काकूंची गोंडस नातवंडं क्लासहून घरी आली. काकूंनी त्यांची दखलही घेतली नाही. ‘आजी, भूक लागली गं’ असं त्यांनी म्हणताच, काकू त्यांच्यावर रागावल्या आणि म्हणाल्या, “आता येईलच रे तुझी आई अॅफिसमधून तिला सांग तुला काय हवे ते…” सुधाला काकूंचं वागणं जरा चमत्कारिकच भासलं. इतकं भरलेपुरले गोकुळ पण या बाईला कशाचा आनंद नसावाच का?

संध्याकाळचे सात वाजले होते… घाईघाईने सुधा तिच्या घरात आली. देवाजवळ दिवा लावला आणि एकवार घरावर नजर टाकली. खरंच किती मनासारखं आणि सुंदर सजवलं आहे आपलं घर आपण, या विचाराने समाधानाची एक लकेर तिच्या चेहऱ्यावर उमटली. अजित संध्याकाळचं बाहेर फिरायला गेला होता. निवृत्तिपश्चात त्यानं आपलं रुटीन छानसं लावून घेतलं होतं. अजित सरकारी बँकेतून निवृत्त झाला आणि मुंबईतला दोन खोल्यांचा फ्लॅट सोडून नाशिकला आला. तिथे गावाबाहेर पूर्वीच जागा घेऊन ठेवली होती. त्यावर छोटासा बंगला बांधला. बंगल्याभोवती सुंदर बाग केली आणि परसबागेत खूपसा भाजीपाला लावला… दिवस कसा भुर्रकन् उडून जात असे.

शिक्षिकेची नोकरी केलेली सुधा दुपारच्या वेळात आजूबाजूच्या मुलांना घेऊन बसत असे आणि त्यांच्या अभ्यासाचा पाया पक्का करून देत असे. अगदी अल्पशी फी आकारत असल्यानं आजूबाजूच्या लोकांमध्ये तिच्याप्रति आदर होता. आजही आपल्या बागेतील कारले, दोडके अन् लिंबे घेऊन ती शेजारच्या म्हात्रे काकूंकडे सहजच गेली होती. दर वेळेस त्या कुठे जाता येता भेटल्या की तिचा हात हातात घेऊन म्हणायच्या, “ये ना गं सुधा, जरा वेळ काढून. तुझ्याशी बोललं की मन कसं मोकळं होऊन जातं. ये गं खरंच ये. कधी येतेस सांग?” सुधाला जणू ‘माहेर’ गवसल्याचा भास व्हायचा. म्हणूनच आज ती काकूंकडे जाऊन आली होती…

परतल्यावर सुधाच्या एकदम लक्षात आलं की, आपलं डोकं एकदम ठणकत आहे. आले, गवती चहा टाकून फक्कड चहा बनवावा म्हणून ती स्वयंपाकघरात शिरली. चहा घेतल्यावर तरी डोकं शांत होईल असं तिला वाटलं. चहाचं आधण खळाळून उकळत होतं. त्यातून वाफा बाहेर पडत होत्या आणि त्या वाफांकडे सुधा एकटक पाहत होती. राहून राहून काकूंचा रडवेला चेहरा डोळ्यासमोर येत होता. आज सुधाला घरी आलेलं पाहून त्यांना कोण आनंद झाला होता. सुधाला आग्रह करून करून त्यांनी खाऊ पिऊ घातलं. तिच्या शेजारी येऊन बसल्या आणि म्हणाल्या, “रोज मेला तो टीव्ही पाहत असते. आज तुझ्याशी गप्पा मारते. बैस जरा.” त्यानंतर मात्र काकूंनी रडगाणंच सुरू केलं. “काय गं सुधा जगावंसंच वाटत नाही बघ… दोन्ही सुना नोकरीवर निघून जातात. दोघा मुलांची दोन मुलं दिवसभराच्या शाळेत कोंबली आहेत. घरी आले की तास दोन तास घरी असतात. तेवढय़ापुरतं घराला घरपण असतं. मग पुन्हा क्लासला जातात. दिवसभराची कामाला बाई असल्यानं मला काहीच करावं लागत नाही. फारशी देखरेख ठेवलेली मुलांना-सुनांना आवडत नाही. मग मी आपली माझी माझी व्यग्र असते. आयुष्यभर अध्यात्मात मन रमविलं नाही तर आता आयुष्याच्या उत्तरार्धात कसं गं मन रमणार देवधर्मात?  मग ते ‘थोतांड’ ही नकोसं वाटतं. एकुलती एक लेक तीही अमेरिकेत स्थायिक झाली आहे. तिची आणि माझी ऐसपैस गप्पांची वेळ जमत नाही. ती तरी इकडे भारतात हवी होती गं…” असं म्हणत त्यांनी डोळ्याला पदर लावला. तेवढय़ात त्यांची गोंडस नातवंडं क्लासहून घरी आली. काकूंनी त्यांची दखलही घेतली नाही. ‘आजी, भूक लागली गं’ असं त्यांनी म्हणताच, काकू त्यांच्यावर रागावल्या आणि म्हणाल्या, “आता येईलच रे तुझी आई अॅफिसमधून, तिला सांग तुला काय हवे ते…” सुधाला काकूंचं वागणं जरा चमत्कारिकच भासलं. त्या दोघा मुलांकडे पाहून सुधाला त्यांना एकदम जवळ घ्यावंसं वाटलं आणि गालगुच्चा घ्यावासा वाटला. ती तसे करणारही होती पण तिनं एकदम मनाला आवर घातला आणि वरकरणी ती त्या दोघांशी त्याच्या अभ्यासाबद्दल बोलली. सुधाच्या मनातील वादळाचा काकूंना थांगपत्ताही नव्हता. त्यांनी आपलं रडगाणं सुरूच ठेवलं होतं. सुधाला काकूंचा क्षणिक रागच आला. इतकं भरलेपुरले गोकुळ पण या बाईला कशाचा आनंद नसावाच का? माझ्या घरी येऊन पाहा दोघंच दोघे असतो दिवसभर तर घर कसं खायला उठतं? घराच्या भिंतींनी पाखरांची चिवचिव, लगबग कधी अनुभवलीच नाही. लग्नानंतरची दहा-पंधरा वर्षे बाळाची वाट पाहण्यात, उपचार करवून घेण्यात सरली आणि एके दिवशी दोघांना वास्तव स्वीकारावं लागलं की आपण कधीच आई-बाबा होऊ शकणार नाही. हा आघात सहन करायला तसेच स्वीकारायला वेळ नक्कीच लागला. हळूहळू वास्तवाचा स्वीकार केला गेला आणि सुधा-अजय एकमेकांसाठी जगू लागले. जगण्याचा वेग वाढवला आणि स्वत:चे शल्य मनाच्या तळघरात बंद करून टाकलं. आपल्या भाचेमंडळींसाठी तसंच पुतण्यांसाठी सुधा-अजय आधारस्तंभ बनले. कुणालाही हेवा वाटावा इतक्या आनंदात ते दोघे राहत असत. अगदी काकूंनाही म्हणूनच सुधा फार आवडत होती आणि त्या तिला खूप जीव लावत होत्या. काकूंना सुधाचं ‘रितेपण’ लक्षात नसेल आलं का? काही कटू अनुभवांमुळे सुधा पटकन् कुणाच्या बाळाचा पापा घेत नसे. उगाचच काही लेबले समाजानं तिला लावली होती आणि तीही त्यातून बाहेर पडू शकत नव्हती.

सुधाने दोन कपात चहा गाळला तोवर अजय बाहेरून आला. दोघे जण बाहेर झोपाळ्यावर बसून चहाचा आस्वाद घेऊ लागले. तिच्याकडे लक्ष जाताच अजय चमकला. “का गं, काही होतंय का. असा चेहरा का उतरवून बसली आहेस आज…” त्याच्या प्रेमळ शब्दांनी अश्रू अगदी झेपावत पापणी आड आले परंतु तिने ते महत्प्रयासाने परतवले… “काही नाही रे जरा डोके जडावलं आहे…” ती म्हणाली… “अजय आपण किती सकारात्मक जगत आहोत. अरे, पण आपल्या आजूबाजूला तशी माणसं नसतील तर आपलीच किती घुसमट होते रे… सारे काही जिथल्या तिथे असून भर गोकुळात माणसं अशी का रे दुर्मुखलेली असतात? मला तर काही कळेनासंच झालेय…” तिने काकूंकडचा किस्सा अजयला सांगितला आणि म्हणाली… “बरं आहे रे आपलं घर आणि आपण. अशा नकारात्मक लोकांना भेटल्यावर डोकं अगदी जड होऊन जाते बघ…”

सुधाला हलकेच कुशीत घेऊन अजय तिच्या डोक्यावर हलक्या हाताने थोपटू लागला आणि म्हणाला.. “वेडाबाई इतका विचार नसतो करायचा गं. शेवटी आपण दोघे आहोतच ना एकमेकांसाठी…”

स्वाती पाचपांडे

swatipachpande@gmail.com