गंगा ही जगातील पाच सर्वात मोठय़ा नद्यांपैकी एक. सर्वात पूजनीय नदी. महाकाव्यांतल्या एका कथेनुसार, गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं ते भगीरथाने. या सोहळ्याला गंगा दसेरा, असं म्हटलं जातं आणि दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात गंगा दसेरा साजरा केला जातो. यंदा ३ जूनला हा सोहळा साजरा झाला. या गंगेच्या काठी उभी आहे वाराणसी नगरी. आदी शंकरांपासून (प्रसिद्ध गंगास्तोत्राचे लेखक) तुलसीदास, सूरदास आणि कबीर या सर्व संत-तत्त्ववेत्त्यांनी या नगरीला भेट दिली. या सर्वानी गंगा नदीला भारतीय अध्यात्माची माता असं संबोधलं आहे. भारताच्या भवितव्याला आकार देणाऱ्या आणि शिक्षण, भारतीय संस्कृती, कला व साहित्य या क्षेत्रांत योगदान देणाऱ्या अनेक महान व्यक्तींचं वाराणसी हे घर आहे. भारतातील सर्वात पूजनीय नदी गंगेचं अस्तित्वही या शहरात साजरं केलं जातं. गंगेला गंगामय्या किंवा मातागंगा म्हटलं जाते ते केवळ तिचा उल्लेख प्रत्येक महाकाव्यात किंवा भारताच्या आध्यात्मिक जीवनात आहे म्हणून नाही, तर पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी गंगा तिच्या सर्व उपनद्यांच्या साथीने संपूर्ण उत्तर भारत सुपीक करते म्हणूनही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा ज्या चार शहरांत भरतो, त्यात वाराणसी एक आहे. मला वाराणसीला भेट देता आली ती बनारस हिंदू विद्यापीठातल्या एका कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमात माझा अन्य दहा स्त्रियांसोबत सत्कार करण्यात आला होता. गंगेच्या अनेकविध लहरी बघण्याची आणि तिच्याबद्दल खूप काही शिकण्याची संधी मला मिळाली. हा खजिना माझ्यासोबत कायम राहिला. तो सर्वासमोर खुला करून दाखवताना मला खूप आनंद होतोय.

गंगेतून दिसणारा सूर्योदय

वाराणसीत गंगेचं सौंदर्य खऱ्या अर्थाने अनुभवायचं असेल, तर पहाटे सूर्योदयापूर्वी उठून एखाद्या छोटय़ा होडीत बसा आणि गंगेतली शांत जागा शोधा. सूर्याच्या पहिल्या किरणांनी पहाटेचा आसमंत भेदला की गंगेच्या क्षितिजावर सौम्य प्रकाश उमटतो. काठावरच्या सगळ्या होडय़ांवर आणि सुंदर स्थापत्य असलेल्या घाटांवरही हा प्रकाश पसरतो. होडीत किंवा तिरावरच्या एखाद्या खडकावर बसून राहा. जगातलं सर्वात सुंदर दृश्य या अनादी, जादूई नदीच्या साक्षीने उलगडत जातं, उदात्त अशा सूर्याचा उदय होतो, हळूहळू तो अधिकाधिक तेजस्वी होत जातो आणि जसजसा वर येत जातो, तसतसा या पवित्र नदीतली प्रत्येक उसळती लाट प्रकाशमय करून टाकतो. सूर्य क्षितिजावर पूर्णपणे उगवतो, तेव्हा या शांतपणे वाहणाऱ्या नदीचं सौंदर्य दाखवण्यासाठी हजारो छोटी-छोटी झुंबरं उजळली आहेत असं वाटतं. ही आहे गंगामय्या किंवा मातागंगा. भारतातील सर्वात मोठय़ा नद्यांपैकी एक. वाराणसी शहरातून वाहणारी. गेली हजारो वर्ष प्रत्येक भारतीयाचं प्रेम होऊन राहिलेली. गंगा नदीतून जादूई सूर्योदय डोळ्यांत भरून घेणं म्हणजे मोठंच सुदैव यावर सर्व भारतीयांचा विश्वास आहे!

रेशीमनगरी

भारताच्या हृदयस्थानी असलेल्या उत्तर प्रदेशात वाराणसी शहर आहे. अनादी नगरी म्हणून ओळखलं जाणारं अध्ययन, शिक्षण आणि संस्कृतीचं केंद्र. तीन हजार वर्षांचा दस्तावेजीकृत इतिहास असलेल्या जगातल्या काही मोजक्या शहरांपैकी एक! विविध आकर्षणांसाठी आणि भव्य प्रासाद-बांधकामांसाठी हे शहर जगभरात ओळखलं जातं. या शहराच्या ठेव्यांपैकी एक म्हणजे काही शतकांपासून जपलेला भलामोठा रेशीम उद्योग. भारतभरातील राजे-राण्यांसाठी रेशमी पोशाख विणणाऱ्या कसबी विणकर कुटुंबांच्या अनेक पिढय़ांनी जपलेला हा मौल्यवान वारसा आहे. जरीकाठांसोबतच विणल्या जाणाऱ्या अस्सल सोन्याच्या फुलवेली किंवा पारंपरिक आकृती ल्यायलेले बनारसी शालू आणि साडय़ा म्हणजे भारतभरात नववधूच्या संग्रहातला अविभाज्य भाग समजला जातो. वाराणसी विविध प्रकारच्या अप्रतिम मिठायांसाठीही प्रसिद्ध आहे. वाराणसीला काशी किंवा बनारस म्हणूनही ओळखलं जातं. आता वाराणसी हे शहराचं अधिकृत नाव झालं आहे. वरुणा आणि असी या गंगेला जोडणाऱ्या दोन नद्यांच्या नावाच्या संयोगातून हे नाव तयार झालं आहे.

दशाश्वमेध घाट

वाराणसीच्या विस्मयकारक आकर्षणांपैकी एक म्हणजे गंगेच्या पश्चिम किनाऱ्याला लागून असलेली स्नानघाटांची मालिका. सगळे मिळून शंभरेक घाट असतील पण त्यातले काही विशेष आणि विविध कारणांसाठी पवित्र मानले जातात. उदाहरणार्थ, भाविक एका दिवसात पाच घाटांवर स्नान करणे पसंत करतात- असी, दशाश्वमेध, आदी केशव किंवा वरुणासंगम, पांचगंगा आणि शेवटी मणिकर्णिका. या सर्वामध्ये दशाश्वमेध घाट सर्वात महत्त्वाचा आहे तो या घाटालगतच्या, शिवाच्या बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या, प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरामुळे. इतिहास सांगतो की, या मंदिराचा अनेकदा विध्वंस करण्यात आला पण इंदूरच्या राणी अहल्याबाई होळकर यांनी हे मंदिर पुन्हा बांधून त्यावर सोन्याचा मुलामा दिला. गंगेचा पश्चिम किनारा व्यापून टाकणारे, वारसास्थळे समजले जाणारे अनेक सुंदर, भव्य स्थापत्य असलेले स्नानघाट वाराणसीत राजे किंवा दानशूर व्यक्तींनी बांधून घेतलेले आहेत. दररोज संध्याकाळी गंगेची आरती जिथे होते, तो दशाश्वमेध घाट सर्वात प्रभावी आहे, असं सर्वाचं मत आहे. विशाल आकार आणि नदीकडे जाणाऱ्या उभट पायऱ्या यांमुळे दशाश्वमेध घाट अत्यंत देखणा दिसतो. प्रत्येक भाविक या घाटाला भेट देतोच. शिवाय काशी विश्वनाथाचं मंदिरही लगतच आहे. सनईवादक भारतरत्न उस्ताद बिसमल्लाह खाँसाहेब या मंदिरात अत्यंत भक्तिभावाने सनई वाजवत असत, असं म्हणतात.

त्याखालोखाल महत्त्वाचा घाट म्हणजे मणिकर्णिका. हा घाट अनेक कथांचा विषय आहे. हा घाट ओळखला जातो दहनक्रियेसाठी. काशीमध्ये उत्तरक्रिया झाल्यास स्वर्गाचे दरवाजे थेट खुले होतात असा बहुसंख्य हिंदूंचा विश्वास आहे. अर्थात आता घाटावर दहनक्रियेस मनाई करण्यात आली आहे. गंगेत केवळ अस्थिविसर्जनाला परवानगी आहे. मणिकर्णिका घाटाजवळ सिंदिया घाट आहे. नेपाळच्या राजाने बांधलेला मान मंदिर घाट, ललिता घाट, मानसरोवर आणि आणखी अनेक घाट. हिंदू कालगणनेनुसार महत्त्वाच्या दिवशी घाटावर स्नानासाठी आलेल्या भाविकांची गर्दी असते. घाटावर होणाऱ्या सर्व सोहळ्यांचे तसेच सर्व मंदिरांमधल्या पूजाकर्माचे अधिकृत पालक काशीचे महाराज आहेत. काशीची संस्कृती गंगेला समांतर आहे आणि म्हणून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला इथे महत्त्वाचे स्थान आहे. पंडित रविशंकर आणि बिर्जू महाराजांसारखे प्रख्यात नर्तक यांचे या शहरात वास्तव्य होते. शास्त्रीय संगीताचं बनारस घराणं इथेच उदयाला आलं. रसप्रद कथा सांगणारा आणखी एक घाट म्हणजे तुलसी घाट. महाकवी तुलसीदासांनी याच घाटावर बसून महान महाकाव्य रामचरित मानस लिहिलं अशी कथा आहे. या संतांची कथा सर्वाना माहीत आहे.

काशीचा आणखी एक अलंकार म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलेले बनारस हिंदू विद्यापीठ. हे विद्यापीठ भारतीय कला, संस्कृती, संगीताचे शिक्षण देते. संस्कृत भाषेचे विशेष शिक्षण हे विद्यापीठ देते. भारत कला भवन ही आणखी एक महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेत भूतकाळाच्या विविध युगांतली मिनिएचर पेण्टिंग्ज जपून ठेवली आहेत. नवीन मंदिरांमध्ये तुलसी मानस मंदिर १९६४ मध्ये बांधण्यात आलं आहे. वाराणसीमध्ये राहिलेले संत-कवी तुलसीदास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे मंदिर बांधण्यात आलं आहे.

सारनाथमधील बौद्ध स्तूप

सारनाथ हे छोटंसं शहर जगभरातल्या बौद्धधर्मीयांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना पहिलं प्रवचन दिलं. वाराणसी म्हणूनच भारताची आध्यात्मिक राजधानी मानली जाते. भारतात जन्मलेल्या सर्व धर्मासाठी हे शहर पवित्र आहे.  वाराणसी आणि संत-कवी तुलसीदास अनेक मार्गानी जोडलेले आहेत. तुलसीदासांनी या शहरात वास्तव्य केलं आणि त्यांचं प्रख्यात रामचरितमानस गंगेकाठी लिहिलं. अशी कथा  सांगितली जाते की, दररोज संध्याकाळी तुलसीदास काव्य लिहायचे आणि तुलसीदासांप्रमाणेच श्रीरामाचा परमभक्त असलेल्या हनुमानाकडे तपासण्यासाठी द्यायचे. एका संध्याकाळी तुलसीदासांना हनुमान सापडलाच नाही. आश्चर्य म्हणजे तो काव्य तपासण्यासाठी आणखी दोन दिवस आलाच नाही. शेवटी तो आला तेव्हा त्याने क्षमा मागितली आणि तुलसीदास देतील ती ‘शिक्षा’ भोगण्याची तयारी दाखवली. तुलसीदास म्हणाले की, येणाऱ्या सहस्रकांमध्ये रामचरितमानसाचं वाचन किंवा पारायण जिथे कुठे होत असेल, तिथे हनुमानाला उपस्थित राहावं लागेल. आजही कुठे रामलीला किंवा रामचरितमानस सादर होत असेल किंवा वाचलं जात असेल, तर या प्रेम, भक्ती आणि वादातीत निष्ठेची कथा स्मरणात ठेवण्यासाठी हनुमानाची मूर्ती पहिल्या रांगेत स्थापन करतात.

– विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व माझे जग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on varanasi city in india
First published on: 07-10-2017 at 01:51 IST