महेश सरलष्कर
भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी किमान ३०३ ते कमाल ३७० जागा मिळवण्याचे ध्येय बाळगले आहे. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वेगवेगळया राज्यांमधली आताची समीकरणे बरीच बदलली आहेत.

भाजपसाठी ३७० आणि ‘एनडीए’साठी ४०० जागांची ध्येयपूर्ती खूप लांबचा टप्पा म्हणता येईल. अधिकाधिक जागा जिंकण्याचे स्वप्न प्रत्येक राजकीय पक्ष पाहतो, भाजपनेही ‘चारसो पार’चा अजेंडा ठेवला तर चूक ठरत नाही. २०१९ मध्ये भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे २०२४ मध्ये भाजपचे पहिले लक्ष्य किमान ३०३ जागा मिळवणे हेच असेल. त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर तो भाजपसाठी बोनस ठरेल. किमान ३०३ ते कमाल ३७० जागा मिळवण्याचे वास्तववादी ध्येय भाजपने बाळगले आहे असे म्हणता येईल. या वेळी ३०३ पेक्षा कमी आणि २७२ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तरी साध्या बहुमताच्या आधारावर केंद्रात भाजपची सत्ता येईल. तरीही ३०३ पेक्षा कमी जागा मिळणे हा एकप्रकारे भाजपचा पराभव मानला जाऊ शकतो. २०१९ ची पुनरावृत्ती होऊन एक जरी जागा जास्त मिळाली तरी भाजपसाठी तो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील मोठा विजय असेल. हा आकडयांचा खेळ गोंधळात टाकणारा असला तरी भाजपला खेळावा लागत आहे.

loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
big job cuts in indian it companies
­­­­अग्रलेख : स्वयंचलन आणि स्वहित
Loksatta editorial political party Speeches of political leaders criticizing each other
अग्रलेख: घंटागाडी बरी…
Loksatta editorial Prime Minister Narendra Modi criticizes Congress on inheritance tax Sam Pitroda
अग्रलेख: वारसा आरसा!
senior scientist dr anil kakodkar
अग्रलेख : सुरक्षित सपाटांचे साम्राज्य!
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Loksatta editorial Salman Khan house attacked by two assailants on a bike
अग्रलेख: सलमानी सुल्तानी!
students choose the US for overseas higher education
अग्रलेख : ‘आ’ आणि ‘उ’!

या वेळी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये २०१९ च्या पहिल्या टप्प्यातील मतदानापेक्षा सात टक्के कमी मतदान झाले आहे. कमी मतदान सत्ताधारी पक्षासाठी फायद्याचे मानले जाते. सत्ताधारी पक्षाला सत्तेवरून खाली खेचायचे असेल तर मतदार हिरिरीने मतदान करतात. त्यामुळे मतांची टक्केवारी वाढते, सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान झाल्यामुळे पराभवाची शक्यता निर्माण होऊ शकते. हे ढोबळ विश्लेषण असून हा नियम नव्हे. मतदारांची सत्ताधारी पक्षावर कमी-अधिक प्रमाणात नाराजी असेल तरीही आणखी पाच वर्षे सत्ताधारी पक्षाला संधी देऊ असा विचार करून मतदार मत देण्यासाठी बाहेर पडले नाहीत तर मतांची टक्केवारी कमी होऊ शकते. पण अशा स्थितीत सत्ताधारी पक्षाच्या जागांमध्ये भर पडण्याची शक्यताही कमी होते. भाजपने तर खूप मोठया जागांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणे उर्वरित सहा टप्प्यांमध्येही मतांची टक्केवारी घसरली तर भाजपला अपेक्षित जागा जिंकता येतील का, अशी शंका निर्माण होऊ शकते.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती

भाजपने २०१९ मध्ये उत्तर व पश्चिमेतील राज्यांमध्ये सर्वच्या सर्व वा सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. बिहारमध्ये ४० पैकी ३९, छत्तीसगडमध्ये ११ पैकी ९, आसाममध्ये १४ पैकी ९, कर्नाटकमध्ये २८ पैकी २५, मध्य प्रदेशमध्ये २९ पैकी २८, महाराष्ट्रात ४८ पैकी ४१ (युतीसह), ओडिशामध्ये २१ पैकी ८, राजस्थानमध्ये २५ पैकी २४, उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी ६२, पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी १८ जागा भाजपने जिंकल्या. भाजपने सर्व जागा जिंकलेल्या राज्यांमध्ये दिल्ली ७, गुजरात २६, हरियाणातील १०, हिमाचल प्रदेश ४, झारखंड ११, उत्तराखंड ५ यांचा समावेश होतो. या १६ राज्यांतील ४०१ जागांपैकी भाजप व तीन मित्रपक्षांनी (जनता दल, लोकजनशक्ती व शिवसेना) ३१५ जागा जिंकल्या होत्या.

त्यातील बहुसंख्य राज्यांमध्ये भाजपने ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली होती. छत्तीसगड ५०, दिल्ली ५७, गुजरात ६२, हरियाणा ५८, हिमाचल प्रदेश ७०, झारखंड व कर्नाटक ५१, मध्य प्रदेश ५८, महाराष्ट्र ५१ (युतीसह), राजस्थान ५८, उत्तर प्रदेश ५०, उत्तराखंड ६१ टक्के अशी मते भाजपला मिळाली होती. या वेळी भाजपला ३०३ चा टप्पा पार करायचा असेल तर ही मतांची टक्केवारी आणि जागा पुन्हा मिळवाव्या लागतील. ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळालेल्या राज्यांमध्ये भाजपला २०१९ ची पुनरावृत्ती करता येऊ शकेल. पण ३७० चा आकडा गाठायचा असेल तर बिहार (४४ टक्के युतीसह), तमिळनाडू (४ टक्के), पश्चिम बंगाल (४० टक्के), ओडिशा (३८ टक्के), तेलंगणा (१९ टक्के), पंजाब (१० टक्के) राज्यांतील भाजपच्या मतांच्या टक्केवारीमध्ये आणि जागांमध्ये वाढ व्हावी लागेल. म्हणजेच भाजपची घोडदौड थांबवायची असेल तर भाजपने ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळालेल्या राज्यांमध्ये विरोधकांना भाजपची मते व जागा कमी कराव्या लागतील.

भाजपला ३०३ पेक्षा जास्त जागा मिळवायच्या असतील तर बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तमिळनाडू ही राज्ये महत्त्वाची ठरू शकतील. बिहारमध्ये भाजपने नितीशकुमार यांच्या जनता दलाशी (सं) व इतर छोटया पक्षांशी युती केली असून त्यातून मतांची टक्केवारी कायम राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजपने २५ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी २३ जिंकल्या होत्या. या वेळी भाजप २८-३० जागा लढवू शकेल. म्हणजे तीन ते पाच जागा जास्त लढवेल. या सर्व जागा भाजपला जिंकाव्या लागतील. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने इतर कुठल्याही राज्यापेक्षा पश्चिम बंगालवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या वेळी इथे भाजपला १८ पेक्षा जास्त जागा मिळवाव्या लागतील. ओडिशामध्ये २०१९ मध्ये भाजपला ३८ टक्के मते व ८ जागा मिळाल्या होत्या. बिजू जनता दलाने ४३ टक्के मते आणि १२ जागा जिंकल्या होत्या. या वेळी चित्र उलटे झाले तर भाजपला फायदा होईल. तमिळनाडूमध्ये भाजपला ३.६६ टक्के मते मिळाली होती व एकही जागा जिंकता आली नव्हती. या वेळी किमान दोन-तीन जागा मिळवण्याचे भाजपचे लक्ष्य असेल. ३०३ पेक्षा जास्त जागा मिळवताना उत्तरेकडील राज्यांमधील जागांची संख्या कायम राहील हे गृहीत धरावे लागेल.

२०१९ मध्ये पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात बदललेले वातावरण व मोदींची किमया या दोन मुद्दयांच्या आधारे भाजपने ३०० चा आकडा पार केला होता. या वेळी राष्ट्रवादीची लाट नाही. रामाची लाटही ओसरलेली आहे. त्यामुळे भाजपला या वेळी मोदींचा चेहरा या एकाच मुद्दयाच्या आधारे लोकसभेची निवडणूक लढवावी लागत आहे. मोदींचा चेहरा सर्व राज्यांमध्ये तितकाच प्रभावी ठरेल का, हा भाजपसमोरील महत्त्वाचा प्रश्न असेल. २०१९ मध्ये मोदींचे नाव घेऊन अनेक उमेदवार निवडून आले होते. या वेळी मोदींचा चेहरा पुरेसा असता तर दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये दिग्गजांना डच्चू द्यावा लागला नसता. महाराष्ट्रात उमेदवार घोषित करण्यासाठी दिरंगाई झाली नसती. २०१९ पेक्षाही २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी अवघड असल्याने राज्यागणिक समीकरणांचा बारकाईने अभ्यास करून भाजप मैदानात उतरला आहे.

mahesh.sarlashkar@expressindia.com