये नवीन निदान केल्यावर आणि आजार प्रगत झाल्यावर आत्महत्येचा धोका वाढताना दिसतो. यामुळेच या सर्व रुग्णांमध्ये आत्महत्येच्या जोखमीचं मूल्यांकन करणं अत्यंत गरजेचं आहे. जगभरात ‘एचआयव्ही’ हा कलंक लावणारा आजार समजला जातो. काही ठिकाणी पुरेसे उपचार आणि सामाजिक पाठबळाच्या अभावी रुग्णाला हा आजार म्हणजे जवळजवळ जन्मठेपेची शिक्षा वाटते.

लुधियानातल्या राजगुरुनगरमध्ये गेल्या वर्षी एका ज्येष्ठ नागरिक जोडप्यानं राहात्या घरी आत्महत्या केली. या दाम्पत्याची दोन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक झाली होती. ते दोघंही निवृत्त झालेले शिक्षक होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नवऱ्यानं आपण ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचं म्हटलं होतं आणि या आजारावर कोणतेही ठोस उपचार नसल्यामुळे आपण कंटाळून, निराश होऊन आपलं जीवन संपवत असल्याचं सांगितलं होतं. त्याच चिठ्ठीत त्याच्या पत्नीनं लिहिलं होतं, की पतीच्या गंभीर वैद्यकीय स्थितीमुळे ती घोर नैराश्यात होती. त्यामुळे त्या दोघांनी एकत्र आयुष्य संपवायचा निर्णय घेतला होता. काही वर्षांपूर्वी बडोदा येथील एचआयव्हीबाधित  कुटुंबातल्या चार सदस्यांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येमुळे खळबळ माजली होती. अशा घटनांना आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समुपदेशन आणि अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांच्या उपयुक्ततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते.

एचआयव्हीसारख्या आजारात लवकरात लवकर उपचार महत्त्वाचे आहेत. आधुनिक उपचार नित्यनेमानं घेणारे  एचआयव्हीबाधित रुग्ण आपलं आयुष्य व्यवस्थित सावरतात आणि जवळजवळ सामान्य आयुष्य जगताना दिसतात. पण सामाजिक उपेक्षा आणि जगण्यासाठी सर्वसामान्य माणसांना मिळणाऱ्या संधींचा अभाव या रुग्णांचं नैतिक खच्चीकरण करत जातो. केरळमधील एका कुटुंबातली घटना या निमित्तानं आठवते. बेन्सन आणि बेन्सी या दोघांचे आईवडील एचआयव्हीबाधित होते. सुरुवातीला त्यांनी ही बातमी गोपनीय ठेवली होती, परंतु जेव्हा ती जाहीर झाली तेव्हा या मुलांना शाळेमधून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यांना ‘एडस् रुग्णांची मुलं’ म्हणून लेबल लावण्यात आलं होतं. त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतर त्यांना भेदभावाची आणि अत्यंत हीन वागणूक मिळाली होती. या मुलांच्या वर्गमित्रांच्या पालकांनी आपल्या मुलांनाही एड्सचा संसर्ग होईल या भीतीनं त्यांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आणि त्यामुळे बेन्सन आणि बेन्सीला शाळा बळजबरीनं सोडावी लागली. पुढे बेन्सननं या रोगाविरुध्द लढा दिला होता आणि त्याच्या एकाकी लढय़ानं साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. सुषमा स्वराज यांनी २००३ मध्ये केरळमध्ये भेट दिली, तेव्हा या दोन्ही मुलांना मिठी मारली होती आणि ‘हे फोटो आता बोलतील’ (These photos will talk) अशी भावना व्यक्त केली होती. केरळ सरकारनं त्यांच्या फोटोंचा वापर या रोगाबद्दलचा सामाजिक कलंक दूर करण्यासाठी केला होता आणि पीडितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोहीम सुरू केली होती. बेन्सन अत्यंत आशावादी होता आणि आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडथळय़ाचा सामना त्याला पूर्ण शक्तीनिशी करायचा होता. पण या आजारामुळे मैत्रिणीबरोबर त्याचं ‘ब्रेकअप’ झालं आणि तो नैराश्यात गेला. आयुष्याशी हार मानत त्यानं आत्महत्या केली. त्यानं एका अर्थी आजाराला हरवलं, पण प्रेमात मात्र तो पराभूत झाला आणि ते तो सहन करू शकला नाही, ही कहाणी नक्कीच हृदयद्रावक आहे.

टीबी, एचआयव्ही/एडस्, हिपेटायटिस यांसारख्या संसर्गासाठी आज अधिक प्रभावी, आधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत. तरीही या आजारातून आणि त्या उपचारांतून जाताना जीवनात होणारे महत्त्वपूर्ण बदल झेलण्यासाठी, मनात रेंगाळणारा भावनिक कल्लोळ पेलण्यासाठी, खच्ची करणाऱ्या सामाजिक प्रतिक्रियांचा सामना करण्यासाठी मनाची खूप तयारी करायला लागते. अमाप सहनशीलता जोपासावी लागते. उपचार आणि उपचारात्मक संशोधन चालू ठेवण्यासाठी डॉक्टर आणि शास्त्रज्ञ धडपड करत असताना गंभीर आजारांशी जोडलेली आत्महत्या ही एक आधुनिक, प्रगत युगाची महत्त्वाची, आव्हानात्मक समस्या म्हणून लक्ष वेधून घेते.

आजही जगाच्या अनेक भागांत कुष्ठरोगबाधित व्यक्तींना तीव्र दु:ख, नैराश्य, स्वत:ला हीन समजणं, सामाजिक प्रतिष्ठा न मिळणं, आपल्या जमिनीसारख्या मालमत्ता गमावणं, नोकरी गमावणं अशा अत्यंत क्लेशकारक अनुभवांतून जावं लागतं.

आपण करोनाकाळातही जगभर अनेक आत्महत्या  होताना पाहिल्या. या जंतूसंसर्गानं होणाऱ्या शारीरिक आजाराच्या तीव्रतेपेक्षा मानसशास्त्रीय नुकसान आणि मानसिक आघात, हे समाजाच्या पूर्वग्रहांमुळे आणि नकारात्मक दृष्टिकोनामुळे होतात. आजाराशी निगडित आर्थिक नुकसान हा मुद्दा आहेच. ही कारणं मूळ आजारापेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात प्राणघातक असू शकतात.

मानसशास्त्रीय नुकसान हे रोगानं ग्रस्त व्यक्तीच्या अवमूल्यन झालेल्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वरूपात प्रकट होतं. या आजारांच्या तणावामुळे व्यक्तीची आत्मस्वीकृती कमी होते आणि आत्महत्येचे विचार मनात येऊ लागतात. आकुंचित झालेला आत्मसन्मान, समाजानं नाकारलेल्या भावनिक आधारानं मानसिक खच्चीकरण आणि आत्महत्येसारख्या आत्मघाती विचारांचं तांडव हे या आजारी व्यक्तींच्या मनात चालू राहातं. या साथीच्या रोगाशी संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेतील प्रचंड मानसिक समस्यांना तोंड देण्याचा ताण व आघात मरणप्राय आहेत.

करोनानं अनेक मार्गानी आणि वेगात लोकांना त्रस्त केलं. अशा स्थितीत ‘जागतिक आरोग्य संघटने’नं आग्नेय आशिया क्षेत्रातल्या देशांना मानसिक आरोग्य आणि आत्महत्या रोखण्याकडे अधिक लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे. जीवन आणि उपजीविकेवर परिणाम होत असलेल्या साथीच्या रोगामुळे लोकांमध्ये मृत्यूची प्रचंड भीती, चिंता, नैराश्य निर्माण होतं. सामाजिक अंतर, विलगीकरण आणि विषाणूबद्दल सतत विकसित होत असलेल्या आणि बदलत्या माहितीचा सामना करताना विद्यमान आणि आधीच अस्तित्वात असलेल्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अनपेक्षित असे काही घटकही आत्महत्येला कारणीभूत ठरले. करोनाच्या काळात लग्न मोडल्यानं दोन तरुणींनी आत्महत्या केली. तर विलगीकरणाच्या काळात गरोदरपणी आणि मूल झाल्यावर कुणाचाच ऐहिक आणि मानसिक आधार न मिळालेल्या पहिलटकरणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. जागरूक नवऱ्याच्या सहकार्यानं ती वाचली. आपल्या लहान मुलांना भावानं आपल्याकडे ठेवायला नकार दिल्यावर त्यांच्या सुरक्षिततेमुळे चिंतित झालेल्या एका परिचारिकेनं आत्महत्या केली. ‘म्युकरमायकॉसिस’ संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये करोनामधून सहीसलामत बाहेर आलेल्या ८० वर्षांच्या व्यक्तीनं तोंडाला फोड आल्यामुळे काळय़ा बुरशीचा संसर्ग झाला असं समजून अहमदाबादमधील निवासस्थानी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

याशिवाय नैराश्यासारखे आत्महत्येसाठी महत्त्वाचे जोखमीचे घटक असणारे मानसिक विकार साथीच्या  रोगांमध्ये विविध कारणांमुळे आढळतात. विषाणूचा डंख असतोच, पण आणखी कितीतरी भेदरवणारे अदृश्य कंगोरे असतात. उपचारांदरम्यान रुग्ण आपल्या उपचारांच्या प्रक्रियेमध्ये स्वत:हून सक्रिय राहाणार आहे, की निष्क्रिय राहणार आहे, हे रुग्णाच्या मानसिकतेशी निगडित आहे. म्हणूनच रुग्णाच्या आयुष्यातील सामाजिक प्रभाव आणि सांस्कृतिक गुणधर्म याची चांगली समज वैद्यकीय प्रणालीला असणं आवश्यक आहे.

  साथीच्या रोगांबद्दल आणि इतर गंभीर आजारांबद्दल अनेक गैरसमज पसरत असतात. त्यातले काही जीवघेणेही असतात. म्हणून जैविक उपचारांबरोबर मानसिक उपचारांचाही सक्षम वापर महत्त्वपूर्ण ठरतो. विशेषत: महासाथीत शास्त्राच्या ज्ञानापुढे आणि बळापुढे जगण्याच्या शाश्वत प्रेरणेसाठी आवश्यक असते, ती वैश्विक आत्मीयता आणि आप्तस्वकीयांचा दिलदारपणा! 

pshubhangi@gmail.com