साठ वर्षांत मुंबई उभी आडवी वाढली.. पण बदलली कधीच नाही! साठ वर्षांपूर्वीच्या-स्वातंत्र्यानंतरच्या मुंबईचं चित्र उभं करणारं – साठ वर्षांनंतरच्या आजच्या मुंबईलादेखील फिट्ट बसणारं.. हे अजरामर गाणं !
ये है बॉम्बे..मेरी जान!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई उपनगरातील रेल्वेस्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता. सकाळ संध्याकाळ वेगवेगळी वाहनं-रिक्षा – बस यातून मार्ग काढीत जाणाऱ्या माणसांनी (मुंबईच्या भाषेत ‘पब्लिक’) धो धो वाहणारा.. सकाळी इतर रस्त्यांनी मुख्य रस्त्याला मिळून स्टेशनकडे जाणारी प्रवाहाची गतिमान वाहण्याची दिशा, तर संध्याकाळी तोच प्रवाह संथ गतीने गजबज-गोंगाटातून थांबून थांबून खरेदी करत वाट काढत स्टेशनकडून उलटा.. मुख्य रस्त्याला फाटे फुटून विरळ होत सोसायटय़ा-झोपडवस्त्यांकडे जाणारा. मधल्या दुपारच्या काळांत दुतर्फा असलेल्या फुटपाथवर अन् जवळपास अध्र्या रस्त्यावर बेकायदेशीर फेरीवाल्यांनी नित्याप्रमाणे जम बसविलेला. त्यांतून देवाची देखील सुटका नाही! स्टेशनजवळच्या फूटपाथच्या एका जंक्शनवर, सुरुवातीला लहानसं असलेलं नंतर ‘वाढता वाढता वाढे’ तसं वाढत गेलेलं एक अनधिकृत देऊळ देखील आहे! त्यातच कधी सालाबादप्रमाणे रस्ता अडवून उभे केलेले, गणपती-नवरात्रीचे खरं तर राजकीय शक्ती प्रदर्शनाचे, स्वातंत्र्यदिनी-प्रजासत्ताकदिनी देशभक्ती प्रदर्शनाचे – मोठाले मंडप, त्यांचे दिवसरात्र कानठळ्या बसविणारे भयावह स्पीकर्स अन दहीहंडय़ांची जबरदस्तीची दादागिरी अन हमरीतुमरी! मात्र कधी अधनंमधनं गर्दीच्या वेळीसुद्धा हे फूटपाथ मोकळे, ‘मुंबई बंद’चा भास निर्माण करणारे दिसतात. मोकळ्या रस्त्यावरून वाहनांची सहज ये-जा होते, जी एरवी दुर्मीळ. दोन-तीन म्युनिसिपालटीच्या गाडय़ा फेऱ्या मारणाऱ्या वा उभ्या. गाडय़ांना रेलून गप्पा छाटणारे म्युनिसिपालटीचे अधिकारी, पोलीस-कॉन्सटेबल्स.. फुटपाथ पलीकडच्या इमारतींच्या हद्दीत दबा धरून बसलेले, बरेचदा आधीच या ‘धाडी’ची सूचना मिळालेले-आपापले स्टॅंन्ड, पाटय़ा, पथाऱ्या, चादरी अन मालाची गाठोडी लपवून ठेवलेले-नेहमीचेच फेरीवाले. हा काही काळापुरता, वा एखादं दिवसापुरता ‘रोड-शो’.. नंतर ‘लाईफ इज बॅक टू नॉर्मल’!
त्या दिवशी – दिवाळीच्या आधीच्या दिवसात – त्या मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या एका दुय्यम रस्त्याच्या जंक्शनवर पब्लिकची मोठी गर्दी. जवळ जाऊन पाहिलं तर डोंबाऱ्याचा खेळ चाललेला. लोखंडी सळ्या बांधून उभ्या केलेल्या दोन टोकाच्या तिकाटण्याना जोडणारी सहासात फूट उंचीवर रस्सी. त्यावरून एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे हातात आडवी काठी धरून, डोक्यावर ठेवलेल्या तीन लोटय़ांचा अन् स्वत:चा तोल सांभाळत जाणारी पाचेक वर्षांची किडकिडीत मुलगी. एका तिकाटण्याजवळ कडेवर एक आकांतानं रडणारं पोरगं घेऊन, दोरीवरील पोरीला टाळ्या वाजवत धीर देणारी तिची आई. अन् दुसऱ्या तिकाटण्याजवळ गाण्याच्या तालावर डफली वाजवत पोरीला सूचना देणारा तिचा बाप.. खरा ‘प्रोफेशनल’ डोंबारी. कारण बाजूला एका मोडक्या प्लास्टिक स्टुलावर ठेवलेल्या स्पीकरवर मोठय़ा आवाजात गाणं चालू असतं..
दुनियामे रेहेना है तो काम कर प्यारे,
हाथ जोड सबको सलाम कर प्यारे,
वरना ये दुनिया जीने नही देगी,
खाने नही देगी, पिने नही देगी !  हे सारं कौतुकानं बघत दाद देणाऱ्या पब्लिक भोवती अधनंमधनं थाळी
फिरवणाऱ्या आईच्या थाळीत नाणी-नोटा पडत होत्या..! पोरीच्या बापानं नंतर खेळ बदलला. पोरीच्या पायात छोटय़ा टायरसारखी रबरी िरग उभी केली. तिच्यावरून गोलाकार िरग फिरवत तोल सांभाळत आता या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं! आता गाणं देखील बदललं..
‘ए भाय, जरा देखके चलो, आगेही नही पीछे भी,
दाए ही नही बाएं भी, उपरही नही नीचे भी! ए भाय..
पुढं वळल्यावर स्टेशन रोडला तुडुंब गर्दी, फेरीवाल्यांची-त्यामुळे त्यांच्या गिऱ्हाईकांची, त्यातून दोन दिवसांवर आलेली दिवाळी.. त्यामुळे नेहमीच्या वस्तूंच्या जोडीनं लटकवलेले आकाशकंदील, चांदण्या, प्लास्टिकची झुंबरं, इलेक्ट्रिक दिव्यांची तोरणं, दिवे, पणत्या, रांगोळ्या- रंग, रोल्स, स्टिकर्स, फटाके.. दिवाळीसाठी लागणारं सारं काही रस्त्यावरच सहज उपलब्ध! तेवढय़ात फेरीवाल्यांपैकी कुणीतरी दवंडी पिटल्यासारखं ओरडलं..‘ए, गाडी आया, गाडी आया, भागो.. !’ ( हे बम्बैय्या हिंदी!) अन् क्षणात माहोल बदलला. सगळ्या फेरीवाल्यांची धावपळ सुरू झाली. आपापले स्टॅन्ड, पाटय़ा, पथाऱ्या, चादरी अन् मालाची गाठोडी लपवून ठेवण्यासाठी एकमेकांची धक्काबुक्की चालू झाली. एकमेकांशी कुजबूज..‘आज कैसा आया मुन्शिपालटीवाला ?..मेसेज भी नही भेजा..’
‘शायद अब दिवालीका बोनस भी चाहिये गब्बरसिंगको..’
‘नाकमें दम कर रख्खा है.. जीनेका कैसा बम्बैमे?’
साऱ्या फेरीवाल्यांच्या धावपळीत एक म्हातारी फेरीवाली मागं पडली. एरवी ती पालेभाज्या, फुलं विकायची. दिवाळीच्या दिवसांत दिवाळीच्या वस्तू टोपल्यांतून घेऊन बसली होती.. रांगोळ्या, रंग, स्टिकर्स, मातीचे नक्षीदार दिवे अन पणत्या.. सगळ्या जड पाटय़ा-टोपल्या. नेमकी तिथंच ‘मुन्शिपालटीची’ गाडी येऊन उभी राहिली. चार माणसं खाली उतरली. त्यांनी तिच्या सगळ्या पाटय़ा-टोपल्या मालासकट उचलल्या अन गाडीत टाकल्या. ती सटपटली.. अधिकाऱ्याशी वाद घालू लागली, ‘अवो सायेब, सणाच्या दिवशी का छळताय? दिवाळीच्या वख्ताला तरी कमवायला देणार की नाय कच्च्याबच्च्यांसाठी.. अन आता कशी वो आली गाडी? दिवाळीत न यायची कबुलात होती न्हवं?’ ‘ए मावशे, दिवाळी सुरू व्हायची आहे अजून. अन् तुला पटकन माल नाय उचलता आला..गाडी नाय दिसली?’
‘मी एकली म्हातारी किती धावपळ करणार?’
‘मग आम्ही तरी काय करणार? रेकॉर्डवर पकडलेला माल दाखवावा लागतो.. आता ऑफिसवर येऊन माल सोडवून घेऊन जा.. दंड भरून’
‘अन रातच्याला पोरांस्नी खायला काय घालू?’,
‘याचा विचार रस्त्यावर बेकायदा धंदा करताना नव्हता?’
‘अन मंग तुझी ही ‘वसुलीची’ नोकरी तरी कुठल्या कायद्यात बसती रं?’
‘चूप म्हातारे.. ज्यास्त बडबड नको, नायतर सगळा माल जप्त होईल !’
सोबत दोन मेल अन एक लेडी कॉन्सटेबल होते. लेडी कॉन्सटेबल मध्ये पडली..‘मावशी, गप ऱ्हावा.. कशापायी नुकसानीत जाताय दिवाळीत..’
‘आमची कसली दिवाळी.. आमची कायम होळी!   कायम नुसत्या बोंबा मारायच्या.. नशिबाच्या नावानं!’
दरम्यान आणखी दोन फळवाल्यांचा माल गाडीत टाकून गाडी पुढं हलली. स्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीतील दुकानातून दुकानदार हा नित्याचा ‘खेळ’ बघत असतात. त्यांच्या दृष्टीनं हे फेरीवाले म्हणजे डोकेदुखीच. या फेरीवाल्यांची देखील ‘युनियन’ असते. ते कधी संप देखील पुकारतात. तेव्हा त्यांच्या लीडरची नाक्यावर पोलीस-बंदोबस्तात भाषणं होतात, मुन्शिपालटीवर मोर्चे जातात.. असंही म्हणतात, यातले काही फेरीवाले दुकानदारांचीच माणसं असतात. दुकानासमोरचा फूटपाथ ‘दुसरे कुणी तरी अडविणारच’ म्हणून हेच दुकानदार अडवतात. बाहेरचा माल संपत आला की आतून माल येतो. बाहेरचं गिऱ्हाईक वेगळं, आतलं वेगळं.. धंदा दोन्हीकडे चालूच!
स्टेशनच्या समोरच्या नाक्यावर एक जुनं सिंगल-स्क्रिन सिनेमा-थिएटर देखील आहे. तिथं कायम भोजपुरी सिनेमे लागतात. त्या सगळ्या परिसरातल्या अन् बाजूच्या उपनगरातल्या फेरीवाल्यांची सोय. पलीकडच्याच ‘शांती गेस्ट-हाउस’वर कधी पोलिसांची धाड पडते. बंद जाळीच्या गाडय़ातून पकडून नेलेल्यांची दुसऱ्या दिवशी सुटका होते! हे सारं नित्याचंच असतं. पुढे स्टेशनजवळ रिक्षावाल्यांची एकच गर्दी.. आता लोकलमधून पब्लिकचे लोंढे बाहेर पडत आहेत. त्यातच स्टेशनजवळच्या फुटपाथवरच्या त्या देवळाजवळ एक रिक्षा थांबली. रिक्षावाल्यानं उतरून मागच्या सीटच्या पाय ठेवण्याच्या जागेतून, चाकाच्या फळीवर बसलेल्या- कमरेखाली पायांनी अधू असलेल्या – एका कुबड आलेल्या मुलीला फळीसकट उचलून फुटपाथवर ठेवलं. एक पैशाचा डबा तिच्यासमोर उघडून ठेवत तिला मस्करीत म्हणाला, ‘देखा बसंती, मुन्शिपालटीका गाडी भी चक्कर मार रहा है.. तुला बी उचलून गाडीत टाकेल गब्बरसिंग, ‘शोले’सारखा नाचायला लावेल, काचांवर !’ ती भिक्षेकरी पोरगी तशाही परिस्थितीत स्वत:वर हसत म्हणाली, ‘काचांचं सोड, मी चाकांवरबी नाचून दाखवीन.. पण ही असली मुसीबत कोण कशाला उचलील!’                                                                               ‘का? मी नाय रोज उचलून आणतो अन् रातच्याला घरी नेऊन सोडतो ? आता कायमची घेऊन जायला सांगतो गब्बरसिंगला.. मला नको नसती ब्याद!’ तो हसत म्हणाला.
‘ते तुला नाय जमणार भाई. आधी रिक्षाचा धंदा कर. पैका कमव घरच्या लेकरांसाठी.. मला नको भीती घालू! अन् हे बघ, रातच्याला उशीर नको करू. घरला जायला उशीर झाला की लय भूक लागतीय.. अन जाताना चायवाल्याला चा सांगून जा! चल भाग अब, मेरेबी धंदेका टाईम है..’
रिक्षावाल्यानं रिक्षा सुरू केली अन रिक्षेत गाणं सुरू झालं..‘आसमांपे है खुदा, और जमींपे हम, आजकल वो इस तरफ देखता हैं कम..!’ दूर जाणाऱ्या त्या रिक्षाच्या मागे लिहिलं होतं, ‘खुदा हाफिज!’
पंचावन्न-साठ वर्षांपूर्वीच्या ‘फिर सुबह होगी’ सिनेमातल्या त्या गाण्यावरून, राजकपूरच्याच ‘श्री ४२०’ मधला सुरवातीचा संवाद आठवला.. खेडवळ पण पदवीधर राजकपूर ‘इमान’दारी बद्दल कमावलेलं मेडल घेऊन कामाच्या शोधात मुंबईला आल्यावर एका म्हाताऱ्या लंगडय़ा भिकाऱ्याला मेडल दाखवत कामधंद्यासाठी विचारतो, तेव्हा तो भिकारी कुत्सितपणे हसत म्हणतो, ‘इमानकी यहां कोई किमत नही.. इससे कुछ नही होनेवाला यहां! ये बंबई है भाय, बंबई! चल बाजू हट..धंदेका टाईम है भाय, धंदेका!’
साठ वर्षांत मुंबई उभी आडवी वाढली.. पण बदलली कधीच नाही! पुढच्याच कोपऱ्यावर फुटपाथवर एका खांबाशी खोक्यावर बसून एक बाई तिच्या समोरच प्लास्टिक स्टुलावर बसलेल्या तरुणीच्या हातावर मेंदी काढत होती. खांबाला टेकून तिची एक कुबडी उभी ठेवलेली, ती एका पायानं अधू होती. तिकडे मुन्शिपालटीची गाडी येऊन थांबली.
‘काय गाडी दिसली नाय का ? मेंदी बेच रही है ना?’                                                                         ‘मेहंदी निकाल रही हूं सिर्फ.. इसमे मैने क्या गुन्ना किया? उपरवाला सब देख रहा है!’
‘चल रे.. उचल तो मेंदीचा बॉक्स.’ त्याला थांबवून, ती लेडी कॉन्सटेबल तिच्याकडे हात करत म्हणाली, ‘जाऊ द्या साहेब तिला, ती अपंग आहे!’  त्या लेडी कॉन्सटेबलचा हात मेहंदीने पूर्ण भरलेला होता! गाडी पुढे गेली..आज कल वो इस तरफ देखता हैं कम..पासून.. उपरवाला सब देख रहा है!.. सगळे रंग-ढंग इथे आहेत! उपरवाला देखे या ना देखे.. बंबई तो कभी रुकती नाही, हमेशा चलती- दौडती रहेती है..!
परत फिरताना जंक्शनवरचा डोंबाऱ्याचा खेळ अजून चालूच असतो. गर्दी दुपटीनं वाढलेली असते. फक्त आता आयटेम बदललेला असतो. दोरीवरची तोल सावरत चालण्याची कसरत संपून आता, पेटत्या िरगमधून झेप घेण्याचा खेळ चालू झालेला असतो. बाप पूर्वीच्याच बेफिकिरीनं पोरीला पेटती िरग उभी धरून, मधून झेप घ्यायला सूचना देत होता.. मुलगी तीच, तिची जिद्द तशीच..आई पोरीला धीर देत दुसऱ्या टोकाला उभी. तिच्या कडेवरचं बाळ मात्र आता रडत नव्हतं. भेदरलेल्या नजरेनं िरगच्या ज्वाळांकडे पाहात होतं. पुढं आयुष्यात कसं जगावं लागणार आहे, याचा त्यावरून अंदाज येण्याचं त्याचं वय नव्हतं.. पण कदाचित त्याच्या जगण्याच्या शिकवणीचा तो पहिला धडा असावा ! स्पीकरवर आता गाणं देखील बदललेलं असतं..
‘ऐ दिल, है मुश्कील.. जीना यहाँ,
जरा हटके, जरा बचके.. ये है बॉम्बे मेरी जान!’
साठ वर्षांपूर्वीच्या – स्वातंत्र्यानंतरच्या मुंबईचं चित्र उभं करणारं – साठ वर्षांनंतरच्या आजच्या मुंबईला देखील फिट्ट बसणारं.. हे अजरामर गाणं ! ये है बॉम्बे..मेरी जान!

मराठीतील सर्व मनातलं कागदावर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yeh hai bombay meri jaan
First published on: 16-01-2016 at 01:02 IST