साडी-चोळी हा भारतीय स्त्रीचा पारंपरिक पोशाख. त्याला काळाच्या ओघात टिकवून ठेवण्याचं, नामशेष होऊ  न देण्याचं, पारंपरिक साडय़ांचं वैभव परत आणण्याचं श्रेय ते वापरणाऱ्या स्त्रियांना आणि वस्त्रोद्योग, हस्तकला उद्योगांतल्या कारागिरांनाही दिलंच पाहिजे. भारताचा हा मौल्यवान वारसा जतन केला गेला तो त्यांना मिळालेल्या राजाश्रयामुळे आणि भारतीय संस्कृतीमुळे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साडी नेसण्याची निवी ही शैली प्राचीन काळापासून आतापर्यंत हळूहळू विकसित होत आली आहे. मोहंजोदडोच्या प्रागैतिहासिक काळात तसंच वैदिक काळात स्त्रिया कमरेभोवती न शिवलेलं वस्त्र गुंडाळत असत आणि पुढे त्याच्या निऱ्या करून खोचत असत, ज्यामुळे हे वस्त्र डौलदारपणे त्यांच्या पायापर्यंत पोहोचत असे. त्या काळातले मौल्यवान धातू आणि खडे, अस्थी आणि लाकडापासून तयार करण्यात आलेले दागिने स्त्री-पुरुष दोघेही अगदी गळाभर वापरत असत. मात्र, स्त्री किंवा पुरुष, दोघेही वस्त्राने छाती झाकत नसत.

हडप्पा येथे अवशेषांमध्ये सापडलेला मातृदेवतेचा शिक्का तसंच इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य राजवटीच्या काळात दिदारगंज यक्षीचं सुंदर शिल्प या दोन्हींतूनही हेच दिसून येतं. सर्व स्त्रिया कमरेभोवती वस्त्र गुंडाळत होत्या, पण वरचा भाग झाकत नव्हत्या. खालचा भाग झाकण्यासाठी वापरलेलं वस्त्रही सकच्छ पद्धतीने नेसलं जात होतं. सकच्छ म्हणजे निऱ्यांचा मधला भाग दोन पायांच्या मधून नेऊन मागे खोचला जात असे. यामुळे हालचाली तर सोप्या होतातच, शिवाय शरीरसौष्ठवही उठून दिसत असे. थोडक्यात, नऊवारी साडी जशी नेसतात तशी. कमरेभोवतीच्या वस्त्राची लांबी वाढवून त्यानेच वरचा भाग आणि डोकंही झाकण्याची पद्धत पुष्कळ अलीकडे, मुघलकाळात आली. मुघलकालीन मिनिएचर पेंटिंग्जमध्ये सोन्या-चांदीने जडवण्यात आलेलं साडीसारखं झिरझिरीत वस्त्र सहज दिसतं. या पेंटिंग्जमधली राधेची चित्रं (१५व्या ते १८व्या शतकादरम्यान काढलेली) बघितली तर आज स्त्रियांच्या ‘वॉर्डरोब’मध्ये अढळ स्थान पटकावणारी साडी किती बदलांतून गेली आहे याचा अंदाज येईल. साडी सकच्छ किंवा विकच्छ पद्धतीने नेसली तरी ती कमरेभोवती गुंडाळण्याची पद्धत कायम राहिली. म्हणूनच या पद्धतीला निवी शैली म्हणतात. आज साडी नेसण्याची साधारण पद्धत म्हणजे चार मीटर भाग कमरेभोवती गुंडाळला जातो आणि उरलेला दीड मीटर भाग डाव्या खांद्यावरून खाली सोडला जातो, ज्याला पदर म्हणतात. याला साडी नेसण्याची निवी शैली म्हणतात. यात साडीची लांबी साडेपाच मीटर असते. साडीसोबत चोळी घातली जाते. चोळी साधारणपणे जाड कापडाची शिवली जाते. यावर रेशमी धाग्यांनी भरतकाम केलं जातं किंवा पारंपरिक नक्षीकाम केलेलं असतं. उरोजांना उठाव देण्याच्या हेतूनेही अनेकदा चोळी शिवलेली असते. थोडक्यात, साडी-चोळी हा भारतीय स्त्रीचा पारंपरिक पोशाख आहे. साडी तिच्या दिमाखासह शतकानुशतकं टिकून तर आहेच, शिवाय साडय़ा विणल्या जातात ती ठिकाणं ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची शहरं झाली आहेत. जिथे विणकर वंशपरंपरागत चालत आलेल्या कौशल्याचा मिलाफ धाग्यांशी साधून अवर्णनीय सौंदर्य तयार करतात, त्या ठिकाणांची कीर्ती जगभर पसरली आहे. यातलं पहिलं शहर म्हणजे ब्रिटिश वसाहतीच्या काळात बनारस हे नाव मिळालेलं आपलं वाराणसी किंवा काशी. प्राचीन काळाशी नातं सांगणारं पाच हजार र्वष जुनं बनारस आता ओळखलं जातं ते रेशमी साडय़ा विणण्याच्या उद्योगामुळे. इथे मागांवर सोन्या-चांदीच्या तारा गुंफून अप्रतिम वस्त्रं विणली जातात. परंपरागत विणल्या जाणाऱ्या साडय़ा आणि स्टोल्ससोबत इथे शेरवानीसाठी कापड, साफा विणले जातात. बनारसी शालू किंवा सोन्याच्या जरीच्या साडय़ा तर नववधूसाठी घेतल्याच पाहिजेत, असा अलिखित नियम आहे. गंगातीरावर वसलेल्या या शहरात आजही घाऊक बाजारात रेशमी वस्त्रं आणि साडय़ा किलोवर विकल्या जातात. भारत आणि अन्य देशांतल्या रेशमी व्यापाराचं बनारस हे केंद्र आहे. भारताच्या दक्षिण भागात कांचीपूरम हे मंदिरांचं शहर आता रेशमी आणि सुती साडय़ा विणण्याचं केंद्र म्हणून हळूहळू विकसित झालंय. कांचीपूरममध्ये रेशमी साडय़ा सजवण्यासाठी त्यात मोर, रुद्राक्ष, फुलं-वेली, सूर्य-चंद्राच्या आकृती, मानवी किंवा दैवी प्रतिमा, मंदिरांचे मनोरे यांसारखी डिझाईन्स विणली जातात. कांचीपूरममध्ये विणलं जाणारं रेशमी वस्त्र पिढय़ानुपिढय़ा टिकतं. आजही सर्व स्तरांतल्या स्त्रियांकडून या साडय़ांना लग्न, समारंभ आणि अगदी दैनंदिन वापरासाठीही मागणी आहे. या साडय़ांना कांचीपूरम शहरावरून कांजीवरम असं नाव आहे. फॅशनबद्दल जागरूक असलेल्या स्त्रीसाठी तिच्या संग्रहात कांजीवरम असणं हा अभिमानाचा भाग असतो.

पश्चिमेकडे महाराष्ट्रात मराठा राजे आणि पेशव्यांच्या कार्यकाळात पैठण हे शहर वस्त्रोद्योग केंद्र म्हणून विकसित झालं. सरदारांच्या घराण्यातल्या स्त्रिया पैठण्या नेसत असत. या पैठण्या खास विणून घेतल्या जात. (आता येवला येथील पैठण्या खूप प्रसिद्ध आहेत.) या साडय़ांवर सोन्याच्या जरीने मोर, पोपट यांचं नक्षीकाम केले जाई. भारतातल्या सर्वाधिक महागडय़ा साडय़ांपैकी समजली जाणारी पैठणी गेल्या शतकात मरणासन्न अवस्थेला पोहोचली होती. यंत्रमागावर विणलेली वस्त्रं आणि कृत्रिम धाग्यांपासून तयार झालेल्या साडय़ांच्या गर्दीत पैठणीची विक्री जवळपास थांबली होती. मात्र, पैठणीबद्दल कळकळ वाटणाऱ्यांनी सरकारच्या मदतीने पैठणी उद्योगाला जिवंत ठेवलं आणि पूर्वीचं वैभवही मिळवून दिलं आहे. आज पैठण्या आठ हजारांपासून लक्षावधी रुपयांपर्यंत विकल्या जातात.

पैठणीप्रमाणेच आणखी काही महागडय़ा, राजेशाही साडय़ांनी महाराष्ट्रीय संस्थानिकांच्या आश्रयाने जन्म घेतला. इंदुरी, चंदेरी, येवला, इरकली, कसुती कॉटन, नारायणगाव सिल्क आणि महेश्वरी साडय़ा उत्तम दर्जाच्या सुती किंवा रेशमी धाग्यांपासून विणल्या जातात. राजघराण्यांतल्या स्त्रियांनी या साडय़ांना लोकप्रियता मिळवून दिली. राजघराण्यातील स्त्रियांच्या दिमाखाला साजेशा साडय़ा विणून घेण्यासाठी संस्थानिक परिवारांनी किती तरी विणकरांना आश्रय दिला होता. अहल्याबाई होळकरांनी नर्मदेकाठी अनेक विणकरांना वसवलं आणि त्यांच्याकडून विणून घेतलेल्या महेश्वरी साडय़ांना प्रसिद्धी मिळवून दिली. काळाच्या ओघात विणकरांचा आश्रय काढून घेतला गेला आणि ते आजूबाजूच्या खेडय़ांमध्ये विखुरले. आज मात्र होळकर घराण्याच्या वंशजांनी जुने विणकर पुन्हा बोलावून, नवीन विणकरांना प्रशिक्षण देऊन अप्रतिम सुंदर महेश्वरी साडय़ांची निर्मिती पुन्हा सुरू केली आहे. या साडय़ा मुंबई, दिल्ली, बंगळूरुसारख्या महानगरांमध्येही विक्रीसाठी पाठवल्या जातात.

पटोला आणि इकत साडय़ाही भारतात गेली अनेक शतकं विणल्या जात आहेत. रेशमी किंवा सुती धागे विशिष्ट रचनेत रंगवून विणल्या जाणाऱ्या पटोला साडय़ांची निर्मिती गुजरात, ओरिसा आणि आंध्र प्रदेशात होते. पक्षी, फुलांसारखी चित्रं भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात मांडणाऱ्या या बहुरंगी साडय़ा उत्सवांमध्ये आवर्जून नेसल्या जातात. पटोला विणण्याची कलाही वंशपरंपरागत चालत आलेली आहे आणि हा वस्त्रनिर्मितीचा दुर्मीळ नमुना मानला जातो. पटोला साडी महागडी असली तरी अत्यंत शुभ समजली जात असल्याने श्रीमंताघरच्या नववधूच्या वस्त्रांमध्ये ती असतेच असते. पटोला साडीला धार्मिक महत्त्व असल्याने देवतांना ती नेसवली जाते किंवा मंदिरातल्या पडद्यांसाठी वगैरेही पटोला डिझाईनची वस्त्रं वापरली जातात. नववधू, गर्भवती स्त्रीला आवर्जून पटोला नेसवली जाते. शिवाय वास्तुशांतीसारख्या पूजेसाठी किंवा काही नवीन उपक्रम सुरू करताना पटोला साडी नेसली जाते. धार्मिक गीतांमध्ये देवतांचं वर्णन करताना पटोला साडीचा उल्लेख आढळतो. कारण पटोला हे वस्त्र देवाचं आवडतं समजलं जातं.

गुजरात, वाळवंटाचा प्रदेश राजस्थान आणि गंगेच्या खोऱ्यातला भाग आणखी एका शुभ समजल्या जाणाऱ्या वस्त्रासाठी प्रसिद्ध आहेत- बांधून रंगवलेल्या बांधणी साडय़ा आणि रेघारेघांच्या लेहरिया साडय़ा. उत्तम दर्जाच्या सुती किंवा रेशमी धाग्यांपासून तयार केलेल्या या साडय़ांचं रूपच असं आहे की, त्या साजरीकरणाचं (सेलिब्रेशन) प्रतीक वाटाव्यात. चमकदार रंगांच्या बुंदक्यांनी किंवा लाल-पिवळ्या-गुलाबी-जांभळ्या धारांनी सजलेल्या बांधणीच्या साडय़ा हा उत्तरेतल्या अनेक राज्यांमध्ये नववधूचा पारंपरिक पोशाख आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये या साडय़ा वैवाहिक आयुष्यासाठीचं तसंच भरल्या घरासाठीचं भाग्यशाली प्रतीक मानल्या जातात. नवरदेवाचा आणि दोन्ही बाजूंच्या पुरुषांचा फेटाही बांधणीच्या कापडाचाच असतो. या राज्यांतली अनेक लोकगीतं आणि लग्नाच्या गाण्यांमध्ये बांधणीच्या ‘चुन्नी’चा उल्लेख असतो.

अतिपूर्वेकडून आलेल्या व्यापाऱ्यांकडून भारतीय रंगारी बांधणीची प्राचीन कला शिकले. या प्रक्रियेत कापडाला असंख्य छोटय़ामोठय़ा गाठी बांधल्या जातात आणि मग विशिष्ट आकार आणण्यासाठी अनेक टप्प्यांत ते रंगवलं जातं. मग त्यावर सजावटीसाठी जरीने भरतकाम केलं जातं, आरसे लावले जातात, अ‍ॅप्लिक काम केलं जातं किंवा रेशमी धाग्यांनी भरतकाम केलं जातं. त्यामुळे हे वस्त्र अधिकच उत्सवी दिसू लागतं. या कलेचं मूळ इंडोनेशिया आणि मलेशियात असलं तरी इथे तयार होणारी बांधणीची वस्त्रं तुलनेने साधी दिसतात. भारतात केली जाणारी बांधणी मात्र देशाच्या सुशोभीकरणाच्या संस्कृतीचा साज लेवून लक्षावधी स्त्रियांचं सर्वात आवडतं वस्त्र झाली आहे.

बंगाल आणि आसाम या पूर्वेकडच्या राज्यांनी त्यांची स्वत:ची अशी रेशमी आणि सुती वस्त्रं विकसित केली आहेत. टसर सिल्क, गरस, धनियाकली अशा अनेकविध वस्त्रांनी गेल्या कित्येक शतकांपासून बंगाली आणि आसामी स्त्रियांना सजवलं आहे. मुर्शिदाबाद सिल्क तर मागावरून वाहत आलेल्या पाण्यासारखं तलम आहे. डाकाई साडय़ांवर विणलेली चित्रंही प्रसिद्ध आहेत. बंगालचं विभाजन झाल्यानंतरही बंगाल आणि आसपासच्या राज्यांमध्ये साडय़ांचा व्यापार जोरात सुरू राहिला.

आज हातमाग उद्योगाचं पुनरुज्जीवन झाल्यामुळे भारतात हातमागावर लक्षावधी साडय़ा विणल्या जातात. यात गिरण्यांत तयार होणाऱ्या साडय़ा, यंत्रमागांवर विणल्या जाणाऱ्या साडय़ा, नैसर्गिक आणि कृत्रिम तंतूंपासून तयार होणाऱ्या आणखी काही लक्ष साडय़ांची भर पडते. यातल्या काही पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांत निर्यात केल्या जातात. मात्र, बऱ्याचशा सर्व स्तरांतल्या भारतीय स्त्रिया विकत घेतात. हा अप्रतिम पोशाख काळाच्या ओघात टिकवून ठेवण्याचं, नामशेष होऊ  न देण्याचं, महागडय़ा साडय़ांचं वैभव परत आणण्याचं श्रेय या स्त्रियांनाच आणि वस्त्रोद्योग, हस्तकला उद्योगांतल्या कारागिरांनाही श्रेय दिलंच पाहिजे. मात्र, भारताचा हा मौल्यवान वारसा जतन केला गेला तो स्त्रियांनी साडय़ा विणण्याच्या, रंगवण्याच्या, छपाईच्या कलेला दिलेल्या आश्रयामुळेच!

विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व माझे जग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian women traditional costumes saree
First published on: 01-07-2017 at 00:26 IST