गावात पाणी योजना आणायची असो, दारूबंदी करायची असो की संयुक्त घर योजना राबवायची असो. शारदा पवार या सरपंच तरुणीला आपल्याच गावातल्या पुरुषांशी संघर्ष करावा लागला. प्रसंगी शिवीगाळही झाली, धमक्याही मिळाल्या, परंतु त्यांनी पुरुषी वर्चस्व मोडून काढलं आणि गावाला प्रगतिपथावर नेलं.
शारदा यांच्या या धाडसाविषयी..
जावली तालुक्याचं तहसीलदार कार्यालय.. सभोवताली दुंद, निजरे गावातील पुरुष ग्रामस्थांचा जमलेला मोठा जमाव.. अगदी हमरीतुमरीवर आलेला.. सरपंच शारदा पवारांच्या विरोधात घोषणाबाजी चाललेली.. या पुरुषांच्या मनात एकच क्षोभ- ही बाई आपल्या वरचढ होतेच कशी? त्यामुळे तिच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात पाणी योजना येऊच द्यायची नाही, त्याचं श्रेय तिला घेऊ द्यायचं नाही.. या विचाराने तिच्या विरोधात सूर सुरू झालेला.. आपल्या पुरुषी विरोधापुढे या महिलांचं काही चालायचं नाही, या आविर्भावातच ही पुरुष मंडळी.. दुसऱ्या बाजूला निर्भीड शारदा शांत उभ्या. त्यांच्या बाजूने गावातील फक्त मोजकीच मंडळी, त्यातही महिलांचाच भरणा अधिक. आपण सत्याच्या मार्गाने जात आहोत, गावाचं भलं करत आहोत, हे शारदांना पक्कं माहीत होतं. त्यामुळे ब्रह्मदेवानं जरी या पाणीयोजनेला विरोध केला, तर त्याचाही विरोध मोडून काढू आणि गावात पाणी योजना आणूच, असा शारदांचा दृढ निश्चय होता.. पुरुषांच्या या विरोधाला न बधता त्यांनी तहसीलदारालाच थेट ठणकावलं, ‘माझं गाव पाण्यासाठी तडफडतंय. काहीही झालं तरी मी गावात पाणीयोजना आणणारच. यासाठी मला मंत्रालयापर्यंत जावं लागलं तरीही चालेल.’ त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानं सारी पुरुष मंडळी गपगार झाली. ही बाई कोणत्याही विरोधाला बधणारी नाही, हे लक्षात येताच तहसीलदारांनाही नमतं घ्यावं लागलं आणि त्यांना निजरे गावातील पाणीयोजनेला मंजुरी देणं भाग पडलं, इतकंच नव्हे पुढे त्यांनी या पाणीयोजनेच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी मदतही केली.
अवघ्या तिशीत निजरे गावाचं सरपंचपद मिळविलेल्या शारदा विनायक पवार यांचा आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळातला हा सर्वात मोठा विजय. हा प्रसंग आठवला की त्यांना अनेकदा स्वत:च्या त्यावेळच्या धिटाईबद्दल आश्चर्य वाटतं!
ही पाणीयोजना त्यांनी गावात आणली खरी पण प्रत्यक्षात ती राबविताना त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. त्यात आघाडीवर होती राजकारणात सक्रिय असलेली त्यांच्याच पक्षातील मंडळी. पाणीयोजनेचं काम ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आलं होतं. या योजनेअंतर्गत गावात सार्वजनिक ठिकाणी नळ देण्याची योजना होती. यावेळी माजी सरपंचाने मूळ आराखडय़ात बदल करून स्वत:च्या घरासमोर नळ करून घेतला. शारदांनी त्यांच्या या अरेरावीला कडाडून विरोध केला. ग्रामसदस्यांना बरोबर घेऊन त्यांनी या माजी सरपंचाला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ केली. त्यांच्या सोबत असलेले उपसरपंच व अन्य पुरुष मंडळींना गुंडांकरवी मारहाण केली. माजी सरपंच व त्याच्या गुंडांना घाबरून कोणीही पोलीस तक्रार करण्यास धजेना. यावेळी गावातल्यांनीही शारदा यांनाच नमतं घ्यायला सांगितलं. मात्र, त्या या गावगुंडांना बधल्या नाहीत. मारहाण करणाऱ्या १४ जणांविरोधात त्यांनी एकटीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि प्रस्थापितांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, हेच दाखवून दिलं.. या प्रसंगाने शारदांना त्यांच्यातल्या शक्तीचं प्रत्यंतर आलं आणि त्यांनी हीच शक्ती वेळोवेळी आपल्या गावाच्या भल्यासाठी वापरली.
मुंबईत हातगाडी चालवून गावाकडल्या आपल्या कुटुंबातील सहा जणांचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या सामान्य माणसाच्या मुलीचा सरपंचपदापर्यंतचा प्रवास निश्चितच साधासोपा नाही. घरात अठराविशे दारिद्रय़. परिणामी शारदांना बारावीपर्यंतच शिक्षण घेता आलं. मग पुढचा टप्पा लग्नाचा. सातारच्या निजरे गावातील विनायक पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. समाजकारणाची आवड असल्याने लग्न झाल्यावरही घरात स्वस्थ बसणं शारदांना पटणारं नव्हतं. गावातील महिलांच्या प्रगतीसाठी सकारात्मक काम करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होताच. त्यांनी तो घरात बोलून दाखवला. यावेळी कोणतीही इयत्ता न शिकलेल्या त्यांच्या सासूबाईंचा त्यांना अनपेक्षितपणे पाठिंबा मिळाला. त्यामुळे तडफदार शारदाताईंना कामाचं बळ मिळालं आणि त्यांनी घराबाहेर पाऊल टाकलं.
त्यावेळी गावातील महिलांचं विश्व हे घर आणि अंगण इतपतच सीमित होतं. गावातल्या देवळाचा रस्ताही अनेकींना माहीत नव्हता. त्यांचे विचार ऐकून घेणं तर सोडाच, त्यांना बोलण्याची संधीही कुणी देत नसे. अशा परिस्थितीत त्यांनी या महिलांमध्ये आत्मविश्वासाची ज्योत जागवली. त्यांच्यातील स्वत्व जागं केलं. आपण एकत्र आलो तर गावात खूप काही सुधारणा घडवून आणू शकतो, हा विश्वास त्यांनी या महिलांना दिला. हे करीत असतानाच दुसरीकडे गावातील पुरुषमंडळी, ही बाई आमच्या बायकांना घेऊन गावात फिरते, घराबाहेर पडण्यास भाग पाडते, ती आमच्या बायकांना बिघडवते, असा कांगावा करू लागली. काही जण शिवीगाळही करू लागले, पण शारदा त्यांना बधल्या नाहीत. आपलं काम सुरूच ठेवलं. महिलांना विश्वासात घेतलं. दरम्यान, महिलांनाही त्यांचं म्हणणं, विचार, काम पटत होतं. त्यांचा मोठा आधार वाटे. विशेषत: वृद्ध महिलांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. शारदांनी या महिलांना पैशांची बचत करून चार पैसे गाठीशी कसे ठेवता येतील, हे शिकवलं. बॅंकेच्या व्यवहाराची माहिती करून दिली. आर्थिकदृष्टय़ा सक्षम केलं. आपल्याही हातात चार पैसे खेळतात, त्यातून आपल्या गरजा भागतात, हे लक्षात आल्यावर महिलांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला. याच आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांना एकत्र आणून ‘जिजामाता महिला मंडळ’ स्थापन केलं. शकुंतला भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गट स्थापन केला. त्यांच्या कामाला महिलांचा वाढता पाठिंबा पाहाता कांगावाखोर पुरुष मंडळींची तोंडं आपोआप बंद झाली, उलट त्यांचं काम पाहून काही सुशिक्षित पुरुष मंडळी त्यांच्या मदतीला आली. एक स्त्री असून गावातली चांगली कामं करतेय, हा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला.
माहिलांसाठी काम करताना आपण सक्रिय राजकारणात जावं, हा विचार मनात घोळत होता, पण पक्कं होत नव्हतं. त्याच दरम्यान एक घटना घडली. त्यांचे सासरे एका पक्षाचे खंदे कार्यकर्ते. त्यांना सरपंचपदासाठी उभं राहायचं होतं, पण त्यांना नेमकं डावललं गेलं. नेमकी हीच बाब शारदांना खटकली. प्रामाणिकपणे काम करूनही सासऱ्यांना डावलल्याचं त्यांच्या जिव्हारी लागलं. आणि त्याचवेळी त्यांनी ठरवलं, राजकारण हेच आपलं कार्यक्षेत्र! हे ठरवूनच त्या थांबल्या नाहीत, त्यांनी सासरे व नवऱ्याला ठणकावून सांगितलं, ‘पुढच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मी उभी राहाणार आहे, पण तुम्ही दोघांनी माझ्या कारभारात अजिबात लुडबुड करायची नाही. मी जिंकले तर माझा कारभार मीच करणार.’ अर्थात, त्यांच्या पक्क्या निर्धारापुढे त्या दोघांचंही काही चाललं नाही. उलट त्यांचा पाठिंबाच मिळाला.
शारदांचं काम सुरू झालं. सुरुवातीला पुरुषांची स्त्रीद्वेष्टी मानसिकता नाहीशी करायची होती. या मानसिकतेचा बीमोड करायचाच या उद्देशाने त्यांनी गावात पथनाटय़, दारूबंदी, स्त्री-भ्रूणहत्या यांसारखे जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. त्यांच्या या कार्यक्रमांमध्ये लहान मुलींपासून ते ६० वर्षांच्या वृद्ध महिलांचाही समावेश असतो.
त्यानंतरचं महत्त्वाचं काम म्हणजे गावातली दारूबंदीची मोहीम. ती हाती घेतल्यावर ज्यांची दारूची दुकानं होती त्यांच्याकडून त्यांना त्रासही सहन करावा लागला. ज्या महिला या मोहिमेत सहभागी होत, त्यांच्या नवऱ्यांना ही दुकानदार मंडळी फितवत. ही नवरेमंडळी घरी जाऊन त्या महिलांना शिवीगाळ करत, मारत. त्या महिला पुन्हा दोन पावलं मागे होत. मग शारदाताईंना पुन्हा नव्याने त्या महिलांची मानसिक तयारी करून घ्यावी लागे. हे काम शारदाताईंनी मोठय़ा चिकाटीने केले. एकीकडे त्या स्त्रियांना मानसिक बळ देत राहिल्या आणि दुसरीकडे दारूची दुकानं असलेल्या गावगुंडांशी लढा! यात अखेर त्यांचा विजय झाला आणि गावात दारूबंदी लागू झाली.
२०१० साली निजरे गावातल्या निवडणुकीत शारदांनी बाजी मारली. आणि त्या सरपंच झाल्या. गावात पूर्वी होणाऱ्या ग्रामसभांना महिलांचा सहभाग नसे. शारदा सरपंच झाल्यावर त्यांनी महिलांना ग्रामसभेला आवर्जून बोलावलं. त्यांच्या सरपंचपदाखाली आयोजित केलेल्या पहिल्या ग्रामसभेचा अनुभव त्यांच्या कारभाराविषयी खूप काही सांगून जातो. त्यांना अजूनही ती ग्रामसभा लख्ख आठवते. त्या सरपंच झाल्यावर भरविलेल्या पहिल्या ग्रामसभेत पहिल्यांदाच महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या, बोलत होत्या, आपले विचार मांडत होत्या. परंतु गावातील काही पुरुषांना महिलांनी ग्रामसभेला उपस्थित राहाणं खटकलं. त्यांनी उगाचच जुनी भांडणं उरकून काढली. बायकांकडे हातवारे करत त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. पुरुषांचं हे उद्दाम वागणं शारदांना काही रुचलं नाही. त्यांनी ते खपवूनही घेतलं नाही. त्यांनी तिथल्या तिथे या पुरुषांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. त्यांना ठणकावलं, ‘महिलांकडे हातवारे करून बोलायचं नाही. ही सभ्य लोकांची ग्रामसभा आहे. जे काही बोलायचं आहे ते सभ्यपणे बोला.’ त्यांच्या या अनपेक्षित शाब्दिक हल्ल्याने पुरुष गपगार झाले आणि पुढच्या ग्रामसभा विरोधाविना पार पडल्या.
गावातील पूर्वीच्या ग्रामसभा गावातल्या मूठभर लोकांपर्यंतच मर्यादित राहात. शारदाताईंनी मात्र गावभर फिरून गावातल्या सर्वाना ग्रामसभेला आवर्जून बोलावलं. ग्रामसभेचं महत्त्व पटवून दिलं. ग्रामसभेचं व्हिडीओ शूटिंग होऊ लागलं. तळागाळातील लोकांपर्यंत ग्रामयोजना पोहोचण्यासाठी नवनवीन योजनांची लाऊडस्पीकरवर घोषणा होऊ लागली. त्याचा फायदा असा झाला की, लोक आपल्या न्याय्य-हक्काबाबत सजग झाले. महिला आपल्या हक्कांबाबत सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनाही जाब विचारू लागल्या. त्यामुळे ही मंडळीही सरकारी योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याला प्राधान्य देऊ लागली.
शारदा यांच्या कारकिर्दीतलं आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे त्यांनी गावात राबवलेली ‘संयुक्त घरमालकी योजना’. केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली. राहते घर नवरा-बायको या दोघांच्या नावावर करणारी ही योजना गावातील स्त्रियांसाठी खूपच मोलाची ठरणार होती. आपल्या गावातील महिलांना या योजनेचा फायदा करून द्यावा यासाठी शारदांनी प्रयत्न सुरू केले. ही योजना राबविल्यानंतर त्यांना स्त्रियांना आपल्या हक्काचं घर मिळालं की, त्यांचा आत्मविश्वास किती दुणावतो याचा प्रत्यंतर आला. बायकोशी भांडण झालं की अनेकदा नवरेमंडळी ‘माझ्या घरातून निघून जा,’ अशी धमकी देत. या घरातून निघून गेलं की आपल्याला निवाऱ्यासाठी दुसरं घर नाही, याची पक्की जाणीव असलेल्या या महिला गप्प राहात. पुरुषांचा मार सहन करीत. परंतु या योजनेमुळे आता त्या नवऱ्यालाच ठणकावून सांगतात, ‘हे घर माझंही आहे. निघून जायचं असेल तर तुम्हीच निघून जा. मी इथून जाणार नाही.’
या योजनेमुळे महिलांमध्ये कमालीचा आत्मविश्वास आला. घर विकायचं असेल तर घरातल्या महिलेचीही स्वाक्षरी आवश्यक असल्याने पुरुषमंडळी सरसकट एकटय़ाच्या विचाराने घर विकू शकत नाहीत. पत्नीलाही विश्वासात घेणं जरुरीचं झालं. गावातील महिलांना विशेषत: विधवांसाठी कुठल्याही उद्योगासाठी वा कामासाठी कर्ज घेताना आपल्या नावावरील घर, हा मोठाच आधार झाला आहे. संयुक्त घरमालकी योजनेनंतर ‘संयुक्त जमीन मालकी’ ही योजना राबविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शेती संयुक्तपणे दोघांच्या नावावर झाली की महिलांना मोठाच आधार मिळेल, असा विश्वास त्यांना वाटतो. ‘संयुक्त घरमालकी’ची योजना राबवताना या योजनेचा त्यांनी सखोल अभ्यास केला. यातूनच शारदा आणि संगीता विंधे यांची संयुक्तपणे ‘घर दोघांचे’ ही पुस्तिका आकाराला आली. ही पुस्तिका म्हणजे संयुक्त घरमालकी योजनेचा उत्कृष्ट परिपाठच आहे. ही पुस्तिका अन्य सरपंचांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे. केवळ आपल्याच गावापुरती ही योजना मर्यादित न राहाता ती अन्य गावांमधूनही यशस्वीपणे राबविण्यासाठी त्या आग्रही आहेत.
राजकारणाच्या माध्यमातून आपण गावाचा कायापालट करीत आहोत, याबाबत शारदाताई खूपच समाधानी आहेत. पण त्यातही त्यांना आपला जन्म खऱ्या अर्थाने सफल झाल्यासारखा वाटतो तो गावातील दोन गटांमध्ये झालेल्या मनोमीलनामुळे. त्यांच्या गावात गेली २५-३० वष्रे दोन गटांमध्ये भांडणं सुरू होती. त्यामुळे गावात तंटे हे ठरलेलेच. परंतु शारदाताईंच्या कामांमुळे या गावाचा विकास साध्य होईल, या विश्वासातूनच हे दोन्ही गट शारदाताईंच्या सरपंचपदाच्या निवडणुकीला एकत्र आले आणि गाव पुन्हा एकदा गुण्यागोविंदानं नांदू लागलं. सण-उत्सव एकत्रपणे सुरू झाले.
एक सामान्य मुलगी ते सरपंच या प्रवासात त्यांना स्थानिक राजकारण, पुरुषप्रधान समाजव्यवस्था, पुरुषीवृत्ती या काटेरी मार्गावरून जावं लागलं, पण त्यांनी आपली वाट सोडली नाही. एका दृढनिश्चयाने त्या मार्गक्रमण करीत आहेत. शारदाताईंच्या आजवरच्या प्रवासात त्यांच्या सासूबाईंनी दिलेला पाठिंबा त्यांना सर्वात मोलाचा वाटतो. ‘तू शिकली आहेस. तू राजकारणात पुढे जा. लोकांचं भलं कर,’ या त्यांच्या शब्दांतूनच त्यांना कामाचं, लढण्याचं बळ मिळतं, असं त्या प्रामाणिकपणे नमूद करतात. सरपंचपदावरून काम करताना त्यांच्यात इतका आत्मविश्वास आलाय की, हाच अनुभव गाठीशी घेऊन आता त्यांना आमदारकीचा पल्ला गाठायचाय.
राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, गावगुंड, आपमतलबी माणसांचं जग, असंच सामान्यांचं मत बनलं आहे, परंतु प्रामाणिक आणि सचोटीने काम करणाऱ्या शारदांकडे पाहिलं की, आपल्यालाही आशेचा किरण दिसतो.
lata.dabholkar@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2013 रोजी प्रकाशित
निर्भीडतेच्या वाटेवर
गावात पाणी योजना आणायची असो, दारूबंदी करायची असो की संयुक्त घर योजना राबवायची असो.

First published on: 05-10-2013 at 01:15 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manly sharda pawar