एकदा एका शिष्याने गुरूला विचारलं, ‘‘आचार्य, मी रोज इतकी स्तोत्र म्हणतो आणि प्रत्येक स्तोत्राची फलश्रुतीही म्हणतो, तरी माझ्या मनातल्या गोष्टी पूर्ण का होत नाहीत? ‘सर्वकामदम्’ असं विशेषण असणारं स्तोत्र म्हणूनही माझी एकही कामना पूर्ण झाली नाही असे का?’’ गुरुजी म्हणाले, ‘‘अरे वेडय़ा, माझ्या मनात कुठलीही इच्छा, कामनाच उरणार नाही, अशी इच्छा निर्माण व्हावी.. या अर्थाने या शब्दाकडे बघ.. मग आपोआपच सगळ्या कामनांची पूर्तता होईल.’’
‘इच्छापूर्ती’..या एका शब्दात कित्ती काय काय सामावलं आहे ना.. इच्छा निर्माण होण्याचं कारण, नेमकी हीच इच्छा निर्माण होण्याचं प्रयोजन, इच्छा ज्याच्या मनात आली असेल त्याची भावना, त्याची स्वप्नं, त्याची मेहनत, त्याचा ध्यास, त्याला इतरांचं लाभलेलं सहकार्य, आशीर्वाद, त्याची श्रद्धा, इच्छा पूर्ण होईपर्यंत त्याच्या मनाची झालेली चलबिचल, इच्छापूर्तीच्या दृष्टीतून मिळालेले संकेत, कदाचित हितशत्रूंनी त्या काळात केलेलं खच्चीकरण, इच्छा पूर्ण झाल्यावर आलेली शांत अवस्था, भरून आलेली कृतज्ञ भावना किंवा तरारून आलेला अहंकार, मिळालेली तृप्तता.. किंवा आता दुसऱ्या इच्छेची सुरुवात.. चार अक्षरं केवळ.. पण कर्ता, कर्म, क्रिया, साधनं, दैव, अधिष्ठान या सगळ्याला वेढून टाकतात ही चार अक्षरं..
इच्छा.. या दोन अक्षरांमुळे आपण माणूस असतो.. जन्माला येणारा छोटासा जीव किती इच्छा घेऊन जन्माला येतो.. घेऊन येतो की इथे आल्यावर निर्माण होतात? काही जण म्हणतील तो जन्माला येतो तोच मुळी आधीच्या जन्मातली इच्छा राहिली म्हणून.. काही म्हणतील संस्कारातून या इच्छा जन्माला येतात.. काही म्हणतील प्रत्येक जिवाचं इथलं कार्य ठरलंय म्हणून तशा इच्छा मनात निर्माण होतात.. काही असो.. इच्छेशिवाय माणूस नाही.. इथल्या वास्तव्यात इच्छाच त्याला खऱ्या अर्थाने कार्यप्रवृत्त करते.. आणि इथून जातानाही त्याची शेवटची इच्छाच महत्त्वाची असते.. फाशी दिल्या जाणाऱ्यालासुद्धा त्याची शेवटची इच्छा विचारली जातेच.. आणि दहाव्याला कावळा शिवला नाही की गेलेल्याची काय बरं इच्छा होती याची चर्चा सुरू होते.. त्याच्या इच्छेच्या पूर्ततेची जबाबदारी दुसऱ्या कोणाला तरी स्वीकारावी लागते.. त्या क्षणी वाटतं हे असं नंतरची इच्छापूर्ती म्हणजे मरणोत्तर सर्वोच्च पुरस्कारच. इच्छापूर्ती या शब्दाला असं एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत महत्त्व आहे खरं.
रामदास स्वामी म्हणतात तसं माणूस म्हणजे विचार.. तसं माणूस म्हणजे इच्छासुद्धा. म्हणजे जगात अब्जावधी इच्छा आहेत तर.. आणि प्रत्येकाच्या दृष्टीतून त्याची त्याची महत्त्वाची.. प्रत्येकाला मोल आपल्या इच्छेचं.. प्रत्येकाची धडपड आहे ज्याच्या-त्याच्या इच्छापूर्तीसाठी.. कुणाला काही मिळवण्याची कुणाला काहीच न मिळवण्याची..
एकदा एका शिष्याने गुरूला विचारलं, ‘‘आचार्य, मी रोज इतकी स्तोत्र म्हणतो आणि प्रत्येक स्तोत्राची फलश्रुतीही म्हणतो.. बहुतेक स्तोत्रात ‘षडभि: मास: फलं लभेत्’ असं म्हटलंय. मग इतके महिने म्हणूनही माझ्या मनातल्या गोष्टी पूर्ण का होत नाहीत? ‘सर्वकामदम्’ असं विशेषण असणारं स्तोत्र म्हणूनही माझी एकही कामना पूर्ण झाली नाही.. गुरुजी हसून म्हणाले, ‘‘अरे वेडय़ा, सर्वकामद म्हणजे सर्व कामनांची पूर्ती करणारं असा अर्थ घेऊ नकोस तर माझ्या मनात कुठलीही इच्छा, कामनाच उरणार नाही अशी इच्छा निर्माण व्हावी.. अशा अर्थाने त्या शब्दाकडे बघ..अशी स्थिती आली की आपोआपच सगळ्या कामनांची पूर्तता होईल. कारण कामना म्हणजे तळ नसलेली विहीर.. ही झाली पूर्ण की ती, ती झाली की त्यानंतर आणखी.. अगदी उभा जन्म सरत आला तरी ही विहीर आटतच नाही.
अंगं गलितं पलितं मुन्डं दशन विहीनं जातं तुंडं
तदपि न मुन्चति आशापिंडं..
शरीर थकलं, केस पिकले, दात गळून पडले तरी आशा, इच्छा, कामना काही संपत नाहीत.. म्हणून स्तोत्र म्हणताना कुठलीही कामनाच उरणार नाही असं मागावं..’’ गुरुजींच्या या बोलण्यावर शिष्य नक्कीच अंतर्मुख झाला असेल.. अर्थात ज्ञानाच्या उन्नत अवस्थेला पोहोचलेल्या गुरूने, ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या शिष्याला हे सांगणं योग्यच आहे.. पण गृहस्थधर्म स्वीकारलेल्या आपल्या हे कसं पचनी पडावं? इच्छा सोडणं? उलट बराचसा प्रयास तर एक एक इच्छा पुरी व्हावी म्हणून असतो आपला.. गालिब साहेब तर म्हणतात, ‘‘अहो एक काय हजारो इच्छा मनात थमान घालत असतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी जीव जाळावा लागतो.
‘हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले..’पण मस्त मौला गालिबसाहेब आणि आपल्यातला फरक लगेच शेरच्या पुढच्या अध्र्या चरणात दिसून येतो.. ते म्हणतात, ‘बहोत निकले मेरे अरमान..’ माझ्या पुष्कळ आकांक्षा पूर्ण झाल्या.. हे जितक्या मोकळेपणाने गालिब म्हणतात तितक्या मोकळेपणाने आपण म्हणू शकू का? पुढचा चरण मात्र आपण गालिबसाहेबांच्या स्वरात स्वर मिळवून म्हणू.. ‘लेकिन फिर भी कम निकले..’कितीही आकांक्षा पूर्ण झाल्या तरी कमीच झाल्या असंच वाटतं.. संस्कृतातला तो पाच ‘ज’कारांचा श्लोक आठवला..
जामाता जठरं जाया जातवेदा जलाशय:
पूरिता: नव पूर्यन्ते जकारा: पंच दुर्भरा:
जावई, पोट, पत्नी, अग्नी आणि सरोवर किंवा समुद्र कितीही त्यांना भरण्याचा प्रयत्न करा ते भरले जात नाहीत.. म्हणजे ते समाधान पावतच नाहीत.. या पूर्ण न होणाऱ्या पंच ‘ज’कारांना मागे टाकतो तो एक ‘इ’कार.. अर्थात इच्छा.. म्हणजे वेताळाचा सातवा हंडा.. वेताळाने एका दरिद्री माणसाला सहा हंडे सोन्या-नाण्यांनी भरून दिले नि सातवा हंडा मात्र अर्धाच दिला ..हा हंडा अर्धाच राहतो हे बजावून सांगितलं.. पण काही वर्षांनी जेव्हा तो दरिद्री माणूस पुन्हा वेताळाला भेटला तेव्हा श्रीमंत होऊनसुद्धा त्याची रया गेलेली होती.. वेताळाने चौकशी केल्यावर कळलं की तो सातवा हंडा भरण्याच्या नादात तो माणूस आपलं सगळं समाधान गमावून बसला होता. त्या सहा भरलेल्या हंडय़ांपेक्षा तो अर्धा हंडाच त्याला दिसत होता.. असंच होतं ना.. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या तरी लक्षात राहते ती न पूर्ण झालेली इच्छा.. प्रत्येकाच्या मनात हा सातवा हंडा असतोच.. हीच गोष्ट जर एखाद्या संतांच्या बाबतीत घडली असती तर संताने त्या वेताळालाच सांगितलं असतं.. ‘‘मला तर हंडे नकोच आहेत. पण बाबा रे, तो सातवा हंडा तू कुणाला देऊही नकोस आणि तो तू तुझ्यापाशीही ठेवू नकोस.. तो सातवा हंडा पुरून टाक आणि तू पूर्ण हो .. कारण त्या कधीही न भरल्या जाणाऱ्या हंडय़ामुळेच तू वेताळ झालायस आणि इतरांना तो देऊन तू त्यांनाही ‘वेताळ’ करतोयस. इच्छेचा दावानल भडकला की सद्विचारांचं रान जाळून जातं..’’ मग या इच्छांचं करायचं तरी काय? स्वामी रामानंद म्हणाले, ‘‘अरे माझी इच्छा असं वेगळं काही ठेवायचंच नाही.. त्या वरच्याच्या इच्छेतच आपली इच्छा मानायची..
‘ राजी है हम उसी में जिस में उसकी रजा है’.. मग आज गोडाधोडाचं जेवण मिळालं तरी त्याची इच्छा आणि आज पाण्याने पोट भरावं लागलं तरी त्याची इच्छा.. या संतांच्या मते, आपल्या इच्छेचं वेगळं खटलं ठेवलं नाही की मन आपोआप शांत होतं. मग आकांक्षा पूर्ण न झाल्याचं दु:ख नाही, अस्वस्थता नाही.. मन शांत.. हे वाचताना, ऐकताना खूप छान वाटतं.. पण मग कधी वाटतं की या अशा जगण्याने जीवन अळणी तर नाही ना होणार? जीवनाला चव आणायला कामनेचं मीठ हवं, आकांक्षेची साखर हवी, आशा-अपेक्षांचा चिंच-गूळ हवा, आणि इच्छेची खमंग फोडणी हवी.. फोडणी हे मोठं कौशल्याचं काम.. फोडणी जळली किंवा जास्त झाली की पदार्थाची चव बिघडते.. जीवनाची चव न बिघडवता इच्छेची फोडणी देणं महत्त्वाचं.. मग पळीभर फोडणी कढईभर जीवनाला चविष्ट बनवील.. चला.. शेवटची साराची पळी.. म्हणजे या इच्छा आख्यानाचं सार हो ..
इच्छाओं से बंधा एक जिद्दी
पिरदा (पाखरू) है इन्सान
जो कैद भी इच्छाओं से है और
उडान भी भरता है उन्ही से ..
धनश्री लेले
dhanashreelele01@gmail.com